Tuesday 20 December 2016

महाआरोग्य शिबीर

नाशिकमध्ये एक जानेवारीला महाआरोग्य शिबीर
सर्व यंत्रणांनी सुयोग्य नियोजन करावे-पालकमंत्री गिरीष महाजन

         
नाशिक दि.20 :-  येत्या 1 जानेवारी रोजी नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदान येथे जिल्ह्यातील विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शासन, प्रशासन, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटल्स, आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, वैद्यकीय संघटना आदींनी समन्वयाने सुयोग्य नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सभागृहामध्ये श्री. महाजन यांनी महाआरोग्य शिबीराच्या आयोजनासंदर्भात आज विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, अपूर्व हिरे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री महाजन म्हणाले, महाआरोग्य शिबीरापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत आणि शहराच्या प्रत्येक प्रभागात ज्या नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या आहेत आणि ज्यांच्यावर तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकापातळीवरील आरोग्य केंद्रांत उपचार शक्य नाहीत, अशा रुग्णांना नाशिक येथे आणून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.  राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत नाशिक शहरातील 30 हॉस्पिटल्सचा समावेश आहे. त्यांच्यासह शहरातील इतर मोठी हॉस्पिटल्स, वैद्यकीय महाविद्यालये, इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा यांचे प्रतिनिधी, इतर पॅथींच्या संघटनांचे प्रतिनिधी यात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गाव व तालुका पातळीवर आरोग्य यंत्रणांनी आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत नियोजन करुन रुग्णांची माहिती जिल्हा यंत्रणेकडे पाठवावी. महानगरपालिकेच्या क्षेत्रातील विविध प्रभागातील अशा गरजू नागरिकांची माहितीही येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोळा करुन त्यांना या महाआरोग्य शिबीरात उपचार मिळतील हे पाहावे, अशा सूचना यावेळी श्री. महाजन यांनी दिल्या.
आदिवासी भागातील गरजू रुग्णांना खऱ्या अर्थाने चांगले उपचार मिळण्यासाठी या शिबिराचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करुन सर्व यंत्रणांनी त्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. या महाआरोग्य शिबिरासाठी राज्यातील नामवंत डॉक्टर्स उपस्थित राहून ते स्वत: याठिकाणी गरजू रुग्णांवर उपचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाआरोग्य शिबीरापूर्वी संपूर्ण जिल्ह्यात 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत अटल आरोग्य सप्ताह राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी शहरातील महत्वाच्या वैद्यकीय संघटना तसेच डॉक्टर्स आणि सामाजिक संघटनांसोबत 21 डिसेंबर रोजी सकाळी 10-30 वाजता बैठक बोलावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी यावेळी दिली.  
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अधिकाधिक नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी नियोजन केल्याचे श्री. शंभरकर यांनी यावेळी सांगितले. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून नियोजन करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगदाळे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाकचौरे यांनी दिली.

----

No comments:

Post a Comment