Saturday 3 December 2016

कॅशलेस व्यवहार

 शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य द्यावे
                 -विभागीय आयुक्त श्री.डवले

नाशिक दि. 03  नोटाबदलीनंतरच्या काळात आता सर्वांनी कॅशलेस बॅंकींग व्यवहाराकडे वळले पाहिजे. सर्वप्रथम शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी या कॅशलेस बॅंकींग व्यवहाराचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात करुन इतर नागरिकांनाही त्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले.
विभागीय आयुक्तालयात सर्व शासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी कॅशलेस व्यवहारासंदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अपर आयुक्त जे.टी. पाटील, उपायुक्त (महसूल) डॉ. संजय कोलते, उपायुक्त (आस्थापना) दत्तात्रय बनकर, उपायुक्त (विकास) एन.पी. मित्रगोत्री, तहसीलदार श्रीमती मंजुषा घाटगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना कॅशलेस व्यवहाराचे फायदे सादरीकरणाद्वारे समजावून सांगण्यात आले. पेटीएम अथवा एसबीआय बडी ॲप कसे डाऊनलोड करावे, त्यावर माहिती कशी भरावी, ते ॲक्टीवेट कसे करावे, आदींची माहिती या सादरीकरणातून देण्यात आली.
अधिकाधिक शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी दैनंदिन व्यवहारात कॅशलेस व्यवहारांसाठी या ॲपचा उपयोग करावा, असे आवाहन यावेळी श्री. डवले यांनी केले. नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये आणि तहसील कार्यालये येथील अधिकारी-कर्मचारी यांनाही प्रशिक्षण देऊन कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रेरित केले जाणार असल्याचे ते म्हणाले.
उपायुक्त डॉ. कोलते यांनी सादरीकरणाद्वारे उपस्थितांना या ॲपची तसेच त्याद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची माहिती दिली.

***

No comments:

Post a Comment