Friday 2 December 2016

कालवा सल्लागार समिती बैठक

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पाणी वाटप निश्चित

          नाशिक दि.2 :- राज्याचे वैद्यकीय शिक्षण  आणि जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी कालव्याद्वारे होणारे पाणी वाटप निश्चित करण्यात आले.
          बैठकीस  जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुंबळे, आमदार बाळासाहेब सानप, डॉ.राहुल आहेर, डॉ.अपुर्व हिरे, राजाभाऊ वाजे, जे.पी.गावीत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर,  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव आदी उपस्थित होते.
           गंगापूर धरणाखालील डाव्या कालव्यातून रब्बी हंगाम व उन्हाळी हंगामाकरिता प्रत्येकी 0.76 असे एकूण 1.52 टीएमसी पाणी वापराचे नियेाजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन 15 ते 31 डिसेंबर, दुसरे 15 ते 29 जानेवारी 2017 आणि तिसरे आवर्तन 14 ते 27 फेब्रुवारी 2017 या कालावधीत देण्यात येणार आहे. उन्हाळी हंगामासाठी पहिले आवर्तन 21 मार्च ते 6 एप्रिल, दुसरे 21 एप्रिल ते 5 मे आणि तिसरे आवर्तन 21 मे ते 2 जून या कालावधीत देण्यात येणार आहे.

          कडवा कालव्यातून रब्बी हंगामासाठी 1.270 टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. कालवा वहन व्यय कमी करण्यासाठी सिंचनाच्या आवर्तनाचेवेळीच बिगरसिंचन आवर्तन देण्यात येणार आहे. पहिले आवर्तन 25 डिसेंबर 2016 ते 14 जानेवारी 2017  तर दुसरे आवर्तन 9 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2017 या कालावधीत देण्यात येणार आहे.
          चणकापुर प्रकल्पांतर्गत गिरणा डावा कालव्यातून रब्बी हंगामासाठी सिंचनाकरिता 0.23 टीएमसी पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे. कालव्यावरील एक हजार हेक्टर क्षेत्राकरिता एका आवर्तनाद्वारे प्रवाही सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे.
          पालखेड उजव्या व डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी सिंचनाकरिता  2.294 टीएमसी आणि  उन्हाळी हंगामासाठी 0.190 टीएमसी पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे.  तसेच बिगर सिंचनाकरिता डाव्या कालव्यातून दोन आवर्तनाद्वारे 0.400 टीएमसी आणि उजव्या कालव्याद्वारे 1.350 टीएमसी पाणी वापराचे नियोजन करण्यात आले आहे.
          डाव्या कालव्याद्वारे 10 डिसेंबर 2016 ते 10 जानेवारी 2017 आणि 5 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2017 अशा दोन आवर्तनाद्वारे तर उजव्या कालव्याद्वारे 5 ते 20 डिसेंबर 2016, 1  ते 20 जानेवारी 2017 आणि 10 ते 28 फेब्रुवारी 2017 अशा तीन आवर्तनात पाणी देण्यात येणार आहे.
          ओझरखेड डाव्या कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी  दोन आवर्तनात 1.628 टीएमसी पाणी वापराचे नियोजन आहे. पाणी वाटप संस्थांच्या मागणीनुसार पहिले आवर्तन 25 डिसेंबर पासून तर दुसरे मार्च 2017 अखेर देण्यात येणार आहे.
कालव्याऐवजी पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचा निर्णय-पालकमंत्री महाजन

          कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी देताना मोठ्या प्रमाणात पाण्याचा व्यय होत असल्याने यापुढे नवे प्रकल्प उभारताना कालव्याऐवजी बंदीस्त पाईपलाईनद्वारे सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने यापूर्वीच घेतला असल्याची माहिती पालकमंत्री महाजन यांनी यावेळी दिली.
          ते म्हणाले, प्रकल्पात पाणीसाठा मर्यादीत असताना पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्य देणे महत्वाचे आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी करून सिंचनासाठी अधिक पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शहरांतील पाण्याची मागणी पुर्ण करताना शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक व्हावी, असा शासनाचा प्रयत्न आहे. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रीया करून ते शेतीसाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा प्रकारे पाण्याची बचत झाल्यास शेतीसाठी ते फायदेशीर ठरेल, असेही श्री. महाजन म्हणाले.

          बैठकीस विविध पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment