Thursday 29 November 2018

आरोग्य शिबिर


आरोग्य शिबिरासाठी एक लाख रुग्णांची प्राथमिक तपासणी

 नाशिक दि.29 :- पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुरी येथे 2 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या अटल ग्रामीण आरोग्य शिबिरासाठी आतपर्यंत एक लाखापेक्षा अधिक रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात आली असून 36 हजार रुग्णांना शिबिरासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
          महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठांतर्गत विविध आठ महाविद्यालयाचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करीत आहेत. रुग्णांच्या प्राथमिक तपासणीनंतर कळवण, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि बागलाण अशा पाच तालुक्यातील 48 प्राथमिक आरोग्य केंद्र, 8 ग्रामीण रुग्णालय आणि 2 उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची सविस्तर तपासणी करून त्यांना शिबिरासाठी संदर्भित करण्यात येत आहे.

           प्रत्येक तालुक्यात 300 प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स घरोघरी जाऊन तपासणी करीत आहेत. तर आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालात 600 डॉक्टर्सद्वारे तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक  तालुक्यात एक आधुनिक सुविधांनी युक्त दंतवैद्यक फिरते रुग्णालयाची सुविधा करण्यात आली असून दातांचे आजार आणि मुख कर्करोगाविषयी तपासणी करण्यात येत आहे.
          रुग्णांची तपासणी आणि बाहेरून आलेल्या डॉक्टरांची गावातच व्यवस्था करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींचे आणि आरोग्य यंत्रणेचे चांगले सहकार्य लाभत आहे. शिबिरात 1500 डॉक्टर्स आणि  चार हजार स्वयंसेवक कार्यरत राहणार आहेत. शिबिराच्या माध्यमातून दातांची कवळी, चष्मे, श्रवणयंत्र, अपंगांची उपकरणे, औषधे मोफत देण्यात येणार आहे. गरजु रुग्णांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
-----

रोजगार मेळावा


रोजगार मेळाव्यात 427 युवकांची प्राथमिक निवड

             नाशिक दि.29 :- दादासाहेब गायकवाड सभागृह येथे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दीनदयाल अंत्यादेय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, नाशिक महानगरपालिका आणि ग्लोबलरिच स्किल ट्रेंनिंग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळाव्यात 427 युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली.
मेळाव्याचे उद्घाटन  जिल्हा उद्योग केंद्राचे माहाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एनयुएलएमचे अधिकारी पल्लवी वक्ते, कौशल्य विकासचे अधिकारी सं.ज्ञा.गायकवाड, श.बा.जाधव, ग्लोबलचे विजय पहारे आदी उपस्थित होते.

मेळाव्यात 35 उद्योग संस्थांनी सहभाग घेतला होता. एकूण 1769 पदांसाठी प्राथमिक निवड करण्यात येणार होती. एकूण 901 व्यक्तिंनी मेळाव्यात नावनोंदणी केली. मुलाखतीनंतर 427 युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी श्री.रेंदाळकर म्हणाले, बदलत्या जगात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असून तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आवडत्या क्षेत्रातील कौशल्य अधिक विकसीत करण्यासाठी  केल्यास रोजगार मिळविण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. मुलभूत शिक्षण घेत असतांना नवे ज्ञान आणि तंत्रज्ञान प्राप्त करणे गरजेचे  आहे. मिळालेल्या ज्ञानामुळे भविष्यात येणाऱ्या संधीवर मात  करणे शक्य होते, असे त्यांनी सांगितले.    
          प्रास्ताविकात  श्री.गायकवाड यांनी मेळाव्याविषयी माहिती दिली आणि  तरुणांना उद्योजक होण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
00000

Tuesday 27 November 2018

सिंचनासाठी मागणी


सिंचनासाठी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
          नाशिक दि.27 :-  उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत असलेल्या ओझरखेड डावा कालवा, पुणेगांव डावा कालवा तसेच करंवजण, वाघाड, ओझरखेड, तिसगांव व पुणेगाव धरणाच्या फुगवट्यातील  आणि जांबुटके लघुप्रकल्पातील पाण्याचा लाभ  घेणाऱ्या पाणी वापर संस्था आणि   शेतकऱ्यांनी आपले मागणी अर्ज 30 नोव्हेंबर 2018 पूर्वी दाखल करावे, असे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.
          जलाशयात उपलब्ध  पाण्यातून बिगर सिंचन आरक्षणाचे पाणी  वजा जाता उर्वरित पाणी हे 2018-19 रब्बी हंगाम 15 ऑक्टोबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2019 मध्ये संस्थेच्या देय पाणी कोट्यातून निर्धारित करुन मोठ्या प्रकल्पांसाठी दोन आवर्तनात आणि लघु प्रकल्पांसाठी एक आवर्तनात सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दीर्घ मुदतीच्या पाणी वापर संस्थांना रब्बी हंगामात संरक्षित सिंचनाकरीता विहीरीच्या पाण्याची जोड असणाऱ्या उभ्या पिकांसाठी दोन आवर्तनात सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
 अधिक पाणी लागणाऱ्या पिकास पाणी पुरवठा करण्यात येणार नाही.त्यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी  संबंधीत  लाभधारकाची राहील. पाणी वापर संस्थांनी आपले नमुना नंबर 7 चे पाणी मागणी अर्ज 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत नजीकच्या शाखा कार्यालयात सादर करावे.
पाणी वापर संस्थांनी त्यांची थकबाकी भरल्याशिवाय पाणी मागणी अर्ज मंजूर केला जाणार नाही. संस्थांनी त्यांच्या हद्दीतील शेतचाऱ्या सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. नादुरूस्त शेतचाऱ्यातून पाणी पुरवठा केला जाणार नाही.शेतचारी अभावी पाणी न मिळाल्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नाही.
 नियमाप्रमाणे मागणी न करता पिकास पाणी घेतलेले आढळल्यास पाणी वापर अनधिकृत समजून उभ्यापिकाच्या क्षेत्राचा अनधिकृत पाणी वापराचा पंचनामा करण्यात येईल. मंजूर उपसा धारकांव्यतिरिक्त इतरांनी इलेक्ट्रीक मोटार,ऑईल इंजिन अथवा पाईप लाईनने पाणी घेतल्यास महाराष्ट्र सिंचन कायद्यानुसार साहित्य जप्त करून कार्यवाही करण्यात येईल.
 उपलब्ध  पाण्यापेक्षा पाणी मागणी जास्त असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे बंधनकारक राहील. शेतकऱ्यांनी अर्जासोबत चालू वर्षाचा सातबारा उतारा जोडणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर आलेले अर्जाचा विचार केला जाणार नाही. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून कृषि उत्पादन वाढवावे, असे आवाहन गा.मो.बाविस्कर, उपकार्यकारी अभियंता पालखेड पाटबंधारे विभाग नाशिक यांनी केले आहे.
00000

अटल आरोग्य शिबिर


नांदुरी येथे होणाऱ्या आरोग्य शिबिराच्या जागेची पाहणी

       नाशिक दि.27- जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक संजय दराडे  आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी नांदुरी येथे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 2 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या अटल आरोग्य शिबिराच्या जागेची पाहणी केली.

           यावेळी अपर पोलिस अधिक्षक निलोत्पल, अपर जिल्हाधिकारीनिलेश सागर, कळवण कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, तहसिलदार महेंद्र चावडे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

       जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी वाहनतळ, भोजनव्यवस्था, रुग्ण तपासणी कक्ष, मुख्य मंडप, नियंत्रण कक्ष आदी व्यवस्थेबाबत माहिती घेतली. रुग्णाच्या नोंदणीपासून तो परत जाईपर्यंत त्यास कोणतीही अडचण येणार नाही यादृष्टीने कक्षांची व्यवस्था करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
          श्री.नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना रुग्णांच्या व्यवस्थेची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हेलिपॅडच्या जागेचीदेखील पाहणी केली. साधारण सहा हेक्टर क्षेत्रात शिबिरासाठीची सर्व व्यवस्था करण्यात येणार आहे.
*****

गोवर रुबेला लसीकरण


पोलिओप्रमाणे गोवर व रुबेला रोगालाही हद्दपार करु या - जिल्हाधिकारी


       नाशिक दि.27- सर्वांच्या सहकार्याने 9 महिने ते 15 वर्षांच्या बालकांना गोवर  आणि रुबेला लसीकरण करुन पोलिओप्रमाणे या रोगास हद्दपार करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
          जिल्हा रुग्णालय येथे आयोजित गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते, आरोग्य उपसंचालक डॉ.रत्ना राखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा समन्वयक डॉ.कमलाकर लष्करे उपस्थित होते.

          श्री.राधाकृष्णन म्हणाले, गोवर रुबेलाचे लसीकरण करणे सर्व पालकांना परिस्थितीनुसार शक्य होत नव्हते. परंतु शासनामार्फत राबवण्यिात येणाऱ्या मोहिमेच्या माध्यमातून सर्व बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.  या दोन्ही आजारामुळे मुलांच्या सर्वांगीण वाढीवर परिणाम होत असल्याने त्यातून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी मुलांना लस देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

          डॉ.गिते म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक असून बालमृत्यू कमी करण्यासाठी मोहिमेचा निश्चित उपयोग होणार आहे. भविष्यात एकही मुलाला येऊ नये किंवा बालमृत्यू होऊ नये यासाठी सर्वांनी मिळून मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

          जिल्ह्यातून एकूण 21 लाख मुलांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.जगदाळे यांनी दिली
          यावेळी बालकांना अंगठ्यावर शाई लाऊन व प्रमाणपत्र देऊन मोहिमेचे व कोल्ड चेनचे (लसीकरण वाहतूक ) उद्घाटन करण्यात आले.

तळेगाव येथे मोहिमेचा शुभारंभ

ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितलताई सांगळे यांचे हस्ते दिंडोरी तालुक्यात तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला.
श्रीमती सांगळे म्हणाल्या, आरोग्य विभागाने लसीकरणद्वारे देशातून पोलिओचे उच्चाटन केले आहे. त्याप्रमाणे पालकांनी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेला प्रतिसाद दिल्यास या आजाराच्या दुष्परिणामापासून बालकांना वाचविता येईल. जिल्ह्यातील मातांनी मुलांच्या  लसीकरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.


डॉ. गीते म्हणाले, शिक्षक  आणि पालकांनी स्वतः पुढाकार घेऊन परिसरातील  आणि गावातील मुला-मुलींना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे. गोवर रूबेला मोहीमेमध्ये आपल्याला शंभर टक्के मुलांचे लसीकरण करावयाचे आहे यादृष्टीने आरोग्य यंत्रणेने कार्य करावे, आवाहन त्यांनी यावेळी  केले.
************

Monday 26 November 2018

जनजागृती रॅली


  लसीकरण मोहिमेबाबत जागृतीसाठी रॅलीचे आयोजन

       नाशिक दि.26- गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेतर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे रॅलीचा शुभारंभ  जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती डॉ.यतीन्द्र पगार यांच्या हस्ते करण्यात आला.   

       यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, डॉ.रविंद्र चौधरी, डॉ.दावल साळवे,  डॉ.अनंत पवार, डॉ.निखिल सैंदाणे  आदी उपस्थित होते.


       जिल्हा परिषद, गंजमाळ, शालीमार, सीबीएस, जुने मेळा स्टँडमार्गे रॅलीचा समारोप जिल्हा शासकीय रुग्णालय येथे झाला. लसीकरण मोहिमेची माहिती देणारा चित्ररथ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे तयार करण्यात आला होता.
----


अटल आरोग्य शिबिर


आरोग्य शिबिरासाठी पूर्वतपासणीला सुरूवात

       नाशिक दि.26- नांदुरी येथे आदिवासी भागातील गरजू रुग्णांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अटल आरोग्य शिबिरासाठी कळवण, बागलाण, देवळा, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यातील आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या पूर्वतपासणीला सुरूवात करण्यात आली. 600 डॉक्टरांमार्फत ही तपासणी करण्यात येत आहे.

       शिबिराच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीस पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेंद्र गिते, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर जिल्हाधिकारीनिलेश सागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डेकाटे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

       बैठकीत रुग्णांची नोंदणी, पूर्वतपासणी, वाहतूक व्यवस्था, भोजन व्यवस्था, शिबीरातील तपासणी, औषध वितरण, रक्तदान, अवयवदान आदी विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
       पूर्वतपासणीला गती देण्याच्या सुचना देताना श्री.राधाकृष्णन म्हणाले, प्रत्येक गरजू रुग्णाला शिबिराचा लाभ होईल यादृष्टीने ग्रामीण भागात शिबिराविषयी माहिती देण्यात यावी. गरजू रुग्णाला चांगली वैद्यकीय सेवा देण्याची ही संधी असून त्यामुळे प्रशासनाविषयी सकारात्मक भावना निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. पाचही तालुक्यातील लोकप्रतिनिधींना देखील शिबिरासाठी आमंत्रीत करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

       गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, महिला बालविकास अधिकारी यांनी परस्पर समन्वयाद्वारे शिबिराची माहिती या भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन डॉ.गिते यांनी केले.
       श्री.नाईक यांनी रुग्णांच्या पूर्वतपासणीबाबत माहिती दिली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी गरजू रुग्णांची माहिती घेण्यात येत असून 600 डॉक्टर्स  प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात रुग्णांची तपासणी करतील. तपासणीनंतर गरजू रुग्णांना शिबिरासाठी संदर्भित करण्यात येईल. रुग्णांवर शिबिरात मोफत उपचार करण्यात येणार आहे.
-----