Saturday 25 August 2018

युवा माहिती दूत


युवा माहिती दूत उपक्रमात नोंदणी करण्याचे युवकांना आवाहन



नाशिक,दि.25 : राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी युनिसेफच्या सहकार्याने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने युवा माहिती दूत हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात महाविद्यालयीन युवकांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
 महाविद्यालयातील विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट आहे.
शासन अनुदानित वैयक्तिक लाभाच्या योजना प्रस्तावित  लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याकरिता त्यांच्याशी थेट संपर्क साधण्याची आवश्यकता असते.  दारिद्र्यरेषेखालील तसेच ग्रामीण  वा दुर्गम भागातील अशिक्षित व अर्धशिक्षित  लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्यासाठी  असलेल्या  विविध योजनांची  माहिती  पोहचविण्याला वृत्तपत्रे, रेडिओ आणि दूरचित्रवाणी वाहिन्या या माध्यमांना मर्यादा येतात. शासकीय योजना प्रस्तावित लाभार्थ्यापर्यंत दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यास राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे साहाय्य घेण्याच्या हेतूने युवा माहिती दूत  हा  उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
योजनेची अंमलबजावणी : प्रत्येक महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांसाठी त्या महाविद्यालयातील अध्यापक वा अध्यापकेतर अधिकारी/कर्मचारी यापैकी एक मार्गदर्शक म्हणून नेमण्यात येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी  विशेष मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून  या मोबाईल ॲप्लीकेशनमध्ये  प्रत्येक  महाविद्यालयातील  मार्गदर्शक, समन्वयक आणि सहभागी युवक यांचे अकाऊंट असेल.
 महाविद्यालयातील  विद्यार्थी माहितीदूत होण्यासाठी   स्वत:हून  या  ॲप्लीकेशनवर  स्वत:च्या  नावाची  नोंदणी करतील.  युवकांनी प्रस्तावित लाभार्थ्यांना कोणत्या योजनांची माहिती द्यावी याकरीता तपशिल सांगणारा मजकूर/ व्हिडीओ/ एफएक्यू देण्यात आलेला आहे. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, संबंधित शासकीय कार्यालयाचा संपर्क तपशिल असेल.        
प्रस्तावित लाभार्थ्याची भेट घेतल्यानंतर युवा माहिती दूत हे त्या लाभार्थ्यांचा तपशील आपल्या मोबाईलमधील ॲप्लीकेशनमध्ये नोंदवितील या तपशिलानुसार संबंधित योजनांची माहिती ॲप्लीकेशनमधून घेऊन प्रस्तावित लाभार्थ्याना समजून सांगतील. लाभार्थ्यांना हे ॲप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी माहिती दूत मदत करतील. तसेच या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना, उपक्रमांची माहिती लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळणे शक्य होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि माहिती दूत यांमध्ये संदेशांची देवाणघेवाण, प्रशिक्षण,पुनर्विलोकन या ॲप्लीकेशनमार्फत होईल. 
मार्गदर्शक, समन्वयक, माहिती दूत, प्रस्तावित लाभार्थी या सर्वांची नोंदणी मोबाईल क्रमांकाशी निगडीत असेल.
 विविध समाजातील  (शेतकरी, महिला, आदिवासी, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,) असलेल्या वैयक्तिक लाभाच्या किमान 25 ते 30  योजनांचा समावेश या उपक्रमासाठी केलेला असेल.
कार्यपद्धती : जिल्हा माहिती अधिकारी : जिल्हास्तरावर जिल्हा माहिती अधिकारी हे नोडल अधिकारी असतील. मार्गदर्शक : प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शक नेमण्यात येणार आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून हे मार्गदर्शक महाविद्यालयाची नोंदणी करतील. महाविद्यालयातील अध्यापक व अध्यापकेतर अधिकारी यांची मार्गदर्शक म्हणून महाविद्यालय  निवड करतील.  ज्या विद्यार्थ्यांनी माहिती दूत होण्याची ॲपवर इच्छा व्यक्त केली आहे, त्या विद्यार्थ्यांच्या नावाला मार्गदर्शक मंजुरी देतील किंवा नामंजूर करतील.
समन्वयक : शासन यंत्रणेची आणि योजनांची माहिती असलेल्या व समाजसेवेची आवड असलेल्या व्यक्तीची समन्वयक म्हणून निवड करण्यात येणार आहे.
युवा माहिती दूत : या उपक्रमासाठी स्वेच्छेने तयार असलेल्या/ निवडण्यात आलेल्या विद्यार्थी 6 महिन्याच्या कालावधीसाठी राज्य शासनाचे युवा माहिती दूत असतील. या कालावधीत किमान 50प्रस्तावित लाभार्थ्याच्या घरी जाऊन, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी(कुटुंबाला) लागू असणाऱ्या योजनांची माहिती देणार असून योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणाशी संपर्क करावा याबद्दल माहिती दूत यांनी माहिती द्यावी आणि लाभार्थ्यांशी अथवा त्यांच्या परिसराशी निगडित  विकास कामांची माहिती देऊन संबंधितांच्या प्रतिक्रियेची नोंद करतील.
युवा माहिती दूत म्हणून  राज्य शासनाकरिता काम करण्याची महत्त्वाची संधी युवकांना मिळेल. युवा माहिती दूत अशी ओळख राज्य शासनाच्यावतीने त्यांना 6 महिन्याकरिता देण्यात येईल. ठरवून दिलेले काम केल्यानंतर त्यांना शासनाचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
0 0 0


Friday 24 August 2018

ग्रामीण पेयजल योजना



जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून 603 कोटीचा निधी
                  नाशिक दि.24- जिल्ह्यातील  टंचाईग्रस्त असणाऱ्या  गावांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मोठा दिलासा देत या वर्षी  2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये 574 गावांसाठी 82 पाणी पुरवठा योजना मंजूर केल्या आहेत.
  राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेला मार्च 2015 मध्ये केंद्र शासनाने स्थगिती दिली होती. मागील 2 वर्षात केवळ संसद आदर्श ग्राम व गुणवत्ता बाधित गावांमध्येच योजना घेण्याचे केंद्र सरकाचे निर्देश होते. त्यामुळे मागील 2 वर्षामध्ये खूप कमी योजना राज्यामध्ये मंजूर करण्यात आल्या होत्या. ही स्थगिती उठविण्यासाठी श्री.लोणीकर यांनी सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला. याबाबत केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे दिल्लीत जाऊन 23 डिसेंबर 2017 रोजी प्रत्यक्ष भेट घेतली व ही बंदी उठविण्याची मागणी केली.  त्यांच्या  पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने सन 2018-19 मध्ये राज्यातील पाणी पुरवठा योजना घेण्यासाठी परवानगी दिली व त्याप्रमाणे सन 2018-19 चा आराखडा तयार करण्यात आला.
या आराखडयामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी सुचविलेल्या सर्व योजना व जिल्ह्यातील  लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केलेल्या  पाणी पुरवठा योजनांना समाविष्ट करुन  या वर्षी जिल्ह्यातील 574 वाड्या-वस्त्यांसाठी 298 योजनांचा समावेशक असा आराखडा तयार करण्यात आला.  या योजना राबविण्यासाठी एकूण 501 कोटी 86 लक्ष रुपये एवढा अंदाजपत्रकीय खर्च लागणार आहे. यामुळे दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी हा मोठा आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.   या आराखड्यामध्ये मागील चालू असलेल्या योजनांसाठी 10 कोटी 06 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  नवीन व चालू असणाऱ्या अशा 587 गावे/वाड्यांमधील 310 योजनांसाठी एकूण रु. 511 कोटी 92 लक्षचा आराखडा अंतिमत: मान्य करण्यात आलेला आहे.
            या आगोदर जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून 102 गावांसाठी 51 योजना मंजूर केल्या असून त्यासाठी 44 कोटी 22 लक्ष एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.   त्याचबरोबर जिल्ह्यातील पाणी पुरवठा सुयोग्यरितीने होण्यासाठी व जिल्ह्यतील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी श्री.लोणीकर यांच्या सततच्या प्रयत्नांने सर्व प्रलंबीत योजना पूर्ण करण्यात आलेल्या आहेत.  
मागील 4 वर्षाच्या कालावधीत श्री. लोणीकर यांनी पाणी पुरवठा विभागातील कामकाजाला चांगलीच गती देऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, भारत निर्माण योजना या योजनांमध्ये अपूर्ण असलेल्या योजनांना पूर्ण करण्यावर भर दिला. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने गावांसाठी हागणदारीमुक्तीची अट घातली होती. मागील 3 वर्षात स्वच्छ भारत मिशनमध्येही राज्याने अत्यंत उल्लेखनीय काम करुन 31 मार्च 2018 रोजी महाराष्ट्र राज्य हे संपूर्ण हागणदारीमुक्त करुन दाखविले.
 जिल्ह्यातील या हागदारीमूक्त गावांमध्ये झालेल्या शौचालयाच्या बांधकामासाठी उर्वरीत आवश्यक निधी रक्कम रू.  27 कोटी 33 लक्ष रुपये माहे ऑगस्ट 2018 मध्ये मंजूर करण्यात आलेले आहे त्याचे परिणामस्वरुप सन 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल आराखड्यामध्ये सर्व गावे हागणदारीमुक्त झाल्यामुळे  जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांचा समावेश  सन 2018-19 च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखड्यात करण्यात आला आहे.
 याद्वारे जिल्ह्यातील जवळपास सर्वच टँकरग्रस्त गावासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे.  या प्रकारे या वर्षीच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना व स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत बांधलेल्या शौचालयांना निधी असे एकत्रित मिळणून जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून 603 कोटी 47 लक्ष रूपये एवढा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती श्री.लोणीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यासाठी खालीलप्रमाणे तालूकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या योजना खालीलप्रमाणे आहे. 
तालूका
गावे/वाड्या/वस्त्या
योजनेची संख्या
किंमत
बागलाण
55
43
23 कोटी 58 लक्ष       
चांदवड
16
16
10 कोटी 31 लक्ष
देवळा
12
7
7 कोटी 44 लक्ष
दिंडोरी
24
24
17 कोटी 43 लक्ष
इगतपुरी
45
34
42 कोटी 17 लक्ष
कळवण
17
10
8 कोटी 50 लक्ष
मालेगाव
58
10
107 कोटी 81 लक्ष
नांदगाव
82
17
35 कोटी 27 लक्ष
नाशिक
24
21
30 कोटी 95 लक्ष
निफाड
28
24
27 कोटी 67 लक्ष
पेठ
21
21
8 कोटी 99 लक्ष
सिन्नर
41
26
23 कोटी 9 लक्ष
सुरगणा
30
28
10 कोटी 16 लक्ष
त्रिंबक
70
15
16 कोटी 97 लक्ष
येवला
51
2
90 कोटी 76 लक्ष

-----