Tuesday 14 August 2018

भावली वृक्षारोपण


कृषी पर्यटनाला चालना देत भावलीचा विकास-जयकुमार रावल

नाशिक दि.14- भावली धरणाचा निसर्गरम्य परिसर राज्यातील नवे पर्यटनस्थळ म्हणून विकसीत होत असून कृषी पर्यटनाला चालना देत भावली परिसराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले.

इगतपुरी तालुक्यातील भावली येथे  इगतपुरी सिटीझन फोरम आणि महिंन्द्रा ॲण्ड महिंन्द्रातर्फे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे, सहाय्यक अभियंता कौस्तुभ पवार, महिन्द्राचे हिरामण आहेर आदी उपस्थित होते.

श्री.रावल म्हणाले, लोणावळा, महाबळेश्वर, पाचगणी आणि खंडाळाप्रमाणे राज्याला आकर्षित करण्याची क्षमता या परिसरात आहे. येथे बांधकाम वाढविण्याऐवजी हरित विकासाला प्राधान्य देण्यात येईल. पर्यटकांना सफरीचा अधिक आनंद देण्यासाठी एमटीडीसीच्या माध्यमातून बोटींगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच ग्रीन टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 भावली परिसरात पाच लाख वृक्ष लागवड करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 15 हजार झाडे लावण्यात येणार आहे. त्याच्या  संगोपनाची व्यवस्थादेखील करण्यात येणार असल्याने परिसराच्या सौंदर्यात भर पडेल. वृक्षारोपणासाठी  जागेची समस्या असताना जलसंपदा विभागाने जागा उपलब्ध करून दिली. संपुर्ण राज्यात वृक्षारोपण हे जनआंदोलन झाले असून सर्वसामान्यांपासून उद्योगक्षेत्रही यात सहभागी होत आहे, असे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये किल्ल्यांच्या सौंदर्यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
----


No comments:

Post a Comment