Wednesday 1 August 2018

फेक न्यूज कार्यशाळा


माध्यमे आणि प्रशासनातील समन्वय आवश्यक-हर्ष पोद्दार

 नाशिक दि.1- अफवा थांबविण्यासाठी माध्यमे आणि प्रशासनातील समन्वय महत्वाचा असून मजकूराची सत्यता तपासून बातमी दिल्यास समाजासमोर वस्तुस्थिती प्रभावीपणे मांडता येते, असे प्रतिपादन मालेगावचे अपर पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालय आणि नाशिक ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव येथे ‘फेक न्यूज:परिणाम व दक्षता’ या विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला पोलीस उपअधिक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे,सायबर शाखेचे सहायक पोलीस निरीक्ष तुषार आढावा, सायबर तज्ज्ञ तन्मय दिक्षीत आदी उपस्थित होते.

श्री.पोद्दार म्हणाले, मालेगावसारख्या संवेदनशील भागात पत्रकारांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केल्याने समाजात शांतता व सलोख्याचे वातावरण आहे. बातमीतील मजकूर खात्रीलायक आणि वस्तुनिष्ठ असल्यास त्याचा समाजाला उपयोग होतो. याउलट मजकूराची सत्यता न तपासता त्याचा उपयोग झाल्यास त्याचे वाईट परिणाम समाजावर होऊ शकतात. कार्यशाळेच्या माध्यमातून सोशल मिडियाच्या योग्य वापराबाबत  तसेच माध्यमातील मजकूर अधिक विश्वासार्ह करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजात शांतता तसेच कायदा व सुव्यवस्थेची स्थिती राखण्यात जबाबदार पत्रकारितेमुळे प्रशासनाला चांगले सहकार्य मिळते, असेही ते म्हणाले.

श्री.दिक्षीत यांनी समाजमाध्यमे वापरतांना घ्यावयाच्या खबरदारीची माहिती दिली. ते म्हणाले, छायाचित्र आणि व्हिडीओ यांचा वापर करताना आधुनिक तंत्राच्या सहाय्याने त्याची सत्यता पडताळून पाहणे आवश्यक आहे. तसेच आपली ओळख दर्शविणारा मजकूर सार्वजनिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. अफवा पसरू नये यासाठी अधिकृत संकेतस्थळे आणि ॲपचा उपयोग करावा. संवाद साधतांना समाजमाध्यमाऐवजी ई-मेलचा उपयोग अधिक सुरक्षित आहे,असे त्यांनी सांगितले. व्हॉट्सॲपने अफवा रोखण्यासाठी नवे फिचर्स दिले असल्याचे ते म्हणाले.

श्री.आढाव यांनी आर्थिक व्यवहार करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती दिली. वैयक्तिक माहिती मोबाईलवरून अनोळखी व्यक्तीकडे देऊ नये. चुकून माहिती दिली गेल्यास व तिचा दुरूपयोग झाल्यास त्वरीत बँकेशी संपर्क साधावा तसेच सायबर पोलीस शाखेकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.मोघे यांनी केले. समारोप करताना श्री.नवले यांनी पोलीस आणि माध्यमातील समन्वय वाढण्यासाठी कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असे सांगितले.
कार्यशाळेला मालेगाव शहर व परिसरातील पत्रकार, छायाचित्रकार, माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.

************

No comments:

Post a Comment