Wednesday 25 July 2018

जलसाक्षरता-2


जलदूत जलसाक्षरता अभियानाला गती देतील-मल्लिनाथ कलशेट्टी


नाशिक, 25 : जलसाक्षरता क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून जलसाक्षरता अभियानाला गती मिळेल, असा विश्वास नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी  व्यक्त केला.
विभागीय जलसाक्षरता कार्यशाळेच्या दुपारच्या सत्रात ते बोलत होते. यावेळी धुळ्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, यशदाच्या उपसंचालक प्रेरणा देशभ्रतार, उपायुक्त सुखदेव बनकर,  अधीक्षक अभियंता राजेश मोरे, वाघाड पाणीवाटप संस्थेच्या अध्यक्षा पार्वताबाई शिंदे, गोवर्धन कुलकर्णी, सुनिल पोटे, राजेश पंडीत, समर्थ पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी आदी उपस्थित होते.
श्री.कलशेट्टी म्हणाले, स्वच्छ भारत अभियानात लोकसहभागाच्या माध्यमातून ज्यापद्धतीने प्रयत्न झालेत तसे प्रयत्न जलसंधारण क्षेत्रात अपेक्षित आहेत. जनजागृती आणि लोकसहभागाद्वारे नदी प्रदूषणाचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. त्यासाठी जलसाक्षरतेचा प्रसार महत्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री.रेखावार म्हणाले, स्वत:ला झोकून दिल्याशिवाय लोकसहभाग मिळत नाही. पाण्यापासून शेती उत्पादन वाढविणे आणि आर्थिक विकास साधणे याचा विचार व्हायला हवा. त्यासाठी पाणीवापर संस्था सुदृढ करणे गरजेचे आहे. जलसाक्षरतेचे महत्व गावपातळीपर्यंत पोहोचविल्यास पाण्याचे योग्य नियेाजन करणे शक्य होईल.
श्री.बनकर म्हणाले, पाण्याचे वाटप योग्य पद्धतीने व कायद्याने झाले पाहीजे. पाण्याचा अपव्यय न होऊ देता  त्याच्या पुनर्वापरावर भर देण्यात यावा. शालेय जीवनापासून मुलांमध्ये पाण्याबाबत जागरुकता निर्माण करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.


श्रीमती शिंदे म्हणाल्या, योग्य पद्धतीने पाणी वाटप केल्यास शेती क्षेत्रात मोठा विकास  घडवून आणता येतो हे सिद्ध करणारे वाघाड मॉडेल सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. वाघाडच्या प्रकल्पामुळे द्राक्ष उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला.
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेला उपक्रम म्हणून जागतिक पातळीवर दखल घेतलेला वाघाड सिंचन प्रकल्प सिंचन व्यवस्थापनासाठी ‘रोल मॉडेल’ असून समप्रमाणात पाणीवाटप , पीकस्वातंत्र्य तसेच काटेकोरपणाने पाणी वाटपाची अंमलबजावणी या प्रकल्पात  होते, अशी माहिती श्री.सोमवंशी यांनी दिली.
सिन्नर तालुक्यात देवनदीवर ब्रिटीशकालीन पाटव्यवस्थेचा पुर्नविकास  लोकसहभाग व युवामित्राच्या मदतीने होत असल्याचे श्री.पोटे यांनी सांगितले.  लोकसहभागातूनच 19 बंधारे निर्माण झाले आणि पाण्याचा अपव्यय 86 टक्क्यावरून 50 टक्क्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे ते म्हणाले.
---

No comments:

Post a Comment