Sunday 15 July 2018

युवा कौशल्य दिन


जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

          नाशिक, 15 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व विविध व्यवसाय प्रशिक्षण संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य मार्गदर्शन व स्न्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे उपसंचालक सुनिल सैंदाणे, सहायक संचालक संपत चाटे, महिंद्रा अँड महिंद्रा चे उप महाव्यवस्थापक जितेंद्र कामठीकर, कौशल्य विकास अधिकारी अशोक चव्हाण, बाळासाहेब जाधव, सागर भाबड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती भानसी म्हणाल्या, राज्यातील युवकांना कौशल्याच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणे हे  शासनाचे धोरण असून त्यादृष्टीने पालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच कौशल्य असलेल्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. येत्या काळात महिलांना जास्तीत जास्त कौशल्य रोजगार योजनेचा लाभ देवून रोजगार वाढविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार फरांदे म्हणाल्या, देशाची वाढती लोकसंख्या ही देशाची ताकद असून आगामी काळात भारत हा मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ असणारा देश असेल. रोजगाराच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवकांना कुशल प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून  देण्यावर  शासन भर देत आहे. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान अंतर्गत व राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यात तीन हजारापेक्षा अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे. योजनेची माहिती  अधिकाधीक युवाकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार हिरे म्हणाल्या, देशाच्या लोकसंख्येच्या 60 टक्के प्रमाण तरुणांचे असून हे तरुण भविष्यात सामर्थ्यशाली भारत घडविणार आहेत. कौशल्य असलेल्या तरुणांनी प्रशिक्षण घेवून स्वयंरोजगार सुरू करावा, असे त्यांनी सांगितले. प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत जिल्ह्यातील अनेक तरुणांना रोजगार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षणात चांगले कार्य करून जास्त रोजगार प्राप्त करून देणाऱ्या संस्था आणि रोजगार प्रोत्साहन योजनेत रोजगारक्षम प्रशिक्षणाचा जास्त  लाभ देणाऱ्या उद्योजकांचा सत्कार करण्यात आला.  तसेच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.
तत्पूर्वी  कालिदास कलामंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर जनजागृती  रॅलीचे आयोजन करण्यात आले.
----


No comments:

Post a Comment