Wednesday 30 January 2019

विभागीय परीक्षण प्रयोगशाळा


 प्रयोगशाळेमुळे नाशिक विकासाचे केंद्र होईल -आर.के.सिंग


          नाशिक दि.30: नाशिक येथे उभारण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षण प्रयोगशाळेमुळे नाशिक विभागाच्या विकासाला वेग येऊन नाशिक विकासाचे केंद्र होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जा  राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी  व्यक्त केले.
शिलापूर येथे केंद्रीय विद्युत संशोधन  संस्थेतर्फे उभारण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षण प्रयोगशाळेच्या भूमीपुजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि..अध्यक्षा शितल सांगळे, खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे, योगेश घोलप, ऊर्जा मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार राज पाल,  सीपीआरआयचे महासंचालक व्ही.एस.नंदकुमार , माजी मंत्री बबनराव घोलप, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव आदी उपस्थित होते.

श्री.सिंग म्हणाले, प्रयोगशाळेमुळे परिसरातील विद्युत उपकरण उद्योगांना मान्यता घेण्यासाठी सुविधा होईल. त्यामुळे असे उद्योग नाशिकमध्ये येऊन रोजगार निर्मितीलादेखील गती मिळेल. केंद्र सरकारने विद्युत क्षेत्रात अनेक चांगले परिवर्तन केले आहे. गेल्या पाच वर्षात एक लाख मेगावॅट जास्‍त निर्मिती करण्यात आली आहे. गरजेपेक्षा जास्त विद्युत निर्मिती होत असल्याने शेजारच्या देशांना वीज निर्यात करण्यात येत आहे.

देशातील 1 लाख 80 हजार किलोमीटरची वाहिनी एका ग्रीडमध्ये जोडण्यात आली आहे. येत्या 3 फेब्रुवारीला लडाख, लेह, कारगिल, द्रास या अधिक उंचीच्या क्षेत्रांना देशाच्या ग्रीडने जोडण्यात येणार आहे. पंतप्रधान महोदयांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे एक हजार दिवसात देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचविण्यात आली आहे.

राज्याला प्रत्येक गावात वीज जोडणी देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेव्यतिरक्त 800 कोटी रुपये देण्यात आले आहे. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी मागणी केल्याप्रमाणे ग्रीड स्वतंत्र करण्यासाठी आणखी 2 हजार कोटी देण्यात येतील, तसेच येत्या 31 मार्च पर्यंत संपूर्ण देश भारनियमन मुक्ती करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

खासदार गोडसे म्हणाले, पश्चिम भारतातील अशा प्रकारची ही एकमेव प्रयोगशाळा असणार आहे. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश येथील विद्युत उपकरण बनविणाऱ्या कंपन्यांना या प्रयोगशाळेचा लाभ घेता येईल. त्यामुळे लहान विद्युत उपकरणे बनविणारे विद्युत उद्योग नाशिकमध्ये येतील.  नाशिकची ओळख 'इलेक्ट्रिक हब' म्हणून होईल व स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले.

 प्रास्ताविकात राज पाल म्हणाले, सीपीआरआय विद्युत क्षेत्रात राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमाणिकरण प्राधिकरणाच्या रुपात कार्यरत आहे. बाराव्या पंचवार्षिक योजनेत सीपीआरआयला मंजूर करण्यात आलेल्या 1390 कोटीच्या निधीपैकी 115 कोटी खर्च करुन पश्चिम भारतासाठी नाशिक येथे ही प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे. नाशिक परिसरात विद्युत उद्योग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना चांगली सुविधा होईल. येत्या 18 महिन्यात या प्रयोगशाळेचे काम पूर्ण करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
येत्या पाच वर्षात 47 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज- चंद्रशेखर बावनकुळे

       मुख्यमंत्री सौर वाहिनी प्रकल्पांतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना यावर्षी वीज जोडणी देण्यात आली असून येत्या पाच वर्षात 47 लाख शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे शक्य होईल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
          श्री. बावनकुळे म्हणाले, गावात शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लहान सौर प्रकल्प उभारुन परिसरातील शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या वीजेच्या निर्मितीवर केवल 2 रुपये 60 पैसे प्रती युनिट एवढा खर्च येत असल्याने शेतकऱ्यांना कमी दरात वीज देता येईल.
       शासनातर्फे तीन लाखाचा सौर कृषीपंप केवळ 30 हजार रुपये घेऊन शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांना केवळ 15 हजार रुपयात हा पंप देण्यात येईल. एकुण एक लाख सौर कृषीपंपाचे वितरण करण्यात येणार असुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
          एकलहरे प्रकल्पाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून हा प्रकल्प आवश्यक क्षमतेनुसार चालविण्यात येईल. प्रकल्पातील जुने संच बदलुन 660 मेगावॅटचे नवीन संच बसविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
 श्री.बावनकुळे म्हणाले, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून 12 लाख 58 हजार कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली असुन 7 लाख 58 हजार शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला वीज देण्यात येणार आहे. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी 'एक शेतकरी एक ट्रान्सफार्मर' अशी योजना सुरु करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
00000

Tuesday 29 January 2019

जिल्हास्तरीय प्रदर्शन


गावाला समृद्ध करण्यासाठी ग्रामोद्योगाला प्रोत्साहन-डॉ.निलिमा केरकट्टा


          नाशिक दि.29: गावपातळीवरील छोट्या उद्योजकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देत गाव समृद्ध करण्यासाठी ग्रामोद्योग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम निलिमा केरकट्टा यांनी केले.

          गोल्फ क्लब मैदान येथे महाराष्ट्र राज्य खादी  व ग्रामोद्योग मंडळातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित  पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.  कार्यक्रमाला मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप आणि जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सिताराम वळवी उपस्थित होते.


         श्रीमती केरकट्टा म्हणाल्या,  महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात ग्रामीण उद्योजकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ मिळवून देण्याचे प्रयत्न होत आहेत. 2021 पर्यंत असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासनातर्फे ग्रामीण भागातील लहान उद्योजकांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात येते. नागरिकांनी ग्रामीण उद्योजकांच्या श्रम आणि प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी कराव्यात,असे आवाहन त्यांनी केले.

        फास्टफूडच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरसारखे आजार वाढत असून त्यापासून दूर रहाण्यासाठी निसर्गाकडे वळावे लागेल. खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून अशा नैसर्गिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येते, असेही त्या म्हणाल्या.
     प्रदर्शन 31 मार्च पर्यंत सुरू रहाणार असून त्यात सेंद्रीय गुळ, रेडीमेड कपडे, पैठणी, हर्बल उत्पादने, बेकरी उत्पादने आदी विविध उत्पादनांची दालने आहेत.  
----

Monday 28 January 2019

कृषी महोत्सव


सेंद्रीय शेतीचा प्रसार आवश्यक-श्रीपाद नाईक


          नाशिक दि.28: नागरिकांना सकस आणि रासायनिक पदार्थमुक्त अनन्‍ उपलब्ध करून देण्यासाठी सेंद्रीय शेतीचा प्रसार  आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.
डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित कृषी महोत्सवाला भेट प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड आदी उपस्थित होते.
श्री.नाईक म्हणाले, शेतकऱ्याला अधिक लाभ मिळावा यासाठी सेंद्रीय शेतीकडे वळविणे आवश्यक आहे. आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती व औषधी वनस्पती उत्पादनाकडे वळविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी मंत्रालयाच्या विविध योजना असून शेतमाल खरेदीची व्यवस्थाही त्यात आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून सेद्रीय शेतीला उत्तमप्रकारे प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.नाईक यांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली आणि विविध उत्पादनांची माहिती घेतली.
----

Saturday 26 January 2019

प्रजासत्ताक दिन


पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

नाशिक दि.26: भारतीय प्रजासत्ताकाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान  येथे  आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभात पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

श्री.महाजन यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परेड कमांडर सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नकाते आणि सेकंड परेड कमांडर पोलीस उपनिरीक्षक रविंद्र दामोदर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

संचलनात पोलीस आयुक्तालय नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, होमगार्ड, शहर वाहतूक शाखा, वनविभाग, अग्नीशामक दल, भोसला मिल्ट्री स्कुलचे आर्मी विंग, नेव्हल विंग, एअर विंग तसेच अश्वदल, राज्य उत्पादन शुल्क, पर्यटन वाहन, वरुण वाहन, वज्र वाहन, के डब्ल्‌यु कॉलेज, न्यु मराठा वाघ गुरुजी शाळेचे स्काऊट पथक आणि पोलीस बँड, डॉग युनिट वाहन, जल प्रतिसाद पथक आदी पथकांनी सहभाग घेतला.

संचलनाच्यावेळी सामाजिक वनीकरण विभाग, महानगरपालिका, चाईल्ड लाईन, समाजकल्याण, मतदार जागृती, जलयुक्त शिवार, आयुषमान भारत, आदिवासी विकास विभाग आदी विविध  चित्ररथाद्वारे शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक आणि मान्यवरांची भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, जि..अध्यक्षा शितल सांगळे, विभागीय आयुक्त राजाराम माने,   विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या संचालक अश्वती दोरजे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरीक उपस्थित होते.
रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

ध्वजारोहणानंतर देशाच्या संस्कृती आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात जेम्स इंग्लिश मेडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मल्लखांब आणि एरीयल सिल्क स्पोर्टस तसेच पेठ तालुक्यातील नाचलोंढी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याने उपस्थितांची  मते जिंकली.

 फ्रावशी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी समुहगीत, न्यू इरा इंग्लिश मेडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारुड, आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशक्तीपर समुह नृत्य आणि समर्थ योग संस्थेच्या विद्यार्थ्यांनी  योग यज्ञ’ हा कार्यक्रम सादर केला. एमएसबी एज्युकेशन इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ताल आणि शिस्तबद्ध बँड फार्मेशला टाळ्यांच्या गजरात दाद मिळाली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण

पालकमंत्री  महाजन यांच्या हस्ते यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2017-18 अंतर्गत विभागस्तरीय स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम प्रथम पारितोषिक अवनखेड ता.दिंडोरी, द्वितीय पारितोषिक अहमनगर जिल्ह्यातील लोणी  व चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीला विभागून,  तसेच पारनेर तालुक्यातील वडनेर ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. 

जळगाव जिल्ह्यातील मेहेरगांव ग्रामपंचायतीला स्व.वसंतराव नाईक स्मृती पुरस्कार , धुळे जिल्ह्यातील परसामळ ग्रामपंचायतीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आणि जळगाव जिल्ह्यातील सुसरी ग्रामपंचायतीला स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

शंभर टक्के अपंग असुनही 4 हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे राहुल विंचुरकर व  सटाणा येथील काकासाहेब भामरे निवासी अपंग कल्याण केंद्राला दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार, तर  जिल्हा निवडणुक अधिकारी प्रज्ञा बडे-मिसाळ यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पर्यटन प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

                   भद्रकाली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास मोहिते, व शहर गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक जाकीर हुसेन शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.  सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतुक) अशोक नकाते, अपर पोलीस अधिक्षक सुरक्षा उपसंचालक महाराष्ट्र पोलीस अकॅडमी दिपक गिऱ्हे, अपर पोलीस अधिक्षक तथा उपसंचालक (बाह्यवर्ग) पोलीस अकॅडमी विजयकुमार चव्हाण यांना अंतरिक सुरक्षा सेवा पदक प्रदान करण्यात आले. मालेगांव किल्ला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांना पोलीस महासंचालक विशेष सेवा पदक, तर पोलीस अकॅडमीचे सहाय्यक संचालक  सुनिल गोसावी यांना केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात आले.
                वनकायद्यांतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते जमिनीचे पट्टे वाटप करण्यात आले.

                 खेलो इंडिया स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांचादेखील यावेळी गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक अथेलेटिक्स, दुर्गा देवरे 1500 मीटर सुवर्ण, 400 मीटर रिले सुवर्ण, पुनम सोनवणे 5 हजार मीटर सुवर्ण, 3 हजार मीटर रजक पदक, दिनेश 10 हजार मीटर सुवर्ण, ताई ब्राम्हणे 1500 मीटर कांस्य, चंदु चावरे खो खो सुवर्ण.
          शशांक वझे यांना गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कार, मंगला शिंदे यांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, सागर नागर आणि सायली सुर्यवंशी यांना गुणवंत खेळाडू पुरस्कार तर सुश्मिता पवार आणि गौरव लांबे यांना गुणवंत खेळाडू थेट पुरस्कार प्रदान करण्यात आले.
----

गरीब व गरजू कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ-पालकमंत्री


नाशिक दि.26: समाजातील सर्व घटकांना विकासप्रक्रीयेत सहभागी करून घेण्याचा शासनाचा प्रयत्न असून गरीब व गरजू कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. तसेच कृषी योजनांच्या माध्यमातून शेती व शेतकरी समर्थ करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा देताना ते बोलत होते. श्री.महाजन म्हणाले, कौशल्य विकास, अण्णासाहेब पाटील महामंडळ, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, मुद्रा बँक योजना आदींच्या माध्यमातून युवकांना रोजगार व स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचा लाभ अनेक युवकांनी घेतला आहे.
          जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे वळविण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टयांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले आहे. जिल्हयात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 170 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
          जिल्ह्याने घरकूल योजनेत चांगली कामगिरी केली असून राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. महात्मा फुले आणि आयुषमान भारत योजनेअंतर्गत गरीब व गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नाशिक शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचे प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथे झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या खेळाडुचे श्री.महाजन यांनी अभिनंदन केले.
----

 जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा


नाशिक दि.26: भारतीय प्रजासत्ताकाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते. यावेळी तंबाखुमुक्तीची शपथ घेण्यात आली.
---