Tuesday 28 February 2017

मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम

             संगणक आणि महाजालावर मराठीचा अधिकाधीक उपयोग करा                                                                -प्रा.व्ही.एन.सुर्यवंशी


            नाशिक दि.28:युवकांनी  मराठी भाषेच्या संवर्धन आणि उत्कर्षासाठी संगणकीय प्रणाली आणि महाजालावर मराठीचा अधिकाधीक उपयोग करावा, असे मत एच.पी.टी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एन.सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
          जिल्हा माहिती कार्यालय नाशिक  आणि एचपीटी महाविद्यालयाच्या  मराठी व पत्रकारीता विभागाच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव  दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी  माहिती उपसंचालक डॉ.किरण मोघे, प्रा.वृंदा भार्गवे, प्रा. अनंत येवलेकर उपस्थित होते.
          श्री. सुर्यवंशी म्हणाले, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणारे राष्ट्र प्रगतीच्या वाटेवर पुढे जात आहेत. संगणकीय महाजालावर इतर भाषांमधील ज्ञान जेवढ्या प्रमाणात उपलब्ध आहे तेवढ्या प्रमाणात मराठीत नाही. मराठी संस्कृतीच्या‍ विकासासाठी मातृभाषेचे महत्व लक्षात घेता  महाजालावर मराठीचा ठसा उमटविणे आवश्यक आहे. त्यासाठी युवकांनी विविध विषयांची माहिती संकेतस्थळ, ब्लॉग, विकीपिडीयाच्या माध्यमातूनक महाजालावर आणावी, असे आवाहन त्यांनी केले. कविवर्य कुसुमाग्रजांच्या भूमीतले विद्यार्थी म्हणून मराठी भाषेच्या संवर्धन आणि विकासासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.

          डॉ.मोघे यांनी शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले,समाजमाध्यमाद्वारे मराठी भाषा गौरव दिनाची चर्चा होत असताना संगणक आणि महाजालावर मात्र मराठी शब्दांची माहिती मर्यादीत प्रमाणात आहे. काही संकेतस्थळांनी मराठी साहित्यलोकजीवन आणि संस्कृती जागतिक स्तरावर पोहोचविण्यात चांगले योगदान दिले आहे. मात्र मातृभाषेच्या विकासासाठी अधिकाधीक संशोधनाद्वारे व्यापक माहिती महाजालावर टाकण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे. आपले शहर, परिसर, संस्कृती, महाविद्याय, पर्यटनस्थळे आदी विषयासंदर्भात विकीपीडियावर एक परिच्छेद लिहून मराठीच्या विकासात आपलेही योगदान देणे शक्य आहे. येत्या काळात संगणकीय प्रणाली आणि महाजालाचे माहिती प्रसारणात महत्व लक्षात घेता संवादासाठी भाषेचे महत्व टिकवून ठेवताना तीचा महाजलावर अधिकाधीक उपयोग करणे महत्वाचे ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
          श्रीमती भार्गवे यांनी पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून नाशिकच्या संस्कृतीचे विविध पैलू मांडण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती दिली. मराठी भाषेतून उपयुक्त माहिती व शासनाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकराज्य मासिकाचे योगदानही महत्वाचे असल्याची त्यांनी सांगितले.
          कार्यक्रमास महाविद्यालयातील पत्रकारीता व मराठी विभागाचे विद्यार्थी प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी  विद्यार्थ्यांना लोकराज्य अंक भेट देण्यात आले.

***********

Monday 27 February 2017

सार्वजनिक बांधकाम विभाग आढावा बैठक

सायखेडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरीत सुरू करा-चंद्रकांत पाटील


नाशिक, दि. 27 : गतवर्षी आलेल्या पूरामुळे क्षतीग्रस्त झालेल्या सायखेडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम त्वरीत सुरू करा, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, सचिव सी.पी.जोशी, अजित सगणे, मुख्य अभियंता आर.आर.केडगे, अधिक्षक अभियंता आर.आर. हांडे, सी.डी.वाघ, पी.बी.भोसले, आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, विविध कामांची प्रलंबित देयके त्वरीत अदा करण्यासाठी त्वरीत आवश्यक कार्यवाही करावी. कमकूवत पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. विभागातील पुलांच्या दुरुस्तीसाठी विहीत प्रक्रीयेद्वारे संस्थेची निवड करण्यात यावी जेणेकरून गरजेनुसार दुरुस्तीची कामे तातडीने करणे शक्य होईल. रस्ते दुरूस्तीसाठी दहा किलोमीटरचे टप्पे करावे आणि वार्षिक दुरूस्ती करार तत्वावर संस्थेची निवड करून प्रस्ताव सादर करावे. दुरूस्ती केलेले रस्ते वर्षभर सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील, असे त्यांनी सांगितले.
मंत्री महोदयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध प्रकल्प, नाबार्ड अंतर्गत कामे,  जाहीरात फलक आदी विविध कामांचा आढावा घेतला. दर तीन महिन्यांनी कामाचा आढावा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-----
          

Wednesday 22 February 2017

रोजगार मेळाव्याचे आयोजन

मालेगाव येथे 23 फेब्रुवारी रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन
          नाशिक दि.22:-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व  उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान आणि मालेगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता एमएसजी कॉले मालेगाव येथे रोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात 219 रिक्त पदांसाठी कौशल्य विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षितांची मागणी आहे. अकांउटंट , परचेस मॅनेजर,स्टोअर कीपर या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे असून उमेदवार वाणिज्य पदवीधर असावा. फक्त पुरूषांसाठी असलेल्या ट्रेनी पदासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे असून शैक्षणिक पात्रता वाणिज्य पदवीधर/बी.एस.सी.मायक्रो बायलॉजी/बी.कॉम/एम.कॉम फायनान्स परिक्षा उत्तीर्ण \ टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण अशी आहे.
ट्रेनी ईपीपी पदासाठी केवळ पुरुषांची निवड होणार असून वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता वाणिज्य पदवीधर व टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण अशी आहे. ट्रेनी (पेंटर कोर्स)   आणि पुरुषांसाठी ट्रेनी ईपीपी पदासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे असून शैक्षणिक पात्रता एस.एस.सी. उत्तीर्ण आहे.
सेल्स ऑफिसर या पदासाठी वयोमर्यादा 20 ते 26 वर्षे असून  उमेदवार पदव्युत्तर अथवा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. आयटीआय इलेक्ट्रशीयन पदासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे  असून शैक्षणिक पात्रता एस.एस.सी./आय.टी.आय. इलेक्ट्री‍शियन आहे. इतरही आस्थापना, दुकाने यांचेकडील 69 पदांसाठीदेखील निवड केली जाणार आहे.
च्छुकांनी www.maharojgar.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करून मेळाव्यास एम.एस.जी. कॉलेज, कॅम्प रोड ता. मालेगाव जि.नाशिक येथे उपस्थित राहावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाचे सहाय्यक संचालक सं.पां. चाटे यांनी केले आहे.

----

कॅशलेस व्यवहार

ग्रामीण भागात कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन द्यावे-जिल्हाधिकारी


नाशिक, दि. 22: ग्रामीण भागात कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बँकांनी विशेष प्रयत्न करावेत आणि त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जनतेला प्रशिक्षीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
         
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या  बैठकीत ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, समितीचे निमंत्रक तथा बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक आर.एम.पाटील, रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी सी.कार्तिक, लिड बँक मॅनेजर अशोक चव्हाण, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, बँकांनी कॅशलेस व्यवहारासाठी निवडलेल्या गावात शंभर टक्के खाते उघडून ते आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी. जनतेला डिजीटल व्यवहाराची माहिती देताना असे व्यवहार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. फेब्रुवारी अखेरपर्यंत प्रत्येक बँकेने किमान दोन गावे ‘कॅशलेस’ करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सिन्नर तालुक्यातील दापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्रने गाव कॅशलेस करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी विविध पीक कर्ज वाटप तसेच बँकाना दिलेल्या उद्दीष्टांचा आढावा घेतला. तिसऱ्या तिमाहीतील पीक कर्ज वाटपाचे शंभर टक्के उद्दीष्ट पुर्ण करावे, त्यासाठी कृषिपूरक व्यवसायांसाठी कर्जवाटपाकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. डिजीधन मेळाव्यासाठी बँकांनी पूर्व नियोजन करून अधिकाधीक व्यक्ती मेळाव्याचा लाभ घेतील याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही श्री.राधाकृष्णन म्हणाले.
बैठकीस विविध बँकांचे जिल्हा समन्वयक अधिकारी उपस्थित होते.
-----

Monday 20 February 2017

क्षयरोग दैनंदिन उपचार पद्धती

क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी जनजागृतीवर भर द्यावा- राधाकृष्णन बी.


नाशिक, दि.20 :- जिल्ह्यातून क्षयरोग संपूर्ण नाहीसा करण्यासाठी आशा सेविकांनी घरोघरी क्षयरोग तपासणी आणि जनजागृतीवर भर द्यावा, असे आवाहन  जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी केले.
          जिल्हा शासकिय रूग्णालय येथे क्षयरोग दैनंदिन उपचार पद्धतीच्या शुभारंभप्रसंगी ते बोत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.सुशिल वाकचौरे आदी उपस्थित होते.

           जिल्हाधिकारी म्हणाले, क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना रोगाबाबत माहिती देणे आवश्यक आहे. या गंभीर आजाराच्या नियंत्रणात आशा सेविकांची भूमीका महत्वाची आहे.  चांगले काम करणाऱ्या आशासेविकांचा सत्कार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. औषधोपचारासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच सहा महिन्यानंतर स्वत: या मोहिमेचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

            श्री. शंभरकर यांनी जिल्हा क्षयरोगमुक्त आणि हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रिपणे प्रयत्न करावे,  असे वाहन केले.
संसर्गजन्य असलेल्या गंभीर क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका सर्व मिळून काम करतील, अशी ग्वाही डॉ.जगदाळे यांनी दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रूग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले. क्षयरोगग्रस्त रूग्णांना दरारोज उपचारांसाठी आशासेविकांना प्रशिक्षण देण्यात आले.   

00000

Friday 17 February 2017

डिजिधन मेळा

डिजिधन मेळा यशस्वी करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी


नाशिक, दि. 17 : निती आयोगाच्या सुचनेनुसार फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या सुरवातीस नागरिकांना कॅशलेस व्यवहाराची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात येणारा डिजिधन मेळावा यशस्वी करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
           
जिल्हाधिकारी कार्यालयात मेळाव्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसीलदार सी.एस. देशमुख, लिड बँक मॅनेजर अशोक चव्हाण, बीएसएनएलचे व्यवस्थापक सुरेशबाबू प्रजापती आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारासंबंधी जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात  करण्यात येत आहे. मेळाव्याला केंद्र व राज्यातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांसाठी आधार नोंदणी, बँक खात्याशी आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांक संलग्न करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डिजीटल व्यवहार करणाऱ्या नशिबवान ग्राहकांना एकूण एक कोटी रुपयापर्यंतची पारितोषिके आणि व्यापाऱ्यांना 50 लाखापर्यंतची पारितोषिके वितरीत करण्यात येणार आहेत. बँकांनी मेळाव्यात स्टॉल लावून नवीन खाते उघडणे, डिजीटल व्यवहाराच्या मोबाईल ॲपची माहिती देणे, रुपे कार्ड वाटप, व्यापारी संघटनांकडून पीओएस मशीनची मागणी नोंदविणे , एईपीएसची माहिती देणे आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
डिजिधन मेळाव्याच्या ठिकाणी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी एअरटेल आणि बीएसएनएलचे सहकार्य मिळणार आहे. डिजिटल व्यवहाराबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसनदेखील बँकांच्या प्रतिनिधींमार्फत करण्यात येणार आहे. विविध ॲप डाऊनलोडची व्यवस्थाही उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती श्री.खेडकर यांनी दिली.
 बैठकीस विविध बँकांचे प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
----


Thursday 2 February 2017

मतदान केंद्रांची पाहणी

विभागीय आयुक्तांकडून मतदान केंद्रांची पाहणी



नाशिक दि.2: विधान परीषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरिता मतदानाच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी  विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी सिडको भागातील मतदान केंद्रांना भेट दिली. त्याच्यासमवेत  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. होते.


तत्पूर्वी श्री.डवले यांनी अंबड औद्योगिक वसाहत येथील सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन येथे भेट देऊन मतमोजणीच्या पूर्वतयारीची पाहणी केली. यावेळी उपआयुक्त संजय कोलते, ज्ञानेश्वर खिल्लारी, उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे, तहसीलदार एस.डी.मोहिते, गणेश राठोड तसेच विविध विभागांचे  अधिकारी उपस्थित होते.  

-----

पदवीधर मतदारसंघ निवडणूक

पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी  मतदान केंद्र पथक रवाना

नाशिक दि.2: विधान परीषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरिता शुक्रवार 3 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्ह्यातील 136 मतदान केंद्रावर मतदान होणार असून आज दादासाहेब गायकवाड सभागृह येथून मतदान साहित्यासह  मतदान केंद्र पथक रवाना झाले.

निवडणूक निरीक्षक आर.जे. कुलकर्णी आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मतदान साहित्य वितरणाची पाहणी केली . मतदान मुक्त आणि नि:पक्षपातीपणे होईल यासाठी विशेष दक्षता घेण्याच्या सुचना श्री.कुलकर्णी यांनी यावेळी दिल्या.

 जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी परस्पर समन्वयाने काम करून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी, असे आवाहन कर्मचाऱ्यांना केले. निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती रँडमायझेशन पद्धतीने करण्यात आली असून त्यांना जबाबदारी सोपविण्यात आलेल्या मतदान केंद्राची माहिती साहित्य वाटपाच्यावेळी देण्यात आली.

मतदान कर्मचारी आणि साहित्य मतदान केंद्राच्याठिकाणी पोहोचविण्यासाठी 27 बसेस आणि 25 जीपची सोय करण्यात आली. बागलाण, निफाड आणि मालेगाव तालुक्यासाठी गरजेनुसार अधिक कर्मचारीवर्ग देण्यात आला आहे. साहित्य वितरणापूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांना उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी सरीता नरके, तहसीलदार गणेश राठोड , शरद घोरपडे यांनी साहित्य वाटप आणि जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली.

-----

Wednesday 1 February 2017

पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी हेल्पलाईन

पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी  हेल्पलाईन कक्ष

नाशिक दि.1: विधान परीषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूकीकरिता विभागीय आयुक्त कार्यालयात हेल्पलाईन कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.
मतदारांना मतदार यादीत कोणत्या यादी भागात, कोणत्या क्रमांकावर त्याचे नाव आहे, तसेच सदर यादी भाग मतदानाकरिता कोणत्या मतदान केंद्रास जोडला आहे याबाबत 0253-2450010/2450100 या दूरध्वनी क्रमांकावर माहिती उपलब्ध होईल. तसेच सदर माहिती divcomnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरील पदवीधर मतदार वोटर सर्चवर लिंकवर स्वत:चे नाव टाकल्यास मतदार भाग क्रमांक, अनुक्रमांक, मतदाराचे नाव व पत्ता दिसेल. याठिकाणी असलेल्या निळ्या बटनावर क्लिक केल्यास मतदान केंद्र दिसेल.  मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा विभागीय आयुक्त नाशिक यांनी केले आहे. अहमदनगरसाठी हेल्पलाईन क्रमांक 0241-2343600/2356940, जळगावसाठी 0257-2234789, नंदुरबार 02564-210008/210012/210006, नाशिक 0253-2310523/2310656/2313252 आणि धुळ्यासाठी 02562-2288066/2288711 असे आहेत.

0000