Friday 17 February 2017

डिजिधन मेळा

डिजिधन मेळा यशस्वी करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी


नाशिक, दि. 17 : निती आयोगाच्या सुचनेनुसार फेब्रुवारी अखेर किंवा मार्च महिन्याच्या सुरवातीस नागरिकांना कॅशलेस व्यवहाराची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात येणारा डिजिधन मेळावा यशस्वी करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
           
जिल्हाधिकारी कार्यालयात मेळाव्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसीलदार सी.एस. देशमुख, लिड बँक मॅनेजर अशोक चव्हाण, बीएसएनएलचे व्यवस्थापक सुरेशबाबू प्रजापती आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारासंबंधी जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात  करण्यात येत आहे. मेळाव्याला केंद्र व राज्यातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांसाठी आधार नोंदणी, बँक खात्याशी आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांक संलग्न करणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डिजीटल व्यवहार करणाऱ्या नशिबवान ग्राहकांना एकूण एक कोटी रुपयापर्यंतची पारितोषिके आणि व्यापाऱ्यांना 50 लाखापर्यंतची पारितोषिके वितरीत करण्यात येणार आहेत. बँकांनी मेळाव्यात स्टॉल लावून नवीन खाते उघडणे, डिजीटल व्यवहाराच्या मोबाईल ॲपची माहिती देणे, रुपे कार्ड वाटप, व्यापारी संघटनांकडून पीओएस मशीनची मागणी नोंदविणे , एईपीएसची माहिती देणे आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
डिजिधन मेळाव्याच्या ठिकाणी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी एअरटेल आणि बीएसएनएलचे सहकार्य मिळणार आहे. डिजिटल व्यवहाराबाबत नागरिकांच्या शंकांचे निरसनदेखील बँकांच्या प्रतिनिधींमार्फत करण्यात येणार आहे. विविध ॲप डाऊनलोडची व्यवस्थाही उपलब्ध राहणार आहे, अशी माहिती श्री.खेडकर यांनी दिली.
 बैठकीस विविध बँकांचे प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
----


No comments:

Post a Comment