Thursday 30 November 2017

निवडणुक आढावा बैठक

‘कॉप’ ॲपच्या सहाय्याने निवडणुक प्रक्रीयेत जनतेचा सहभाग वाढवा-सहारिया


नाशिक, दि.30-  राज्य निवडणुक आयोगाने नगरपालिका निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी  ‘सिटीझन ऑन पेट्रोल’ (कॉप) हे मोबईल ॲप्लिकेशन तयार केले असून हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जागरूक नागरिक आणि अधिकाऱ्यांना या सुविधेचा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन राज्य निवडणुक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी केले.
इगतपुरी येथे त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि सटाणा येथील प्रभाग क्र.5-अ च्या पोटनिवडणुकीच्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपरजिल्हाधिकारी निलेश सागर, पोलीस अधीक्षक संजय दराडे, निवडणुक उपायुक्त अविनाश सणस, उपजिल्हाधिकारी शशीकांत मंगरुळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निवडणुक निरीक्षक ज्ञानेश्वर खिल्लारी आणि प्रकाश वाघमोडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

श्री.सहारिया म्हणाले, या ॲपच्या माध्यमातून जनतेला लोकशाहीच्यादृष्टीने सक्षम करण्याचे कार्य करण्यात येत आहे. ॲपवर येणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेण्यात यावी. अॅपच्या वापराबाबत निवड केलेल्या नागरिकांना प्रशिक्षण देण्यात यावेनागरिकांनी न घाबरता तक्रार केली तर आदर्श निवडणुक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. निवडणुकीनंतर स्वतंत्र संस्थेमार्फत ॲपच्या उपयुक्ततेचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीकडे लक्ष देण्याबाबत सुचना देताना ते म्हणाले, मतदान केंद्रात जाताना मतदाराला उमेदवारांची माहिती देण्यासाठी ठळक अक्षरात माहिती देणारे फलक दर्शनी भागात लावण्यात यावे. ट्रु वोटर ॲपद्वारे उमेदवाराच्या निवडणुक खर्चाची बारकाईने तपासणी करण्यात यावी. आदर्श मतदान केंद्र तयार करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. अपंगांसाठी रुग्णवाहिका आणि व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले. निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणुक प्रक्रीयेत सहभागी अधिकाऱ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा सक्षमपणे वापर करावा, असे श्री.सहारिया म्हणाले.

श्री.सणस म्हणाले, ‘कॉपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारीबाबत तक्रार करणाऱ्याची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. या ॲपचे आंतरराष्ट्रीय परिषदेत 53 राष्ट्रांनी कौतुक केले असून ॲपबाबत माहिती जाणून घेतली आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरपासून त्याचा प्रायोगिक तत्वावर उपयोग करण्यात येत असून तो यशस्वी ठरल्यास राष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शक ठरेल, असे त्यांनी सांगितले.
श्री.दराडे यांनी पोलिस विभागाने केलेल्या पुर्वतयारीची माहिती दिली. निवडणुकीसाठी एक एसआरपी कंपनी आणि 200 होमगार्डची  मागणी वरिष्ठ पातळीवर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.सागर यांनी, निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारी योग्यप्रकारे पारा पाडावी, असे आवाहन केले. कॉपमुळे नागरिकांना या प्रक्रीये सहभाग घेण्याची चांगली संधी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी निवडणुक अधिकारी, दोन्ही नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांनी निवडणुकीसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली.

---

जागतिक एड्स दिन

जागतिक एड्सएचआयव्ही माहितीयुक्त गावउपक्रमाची सुरवात


          नाशिक, दि.30- जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा आरोग्य यंत्रणेच्यावतीनेएचआयव्ही माहितीयुक्त गावउपक्रमाची सुरवात करण्यात आलीजिल्हा रुग्णालय येथे जनजागृतीचेदेखील आयोजन करण्यात आले. रॅलीचा शुभारंभ महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाघचौरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, आरोग्य सभापती यतीन पगार, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्रीमती भानसी म्हणाल्या, एच.आय.व्ही. एड्स बाबत जनजागृती होणे गरजेचे गरजेचे आहे. सामाजिक काम करणाऱ्या संस्थांनी शाळांमधील प्रामुख्याने आठवी ते दहावी या वर्गातील मुलींना व महाविद्यालयांमधील तरुण तरुणींना एड्सबाबत माहिती देऊन या रोगाविषयीची प्रबोधन करावे. सामाजिक संस्थांनी यासाठी पुढाकार घेत एच.आय.व्ही.एड्स बाबत माहिती देऊन जनजागृतीही करावी, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती सांगळे म्हणाल्या, जागतिक एडस दिनानिमित्त मुला-मुलींचे लैंगिक संबंधाविषयी प्रबोधन झाले पाहिजे. याबाबतची जनजागृती होणे आवश्यक आहे.  ग्रामीण भागातही या रोगाविषयीचे प्रबोधन जिल्हा परिषदेच्या शाळेमार्फत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
 श्री. मिना म्हणाले, एड्सचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. एड्स हा रोग कुणाशी हस्तांदोलन करण्याने किंवा स्पर्शाने होत नसून तो असुरक्षित लैंगिक संबधामुळे होतो. याबाबत तरुणांमध्ये जनजागृती होऊन त्याचा प्रसार थांबणे गरजेचे आहे. एडस रुग्णांच्या बाबतीत तिरस्कार न करता त्यांच्याविषयी सहानुभूती ठेवणे आवश्यक आहे. तसेच त्यांची योग्यप्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

          डॉ.सुरेश जगदाळे म्हणाले, 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. 1984 साली प्रथम एड्सचा रुग्ण सापडला. तेंव्हापासून आजाराची समस्या वाढत असून युवापिढीला यापासून अधिक धोका  आहे. या रोगाच्या विषाणूने एकदा मानवाच्या शरिरामध्ये शिरकाव केला तर त्यास हा आजार पोखरुन काढतो व त्यास नष्ट करतो. या आजारावर सध्यातरी कुठलेच औषध उपलब्ध नाही. त्यामुळे या आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून समाज प्रबोधन होणे गरजेचे आहे. बाधीत रुग्णांची काळजी सरकार घेत आहे, असे त्यांनी सांगितले.  
          एचआयव्ही माहितीयुक्त गाव’ उपक्रमात 6 तालुक्यांचा समावेश करण्यात आला असुन संदीप फाऊंडेशनच्या विद्यार्थ्यांमार्फत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. प्रादेशिक परिवहन विभागामार्फतही टॅक्सीचालकांच्या परवान्यावर 1097 हा क्रमांक चालू केला आहे.

          यावेळी एड्सची शपथ सर्वांना देण्यात आली. तसेच क्षयरोगावरील ‘99 डॉटस्’ या औषधाच्या किटसचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते करण्यात आला. रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण संस्था, जिल्हा क्षयरोग केंद्र, महिंद्रा लॉजिस्टीक, संदीप फांऊडेशनच्या विद्यार्थिनी, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनी, शासकीय औद्योगिक संस्था (मुलींची) विद्यार्थिनी, के.टी.एच.एम. बी.वाय.के. कॉलेज, आर.वाय.के.कॉलेज, समाजकार्य महाविद्यालय, सह्याद्री नर्सिंग कॉलेज, स्वामी नारायण नर्सिंग कॉलेज, के.के.वाघ नर्सिग, गणपतराव अडके नर्सिंग कॉलेज, पंचवटी कॉलेज, वाय.डी.बिटको कॉलेज, विद्यार्थी व विद्यार्थिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

----

Wednesday 29 November 2017

वेस्ट टू एनर्जी

प्रदुषण समस्या टाळण्यासाठी घनकचऱ्यावर प्रक्रिया आवश्यक-गिरीष महाजन


नाशिक, दि.29- महानगरांमधील प्रदुषण आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर व दुर्गंधीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी घनकचऱ्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व  लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
भारत सरकार महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका यांनी संयुक्तपणे उभारलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, जर्मनीच्या जीआयझेड कंपनीचे अर्णे पानेसर, डर्क वॉल्टर, हेरॉल्ड, भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशनचे संचालक नवीन अग्रवाल, महाराष्ट्राचे संचालक उदय टेकाळे, दिनकर पाटील,अजय बोरस्ते आदी उपस्थित होते.

 श्री.महाजन म्हणाले, महानगरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न वाढत्या शहरीकरणामुळे गंभीर होत चालला आहे. त्यामुळे कचऱ्यापासून पर्यावरणपुरक निर्मिती करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. त्यासाठी विविध देशांचे सहकार्य घेण्यात येत आहे. शासनाच्या या प्रयत्नांना नागरिकांची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून नागरिकांनी ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करुन कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.

 भविष्यात या कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे प्रयत्न करण्यात येतील असेही श्री.महाजन म्हणाले. राज्यातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी संगितले.

 श्रीमती भानसी म्हणाल्या, जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत जर्मन सरकार व भारत सरकार यांचे संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरामध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पाकरिता जर्मनीच्या जीआयझेड कंपनीकडून  तांत्रिक व आर्थिक सहकार्य मिळाले आहे.

 सदर प्रकल्पात दररोज सुमारे 15 ते 20 मेट्रीक टन ओला कचना व 10 ते 15 मेट्रीक टन सार्वजनिक शौचालयातील मल जल असे एकूण 30 मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगॅस/मिथेन गॅस तयार करुन त्याद्वारे वीज निर्मिती करण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिकेस दरमहा सुमारे 99 हजार युनिट इतकी वीज पुरविणार आहे. प्रकल्पात तयार झालेली वीज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पॉवर ग्रीडला जोडण्यात येणार असून जेवढी वीज पॉवर ग्रीडमध्ये टाकण्यात येईल तेवढे युनिट मनपास इतर वीज देयकातून सुट मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
 प्रास्ताविकात जीआयझेडच्या जितेंद्र यादव यांनी प्रकल्पाविषयी माहिती दिली.         
---


स्मार्ट सिटी परिषद

स्मार्ट शहरासाठी लोकसहभाग आणि नियोजन आवश्यक-गिरीष महाजन
         

नाशिक, दि.29-  नाशिक शहर स्मार्ट  करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांचे एकत्रित प्रयत्न तसेच शहर विकासाचे सुक्ष्म नियोजन आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व  लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
          नाशिक स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ताज गेटवे येथे आयोजित स्मार्ट सिटी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, नॉर्वेच्या काऊन्सुलेट जनरल ॲन ओलेस्टड, विभागीय आयुक्त महेश झगडे, मनपा आयुक्त डॉ.अभिषेक कृष्णा, स्मार्ट सिटी एलेट्सचे जोसेफ मॅक्वील, दिनकर पाटील, वसंत गिते आदी उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले,देशात एकूण 98 शहरांची स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आली आहे. राज्यातील नाशिकसह विविध शहरात प्रकल्पाला गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. नाशिक शहरात विकासाची मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा उपयोग करून महानगरचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य आणि समृद्धीने परिपूर्ण जीवनाचा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनही त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. भविष्यात ‘स्मार्ट शहर’ अशी ओळख प्रस्थापित करण्यात नाशिक यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          ते म्हणाले, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या विकासकामांसोबत ‘गोदापार्क’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच अर्थकारणालाही गती मिळेल. नागरिकांनादेखील मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चांगल्या विरंगुळ्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
          शहराच्या सौंदर्यासोबत स्वच्छतेलाही महत्व दिले जात असल्याचे सांगून परिषदेच्या माध्यमातून ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी नव्या संकल्पना पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
          महापौर श्रीमती भानसी यांनी नाशिक शहर स्मार्ट करण्यासाठी ‘स्मार्ट रोड’ तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. अशोकस्तंभ ते मॉडर्न सर्कल दरम्यान पहिल्या रस्त्याचे काम लवकरच सुरु होईल, असे त्या म्हणाल्या.

          श्री.झगडे म्हणाले, गेल्या 200 वर्षात शहाराच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरीकरण वेगाने होत असतांना शहर विस्ताराचे योग्य नियोजन होणे गरजेचे असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग तेवढाच महत्वाचा आहे. नियोजनाद्वारे रोजगार आणि संपत्तीची निर्मिती, उत्तम मानव विकास निर्देशांक आणि शाश्वत पर्यावरण संवर्धन या बाबी स्मार्ट शहरासाठी आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले. शहरातील मुलभूत समस्या दूर करूनच शहर स्मार्ट करता येणे शक्य असल्याचे सांगून शिक्षण, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, पर्यावरण, रोजगार, वाहतूक, आवास अशा विविध पैलूंचा विचार या संदर्भात होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
          यावेळी श्री.जोसेफ, आयटीडीपीचे हर्शद अभ्यंकर, युएसटी ग्लोबचे कार्तिक हरिहरन यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या विविध पैलूंबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

       श्रीमती ॲन यांनी नॉर्वेच्या डिजीटल विकासात भारतीय संस्थांचा मोठा सहभाग असल्याचे सांगितले. भारत हा नॉर्वेप्रमाणे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न देश असून ऊर्जा, पायाभूत सुविधा, पर्यावरण, संरक्षण आदी क्षेत्रात दोन्ही राष्ट्रात सहकार्याचे वातावरण असल्याचे त्या म्हणाल्या.

          प्रास्ताविकात डॉ.कृष्णा म्हणाले, नागरिकांना शहराचे आकर्षण वाटावे अशा सुविधा निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी नदीघाट विकास, सीसीटीव्ही आणि इतरही प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. नागरिकांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असून लवकरच ई-प्रमाणपत्र सुविधा सुरु करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
         
                   

---

आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धां

                 आदिवासी विद्यार्थांनी आंतराष्ट्रीय पातळीवर नैपुण्य कमवावे
                                                                             

नाशिक, दि. 29:- दिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या अंगभूत गुणांमुळे ते खेळांमध्ये पुढे जाऊ शकतात.  विभागीय क्रीडा स्पर्धांमधून चांगले खेळणाऱ्या विद्यार्थ्यांनी भविष्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन राज्य व देशाचे नेतृत्व करावे, असे आवाहन आदिवासी  विकास आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांनी केले.
आदिवासी विकास विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सहआयुक्त दशरथ पानमंद, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, अपर आयुक्त संदीप गोलाईत, प्रकल्प अधिकारी अमोल येडगे, प्रदिप पोळ, संतोष ठुबे, अमन मित्तल आदी उपस्थित होते

 श्री. कुलकर्णी म्हणाले, विभागीय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भविष्यासाठी चांगली प्रेरणा व अनुभव घेऊन जाण्याची चांगली संधी विद्यार्थ्यांना मिळते.  त्यांच्यातील क्रीडागुणांना चालना देण्यासाठी विभागाने चांगल्या सुविधा दिल्या आहेत. या सुविधांचा उपयोग अधिक नैपुण्य प्राप्त करण्यात होईल.  स्पर्धांसाठी जमलेल्या सर्वांना एका मोठ्या कुटुंबाचा अनुभव येईल असे वातावरण निर्माण करण्यात येईल, असे ते म्हणाले.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भंडारदरा येथील आदर्श आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांचा वापर करुन गाणे व संगीताच्या तालावर नृत्य सादर केले. यावेळी सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. क्रीडाज्योत प्रज्वलीत करून स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी श्री.गोलाईत यांनी प्रास्तविकात स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती दिली. स्पर्धेमध्ये नाशिक, कळवण, नंदुरबार, तळोदा, धुळे, यावल, राजूर या सात प्रकल्प क्षेत्रातील शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांची मुले व मुली एकूण दोन हजार 858 असे खेळाडू  सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धा आजपासून तीन दिवस स्वर्गीय माँसाहेब मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल पंचवटी येथे सुरु झाल्या असून येथे कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, ॲथेलेटीक्स, धावण्याच्या विविध अंतराच्या स्पर्धा, गोळाफेक, भालाफेक आदी क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे.

0000000

Monday 27 November 2017

सांसद आदर्श ग्राम

      साल्हेरच्या विकासासाठी  आराखडा तयार करा-डॉ.सुभाष भामरे


          नाशिक, दि.27- सांसद आदर्श ग्राम योजनेतून सटाणा तालुक्यातील साल्हेर या गावाचा संपूर्ण विकास करण्यात येणार असून जिल्हा यंत्रणांनी त्यादृष्टीने परिपूर्ण विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी आज दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, अपर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, बागलाणचे तहसिलदार सुनिल सैंदाणे, साल्हेरचे सरपंच दिलीप शिंदे आदी उपस्थित होते.

          डॉ.भामरे म्हणाले, साल्हेरच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. केंद्र शासन, राज्यशासन व सीएसआर निधीतून विकासाशी संबंधित पायाभूत कामे , शिक्षण सुविधा, रस्ते, वीज, स्वच्छता अशा सुविधांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. यासाठी उपलब्ध स्त्रोतांचा वापर केला जावा तसेच समन्वयन अधिकारी नेमून कामांना गती दिली जावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
          ते म्हणाले, धुळे जिल्ह्यातील गोंदूर या गावाचा विकास करतांना नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या प्रयत्नांमुळे हे गाव जिल्ह्यातील आदर्श असे ठरुन इतरांसाठी प्रेरणा देणारे झाले आहे. याच धर्तीवर साल्हेर हे आदिवासी भागामध्ये येत असल्याने त्याची निवड करतांना येथील जनता व परिसराच्या विकास मार्गातील अडचणी दूर करुन त्यास प्रगतीपथावर नेण्याचा उद्देश आहे.
          जिल्हाधिकारी म्हणाले, साल्हेरच्या विकासासाठी प्रशासन आवश्यक ती सर्व काळजी घेणार असून बागलाण तालुक्यातील तहसिलदार हे समन्वयन अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्यामार्फत या कामांवर देखरेख ठेवली जाईल. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व प्रमुख उपक्रम साल्हेर येथे राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
 बैठकीस सटाण्याचे गटविकास अधिकारी किशोर भामरे, साल्हेरचे ग्रामस्थ, पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.   

---

Saturday 25 November 2017

बालभारती सुवर्ण महोत्सव

बालभारतीच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा अतिरिक्त पगार
सुवर्णमहोत्सवी सांगता समारोहात विनोद तावडे यांची घोषणा


नाशिक दि.25- बालभारतीची वैभवशाली परंपरा यशस्वीरित्या पुढे नेत असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार तर पेन्शनधारक निवृत्त कर्मचाऱ्यांना एक महिन्याचे पेन्शन आणि एक हजार रूपये वाढ भेट म्हणून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वक्फबोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली. ही भेट म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रेमाने व्यक्त केलेल्या भावना आहेत, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती  व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे गुरू गोविंदसिंग फाऊंडेशन शाळेत आयोजित बालभारती सुवर्ण महोत्सवी सांगता समारोह आणि नाशिक भांडार नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, जयवंतराव जाधव , श्रीमती वर्षा तावडे  बालभारतीचे संचालक सुनील मगर, सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर, गुरू गोविंदसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष गुरूदेवसिंग बिरदी, हरजितसिंग, बलविरसिंग,  शिक्षण  उपसंचालक रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.
 श्री. तावडे म्हणाले, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित करण्यात बालभारतीचे मोठे योगदान आहे. त्यामुळे बालभारती उपक्रमाची  माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या बालभारतीची रचना पाहण्यासाठी सहलीच्या माध्यमातून त्यांना न्यायला हवे,  अशी सुचना त्यांनी केली.

ते म्हणाले, 1980 मध्ये पाश्चात्य राष्ट्रात ज्ञानरचनावाद स्वीकारला गेला. मात्र भारतात त्याचा स्वीकार 2006 मध्ये झाला. राज्य शासनाने त्यानुसार अभ्यासक्रमांची रचना करणे सुरू केले असून कौशल्याधारित शिक्षणाला महत्व दिले जात आहे. त्यामुळे मुलांना ज्ञान ग्रहण करणे सोपे झाले आहे. पुस्तकातील अभ्यासक्रम  बदलल्यामुळे विद्यार्थ्यांना गाईडशिवाय परिक्षेला बसता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 श्री तावडे म्हणाले की, शासनातर्फे ई-बालभारती हा महत्वाकांक्षी प्रकल्प  राबविण्यात येत आहे. पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात ई-लर्निंगचा समावेश करण्यात येणार आहे. उद्योजकांच्या सहकार्याने राज्यातील एक लाख सहा हजार शाळांमध्ये मोफत डिजीटल कनेक्टीव्हीटी  उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ई- लर्निंगमुळे विषय समजून घेणे विद्यार्थ्यांना सोपे जाईल आणि दोन कोटी विद्यार्थ्यांना असा अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य ठरेल, असे त्यांनी सांगितले.

श्री. तावडे यांच्या हस्ते, नाशिक भांडार इमारतीचे उद्घाटन आणि किशोर मासिकाच्या डिजिटायझेशन उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. बालभारतीच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी बालभारतीमधील कवितांवर आधारीत तयार केलेल्या हस्तलिखित ‘बालमनोन्मेश’चे प्रकाशनही श्री.तावडे यांच्या हस्ते करण्यात आले.मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी स्वप्नील बांदोडकर यांनी  'श्रावणमासी'  ही कविता सादर केली तसेच गणिताच्या सुत्रावर अधारित ‘सुत्राचा हा खेळ मांडियेला’ हे गीत सादर केले. गणितातील सुत्रे आणि मराठीतील कवितांना नवा संगीत साज देऊन नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्तविकात श्री. मगर यांनी गेल्या वर्षापासून बालभारतीने आठवी ते दहावीची पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यास सुरवात केली असल्याचे सांगितले. बालभारतीचा ठेवा पुढच्या  पिढीपर्यंत नेण्यासाठी डिजिटायझेशन  उपक्रम हाती घेण्यात आल्याचे ते म्हटले.
क्षणचित्रे-
·        *उद्घाटन  आणि प्रकाशनाच्यावेळी मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन आणि कॉफीटेबल बुकचे प्रकाशन केले.
·    *स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेल्या गीतांचा विद्यार्थ्यांनी भरपूर  आनंद घेतला आणि त्यांना आवडीचे गाणे गायला सांगितले. स्वप्नीलने त्यांना नाराज न करता विद्यार्थ्यांना कोरससाठी सोबत घेत गाणे गायिले.
·        *मंत्री महोदयांनी संवाद साधल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह होता.
·        *श्री.तावडे यांनी भाषणाच्या सुरूवातील बालभारतीचे नाव बदलायचे काय, असा प्रश्न विचारला. सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने नकार दिल्यावर ‘आजच्या बैठकीत बालभारती असेच नाव राहील असे ठरले’ असे श्री.तावडे यांनी सांगिताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाटाने त्यांचे स्वागत केले.
वर्गातले ज्ञान आत्मसात करा
मंत्री महोदयांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

विद्यार्थ्यांशी संवादासाठी वेळ हवा असल्याने श्री.तावडे यांनी आपले भाषण लवकर संपविले. लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारणे हा लोकशाहीतील अधिकार आहे असे सांगताना त्यांनी विद्यार्थ्यांना मोकळेपणे प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीदेखील त्यास प्रतिसाद देत कॉपी प्रकरणामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होत नाही, वर्गात शिकविले जात नाही तर क्लासलाच जास्त वेळ दिला जातो, रोजगाराचा प्रश्न, आठवीपर्यंत मुलांना उत्तीर्ण केल्याने गुणवत्ता ढासळते असे अनेक प्रश्न मांडले. मंत्री महोदयांनी त्यांना तेवढ्याच मोकळेपणाने उत्तरे दिली.
ते म्हणाले, कॉपी प्रकार बंद करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. मात्र कॉपी करणाऱ्यांना भविष्य नसते. खरा अभ्यास करणारे स्पर्धेत यशस्वी होतात. वर्गात मिळणाऱ्या शिक्षणामुळे विषय समजावून घेता येतो. त्यामुळे पुढील वर्षापासून बारावीच्या  वर्गासाठी बायोमॅट्रीक उपस्थिती नोंदविण्यात येणार आहे. उपस्थिती कमी असणाऱ्यांना परिक्षेस बसता येणार नाही. इन्टिग्रेटेड क्लाससेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
रोजगाराभिमुख शिक्षण असावे यासाठी अभ्यासासोबत कौशल्यविकासाला महत्व देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. एका विद्यार्थ्याने पेपर लिहिण्यासाठी तीन तासाचा वेळ कमी असल्याबात तक्रार केली असता शिक्षण तज्ज्ञांपर्यंत ही समस्या पोहोचवून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

                                      बालभारतीविषयी थोडे...


स्थापना-

·   पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी राज्य सरकारांनी व्यावसायिक तत्वावर चालणारी स्वायत्त संस्था स्थापन करावी अशी कोठारी आयोगाची  शिफारस.
·      त्यानुसार 27 जानेवारी 1967 रोजी ' महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ' स्थापन.
उद्दीष्टे-
·        शालेय शिक्षणाच्या  अभिवृद्धीसाठी साहाय्य व उत्तेजन. शालेय पाठ्यपुस्तके, शिक्षकांकरिता हस्तपुस्तिका, मार्गदर्शिका, विद्यार्थ्यासाठी स्वाध्याय पुस्तिका, शैक्षणिक साहित्याची निर्मिती.
·        पाठ्यपुस्तके ,शैक्षणिक  साहित्याची छपाई, प्रकाशन, साठा, वितरण व विक्रीची व्यवस्था
पाठ्यपुस्तके-
·        पहिली ते आठवी इयत्तांसाठी आठ भाषांतून सचित्र व रंगीत पाठ्यपुस्तके.
·        मान्यवर लेखक-कवी, विचारवंत, तसेच प्रतिभावंत कलाकारांचा पाठ्यपुस्तक निर्मितीत सहभाग.
·        पुस्तकांचा आशय व आकारात कालानुरूप बदल.


पाठ्येत्तर उपक्रम
·        पूरक वाचन साहित्याच्या निर्मितीवर भर देणारे एकमेव  पाठ्यपुस्तक मंडळ.
·        भारतीय स्वातंत्रलढा, महापुरषांची चरित्रे, आदर्श शिक्षकांच्या आत्मकथा, बालगीते, संस्कारकथा, खेळ, स्फुर्तिगीते आदी पुरक साहित्य प्रकाशित.
·        स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती.
किशोर
·        46 वर्षापासून मुलांचे आवडते मासिक.
·     अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान देण्याबरोबरच मुलांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावे ही भूमिका.
·   दिवाळी अंक , सुटी विशेषांक, वाचकप्रिय. किशोर मासिकातील निवडक साहित्याचे 14 खंड प्रकाशित
ग्रंथालय
·        मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराथी, तेलगु या आठही भाषांतील एक लाख 37 हजार 622 पुस्तकांचा मधुसंचय.
·    विविध विषयांची 177 देशी-विदेशी नियतकालिके. सन 1836 पासूनची दुर्मिळ पाठ्यपुस्तके, विविध राज्ये तसेच देशांतील पाठ्यपुस्तके, नकाशे, पाच हजार कोश, गॅझेटियर्स, जनगणना अहवालांचा खजिना.
इंग्रजी
·        मातृभाषेसोबत पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण.
·        जुन 2000 मध्ये 'माय इंग्लिश बुक 'चे पहिले पुस्तक लागू.
·        इंग्रजी शब्दसोबत देवनागरी लिपीतील उच्चारण हे पुस्तकाचे वैशिष्ट्य.
·        विद्यार्थी-शिक्षकांसाठी 2005 मध्ये इंग्रजी- मराठी सचित्र शब्दकोश.

ई-बालभारती
·   पोर्टलवर बालभारतीचे फॉन्टस, 'मराठी बालभारती' च्या चार मालांची  पाठ्यपुस्तके, 2006 पासूनच्या पाठ्यपुस्तकांचा 'पीडीएफ' उपलब्ध
·        2013-14 पासून निर्मिती विभागाचे कामकाज 'ओपीएस' संगणक प्रणालीमार्फत.
·  छपाईसाठी ‘सीटीपी’ तंत्रज्ञानाचा वापर. भविष्यात सर्व्हरमार्फत मुद्रकांना पाठ्यपुस्तक पीडीएफ देण्याचे नियोजन.


----