Tuesday 7 November 2017

शेततळ्यामुळे समृद्धी

शेततळ्यांच्या शतकामुळे कानमंडाळेत समृद्धीची चाहूल


 नाशिक दि.7: राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत चांदवड तालुक्यात कानमंडाळे गावातील शेतकऱ्यांनी 114 शेततळे तयार केल्याने गावातील पीक पद्धतीत लक्षणीय बदल घडून आला आहे. शेततळ्याच्या माध्यमातून गावाच्या आर्थिक विकासालादेखील गती मिळाली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील वडाळभोईपासून साधारण 10 किलोमीटर अंतरारवर असलेल्या या गावातील शेतीचा मुख्य आधार गावातील पारंपारिक नाला आहे. नोव्हेंबरनंतर  त्यात पाणी नसते आणि विहिरींचे पाणीदेखील जानेवारीपर्यंत उपलब्ध होते. त्यामुळे गावातील शेतकरी परंपरागत बाजरी, कुळीथ, सोयाबीन अशी पिके घेत असत. हिवाळ्यात तुरळक प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जात असे.

कृषी विभागाने सिंचनसुविधेबाबत शेतकऱ्यांचे अनेकदा प्रबोधन करूनदेखील परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. मात्र ‘मागेल त्याला शेततळे’ योजना आल्यानंतर त्यात वेगाने फरक झाला. कृषी सहाय्यक सुवर्णा पवार यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थांना शेततळ्याचे महत्व पटवून दिले आणि ऑनलाईन नोंदणीतही मदत केली.
शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी बागायतीकडे वळण्यास सुरवात केली आहे. डाळींब, आले, द्राक्ष, कांदा, ॲपल बोर आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे.
 शेततळ्यांच्या सोबतच ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानाच्या माध्यमातून पीक प्रात्यक्षिके, राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून पॅक हाऊस आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान, सामुहिक शेततळे अशा योजनांच्या माध्यमातून कृषी विभागाने शेतकऱ्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन केल्याने  ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गावात शेततळे योजनेबाबत महिलादेखील कौतुकाने बोलताना दिसतात.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी ठिबक सिंचनासारख्या पद्धतींची माहिती त्यांना देण्यात येत आहे. 40 ते 45 शेतकरी द्राक्ष बागांकडे वळले आहे. खरिपाचे पीक घेतल्यानंतर काही शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड सुरू केली आहे. गावाचा फेरफटका केल्यानंतर शिवारात झालेला बदल चटकन लक्षात येतो. शेततळ्यांच्या माध्यमातून गावात समृद्धी येत असल्याचे चित्र त्यात प्रतिबिंबीत होत आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात अग्रेसर तालुक्यापैकी चांदवड एक  आहे. तालुका कृषी अधिकारी विजय पवार यांच्या प्रयत्नांमुळे तालुक्यात आतापर्यंत 1150 शेततळे पुर्ण झाले आहेत. शेततळ्याची मागणी ऑनलाईन नोंदविल्यानंतर जागा पाहणी करून त्वरीत मंजूरी प्रक्रीया करण्यात येत आहे. तसचे 15 दिवसात अनुदान शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.


सुवर्णा पवार- शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क करून योजनेची माहिती दिल्याने चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेचे महत्व पटल्यामुळे शेतकऱ्यांकडून आता चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ऑगस्ट 2016 पासून गेल्या वर्षभरात 114 शेततळी या योजनेअंतर्गत तयार करण्यात आली आहेत. आणखी 280 शेततळ्यांची मागणी ऑनलाईन नोंदविण्यात आली आहे.

लहानू जाधव, वयोवृद्ध शेतकरी-विहीर आणि विंधनविहिरीचे पाणी जानेवारीतच अटत असल्याने खरिपाच्या उत्पन्नाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता शेततळ्यामुळे किमान खरिपानंतर किमान कांदापीक तरी घेता येईल. शेतकऱ्याला एकप्रकारे आधार मिळाला आहे.



-

No comments:

Post a Comment