Sunday 19 November 2017

राष्ट्रीय पत्रकार दिन

परिवर्तनपूरक पत्रकारिता कायम ठेवण्याचे आव्हान-विश्वास देवकर


नाशिक, दि.19 :  बदलत्या परिस्थितीत माध्यमांसमोर परिवर्तनपूरक पत्रकारिता कायम ठेवण्याचे आव्हान आहे. पत्रकारांनी सकारात्मकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही तर हे आव्हान पत्रकारितेचा गाभा नष्ट करेल, असे प्रतिपादन दै.देशदूतचे संपादक विश्वास देवकर यांनी केले.
          जिल्हा माहिती कार्यालय आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत एचपीटी महाविद्यालय वृत्तपत्रविज्ञा व संज्ञापन अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित माध्यमांसमोरील आव्हाने या विषयावरील परिसंवादात  ते बोलत होते. कार्यक्रमाला दै.दिव्य मराठीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, झी चोवीस तासचे ब्युरो चिफ योगेश खरे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, प्रा.श्रीकांत सोनवणे, माहिती अधिकारी किरण वाघ आदी उपस्थित होते.

          श्री.देवकर म्हणाले, विकासाचा ध्यास हे पत्रकारितेचे मूलतत्व आहे. व्यवसाय म्हणून माध्यमांकडे पाहिले जात असताना पत्रकारितेतील मुल्य टिकविण्याचे मोठे आव्हान पत्रकारांसमोर आहे. सर्वसामान्यांच्या संवेदना हा पत्रकारितेचा मुळ गाभा आहे आणि पत्रकारिता सामाजिक बदलाचे मोठे साधन आहे. त्यामुळे व्यवस्थेचा बळी न होता समाजातील बदलाची नोंद घेत सत्य कथनाच्या आव्हानाला प्रभाविपणे सामोरे जाण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. जगाच्या परिवर्तनाला उपयुक्त ठरेल अशी निर्मिती करणाऱ्या माध्यमांना आणि पत्रकारांना अमर्याद संधी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. माध्यम क्षेत्रात वेगाने बदल होत असून बहुमाध्यमी पत्रकारितेच्या क्षेत्रात नव्या पत्रकारांना भरपूर संधी असल्याचेही श्री.देवकर म्हणाले.
         

          श्री.खरे म्हणाले, कोणत्याही राजकीय प्रवाहापासून अलिप्त राहात स्वतंत्र पत्रकारिता करणे हे माध्यमांसमोर मोठे आव्हान आहे. मुल्यांशी तडजोड न करता चांगली पत्रकारिता करता येते. सामाजिक माध्यमांमुळे सामान्य माणूसदेखील व्यक्त होऊ लागल्याने इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अशा माध्यमांमुळे पत्रकारितेची गती वाढली असून त्या गतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांना क्रमप्राप्त झाले आहे. याशिवाय माध्यमातील अर्थतंत्र, वाढत्या वैयक्तिक गरजा व सभोवतीची प्रलोभनांच्या आव्हानांनादेखील येत्या काळात सामोरे जात मुल्याधारीत पत्रकारिता करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

          डॉ.मोघे यांनी  पत्रकारिता क्षेत्रातील मुल्यांची जपणूक करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेतील विविध पैलूंवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा होत असल्याचे सांगितले. समाजाच्या विकासात सहभाग, जनजागृती आणि प्रेरणा अशा तीन अंगाने माध्यमांचे योगदान असल्याचे ते म्हणाले.
          प्रा.सोनवणे यांनी विकास प्रक्रीयेत लोकसहभाग महत्वाचा असून माध्यमे अशा लोकसहभागासाठी प्रेरित करतात, असे सांगितले. माध्यमांच्या प्रभावी कामगिरीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची जपणूक आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

          प्रारंभी  श्री.पवार  यांचा शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या व्यवस्थापनासाठी विश्वस्त संस्थेच्या कार्यकारी मंडळावर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल श्री.देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला लक्ष्मण घाटोळ, कुमार कडलग, खुशाल पाटील, आकाश येवले, जगदिश सोनवणे, आझाद आव्हाड, देवानंद बैरागी, प्रविण ठाकरे आदीसह पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन, व पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----

          

No comments:

Post a Comment