Tuesday 7 November 2017

कृषी निर्यातदार बैठक

शेतमालाच्या निर्यात वाढीसाठी प्रयत्न व्हावेत-महेश झगडे

 

नाशिक दि. 7- आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन कृषी निर्यातदारांनी शेतमालाची निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी नाशिक येथील विमानसेवेचा उपयोग करण्यात यावा, असे प्रतिपादन  विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

कृषी व फलत्पोदन उत्पादकांना निर्यातीस चालना देण्यासाठी कृषी विभागामार्फत HALCON, निर्यातदार व शेतकरी यांची बैठक आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत श्री. झगडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी टी. एन. जगताप, एचएएलचे व्यवस्थापक बी. एच. शेशगिरी राव,हलकॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर सेन, सिमा शुल्क अधिक्षक एम.वैद्य तसेच नाशिक विभागातील निर्यातदार व शेतकरी उपस्थित होते.


श्री. झगडे म्हणाले, देशात व परदेशात कोणत्या ऋतूत, कोणता आहार केला जातो तसेच कोणत्या भाजीपाल्यास जास्त मागणी असते याचा अभ्यास निर्यातदारांनी करून त्या स्वरूपाच्या उत्पादनाची मागणी शेतकऱ्यांकडून करावी. मागणीनुसार शेतमालाची उत्पादनही तेवढेच महत्वाचे आहे. यासाठी कृषी सहाय्यकांनी निर्यातदार व शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून काम करावे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे शेतीत अधिकाधिक प्रगती कशी होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.


श्री. झेंडे म्हणाले, नाशिक विभागातील शेतकऱ्यांनी फलोत्पादनाप्रमाणे  भाजीपाला उत्पादन व निर्यातीत प्रगती करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावे. याअनुषंगाने ऋतूमानाप्रमाणे जमिनीचे व पाण्याचे नियोजन करून शेती करणे गरजेचे आहे. तसेच शेतीमाल निर्यात करतांना येणाऱ्या अडचणींवर एकत्रितपणे मात करून मार्ग काढणे आवश्यक आहे, असेही श्री. झेंडे यांनी सांगितले.  0000

No comments:

Post a Comment