Thursday 23 November 2017

ग्रंथांनी काय दिले

नाशिक जिल्हा ग्रंथोत्सव 2017
ग्रंथांनी जीवनात लढण्याचे बळ दिले-उत्तम कांबळे

नाशिक दि.23- जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करताना जिथे कुटुंब आणि व्यवस्था हारली तिथे ग्रंथांनी लढण्याचे बळ दिले आणि संकटातून बाहेर पाडण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.
          जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान जि.प. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मु.शं.औरंगाबादकर सभागृह येथे ‘जिल्हा ग्रंथोत्सव 2017’ अंतर्गत ग्रंथांनी काय दिले या विषयावर श्री.कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला लेखा व कोषागरे कार्यालाच्या सहाय्यक संचालक स्वरांजली पिंगळे, नानासाहेब बोरस्ते, श्रीकांत बेणी आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन जोपुळे उपस्थित होते.

          श्री.कांबळे म्हणाले, जीवनातील प्रतिकूल क्षणात पुस्तकाने सन्मानाने जगायला शिकविले आणि आनंदाने जगण्याची कलादेखील शिकवली. तारुण्यात केलेल्या वाचनामुळे जीवनाला आकार मिळाला. चांगले स्वप्न डोळ्यासमोर ठेऊन त्यामागे धावण्याची ताकद ग्रंथांमुळे मिळाली. अज्ञान दूर करून सत्याच्या अधिक जवळ जाण्याची प्रेरणा वाचनामुळे मिळाली.
          स्वत:ला व्यक्त करण्याची उर्मी मनात निर्माण झाल्यावर सृजनात्मक लेखनाची निर्मिती होत असते. निसर्गाला जाणून घेण्यासाठी लेखन करणे हा या निर्मितीचा दुसरा टप्पा आहे. जीवनातले पैलू समजावून घेत त्याला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र ग्रंथलेखनासाठी एवढे पुरेसे नसून त्यासाठी प्रतिभा आवश्यक असते. जीवन, निसर्ग आणि माणसाविषयीचे आकलन आणि निरीक्षण लेखकाकडे असायला हवे. प्रतिभा आणि वेदनेच्या संगमाद्वारे सुंदर साहित्याची निर्मिती होते, असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, जगण्याचे प्रश्न शोधण्यासाठी ग्रंथांकडे जावे लागते.  ग्रंथ प्रश्न निर्माण करायला शिकवितात. ज्या समाजात प्रश्न निर्माण होत नाही तो समाज मृतवत होतो. अलिकडच्या काळात विद्यार्थ्यांचे वाचन कमी असल्याने त्यांच्या सर्वांगिण विकासाला मर्यादा आल्या आहेत. जगण्याला अर्थ द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी ग्रंथांना जवळ करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती पिंगळे म्हणाल्या, ग्रंथ आनंद देणारा मित्र आहे. ग्रंथ हे विवेकी आणि विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन प्रदान करत असल्याने अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा ग्रंथातून मिळते. संत साहित्याने समाजातील वाईट प्रथांवर कडाडून प्रहार केला. अशा साहित्यातून नवी मुल्य समजतात. उद्दीष्टाकडचा प्रवास सुसह्य करण्यासाठी ग्रंथांनी सहकार्य केले, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


-----

No comments:

Post a Comment