Wednesday 26 April 2017

स्वस्थ महाराष्ट्र अभियान

स्वस्थ महाराष्ट्र अभियानाद्वारे

                  गरजू रुग्णावर उपचाराची संधी-राधाकृष्णन बी.


नाशिक, दि.26-  पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्याची व त्याची सेवा करण्याची संधी मिळणार असून चांगले नियोजन केल्यास पथदर्शी अभियानात नाशिक उत्कृष्ट  काम करणारा जिल्हा ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पथदर्शी तपासणी मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील वैद्यकिय रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, आरोग्य विद्यापीठाचे कुलसचिव कालीदास चव्हाण, उपकुलसचिव विद्या ठाकरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे आदी उपस्थित होते.

श्री.राधाकृष्णन  म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या आवाक्यात नसलेल्या शस्त्रक्रीया आणि उपचार मोफत करण्यात येणार आहेत. गरजू रुग्णांना  नामांकित डॉक्टर्स व रुग्णालयाच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील. शासकीय रुग्णालयात नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) सुरू करावे, अशी सूचना त्यांनी केली. आरोग्य यंत्रणेतील  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सेवाभावनेने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यापूर्वी नाशिक येथे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 1 जानेवारी रोजी आयोजित महाआरोग्य शिबीरामध्ये दीड लाख लोकांची तपासणी करुन 50 हजार रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हे अभियानदेखील त्याच पद्धतीने यशस्वी करण्यासाठी इतरही यंत्रणांचा सहभाग घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

डॉ. जगदाळे म्हणाले, अभियानातील प्रत्येक रुग्णावर उपचार होण्यासाठी शासकीय योजना, उद्योगसंस्थांचा सीएसआर निधी आणि समाजसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. अभियानावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शासनाची सर्व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच निश्चित केलेल्या खाजगी रुग्णालयांमध्ये अभियानांतर्गत पूर्व तपासणी केली जाईल. अभियानाची माहिती रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आशासेविका, परिचारीका, अनुलोम ही समाजसेवी संस्था  काम करेल. 

डॉ. वाकचौरे म्हणाले, अभियानात 20 आजारांनुसार रुग्णांची नोंद करण्यात येणार असून त्यांचे वर्गीकरण आणि कार्यवाहीसाठी ‘स्पर्श’ ही संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. महाआरोग्य शिबीरामध्ये पाच दिवसांच्या कालावधीत पूर्व तपासणी करुन  शिबीरासाठी रुग्णांची नोंद करण्यात आली होती. पण या अभियान 1 ते 27 मे दरम्यान राबविण्यात येणार असल्याने  दुर्गम भागातील रुग्णापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. नेहमीच्या आरोग्य योजनेतून उपचार शक्य नसल्यास गरजू रुग्णांना मुख्यमंत्री मदत निधीतून उपचारांसाठी  मदत केली जाईल.

डॉ.डेकाटे म्हणाले, झोपडपट्टीतील गरीब लोकांपर्यंत हे अभियान नेण्यासाठी 1 मे रोजी लोकप्रतिनिधीं, नगरसेवकांच्या सहभागाने नाशिक शहरातील प्रत्येक प्रभागात शुभारंभ कार्यक्रम करण्यात येईल. ठरविण्यात आलेल्या 20 आजारांमध्ये नोंद होऊ न शकल्यास संशयित रुग्ण म्हणून नोंद करण्यात येऊन सर्व रुग्णांपर्यंत लाभ पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
            यावेळी डॉ. वाकचौरे यांनी अभियानाबद्दल माहितीचे सादरीकरण केले तसेच 'स्पर्श' प्रणालीच्या वापराबाबत तंत्रज्ञ श्री.शिंदे यांनी सादरीकरण केले.
 
-----

सप्तश्रृंग गड स्वच्छता मोहिम

सप्तश्रृंग गड स्वच्छता मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

नाशिक, दि. 26:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत श्री सप्तश्रृंगगड प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रशासनातर्फे ग्रामस्थांच्या सहकार्याने  विशेष स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली असून मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी पं.स.सभापती आशा पवार, तहसीलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी टी.टी.सोनवणे, भुपेंद्र बेडसे, श्री सप्तश्रृंग निवासीनी देवस्थानचे विश्वस्त नाना सुर्यवंशी, पं.स.सदस्य पल्लवी देवरे, सरपंच सुमन सुर्यवंशी, उपसरपंच गिरीश गवळी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते  व्यावसायिकांना कापडी पिशव्या आणि कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. श्री.राधाकृष्णन आणि श्री.शंभरकर यांनी स्वत: स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला. मोहिमेअंतर्गत स्त्री शक्ती महिला बचत गटातर्फे प्रत्येक स्टॉलवर प्लास्टीकमुक्तीचा संदेश देणारे प्लास्टीक बोर्ड लावण्यात आले आहेत. तसेच  बचतगटाने ग्रामपंचायतीला ना नफा ना तोटा तत्वावर कापडी पिशव्या तयार करून दिल्या आहेत.

माजी उपसरपंच संदीप बेणके यांनी पाच हजार कापडी पिशव्या मोहिमेसाठी  भेट दिल्या. ग्रामपंचायतीतर्फे 15 हजार पिशव्या आणि 50 कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. व्यावसायिकांचे प्लास्टिक न वापरण्याबाबत प्रबोधनही यावेळी करण्यात आले. प्लास्टीकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

स्वच्छता मोहिमेसाठी टोलनाका ते चांदणी चौक, चांदणी चौक ते पहिली पायरी, चांदणी चौक ते मुंबादेवी, पहिली पायरी ते दाजीबा महाराज, पहिली पायरी ते मुंबई चौक आणि शिवालय ते मुंबादेवी अशा सहा भागात स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते. पथकात अधिकारी, कर्मचारी, नागरिक सहभागी होते.

 प्लास्टिक एकत्रित करण्यासाठी तीन ट्रॅक्टर आणि एक घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली होती. गट विकास अधिकारी कार्यालयातील 86, तहसील कार्यालयातील 40, विश्वस्त मंडळ 55, वन विभाग 7 आणि  सार्वजनिक बांधकाम विभागातील 5 कर्मचाऱ्यांसह 200 नागरिकांनी प्लास्टिक कचरा एकत्रित करण्याच्या उपक्रमात सहभाग घेतला. उद्योजक आणि व्यावसायिकांनी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य आणि सौंदर्य कायम राखण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमात सहभागी होऊन कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

महिन्यातील एक दिवस मोहिम राबवावी-जिल्हाधिकारी

सप्तश्रृंगीगड राज्यातील आदर्श पर्यटनस्थळ व्हावे यासाठी ग्रामपंचायत आणि श्री सप्तश्रृंग निवासीनी देवस्थानने एकत्रितपणे प्लास्टिकमुक्तीची मोहिम राबवावी आणि महिन्यातील एक दिवस निश्चित करून त्यादिवशी नागरिकांच्या सहकार्याने प्लास्टिक कचरा एकत्रित करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी केले.
ते म्हणाले, प्लास्टिक एकत्र करून नाशिक महापालिकेस प्रक्रीयेसाठी देणे शक्य होईल. महापालिका, जिल्हा परिषद आणि प्रशासन यात सामंज्यस्य करार करून ग्रामपंचायतील उत्पन्नाचे साधनही उपलब्ध करून देता येईल. नागरिकांनी प्लास्टिकबंदी मोहिम यशस्वीपणे राबविल्यास गडाचा परिसर सुशोभिकरणासाठी प्रशासनाकडून सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

श्री.शंभरकर यांनी भाविकांना आकर्षित करण्यासाठी आणि गडाचे पावित्र्य राखण्यासाठी प्लास्टिकवर पुर्णत: बंदी आवश्यक असल्याचे सांगितले. सर्वांनी मिळून निश्चय केल्यास गड प्लास्टिकमुक्त होईल आणि त्यातून चांगला संदेश पर्यटकांपर्यंत जाईल, असे ते म्हणाले.
श्री.सुर्यवंशी यांनी देवस्थानतर्फे प्रसादाचे लाडू यापुढे विघटनशील कागदात दिला जाईल, असे सांगितले. भक्तांनादेखील गडावर प्लास्टिक पिशव्या नेण्यास अनुमती दिली जाणार नाही, असेही ते म्हणाले.

----

Tuesday 25 April 2017

‘गुड मॉर्निंग’चा प्रभाव

ग्रामसेविकेच्या ‘गुड मॉर्निंग’चा प्रभाव,  धारणगाव झाले हागणदारी मुक्त

नाशिक, दि.24:- सिन्नर तालुक्यातील धारणगाव ग्रामसेविका वनिता वर्पे यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांमुळे हागणदारीमुक्त झाले आहे.महिला असूनही  पहाटे ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी वर्पे यांनी केलेले प्रयत्न ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरले आहेत.

वनिता वर्पे या 2003 मध्ये ग्रामसेविका पदावर सोनारी येथे रुजू झाल्या. आपले बाळ सव्वा महिन्याचे असूनही रुजू होताच त्यांनी गाव हागणदारीमुक्‍ करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यासाठी अनेकदा रात्रीच्या ग्रामसभादेखील घेतल्या. मात्र त्यांच्या प्रयत्नांना मर्यादीत यश आले. मात्र त्याचवेळी त्यांनी एकतरी गाव पुर्णत: हागणदारीमुक्त करण्याचा निश्चय त्यांनी केला.

धारणगाव येथे जून 2016 मध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी या समस्येकडे प्राधान्याने लक्ष दिले. त्यावेळी 192 पैकी 81 कुटुंबांकडे शौचालय होते. बैठका घेतल्यानंतर नागरिक शौचालय बांधण्यासाठी होकार देऊ लागले, मात्र कृती होत नव्हती. त्यावर ‘गुडमॉर्निंग’ पथकाची कल्पना त्यांनी सुरू केली. त्यासाठी गावातील महिला आणि पुरुषांना एकत्रित केले.

स्वत: वनिता पहाटे साडेतीन वाजता उठून घरातली कामे करीत साडेपाचला गावात पोहोचायच्या. उघड्यावर विधीसाठी जाणाऱ्या  लोकांना गाठून त्यांना गुलाबाचे फूल दिले जायचे. समोरच्या व्यक्तीला या प्रकाराची चीड आल्यास शौचालय लवकर बांधले जातील या हेतूने त्यांनी महिला पथक पुरुषांना आणि पुरुष पथक महिलांना ‘गुड मॉर्निंग’ करेल, नामी शक्कम लढवली आणि त्यात त्यांना यश आले.

 या पथकाद्वारे उघड्यावर विधीसाठी जाणाऱ्यांचे फोटोदेखील काढले जायचे. त्यामुळे  नागरीक आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त करीत होते. मात्र त्यांच्याकडे वनिता यांनी दुर्लक्ष केले. हे सर्व सुरू असताना ग्रामस्थांचे प्रबोधनही सुरू होते. अखेर ग्रामस्थ शौचालय बांधण्यासाठी तयार झाले. आशाबाई काळे यांच्यासारख्या गरीब महिलेला प्रसंगी सर्व सहकार्य करून प्रत्येक घरात शौचालय होईल याची खबरदारी घेण्यात आली. सरपंच जीजाबाई शेळेके, जयाबाई वाळेकर, उपसरपंच दिपक शिसोदे यांनी त्यासाठी चांगले सहकार्य केले. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनीदेखील  वनिता यांना सातत्याने प्रोत्साहन दिले.

गावातील वयोवृद्ध शिक्षक भालचंद्र पाटील यांच्याकडे कागदपत्रे नसल्याने ते शौचालय बांधू शकत नव्हते. ग्रामपंचायतीने स्वत:चे नवे शौचालय बांधण्याऐवजी त्यांची नुतनीकरण करून उरलेल्या रकमेत गुरुजींचे शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हागणदारीमुक्तीच्या निमित्ताने गाव एकत्र आल्याने करवसुली 100 टक्के झाली आहे. गुडमॉर्निंग पथकाचे काम संपल्यानंतर वसुलीचे काम केले जात असे. गावाने लावलेल्या 100 पैकी 75 झाडे जगवली आहेत. मार्चअखेर हागणदारीमुक्त झालेले हे गाव आता विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी पुढे सरसावले आहे.

वनिता वर्पे-ग्रामसेवक झाल्यानंतर गाव हागणदारीमुक्त करण्याच्या स्वप्नाने झोप येऊ दिली नाही. ग्रामस्थ सकाळी गावात गेल्यावर ‘पुढच्या वेळी पथक आले तर गोटे मारू’ असे सांगायचे. त्यावर प्रत्युत्तरादाखल ‘एक खडा तर मारू पहा’ असे ठणकावून सांगितले. मात्र नंतर याच ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले आणि एकदिलाने काम केल्याने गाव हागणदारीमुक्त झाले. आज स्वप्न पुर्ण झाल्याचा आनंद आहे. महिला आहे म्हणून कामाला मर्यादा असतात असे मला कधीच वाटले नाही.

जीजाबाई शेळके, सरपंच-लहान-मोठ्यांना शौचालयाचा चांगला उपयोग झाला आहे. विशेषत: महिलांना आत बाहेर जावे लागत नाही. सुरुवातीला महिला ऐकायच्या नाहीत. मात्र आता सर्वांना समस्या सुटल्याचा आनंद आहे. गावातल्या नसुनही वनिताताईंनी केलेल्या कामाचे सर्वांना कौतुक आहे.


                       ------------------

Monday 24 April 2017

खरीप आढावा बैठक

सिंचन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत शेतीसाठी प्रयत्न-गिरीष महाजन


नाशिक, दि.24 :- शेतकऱ्यांसाठी सिचंनाच्या सुविधा उपलब्ध करून देत आणि शेताच्या बांधापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवून  शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्याला समृद्ध करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या  जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक आणि जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय आढावा व सनियंत्रण बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, कृषी सहसंचालक कैलास मोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम जगताप आदी उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले, शेतकऱ्याला पाणी आणि वीज उपलब्ध करून दिल्यास त्याला आर्थिक समृद्धीकडे नेता येईल आणि एकूणच अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 18 हजार कोटी उपलब्ध झाले आहेत. केंद्राकडे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी आणखी 10 हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे. या माध्यमातून सिंचनाची अनेक अपूर्ण कामे पुर्ण करता येतील. गेल्या दोन वर्षात सिंचनाची अपूर्ण कामे पुर्ण केल्याने आणि पाण्याचे योग्य नियोजन केल्याने रब्बी हंगामात उच्चांकी असे 40  लाख हेक्टर सिंचनाखाली आले आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे कृषी उत्पादनात वाढ झाली आहे.

शेतकऱ्यांना शेती आरोग्यपत्रिकेसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पीक विमा योजनेच्या निकषातदेखील अनुकूल बदल करण्यात आले आहेत.  खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात खते आणि बियाणे  उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सुक्ष्म सिचंनाचा उपयोग करीत शास्त्रोक्त शेती केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत नवे तंत्रज्ञान पोहोचवावे, असे आवाहन त्यांनी केले.

पालकमंत्री म्हणाले, कृषी निविष्ठांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची पद्धत सुरू करून पारदर्शकतेवर अधिक भर देण्यात आला आहे. राज्याच्या अंदाजपत्रकात शेती हाच केंद्रबिंदू मानण्यात आला असून शाश्वत शेतीच्या दिशेने महत्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यातदेखील शेतकऱ्याने शेततळ्यासाठी प्लास्टीकचा कागद बँकेचे कर्ज काढून घेतल्यास जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून त्याचे व्याज भरण्याची योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. खरीप हंगामासाठी पुरेशा प्रमाणात खते आणि बियाणे यांचा साठी उपलब्ध असल्याचे श्री.महाजन म्हणाले. शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करून निश्चितपणे मार्ग काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
‘मेक इन नाशिक’च्या माध्यमातून कृषीपूरक उद्योगांसाठी प्रयत्न
पालकमंत्री म्हणाले, मुंबई येथे होणाऱ्या ‘मेक इन नाशिक’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यात कृषीपूरक उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. पतंजलिसारख्या उद्योगाशी याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. टमाटा, कांदा, द्राक्ष, डाळींब यासारखी उत्पादने घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. दलालापासून शेतकऱ्यांची सुटका व्हावी आणि त्यांना प्रत्यक्षात लाभ व्हावा, असे शासनाचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
लोकसहभागामुळे ‘जलयुक्त’ यशस्वी
शासनाने राबविलेली जलयुक्त शिवार योजना लोकसहभागामुळे यशस्वी ठरली असल्याचे श्री.महाजन यांनी सांगितले. ते म्हणाले, शासन, प्रशासन, सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था, नागरीक यांच्या एकत्रित प्रयत्नातून योजनेला गती मिळाली आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक चांगली कामे झाली आहेत. जिल्ह्यात गतवर्षी याचा कालावधीत असलेली टँकरची संख्या 800 वरून 20 पर्यंत कमी झाली आहे. या योजनेच्या लाभाचे विश्लेषण करून ती अधिक परिणामकारक करण्याचे प्रयत्न करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. चांदवड तालुक्याने राज्यस्तरावर मिळविलेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी कौतुगोद्गार काढले. येथील आमदार डॉ. राहुल आहेर आणि चांदवडच्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

विभागीय आयुक्त श्री.डवले यांची सचिव पदावर मुंबई येथे बदली झाल्याने श्री.महाजन यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पदाचा अभिमान न बाळगता गावपातळीवर जाऊन त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली, अशा शब्दात त्यांनी श्री.डवले यांच्या कामगिरीचे  कौतुक केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियानांतर्गत माहिती देणाऱ्या भित्तीपत्रकाचे आणि कृषी सहाय्यक अभिलेख्याचे प्रकाशन करण्यात आले.

बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, राजाभाऊ वाजे, जे.पी.गावीत, निर्मला गावीत, दिपीका चव्हाण, अनिल कदम,  योगेश घोलप, जयवंत जाधव  आदी उपस्थित होते.
खरीप हंगामासाठी खत आणि बियाणे पुरेशा प्रमाणात
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जगताप यांनी सादरीकरणाद्वारे खरीप हंगामासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली. एकूण 87 हजार 847 क्विंटल बियाणांची मागणी असून 3 लाख 83 हजार 187 मे.टन खतांची मागणी आहे. खते आणि बियाणांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात प्रायोगित तत्वावर बियाणे विक्रीसाठी पीओएस यंत्राचा वापर करण्यात येणार असून 1400 यंत्र वाटप करण्यात आले आहेत. 2017 मध्ये 3 लाख 36 हजार 352 आरोग्यपत्रिकांच्या वाटपाचे उद्दीष्ट आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 83.35 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे डिसेंबर अखेरपर्यंत अर्ज करता येईल, असेही  त्यांनी सांगितले. गावपातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 504 कृषी सहाय्यक कार्यालये सुरू करण्यात आली असून राज्यस्तरावर या ‘नाशिक पॅटर्न’ची दखल घेण्यात आली आहे, असे ते म्हणाले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 2016-17 मध्ये 218 गावांचा समावेश करण्यात आला असून एकूण 6 हजार 157 कामांना मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

----

Friday 21 April 2017

शेततळ्यांमुळे शाश्वत शेतीकडे

शेततळ्यांमुळे निमगावची वाटचाल शाश्वत शेतीकडे


सिन्नर तालुक्यातील निमगाव येथे शासनाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेबरोबरच शेतकऱ्यांनी वैयक्तिक खर्चानेदेखील शेततळी तयार केली आहेत. ‘आत्मा’ अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या रोकडेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून विपणन व्यवस्था आणि नव्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांकडून होणारा वापर यामुळे या गावातील शेतकऱ्यांची वाटचाल शाश्वत शेतीच्या दिशेने होत आहे.
गावात प्रारंभी राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत शेततळे तयार करण्यात आले. त्याचा फायदा झाल्याचे पाहून इतरही शेतकरी शेततळ्यांकडे वळले. गावात  ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत 17 शेततळी तयार करण्यात आली. योजनेअंतर्गत आणखी काही  शेततळ्यांचे काम सुरू आहे. इतर 50 विनाअनुदानीत शेततळीदेखील तयार करण्यात आली असल्याने पिकांसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

पाण्याच्या उपलब्धतेसोबतच नव्या तंत्रज्ञानाचा वापरदेखील शेतकऱ्यांकडून होत आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग,   पॉली हाऊस, शेडनेट आदी सुविधा निर्माण झाल्याने उत्पादकता वाढली आहे. शिवाय वर्षात दोन किंवा तीन पीक घेणे शक्य झाले आहे.  राष्ट्रीय गळीतधान्य व तेलताड अभियानाचा लाभ 60 शेतकऱ्यांनी घेतला.

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. याच योजने अंतर्गत रोकडेश्वर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापण्यात आली. या कंपनीचे 538 सदस्य असून शेतकऱ्यांचे उत्पादन त्यांच्या बांधावरून खरेदी करून ते बाजारापर्यंत नेण्याची व्यवस्था कंपनीमार्फत करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. या योजनेअंतर्गत डाळ मिल, आर्द्रता मापक यंत्र आणि चाळणी यंत्रदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

गावातील 31 शेतकरी सेंद्रीय पद्धतीने शेती करीत आहेत. कोरडवाहू क्षेत्र विकास अंतर्गत विविध प्रशिक्षण सत्र आणि अभ्यासदौऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून त्याचा उपयोग शेतीत बदल घडवून आणण्यासाठी होत आहे. या योजनेअंतर्गत दोन हरितगृह आणि 28 विद्युतपंप देण्यात आले आहेत. सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी एकूण 1 कोटी 41 लाखाचा निधी कृषी विभागातर्फे वितरीत करण्यात आला आहे. आत्माचे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर, मंडळ कृषी अधिकारी बी.के. सातपुते यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य ग्रामस्थांना उपयुक्त ठरत आहे. अनुभवी शेतकरी जनार्दन सानप आणि नारायण सांगळे यांनी सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून गावातील शेतीच्या विकासासाठी नवी दिशा दिली आहे. गावाची वाटचाल शाश्वत शेतीच्या दिशेने सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना कृषी विभागाने पुढाकार घेत दिलेली साथ या प्रक्रीयेत महत्वाची ठरली आहे.
जनार्दन सानप-रोकडेश्वर कंपनीच्या माध्यमातून बांधावर मका, गहू विकत घेतला जातो. मालाचे ग्रेडिंग आणि पॅकींग करून मुंबईच्या बाजारात विक्री केली जाते. त्यामुळे दलालांची साखळी कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे. यापुढील काळात प्रक्रीया उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्याला उमेदीन उभे करण्याचे प्रयत्न शासन व कंपनी एकत्रितपणे करीत आहेत.

        गावात तीन कांदा चाळींची उभारणी. 75 मे.टन क्षमता
        दहा शेडनेटची उभारणी.
        उच्च दर्जा भाजीपाला लागवडीसाठी तीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य
         संगणक, वजनकाटे, शिलाई मशिन, पॅकींग मशीन, ग्रेडींग टेबल, के्रट्स आदी एकूण 14 लाखाचे साहित्य वितरीत

----

Thursday 20 April 2017

हिवरे गाव हागणदारी मुक्त

गाव हागणदारीमुक्त करूनच ग्रामसेवक विभुते चढले बोहल्यावर


नाशिक, दि.20 :- सिन्नर तालुक्यातील हिवरे गाव हागणदारी मुक्त करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अशावेळी तरुण ग्रामसेवक किशोर विभुते यांनी गाव हागणदारीमुक्त होईपर्यंत विवाह न करण्याचा निश्चय केला. बाहेरच्या जिल्ह्यातील तरुण आपल्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचाही त्याग करीत असल्याचे पाहून ग्रामस्थदेखील पुढे सरसावले....आणि अवघ्या काही महिन्यातच गाव हागणदारी मुक्त झाले.

सिन्नर पासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरे गावात एकूण 351 कुटुंब आहेत. त्यापैकी 174 कुटुंबांकडे शौचालय होते. उर्वरीत 177 कुटुंब शौचालय बांधण्यासाठी पुढे येत नव्हते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सिन्नर पंचायत समिती येथे  घेतलेल्या बैठकीत शौचालय उभारणीसाठी ग्रामस्थांना तयार करण्याचे आव्हान कोण स्विकारेल, असा सहज प्रश्न उपस्थित केला असता विभुते यांनी कोणताही विचार न करता ते स्विकारले. एवढेच नव्हे तर गाव हागणदारीमुक्त होईपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय बोलून दाखविला. काहींनी त्यांना यापासून परावृत्त करण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र ते आपल्या निश्चयावर ठाम राहिले.

विभुते हे मुळेचे लातूर जिल्ह्यातील नळेगावचे. एक हुशार आणि धडाडीचे ग्रामसेवक म्हणून आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीसच त्यांनी आपली ओळख प्रस्थापित केली आहे. हीच धडाडी दाखवीत त्यांनी ग्रामस्थांना तत्कालिन सरपंच लता सहाणे, विद्यमान सरपंच विमल बिन्नर यांच्यासह घरोघरी जावून समजविण्याचा प्रयत्न केला. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले. विविध बैठकातून मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे आणि ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनीदेखील बैठकांमधून विभुते यांचे उदाहरण देत ग्रामस्थांनी गावासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. विभुते यांच्या निर्णयामुळे ग्रामस्थांच्या मानसिकतेत हळूहळू परिवर्तन झाले.

दरम्यान जून 2016 मध्ये विभुते यांचा साखरपुडा झाला. तत्पूर्वी गावात 2014-15 मध्ये 14 आणि  2015-16 मध्ये 107 कुटुंबांनी शौचालय बांधले होते. या कुटुंबांना  रुपये 12 हजाराप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. उर्वरीत 56 कुटुंबांकडे शौचालय नसल्याने त्यांनी विवाहाचा मुहुर्त निश्चित करण्यास नकार दिला. गावात त्यांच्या विवाहाची आणि त्यासाठी शौचालय बांधण्याची चर्चा होवू लागली. अखरे ऑगस्ट 2016 मध्ये राहिलेल्या सर्व शौचालयांचे काम पूर्ण होऊन गाव हागणदारीमुक्त जाहीर झाले. उद्दीष्ट पुर्ण झाल्याने विभुते यांनी विवाह निश्चित केला. 21 एप्रिल रोजी त्यांचा विवाह उदगीर तालुक्यातील संगम येथे होत आहे. 
गाव हागणदारीमुक्त होण्याच्या आनंदाएवढाच आनंद ग्रामस्थांना विभुते यांच्या विवाह सोहळ्याचा आहे. आज त्यांच्या संपूर्ण गाव त्यांच्या वैवाहीक जीवनातील आनंदाची कामना करीत त्यांना शुभेच्छा देत आहे. त्यांच्या प्रतिज्ञेने गावाला एकत्र होऊन चांगले काम करण्याची ऊर्जा दिली एवढे मात्र खरे.
किशोर विभुते-गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय विवाह न करण्याचा निश्चय केल्यावर ग्रामस्थांनीदेखील माझ्यावरच्या प्रेमापोटी शौचालय बांधण्यास सहमती दर्शविली. सर्वांनी सहकार्य केल्यानेच हे शक्य होऊ शकले. आज विवाहाचा आणि गावाच्या विकासात काहीतरी योगदान दिल्याचा आनंद आहे.

रत्नाकर पगार, गट विकास अधिकारी- विभुते यांनी चांगले उदाहरण प्रस्तुत केले आहे. एखाद्याच्या समर्पण भावनेने चांगले काम कसे होते हे हिवरे गावात दिसून आले आहे. सिन्नर तालुक्यात इतरही ग्रामसेवकांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे तालुका लवकरच हागणदारीमुक्त होईल आणि त्यासाठी जनतेचे सहकार्य लाभेल, असा विश्वास वाटतो.

----




लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान

 लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान
 गणेश सजावट स्पर्धेत युनिक ग्रुपला प्रथम पुरस्कार प्रदान


नाशिक दि.20-राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान अंतर्गत गणेश सजावट स्पर्धेत जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार राजीवनगर येथील युनिक ग्रुपला प्रदान करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांच्या हस्ते स्पर्धेचे पारीतोषिक वितरण करण्यात आले. यावेळी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. श्रीकांत घारपूरे,अमोल गोटे, मेघा लोंढे आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरावरील प्रथम पुरस्कार युनिक ग्रुप (1 लाख, सन्मानचिन्ह), द्वितीय सुभाषरोड  कला क्रीडा व सांस्कृतिक  मंडळ देवळा (75 हजार, सन्मानचिन्ह) आणि तृतीय पुरस्कार सलादेबाबा कला क्रीडा मंडळ वडनेर भैरव(चांदवड) यांना प्रदान करण्यात आला.

तसेच यावेळी तालुकास्तरीय सजावट स्पर्धेची पारीतोषिके प्रदान करण्यात आली. तालुकास्तरावरील प्रथम विजेत्या मंडळाला रुपये 25 हजार आणि सन्मानचिन्ह, द्वितीय रुपये 15 हजार आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय पुरस्कार विजेत्या मंडळाला रुपये 10 हजार आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
तालुकास्तरीय स्पर्धेतील विजेते: चांदवड तालुका- प्रथम पुरस्कार सलादेबाबा कला क्रिडा मंडळ वडनेरभैरव,द्वितीय जांबगांव रस्ता दत्तमंदीर बहूउददेशीय भजनी मंडळ वडनेरभैरव, तृतीय  संत काळूबाबा महिला मंडळ वडनेरभैरव.
नाशिक तालुका- प्रथम पुरस्कार युनिक ग्रुप, द्वितीय वेलकम  सहकार मित्र मंडळ सोमवार पेठ, तृतीय भगतसिंग क्रांती मंडळ द्वारका.
 देवळा तालुका- प्रथम पुरस्कार सुभाषरोड  कला क्रीडा व सांस्कृतिक  मंडळ देवळा, द्वितीय श्रीकृष्ण मंडळ कनकापूर, तृतीय स्वराज्य फ्रेंडसर्कल खर्डे.
 दिंडोरी तालुका- प्रथम पुरस्कार अजिंक्य मित्र मंडळ, द्वितीय युवक मित्र मंडळ, तृतीय तुळजा भवनी प्रतिष्ठान.
 येवला तालुका- प्रथम पुरस्कार धोंडाराम तालीम, द्वितीय जयविक्रांत फ्रेंड्स सर्कल, तृतीय  फत्तेसिंग सेवाभावी प्रतिष्ठान यांना प्रदान करण्यात आले.
 तसेच संत गाडगेबाबा सांस्कृतिक कला व क्रिडा मंडळ कळवण, युवा फांउडेशन गणेश मित्र मंडळ नांदगांव, श्री निलमणी गणेश मंडळ मनमाड, प्रचितीराज सांस्कृतिक मित्रमंडळ त्र्यंबकेश्वर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

0000000

Wednesday 19 April 2017

उद्योग मित्र समिती

औद्योगिक वसाहतीतील भूखंड वाटप प्रक्रीया  अधिक पारदर्शक करावी
                                                      


नाशिक, दि.19 :-औद्योगिक वसाहतीतील भूखंड वाटप प्रक्रीया अधिक पारदर्शक करावी आणि त्याबाबतच्या माहितीला व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.
 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश रेंदाळकर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले,  विविध औद्योगिक वसाहतीतील भूखंड वितरणाची ऑनलाईन प्रक्रीया एकाचवेळी सुरू करण्याबाबत विचार करण्यात यावा. अंबड औद्योगिक वसाहती अंतर्गत एस ब्लॉकमधील भूखंड वितरण प्रक्रीयेसाठी पुरेसा कालावधी देण्याबाबत माहिती सादर करावी. इच्छुक उद्योजकांना पुरेसा कालावधी दिला नसल्याचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास त्याबाबत पुर्नविचार करण्यास सांगण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सातपूर आणि अंबड वसाहतीतील भूखंडाच्या वितरण आणि वापराबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 ते म्हणाले, औद्योगिक वसाहतीतील मोकळे भूखंड सुशोभिकरणासाठी उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर  पाच वर्षासाठी देण्याबाबत विचार करण्यात यावा. उद्योजकांनी विघटनशील आणि अविघटनशील कचरा वेगळा करून घंटागाडीकडे द्यावा.  उद्योगांच्या सोईसाठी घंटागाड्यांची वेळ निश्चित करण्यास महापालिकेस सुचना देण्यात येतील, असे श्री.राधाकृष्णन यांनी सांगितले. मालेगाव औद्योगिक वसाहतील उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकांना सर्व सुविधा प्रशासनातर्फे देण्यात येतील, तसेच त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी एक खिडकी व्यवस्थादेखील करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
शहराच्या विकास प्रक्रीयेत उद्योगांचे महत्वाचे योगदान असल्याने उद्योगांना अखंडित आणि सुरळीत विद्युत पुरवठा करण्याबाबत महावितरणने विशेष लक्ष द्यावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. औद्योगिक वसाहत विकसीत  करताना पायाभूत सुविधांच्या निर्मितीकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सुचना त्यांनी केली.
जिल्हाधिकाऱ्यांनी  विविध औद्योगिक वसाहतीतील विद्युत समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, दूरध्वनी कनेक्शन, दिंडोरी, येवला, सिन्नर, मालेगाव येथील भूसंपादन, पथदीप दुरुस्ती आदींचा आढावा घेतला.
          बैठकीस उद्योग संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

----

स्वस्थ महाराष्ट्र अभियान

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान
राज्यभरातील सहा जिल्ह्यात 1 मे पासून
पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहिम
                           - गिरीष महाजन


- मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हास्तरावर समिती स्थापन
- नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश
- विविध वीस आजारासंबंधीची तपासणी होणार
- तपासणीनंतर गरजूंना मोफत उपचार करण्यात येणार
मुंबई, दि. 18 : राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यात येत्या 1 ते 27 मे 2017 दरम्यान पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी शासकीय योजनेतून मोफत होणार आहे. या मोहिमेसाठी संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिल्या.
            पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सूचना दिल्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, आरोग्य विभागाचे संचालक सतीश पवार, आयुषचे संचालक श्री. कोहली, सर ज.जी. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. आरोग्य पूर्व तपासणीमुळे रुग्णांच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर शासनाच्या उपलब्ध योजनांमार्फत त्या रुग्णांना योग्य ते पुढील उपचार, शस्त्रक्रिया संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात येतील. यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागातील एक असे सहा जिल्हे घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोहिमेनंतर पुढील कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.     
पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेंतर्गत श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, हृदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदूचे विकार, मूत्ररोग आदी वीस  विषयांतील आजारांसंदर्भातील पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहिम राबविण्यासाठी राज्यस्तरावर वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री सहअध्यक्ष आहेत. तर जिल्हास्तरावर पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करावी, असे यावेळी श्री. महाजन यांनी सांगितले.
श्री. महाजन म्हणाले की, या अभियानांतर्गत संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सा, जिल्हा वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये या मोहिमेत सहभागी होणार आहेत.  या मोहिमेत सहभागी रुग्णांची विषयक माहिती ऑनलाईन ठेवण्यात यावी. तसेच तपासणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र रुग्ण सहायता कक्ष स्थापन करण्यात यावे. तसेच गरजू रुग्णांना शासकीय योजनांमधून पुढील उपचार करण्यात येणार आहेत. ज्यांना सध्याच्या योजनांमधून लाभ मिळू शकणार नाही, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या जिल्ह्याच्या ठिकाणीच उपचारासाठी मदत मिळण्यासाठीही सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक संस्था, अशासकीय संस्था व सामुदायिक सामाजिक दायित्व यांची मदत घेण्यात येणार आहे.
आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेतील रुग्णांच्या आजारासंबंधी संशोधन करून शासनस्तरावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे नियोजन राज्यस्तरीय समिती करणार आहे. या मोहिमेच्या आधारावरच राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र योजना राबविण्यात येणार असल्याचेही श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी विकास मंत्री श्री. सवरा म्हणाले की, समाजातील तळागाळातील गरजू रुग्णांना या मोहिमेद्वारे आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न केल्यास नक्कीच अभियान यशस्वी होईल.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील  यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा व वैद्यकीय शिक्षण विभागातील तज्ज्ञ मनुष्यबळाचा उपयोग करून ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन केले.
००००