Friday 14 April 2017

प्रधानमंत्री आवास योजना

गरीबाला स्वत:चे घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना- डॉ.सुभाष भामरे

नाशिक दि.13- समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येकाला स्वत:चे घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून देशात तीन कोटी घरकुल उभारण्यात येणार आहेत. ही योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी प्रशासन यंत्रणेने प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नाशिक शहरातील आडगाव येथे 448 सदनिकांच्या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, म्हाडाचे मुख्याधिकारी रमेश मिसाळ, उपमहापौर प्रथमेश गिते आदी उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, महाराष्ट्रातील 20 प्रकल्पातील 42 हजार सदनिकांच्या कामाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर येथे करण्यात आला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 2022 मध्ये 75 वर्षे पूर्ण होतील. अशावेळी देशातील सर्वांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालयाची व्यवस्था व पोहोच रस्ता यासह पक्के घर देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे, असे त्यांनी सांगीतले.

ते म्हणाले, झोपडपट्टयांचा आहे तेथेच पुनर्विकास, कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती, खाजगी भागीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याद्वारे वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधण्यास अनुदान अशा चार गटांमध्ये योजना राबवण्यात येणार आहे. योजनेमध्ये अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीच्या मालकीचे देशातील कोणत्याही भागात घर नसावे, असे डॉ. भामरे म्हणाले.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.म्हणाले, अत्यल्प उत्पन्न गटासाठी प्रतिवर्ष आर्थिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपये आहे. ग्रामीण भागात असलेल्या या योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांसाठी नागरीक्षेत्रातही लागू करण्यात आल्या आहेत.
प्रकल्पातील पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून प्रती घरकूल दीड लाख रुपये व राज्य शासनामार्फत एक लाख रुपये अनुदान देण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी मिसाळ यांनी दिली.
यावेळी आमदार सानप यांनी मनोगत व्यक्त केले. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्यावतीने आडगावच्या गट क्र. 1560 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हा प्रकल्प होणार आहे. यावेळी मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन केले.
---

No comments:

Post a Comment