Thursday 28 February 2019

मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम

मतदार नोंदणीसाठी  2 व 3 मार्चला विशेष मोहीम

नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधी-जिल्हाधिकारी

नाशिक, दि. 28: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी 2 व 3 मार्च 2019 रोजी  जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या अर्हता प्राप्त नागरिकांनी या विशेष संधीचा लाभ घेऊन मतदान प्रक्रीयेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणीसाठी  23 व 24 फेब्रुवारी रोजीदेखील विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी नोंदणी करू न शकलेल्या मतदारांसाठी ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. 6, 7, 8 व 8 अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी  1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.
सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी निरक्षर मतदारांसाठी मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असून गावांमध्ये मतदार यादीचे चावडी वाचनही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिक कल्याण संघटना (रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन- आरडब्ल्यूए) आणि सर्व ग्रामसभांनीदेखील या मोहिमेची माहिती नागरिकांना द्यावी. विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीदेखील या मोहिमेत सहभाग घ्यावा.
मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असून मतदाराचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येणार आहे. मतदार ओळखपत्र असले तरी नागरिकांनी मतदार यादीत आपल्या नावाची खातरजमा करून घ्यावी. विशेषत: 18 वर्ष पुर्ण केलेल्या युवकांनी आणि पात्र दिव्यांग नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहिती www.ceo.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
००००

Wednesday 27 February 2019

समन्वय अधिकाऱ्यांची बैठक


लोकसभा निवडणूकीसाठी समन्वय अधिकाऱ्यांची बैठक संपन्न

नाशिक दि.27: सार्वत्रिक निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या समन्वय अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या या बैठकीस अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, सहाय्यक जिल्हाधिकारी  आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणुकीशी संबंधीत पूर्वतयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, अवैध दारू विक्री विरोधात कडक कारवाई करण्यात यावी. ‘स्वीपकार्यक्रमांतर्गत शाळा-महाविद्यालयांच्या सहकार्याने मतदार जागृतीबाबत कार्यक्रम घेण्यात यावे. कायदा व सुव्यवस्थेबाबत आवश्यक नियोजन करावे. शस्त्र जमा करण्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे.

आरोग्य विभाग आणि समाज कल्याण विभाग यांनी दिव्यांग मतदारांची माहिती संकलीत करावी.  दिव्यांग मतदारांना मतदान प्रक्रीयेची माहिती देण्यात यावी. अशा मतदारांना  मतदान केंद्रापर्यंत आणणे व परत नेण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी वाहतूक नियोजन करावे. आरोग्य विभागाने जिल्ह्यातील एकूण व्हील चेअरची संख्या निवडणूक शाखेस तात्काळ कळवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी म्हणाले, समन्वय अधिकाऱ्यांनी जिल्हा निवडणुक व्यवस्थापन आराखडा तयार करावा. 18 ते 19 वयोगटातील मतदारांवर विशेष लक्ष देऊन त्यांची मतदार म्हणून 100 टक्के नोंदणी करावी. जिल्ह्यातील 1400 पेक्षा जास्त मतदार असलेल्या ठिकाणी नवीन सहायकारी मतदान केंद्र स्थापन करावे. मतदान साहित्य वाटप  व स्वीकृती केंद्र निश्चित करावे.
भ्रमणध्वनी आणि इंटरनेट नसलेली ठिकाणे निश्चित करण्यात यावी. मतदान केंद्रावर किमान पायाभूत सुविधा उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करावे. आवश्यक मनुष्यबळ निश्चित करावे. सहायक निवडणुक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रातील सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक दुरुस्तीची कामे त्वरीत करून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.आनंदकर यांनी वाहतूक नियोजनासाठी तयार करण्यात आलेल्यासुगमॲपची माहिती दिली. बैठकीच्या प्रारंभी समस्यांचे समाधान करण्यावर भर देण्याचा संदेश देणारीचित्रफीत दाखविण्यात आली.
----

Tuesday 26 February 2019

लोकसभा निवडणूक बैठक


लोकसभा निवडणूकीत नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग-निलेश सागर

नाशिक दि.26: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत ईव्हीएम व्हीव्हीपॅट आणि ‘सी-विजिल’ सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांनी आवश्यक पूर्वतयारी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी निलेश सागर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकसभा निवडणूक पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आंनदकर उपस्थित होते.

श्री.सागर म्हणाले, सी-विजिलच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारीबाबत तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय पथकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. निवडणुक प्रक्रीयेच्या पारदर्शकतेविषयी नागरिकात विश्वास निर्माण व्हावा यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग करण्यात येणार आहे. विभाग प्रमुखांनी कार्यालयात मतदार जागृती मंच स्थापन करून कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत निवडणुक प्रक्रीयेची माहिती पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती पाठवावी. निवडणुकी संदर्भातील आपली जबाबदारी पार पाडीत प्रत्येकाने आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीत सहकार्य करावे, असेही श्री.सागर म्हणाले.


श्री.आनंदकर म्हणाले, प्रादेशिक परिवहन विभागाने  वाहनांची माहिती संकलीत करून ती तातडीने सादर करावी. मतदानाच्यावेळी मतदान केंद्रावर विद्युत व्यवस्थेबाबत महावितरणने आढावा घ्यावा व आवश्यक कार्यवाही करावी. पोलीस विभागाने सुरक्षा आराखडा तयार करावा.  जिल्हा परिषद आणि महापालिकेने मतदार जागृती कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे त्यांनी सांगितले. निवडणुक विषयक सर्व पत्रव्यवहार पेपरलेस होईल, असेही ते म्हणाले.
बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
----

Friday 22 February 2019

मतदार नोंदणी मोहिम


जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी  विशेष  मोहिमेचे आयोजन
           

नाशिक, दि.22 - भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या नागरिकांना मतदार नोंदणीसाठी संधी देण्यासाठी  23 ते 24 फेब्रुवारी 2019 या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी मोहिम कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


नागरिकांना आपले नाव तपासण्यासाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत  प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निरक्षर मतदारांसाठी मतदान केंद्रावर आणि गावात चावडी वाचन करण्यात येणार आहे.


आगामी सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी वाढविण्यासोबतच एकही मतदार मतदान करण्यापासून वंचित न राहण्यासाठी तसेच मतदार केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या अंतिम मतदार यादीमध्ये ज्या मतदाराचे नाव आलेले नसेल किंवा चुकलेले असल्यास त्यांना फार्म नंबर 6,7,8, 8अ भरुन देण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या मोहिमेत 23 ते 24 फेब्रुवारी 2019 या दोन्ही दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
नागरिकांनी दोन रंगीत पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, रहिवाशी पुरावा आणि वयाचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. विशेष मतदार नोंदणी शिबीरामध्ये जास्तीत जास्त मतदार यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी केले आहे.
0000

Monday 11 February 2019

शेतकऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी करार


शेतकऱ्यांच्या क्षमतावृद्धीसाठी गोदरेज आणि प्रशासनात करार


         नाशिक दि.11 :-  अल्पभूधारक आणि भूमीहीन शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञान आणि पूरक व्यवसायाची माहिती देऊन त्यांची क्षमतावृद्धी करणे आणि त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी गोदरेज ॲग्रोटेक आणि जिल्हा प्रशासनात सामंजस्य करार करण्यात आला. करारावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि गोदरेज ॲग्रोटेक सीएसआर शाखेच्या व्यवस्थापक अनाहिता भटनागर यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

          जिल्ह्यातील जांबुटके, खडकीजाम, रासेगाव, उमराळे (बु), धेरवाडी, जानोरी, आशेवाडी आणि तुंगलधारा या आठ गावातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. प्रशिक्षण आणि संवादाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न  या उपक्रमांतर्गत करण्यात येईल.
          गोदरेज ॲग्रोटेकशी संलग्न असलेल्या संपदा या स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रशिक्षणाचे काम करण्यात येणार आहे. शेतकरी कुटुंबातील युवकांपर्यंत आवश्यक माहिती पोहचविण्याचा विशेषत्वाने प्रयत्न उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शेतीतील उत्पादनवाढ, मशरूम उत्पादनासारखे अपारंपरिक व्यवसाय, पशुपालन आदींकडे शेतकऱ्यांना वळविण्याचे प्रयत्न प्रशिक्षणाच माध्यमातून करण्यात येणार आहे.
         
-----

Friday 8 February 2019

पोल्ट्री एक्स्पो 2019


नाशिक जिल्ह्यात पोल्ट्रीकेंद्र स्थापन करावे - सुभाष देसाई

नाशिक, दि.8- शेतकऱ्यांना प्रतिकुल परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या आधार देण्यासाठी पुरक व्यवसाय महत्वाचा असून त्यादृष्टीने जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाच्या प्रचारासाठी पोल्ट्रीकेंद्र
स्थापन करावे, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
ठक्कर डोम येथे आयोजित पोल्ट्री एक्स्पो 2019च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ब्रिडर असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार,वेंकटश्वराय हेचरिचचे महाव्यवस्थापक डॉ.प्रसन्न पेडगावकर, ब्रायलर फार्मर्स कमिटी गुजरातचे अध्यक्ष अन्नुभाई पटेल, पोल्ट्री औद्योगिक संस्थेचे सदस्य कृष्णा गांगुर्डे, उध्दव आहेर उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणाले, शेतकऱ्यांना पोल्ट्री व्यवसायांसाठी प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे. पोल्ट्री व्यवसायाला शेतीशी जोडण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषि औद्योगिक धोरणात त्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या व्यवसायासंबंधी समस्या सोडविणेबाबत कृषि व पशुसंवर्धन विभाग यांचे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येईल.

पोल्ट्री व्यवसायिक व शेतकरी एक आल्यास या व्यवसायाला अधिक गती प्राप्त होईल. दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे धवलक्रांती झाली त्याप्रमाणे पोल्ट्री व्यावसायिकांनी संघटीतपणे हा व्यवसाय पुढे न्यावा,असे आवाहन त्यांनी केले. प्रदर्शनाच्या माध्यमातून पोल्ट्री व्यवसायाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मंत्री महोदयांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.
                                        उद्योगमत्र्यांची सह्याद्री फार्मला भेट

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेडला उद्योगमंत्री सुभाषदेसाई यांनी भेट दिली. यावेळी चेअरमन विलास शिंदे, सह्याद्री फार्मचे संचालक प्रशांत जयकृष्णीय, महाएफपीसीचे महाव्यवस्थापक योगेश थोरात, प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, श्रीकृष्ण गांगुर्डे, आरती शिंदे, तुषार जगताप उपस्थित होते.
यावेळी श्री.देसाई यांनी सह्याद्री फार्मची पाहणी करुन संपुर्ण यंत्रणेची माहिती घेतली तसेच कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याची संघटीत शक्ती कशी काम करते याचा प्रत्यय आल्याचे त्यांनी सांगितले.  शेतकरी एकत्रित येऊन जगाच्या बाजारपेठेत स्थान निर्माण करुन शकते हे सह्याद्री फार्मसच्या माध्यमातुन स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मंत्री महोदयांना सादरीकरणाद्वारे कंपनीच्या कामकाजाची माहिती देण्यात आली.
0000

Thursday 7 February 2019

गाळ काढण्यासाठी करार


ब्रिटीशकालीन वळण बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी करार


          नाशिक दि.7: जिल्ह्यात ब्रिटीशकालीन वळण बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युवा मित्र संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. आठ तालुक्यात 142 गावातील 71 हजार कुटुंबांना याचा लाभ होणार असून 55 हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. आणि युवा मित्रच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक सुनिल पोटे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक मुकुल गुप्ते, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, युवा मित्र संस्थेचे, कार्यक्रम व्यवस्थापक अजित भोर आदी उपस्थित होते.

आतापर्यंत 26 वळणबंधाऱ्यातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात 170 वळणबंधाऱ्यातील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी 31 जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून ही संख्या 70 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
बागलाण तालुक्यात 35 गावातील 40 बंधारे, चांदवड तालुक्यात 32 गावातील 39, दिंडोरी  10 गावातील 13, कळवण 21 गावातील 24, मालेगाव 13 गावातील 13, नाशिक 1 तालुक्यातील 2, निफाड 22 गावातील 25 आणि सिन्नर तालुक्यात 8 गावातील 14 बंधाऱ्यांचा यात समावेश आहे.
गाळ काढण्यासाठी 50 टक्के खर्च शासन , 41.9 टक्के खर्च टाटा ट्रस्ट व इतर संस्था आणि 8.1 टक्के खर्च लोकसभागातून करण्यात येणार आहे.
गाळ काढण्याबरोबर पीक पद्धतीत अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिकांचेदेखील या कामात सहकार्य घेण्यात येणार आहे. भविष्यात पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी पाणीवापर संस्था स्थापन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. गाळ काढण्याच्या कामात ग्रामस्थांचे सहकार्य मिळावे यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
-----

Monday 4 February 2019

रस्ता सुरक्षा अभियान


युवकांनी वाहतूक सुरक्षेचे दूत म्हणून कार्य करावे-रविंद्र सिंगल


          नाशिक दि.4: रस्ते अपघातामुळे होणारी मानवी जीवाची हानी टाळण्यासाठी युवकांनी वाहतूक सुरक्षेचे दूत म्हणून कार्य करावे आणि रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्ताने  वाहतूक नियमांची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी केले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक शहर पोलीस, नाशिक ग्रामीण पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय शिक्षण विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 30 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.



कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलीस अधीक्षक संजय दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पी.जी.खोडसकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे आदी उपस्थित होते.

श्री. सिंगल म्हणाले, वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून समाजाचीदेखील आहे. रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या भारतात अधिक आहे. शालेय विद्यार्थ्यानीछोटा पोलीसबनून  वाहतूक नियमांबाबत जागरूकता आणावी आणि अपघात टाळण्यासाठी पोलीस  दलाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. दराडे म्हणाले, रस्ता अभियांत्रिकी, शिक्षण आणि वाहतूक नियम हे रस्ता सुरक्षेचे प्रमुख तीन घटक आहेत. याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न रस्ता सुरक्षा सप्ताहात करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या हेल्मेट सक्तीला सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.


सात दिवसाच्या रस्ता सुरक्षा अभियानातजीवनदूतही  संकल्पना राबविण्यात येत आहे. स्वच्छ आणि सुरक्षीत शहरासाठी नागरिकांनी सहाकार्य करावे, असे श्री.कळसकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

मान्यवरांच्या हस्तेजीवनदूतम्हणून काम करीत अपघातात सापडलेल्या नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाहतूक नियमांची माहिती देणारी घडीपत्रिका आणि जीवनदूत होऊ या रेया गिताच्या सीडीचे विमोचनदेखील करण्यात आले.

डॉ. शैलेंद्र गायकवाड आणि सहकाऱ्यांनीयमदूत की जीवनदूतया पथनाट्याद्वारे वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. यावेळी वाहतूक सुरक्षेवर आधारीत विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

-----