Friday 22 February 2019

मतदार नोंदणी मोहिम


जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी  विशेष  मोहिमेचे आयोजन
           

नाशिक, दि.22 - भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या नागरिकांना मतदार नोंदणीसाठी संधी देण्यासाठी  23 ते 24 फेब्रुवारी 2019 या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी मोहिम कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.


नागरिकांना आपले नाव तपासण्यासाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत  प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निरक्षर मतदारांसाठी मतदान केंद्रावर आणि गावात चावडी वाचन करण्यात येणार आहे.


आगामी सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी वाढविण्यासोबतच एकही मतदार मतदान करण्यापासून वंचित न राहण्यासाठी तसेच मतदार केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या अंतिम मतदार यादीमध्ये ज्या मतदाराचे नाव आलेले नसेल किंवा चुकलेले असल्यास त्यांना फार्म नंबर 6,7,8, 8अ भरुन देण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

या मोहिमेत 23 ते 24 फेब्रुवारी 2019 या दोन्ही दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत विशेष मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
नागरिकांनी दोन रंगीत पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, रहिवाशी पुरावा आणि वयाचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. विशेष मतदार नोंदणी शिबीरामध्ये जास्तीत जास्त मतदार यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी केले आहे.
0000

No comments:

Post a Comment