Thursday 7 February 2019

गाळ काढण्यासाठी करार


ब्रिटीशकालीन वळण बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी करार


          नाशिक दि.7: जिल्ह्यात ब्रिटीशकालीन वळण बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि युवा मित्र संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला. आठ तालुक्यात 142 गावातील 71 हजार कुटुंबांना याचा लाभ होणार असून 55 हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. आणि युवा मित्रच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक सुनिल पोटे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक मुकुल गुप्ते, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, युवा मित्र संस्थेचे, कार्यक्रम व्यवस्थापक अजित भोर आदी उपस्थित होते.

आतापर्यंत 26 वळणबंधाऱ्यातील गाळ काढल्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढील टप्प्यात 170 वळणबंधाऱ्यातील गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी 31 जेसीबी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले असून ही संख्या 70 पर्यंत वाढविण्यात येणार आहे.
बागलाण तालुक्यात 35 गावातील 40 बंधारे, चांदवड तालुक्यात 32 गावातील 39, दिंडोरी  10 गावातील 13, कळवण 21 गावातील 24, मालेगाव 13 गावातील 13, नाशिक 1 तालुक्यातील 2, निफाड 22 गावातील 25 आणि सिन्नर तालुक्यात 8 गावातील 14 बंधाऱ्यांचा यात समावेश आहे.
गाळ काढण्यासाठी 50 टक्के खर्च शासन , 41.9 टक्के खर्च टाटा ट्रस्ट व इतर संस्था आणि 8.1 टक्के खर्च लोकसभागातून करण्यात येणार आहे.
गाळ काढण्याबरोबर पीक पद्धतीत अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येणार आहेत. स्थानिक नागरिकांचेदेखील या कामात सहकार्य घेण्यात येणार आहे. भविष्यात पाण्याचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी पाणीवापर संस्था स्थापन करण्यावरही भर देण्यात येणार आहे. गाळ काढण्याच्या कामात ग्रामस्थांचे सहकार्य मिळावे यासाठी जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.
-----

No comments:

Post a Comment