Wednesday 31 January 2018

शिक्षणाची वारी

शैक्षणिक सुधारणांमुळे राज्य तिसऱ्या स्थानावर- विनोद तावडे


नाशिक, दि.31:- महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक सुधारणांमुळे राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, अल्पसंख्याक व वक्फ बोर्ड, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शिक्षणाची वारी कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार सीमा हिरे, नरेंद्र पवार, शिक्षण संचालक सुनिल मगर, उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी वैशाली झनकर, नितीन उपासनी तसेच प्रदिप पेशकार, संदिप झा आदी उपस्थित होते.

श्री. तावडे म्हणाले, तीन वर्षांपूर्वी सुरुवात केलेल्या शैक्षणिक सुधारणांचे चांगले परिणाम दिसत आहेत. यापूर्वी महाराष्ट्र देशात 16 व्या स्थानावर होते. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाची अंमलबजावणी चांगल्यारितीने होत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काहीना काही कौशल्य दडलेले असते ते शोधण्याची गरज आहे. यामुळे शालांत परिक्षेत अनुतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निकालानंतर लगेचच पुन:परिक्षा घेणे, गुणपत्रकावर नापास हा शेरा टाकण्याच्या ऐवजी इलीजीबल फॉर स्कील डेव्हलपमेंट’ (कौशल्य विकासासाठी पात्र) शेरा देणे,असे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगीतले.

ते म्हणाले, शाळांमधील शैक्षणिक सुधारणांमुळे 25 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमधून काढून मराठी शाळांमध्ये पाठविण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला आहे. शिक्षकांना तंत्रज्ञानाचा परिचय करून दिल्याने एक लाख 21 हजार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवताना तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला आहे. शिक्षकांवरील शाळाबाह्य कामाचा ताण कमी व्हावा यासाठी निवडणूक कामांमधून वगळण्यात यावे असे निर्देश देण्यात आल्याचेही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगीतले.

          श्री.तावडे यांनी शिक्षकांमध्ये जावून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. तसेच शिक्षकांनी सुचविलेल्या नवीन संकल्पनांचा शासनाच्या धोरणंमध्ये समावेश करण्यात  येईल, त्यांनी सांगीतले.
शिक्षणाची वारी कार्यक्रमासाठी शिक्षण पद्धतीमध्ये राबवलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे, उपक्रमांचे 55 स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री श्री.तावडे यांनी स्टॉल्सला भेट देऊन पाहाणी केली. ‘शिक्षणाची वारी कार्यक्रमांतर्गत 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत नाशिकसह पालघर, ठाणे, पुणे, अहमदनगर, नंदुरबार, मुंबई, मुंबई उपनगर, धुळे, जळगाव जिल्ह्यांमधील शिक्षक सहभागी होणार आहेत.

00000

Tuesday 30 January 2018

विधी सेवा शिबीर


         गरजू नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणे गरजेचे- सुर्यकांत शिंदे   
                                              
                   
             नाशिक दि.30- समाजातील दुर्बल घटक आणि गरजू नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजनांची माहिती पोहोचणे गरजेचे असून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून अशी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे प्रतिपादन  प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांनी केले.

           विधी सेवा शिबीर शासकी योजनांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वक अजय मिसर आदी उपस्थित होते.

           श्री. शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देाताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या समजावून घेत त्यांना मार्गदर्शन करावे. एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होत असल्याने शासकीय योजना खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.     

          डॉ. सिंगल म्हणाले, ग्रामीण भागातील गरीबांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती कोठे मिळेल हे माहित नसल्यामुळे त्यांना योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहावे लागते.  मेळाव्याचा  त्यांना योजनांची माहिती मिळेल आणि त्याचा लाभ घेता येईल. ही माहिती अधिकाधीक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

           जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने बी.डी.भालेकर मैदान येथे आयोजित मेळाव्यात नागरीकांना योजनांची माहिती देण्यासाठी शासकीय विभागांनी 29 स्टॉल्स उभारण्यात आले. यामध्ये पोलिस आयुक्तालय, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, कौशल्य विकास विभाग, जिल्हा अधिक्षक डाकघर(पोस्ट विभाग), जिल्हा पोलिस अधिक्षकपशूसंवर्धन विभाग आदीं विभागांनी स्टॉल उभारले आहेत. स्टॉल्सच्या माध्यमातून योजनांची माहिती देण्यात आली.
00000000


चांदगिरी ग्रामपंचायत

सेवा भावनेने काम केल्यास विकास शक्य - गुलाबराव पाटील

नाशिक, दि.30:- सार्वजनिक जीवनात सेवा भावनेने काम केल्यास गाव आणि परिसराचा वेगाने विकास शक्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
 सोमवारी रात्री चांदगिरी ग्रामपंचायत येथील विविध विकास कामांचे भुमिपुजन व लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, बबनराव घोलप,  विजय करंजकर, सरपंच नंदाताई कटाळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना, सेवा भावनेने विकासाची कामे केल्यास जनतेचा विश्वास संपादन करता येतो. गावातील विकास पाहिल्यावर याची प्रचिती येते, असे राज्यमंत्री श्री.पाटील म्हणाले. त्यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. गावातील विकासकामांच्या गुणवत्तेचेही त्यांनी कौतुक केले.

-----

Monday 29 January 2018

पतसंस्था शाखा उद्घाटन

पतसंस्थांनी नागरिकांचा विश्वास संपादन करावा-गुलाबराव पाटील
 
नाशिक, दि. 29 : पतसंस्थांनी पारदर्शक कारभाराद्वारे नागरिकांचा विश्वास संपादन करावा व ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
          लासलगाव ग्रामीण बिगरशेतकरी सहकारी पतसंस्था मर्यादीत येवला शाखा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष बंडुशेट शीरसागर, पंचायत समितीचे सभापती रुपचंद भागवत, कल्याणराव पाटील, दादाजी जाधव, माणिकराव शिंदे, मोतीराव पवार, अंबादास बनकर, राजेंद्र लोणारी आदी उपस्थित होते.

          श्री.पाटील म्हणाले, पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात वित्तपुरवठा सुलभतेने होतो. पतसंस्थेतील रोजच्या बचतीमुळे ठेवीदारांना बचतीची सवय लागते आणि प्रसंगी बचतीचा उपयोग गरजा भागवण्यासाठी करता येतो. पतसंस्था चांगल्यारितीने चालण्यासाठी पतसंस्था आणि ठेवीदारांनी परस्पर सहकार्याची आणि विश्वासाची भावना ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
          राज्यात एक लाख 92 हजार सहकारी संस्था कार्यरत असून ग्रामीण विकासासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही श्री.पाटील म्हणाले.


----

सायबर सुरक्षितता

सायबर सुरक्षितते जनजागृती आवश्यक-रवींद्रकुमार सिंगल
                                                       

नाशिक दि.29 – माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे 'सायबर सुरक्षितता' हा विषय समाजातील सर्व घटकांसाठी महत्वाचा असून त्याबाबत अधिकाधीक जनजागृती होण्याच्यादृष्टीने माध्यमांचे सहकार्य महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
           नाशिक पोलिस आयुक्तालय जिल्हा माहिती कार्यालय यांच्यावतीने पत्रकारांसाठी आयोजितसायबर सुरक्षितताया विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील,श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुटेमाहिती अधिकारी किरण वाघ तसेच पत्रकार, पत्रकारीतेचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

          श्री.सिंगल म्हणाले, सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॅापींग, ऑनलाइन बॅंकिंगचे व्यवहार होत आहेत. यासाठी स्मार्ट फोन, संगणक या माध्यमांचा वापर होत  आहेसमाजातील ज्येष्ठ नागरीक, महिला, विद्यार्थी, युवक हे याद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार करत असताना -प्रणालीचा जबाबदरीपूर्वक उपयोग करणे गरजेचे आहे. या  व्यवहारांमध्ये पुरेशी काळजी घेतली जात नाही असे दिसून आले आहे. ऑनलाइन व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची गरज असून नागरींकांमध्ये याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

           ते म्हणाले, ऑनलाइन व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याने नागरीक गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे येतात. यासाठी विशेष सायबर पोलिस स्टेशनची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे अशा गुन्ह्यांचा लवकर सोडवणूक करता येते आहे. व्हॉटस् ॲपचा माध्यमातून महिलांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारास सायबर शाखेने शोधून राजस्थानमधून अटक करण्यात आली, यामुळे पिडीत महिलांना दिलासा मिळाला. सायबर शाखेची कामगिरी महत्वपूर्ण ठरत असून राज्यात नाशिक पोलिस आयुक्तालयाची कामगिरी चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.
            सायबर सुरक्षिततेबाबत होणारी कार्यशाळा हा चांगला उपक्रम असून जिल्हा माहिती कार्यालयाच्या सहयोगाने जनजागृतीसाठी पुढेदेखील अशा कार्यशाळांचे आयोजन केले जाईल, असे श्री. सिंगल म्हणाले

            याप्रसंगी भूषण देशमुख यांनी  डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर, त्यामध्ये असणारे धोके, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यायची काळजी आदी बाबींवर सादरीकरण केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. मोबाईलचा वापर करताना अनावश्यक अप डाउनलोड करू नये, आपला पासवर्ड परिचित व्यक्तीलाही सांगू नये, फसव्या मेलपासून सावध राहावे, चांगल्या दर्जाची संरक्षण यंत्रणा राबवावी, संगणकावरील माहितीचे नियमित बॅकअप घ्यावे, अशी माहिती त्यांनी दिली. कार्यशाळेच्या माध्यमातून मिळणारी माहिती उपस्थितांनी नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
                                                           00000000