Friday 5 January 2018

स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सर्वसमावेशक प्रयत्न

दुर्बल घटकांच्या आरोग्य आणि शिक्षणाचा विचार व्हावा-देवयानी फरांदे

नाशिक  दि. 5 :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महिला आणि दुर्बल घटकांच्या आरोग्य आणि शिक्षणाचा विचार प्राधान्याने व्हावा, तसेच त्यासाठी राखीव निधीचा उपयोगही परिणामकारकरितीने व्हावा, अशी अपेक्षा आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केली.
          विभागीय परिषदेत आयोजित 'स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सर्वसमावेशक प्रयत्न' या विषयावरीत सत्रात त्या बोलत होत्या. सत्राला पाणी फाऊंडेशनचे सल्लागार नामदेव नन्नावरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  विद्यापीठाचे प्राध्यापक जितेंद्र वासनीक, अशोक भांगरे आदी उपस्थित होते.

          श्रीमती फरांदे म्हणाल्या, गावाचा विकास झाला तरच देशाचा एकूण समतोल विकास होईल. गावाचा विकास महिला आणि दुर्बल घटकांच्या विकासावर अवलंबून असल्याने घटनादुरुस्तीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण देण्यात आले. आरक्षणाच्या माध्यमातून महिलांचे नेतृत्व चांगल्याप्रकारे विकासीत झाले. स्थानिक स्वराज्य संस्थेतून अनुभव घेत विधीमंडळ आणि  संसदेत प्रभावी कामगिरी करण्याची संधी त्यांना मिळाली. कुटुंबातून जिथे महिलांना प्रोत्साहन दिले जाते त्याठिकाणी चांगले नेतृत्व निर्माण होते,असे त्यांनी सांगितले. महिला आणि दुर्बल घटकातील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षणाच्या आधारे विकासप्रक्रीया गतिमान करावी आणि अशा लोकप्रतिनिधींनीदेखील निवडून आल्यावर समाजाच्या सेवेची संधी म्हणून स्वतंत्रपणे काम करती ठसा उमटवावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
          श्री.वासनीक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत स्त्री-पुरुष समानतेविषयी विचार व्हावा आणि महिलांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे सांगितले. आरक्षणामुळे सार्वजनिक जीवनातील महिलांचा सहभाग वाढला,असे मत त्यांनी व्यक्त केले.
          श्री.भांगरे यांनी स्थानिक स्वरांज्य संस्थेच्या माध्यमातून दुर्बल घटकांच्या विकासाच्या योजनांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. श्री.ननावरे म्हणाले, घटनादुरुस्तीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला गती मिळाली. महिला आणि दुर्बल घटकांना जबाबदारी आणि अधिकार देण्यात आले. ग्रामीण विकासासाठी सर्व घटकांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

----

No comments:

Post a Comment