Thursday 25 January 2018

राष्ट्रीय मतदार दिन

 राष्ट्रीय मतदार दिवस
विभागीय आयुक्त  झगडे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप

नाशिक दि.25- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते सहस्त्रक मतदार प्रमाणपत्र व दिव्यांगांना मतदार प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., अप्पर उपजिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ, उपजिल्हाधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, सोपान कासार, निवडणुक विभागाचे तहसीलदार गणेश राठोड, तहसीलदार राजश्री अहिरराव, आंतरराष्ट्रिय खेळाडू मोनिका आथरे, संजीवनी जाधव आणि प्रशिक्षक विरेंद्र सिंग आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, देशाचा विकास करण्यासाठी आणि लोकशाही बळकट होण्यासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावणे गरजेचे आहे. भारतीय संविधात कुठलाही भेदभाव न करता 18 वर्ष पुर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळतो. लोकशाहीतील हा  सर्वात मोठा हक्क आहे. मतदार नोंदणीची  जबाबदारी जिल्ह्यातील बीएलओ आणि अधिकारी यांनी चांगल्या प्रकारे पार पाडल्याने मतदार नोंदणी अभियानात  नाशिक अग्रेसर ठरला,  असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी दृकश्राव्य चित्रफीतीद्वारे केंद्रिय निवडणुक आयुक्तांच्या संदेश दाखविण्यात आला. विभागीय आयुक्त झगडे यांनी मतदार प्रतिज्ञापत्राचे वाचन केले.  मान्यवरांच्या हस्ते मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच मतदार नोंदणीत चांगले काम करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी जनजागृती  रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झाला. रॅलीच्या माध्यमातून मतदार नोंदणीचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय, एम.जी.रोड, शालीमार चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात रॅलीचा समारोप झाला.

----

No comments:

Post a Comment