Friday 26 January 2018

विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धा 2017

युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला बलशाली बनविण्यासाठी करा- पालकमंत्री


       नाशिक दि. 26- देशात तरुणांची संख्या मोठी असून या युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला बलशाली बनविण्यासाठी होणे गरजेचे आहे. यासाठी एकत्र येऊन व एकसंघ राहून गाव, शहर व देशासाठी कार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. 
          जिल्हा पोलिस प्रशासनाच्या विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धा-2017 चा पारितोषिक समारंभ व तक्रारदारांचा मुद्देमाल परत करण्याचा उपक्रम पालकमंत्री गिरीष श्री.महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधिक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड आदी उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले, महाराष्ट्रातून सुरू करण्यात आलेल्या गणेशोत्सवामुळे स्वातंत्र्य लढ्यास बळ मिळाले होते. असे सण साजरे करतांना त्याचे पावित्र्य राखण्याबरोबर सामाजिक संदेश देण्याचे उपक्रम राबविणे गरजेचे आहे.  त्याचबरोबर अशा उत्सव उपक्रमातदेखील शिस्तीचे आणि नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.व्यसनाधीनतेमुळे, तंबाखु, गुटखा आदींच्या सेवनामुळे युवा पिढी कमजोर होण्याची भिती असल्याने गणेशोत्सवाच्या माध्यमातून युवकांचे प्रबोधन करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
          ते म्हणाले, आपल्याला मिळालेलं शरीर हे मौल्यवान असून निरोगी देहातील अवयवदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. या मातीमोल शरिराचा असा उपयोग होण्यासाठी सर्वांनी अवयवदानासाठी पुढे यावे. स्वच्छ गाव व स्वच्छ शहर होण्यासाठी काय करता येईल याचा विचार व्हावा व भारत स्वच्छता अभियानात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
           समाजातील काही अपप्रवृत्तींमुळे वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर भूमीका घ्यावी. पिडीतांचे मुद्देमाल परत देण्याचा जिल्हा पोलीस प्रशासनाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे श्री.महाजन म्हणाले.

विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धा 2017 चे पालकमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

          जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित विघ्नहर्ता गणेशोत्सव स्पर्धा 2017 चे पारितोषिक वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक एकता मित्रमंडळ, बलखेड ता.दिंडोरी, द्वितीय पारितोषिक युवा फांऊडेशन मित्रमंडळ नांदगाव व तृतीय पारितोषिक बजरंग मित्रमंडळ गिरणारे यांना देण्यात आले. तसेच मालेगांव ग्रामीण उपविभागांतर्गत राजे ग्रुप झोडगे, ताहराबादचा राजा व आदिवासी युवक मित्रमंडळ, निफाड उपविभाग अंतर्गत जयबजरंग मित्रमंडळ विंचुर, नेहरुचौक मित्रमंडळ निफाड, क्रांती मित्रमंडळ लासलगांव, पेठ उपविभागांतर्गत जयबजरंग गणेशमंडळ, मृत्यूंजय गणेश मित्रमंडळ, महारुद्र मित्रमंडळ गिरणारे, कळवण उपविभागांतर्गत एकता युवक मंडळ वरखेडे, संतगाडगेबाबा गणेशोत्सव मंडळ पिंपळखुर अभोणा, इच्छापूर्ती गणेशमंडळ खेडगाव, नाशिक ग्रामीण उपविभागांतर्गत नॅशनल हायवे मित्रमंडळ पिंपळगाव बसवंत, ओझरचा राजा गणेशमंडळ, संताजी मित्रमंडळ घोटी आदींसह उत्तेजनार्थ पारितोषिके मिळविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिकांचे वाटप करण्यात आले.

पोलीस प्रशासनाकडून 22 तक्रारदारांना 14 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल परत 

          मुद्देमाल परत देण्याच्या उपक्रमामध्ये वावी ता.सिन्नर येथील संतोष यादव यांची 2 लाख 45 हजार रुपये किंमतीची कार, कळवण येथील अनुसयाबाई यांचे 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल ओझर येथील पंकज थोरात यांचा 1 लाख 13 हजारांचा मुद्देमाल तसेच सुरगाणा, मालेगांव, इगतपुरी, वडनेर खाकुर्डी, आदी ठिकाणांवरुन आलेल्या तक्रारदारांचे सोन्याचे दागिने, मोबाईल, मोटार सायकल, आदी हस्तगत केलेला मुद्देमाल पालकमंत्र्यांच्या हस्ते परत देण्यात आला.
---


No comments:

Post a Comment