Friday 29 July 2016


लिंगटांगवाडी-कुंदेवाडीत लोकसहभागातून जलक्रांती

सिन्नर तालुक्यातील लिंगटांगवाडीतील पाणी समस्या ‘जलयुक्त’च्या माध्यमातून दूर होतानाच लगतचे कुंदेवाडी गाव जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट नसतानाही प्रशासन, समाजसेवी संस्था आणि स्थानिकांच्या प्रयत्नातून या गावात जलक्रांती झाल्याचे दृष्य पहायला मिळते आहे.

लिंगटांगवाडीत पाण्याची समस्या असल्याने गावाचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत करण्यात आला. मात्र लगतच्या कुंदेवाडी गावाचा समावेश योजनेत नव्हता. गावात गतवर्षी प्रथमच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. टंचाईची ही पाऊले गावातील ज्येष्ठ मंडळींनी ओळखली.  सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे संचालक नामकर्ड आवारे, ह.भ.प. एकनाथ महाराज गुळेश्वर, मधुकर नाठे, शिवाजी नाठे, राजाराम कुऱ्हाडे या मंडळींनी गावकऱ्यांना एकत्र करून जलसंधारणाचे महत्व समजावले.
आमदार राजाभाऊ वाजे आणि तहसीलदार मनोज खैरनार यांच्या प्रयत्नामुळे महामार्गाचे काम करीत असलेल्या चेतक एन्टरप्रायजेस संस्थेचे सहकार्य या दोन्ही गावातील कामासाठी मिळाले. प्रशासनाने ‘चेतक’च्या माध्यमातून डिझेल आणि जेसीबीची व्यवस्था केली. गाळ वाहण्यासाठी डंपरची व्यवस्थादेखील करण्यात आली.

लिंगटांगवाडीतील बंधाऱ्याजवळ साचलेला गाळ काढण्यात आला. नाल्याचे खोलीकरणही करण्यात आले. लिंगटांगवाडी आणि कुंदेवाडी मिळून पंधरा दिवस 2800 फूट लांबीच्या नाला 35 फूट रुंद आणि 28 फूट खोल करण्यात आला. 18.5 लाख क्युबीक मीटर गाळ त्यातुन काढण्यात आला. चांगला गाळ शेतकऱ्यांनी शेतात वाहून नेला. काही भागातून निघालेला मुरूम चेतक संस्थेने कामासाठी वापरला. याद्वारे शासनास सुमारे 4 कोटीचा महसूल प्राप्त झाला.
झालेल्या कामाची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये आहे. झालेल्या कामामुळे साडेपाच कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे.  लिंगटांगवाडीतील नाल्याच्या किनाऱ्यावर असलेल्या शेतीला याचा फायदा होणार आहे. कुंदेवाडीतील 110 आणि मुसळगावातील 25 विहिरींना याचा फायदा झाल्याचे पहिल्याच पावसात दिसून आले आहे. एकूण 750 एकरावरील शेतीला याचा फायदा होणार आहे शिवाय गावाला टँकरचीही गरज भासणार नाही.

नाल्यावर ठरावीक अंतरावर यशवंत ग्रामसमृद्धी योजने अंतर्गत तीन बंधारे बांधून पाणी शिवारात जिरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गावात लघुपाटबंधारे विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात आले असून याच नाल्यावर तीन बंधारे बांधण्यात येणार आहेत. यावर्षीच्या टंचाईवरून धडा घेत भविष्यातही पाणी टंचाई जाणवू नये म्हणून ग्रामस्थांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचे चांगले परिणामही दिसून आले आहेत. जलयुक्त शिवार योजना ही केवळ शासनापुरती मर्यादीत राहिलेली नसून तील लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त होत असल्याचे अशा कामांच्या माध्यमातून दिसून येत आहे.
नामकर्ण आवारे- जागरूक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित आहे. नागरिक, प्रशासन आणि खाजगी संस्था एकत्रित आल्यास त्यांच्या समन्वयातून चांगले काम उभे रहाते, हे कुंदेवाडीने दाखवून दिले आहे. माझेच गाव असल्याने या कामात सहभाग असल्याचे समाधान आहे.
शिवाजी नाठे, शेतकरी- नाल्याच्या किनारच्या विहिरींची पाणी पातळी 20 ते 25 फुटांनी वाढली आहे. त्याचा फायदा शेतीसाठी होणार आहे. देव नदीचे वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी शिवारात जिरल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही.

Thursday 28 July 2016


कावीळचे उच्चाटन
आज जागतिक कावीळ दिन. जगभरात या रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन आजच्या दिवशी करण्यात येते. या रोगाचा संसर्ग असणाऱ्यांची मोठी संख्या लक्षात घेता या रोगाबाबत अधिक दक्षता बाळगणे आणि जनतेपर्यंत माहिती पोहोचविणे आवश्यक आहे.

कावीळ  या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी विविध संघटनांमार्फत जागतिक स्तरावर विशिष्ट दिवशी उपक्रम आयोजित करण्यात येत होते. जगात याविषयी एकत्रितपणे प्रयत्न करण्याच्यादृष्टीने जिनीव्हा येथे 2010 मध्ये झालेल्या 63 व्या जागतिक आरोग्य परिषदेत 28 जुलै हा दिवस ‘जागतिक कावीळ दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.


कावीळ हा संसर्गजन्य आजारांतील हा एक विषाणूजन्य आजार आहे. याची लागण झाल्याने यकृताला सूज येत असते. सुरुवातीला या आजाराचे नाव रक्तजल असे होते. कावीळ या आजाराची लक्षणे सर्वप्रथम आफ्रिका आणि अशिया खंडातील काही देशात दिसून आली. जगातील चारशे दशलक्ष जनता या आजाराने ग्रस्त आहे. विकसनशील देशात या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण अधिक दिसून येते.


कावीळ आजाराच्या विषाणूचे 5 प्रकार आहेत. अ, ब, क, ड आणि ई हे मुख्य प्रकारचे विषाणू  आहेत. यापैकी अ आणि ई हे पाण्यातून पसरणारे आहेत. या आजारावर लसीकरणाने उपचार करता येतात. या प्रकारचा आजार  होऊ नये यासाठी शुद्ध पाणी पिणे, पाणी उकळून पिणे, स्वच्छता राखणे, तसेच पाण्याचे क्लोरीनेशन  करणे आवश्यक आहे.


 ब, क आणि ड हे विषाणू मानवी शरीरात रक्ताद्वारे, असुरक्षित लैंगिक संबंध याद्वारे प्रवेश करतात. कावीळ ‘ब’ हा सगळ्यात जास्त भयानक विषाणू आहे. तसेच याची लागण मातेकडून नवीन जन्मल्या अर्भकास होण्याची दाट शक्यता असते, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नवीन जन्मल्या बाळास 72 तासांच्या आत प्रतिबंधात्मक लस टोचण्यात येते. या रोगामुळे मातेच्या मृत्यची शक्यता अधिक असते.  कावीळ ‘ब’ विषाणूमुळे यकृताचा कॅन्सर होण्याचीदेखील शक्यता असते.

कावीळ आजाराची लक्षणे समजून येण्यास तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. यात प्रामुख्याने यकृतास सूज येणे, भूक मंदावणे, भूक न लागणे, डोळे, लघवी पिवळे होणे, ताप तसेच अशक्तपणा येणे, पोटात दुखणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.

रक्ताच्या अतिशय छोट्या थेंबातूनही कावीळ ‘’ हा आजार पसरत असल्याने मोठी खबरदारी घेणे आवश्यक ठरते.  कावीळ ‘’ चे लसीरकणाद्वारे कॅन्सरवरही नियंत्रण ठेवता येते. शुद्ध पाणी आणि अन्नाचे सेवन तसेच वैयक्तिक स्वचछतेकडे अधिक लक्ष दिल्याने कावीळ आजारावर नियंत्रण करणे शक्य आहे.  या वर्षाच्या जागतिक कावीळ दिनाचे उपक्रम ‘कावीळ आजाराचे उच्चाटन’ (एलिमीनेशन) या संकल्पनेवर आधारीत आहे. नागरिकांनी स्वच्छतेवर भर दिल्यास आणि आवश्यक खबरदारी  घेतल्यास या रोगाचे उच्चाटन शक्य आहे.

कावीळ आजारावर नियंत्रण आणण्यासाठी जन्मातच बाळाचे लसीकरण आवश्यक आहे. ‘पेन्टाव्हॅलंट’ ही पाच आजारावरील लस देणे गरजेचे आहे. त्यात कावीळाची देखील लस समाविष्ट असते. लसीकरणाद्वारे आपण लहान मुलांना कावीळमुक्त करू शकतो. जवळच्या वैद्यकीय केंद्रात किंवा नियमित भरणाऱ्या शिबिरात मुलांचे  मोफत लसीकरण करण्यात येते. लसीकरण वेळेवर करून घेण्याची काळजी मातांनी घ्यावी.- डॉ.सुशील वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी नाशिक


लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान आणि
लोकमान्य उत्सव 
नाशिक दि. 28: सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीला 125 वर्ष पुर्ण होत असल्याने तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्यांच्या उद्घोषणेचे शतक महोत्सवी वर्ष यानिमित्ताने लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान’  आणि ‘लोकमान्य उत्सव’ असे दोन सांस्कृतिक उपक्रम 2016 आणि 2017 या दोन वर्षात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांची चतुःसुत्री तसेच अन्य उपक्रमांद्वारे जनजागृती घडविण्याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. यात  गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळाची पद्धत, देखावे, सामाजिक कार्य, समाज सहभाग आदी विषयांबाबत मुल्यांकन करुन शासनाच्यावतीने तालुका,जिल्हा आणि विभागीय स्तरावर विजेत्या मंडळाचा गौरव तसेच रोख बक्षीस करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेण्याकरता  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी  स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव ,व्यसनमुक्ती  व जलसंवर्धन  यातून  एका कल्पनेशी निगडीत देखावा करणे आवश्यक आहे.
 स्पर्धेत राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना होता येईल. त्याकरिता मंडळाची धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.  मंडळानी अर्ज संबधित तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे करावयाचा आहे.  29 जुलै ते 29  ऑगस्ट 2016  या कालावधीत गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यलयीन वेळेत  अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. या कालावधीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तपासणी  व पारितोषिकाकरीता निवड करण्याकरिता विभागीय ,जिल्हा आणि  तालुका स्तरावर  समित्या नेमण्यात येणार आहेत. विभागीय स्तरावर प्रथम पारितोषिक विजेत्या मंडळाला  दोन लाख , द्वितीय दीड लाखांचे  व  तृतीय विजेत्याला  एक लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर  प्रथम विजेत्याला  एक लाखाचे,   द्वितीय  पंचाहात्तर हजार  व तृतीय  विजेत्याला  पन्नास  हजाराचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तालुका स्तरावर  प्रथम पारितोषिक 25 हजार , द्वितीय पंधरा हजार आणि तृतीय दहा हजार  देण्यात येणार आहे.
लोकमान्य उत्सववाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांची जीवनगाथा, त्यांनी केलेल्या संघर्षाचा लढा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या महोत्सवाकरिता विदेशातील आणि महाराष्ट्राबाहेरील महाराष्ट्र मंडळाचे पदाधिकारी आणि राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि महासंघाचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.-----

Wednesday 27 July 2016


कृषि विभागाच्या पुढाकाराने आदिवासी भागात बियाणे निर्मिती
नाशिक दि.24- पेठ तालुक्यातील आदिवासी भागात कृषि विभागाने शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीसाठी पुढाकार घेतला असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. हा भाग केशर आंबा उत्पादनासाठी ओळखला जात असून लवकरच बासमती आणि कांद्याचे  प्रमाणित बियाणांचे उत्पादनदेखील प्रायोगिक तत्त्वावर  घेण्यात येत आहे.
कृषि विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या सहाय्याने 2009 मध्ये पहिल्या प्रयोगास सुरूवात केली. नागलीसारखे खरीप पीक होणाऱ्या या भागात  योजने अंतर्गत केशर आंब्याची लागवड करण्यात आली. आतापर्यंत दोन हजार हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली असून एक हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी फळधारणा झाली. एका शेतकऱ्याला एका झाडामागे सरासरी एक हजार रुपये मिळत आहेत. पुढील वर्षी आंब्याचे उत्पादन आणखी वाढणार आहे.
या संपुर्ण प्रकल्पांतर्गत एकूण 1 लाख 60 हजार मनुष्य दिवसांची निर्मिती झाली आणि आंबा लागवड तसेच मजुरीवर 3 कोटी रुपये खर्च झाला. गावातच रोजगार मिळाल्याने नागरिकांचे गुजरातकडे होणारे स्थलांतरदेखील थांबले आहे. मे-जून मध्ये आंब्याचे पैसे मिळत असल्याने खरीपासाठी याचा उपयोग करून शेतकरी कर्जाच्या पाशातून बाहेर पडत आहेत.
कृषि विभागाने पुढाकार घेऊन पेठ, दिंडोरी, सिन्नर येथील खरेदीदारांमार्फत खरेदीची व्यवस्था केल्याने स्थानिक बाजारात स्वस्त दरात विकला जाणारा आंबा सरासरी 50 रुपये प्रति किलो दराने विकला जातो. भाताच्या तुसात आंबा पिकविण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून या सेंद्रीय आंब्याला चांगली मागणी आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून 8 पॅक हाऊस उभारून ग्रेडींग आणि पॅकेजिंगची व्यवस्थादेखील पुढील वर्षापासून करून देण्यात येणार आहे.



आंब्याप्रमाणेच भाताचे प्रमाणित बियाणेदेखील प्रायोगित तत्वावर तयार करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान  (एनएचआरडीएफ)च्या माध्यमातून यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना स्थानिक वाणाऐवजी 38 क्विंटल पायाभूत बियाणे पुरविण्यात आले आहे.आयएचआरआय कर्नाल येथून हे बियाणे आणण्यात आले आहे. 19 शेतकरी गटामार्फत हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 150 शेतकऱ्यांनी 150 एकर क्षेत्रावर या बियाणांची लागवड केली आहे.
शिलानाथ पवार, तालुका कृषि अधिकारी- शेतकऱ्याला एकरी 20 पोत्याऐवजी 10 पोते जरी उत्पादन झाले तरी दराचा विचार करता दहापट लाभ अधिक होईल. शिवाय एक हजार क्विंटल प्रमाणित बियाणे उपलब्ध होईल. या बियाणाला बाजारात मागणी असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होणार आहे.
आत्माकडून हे बियाणे प्रमाणित करून पुढीलवर्षी स्थानिक शेतकऱ्यांना पुरविण्यात येणार आहे. संशोधन, पायाभूत बियाणांची निर्मिती आणि प्रमाणित बियाणांचे उत्पादन अशा तीन स्तरावर हे काम सुरू आहे.


नागलीसाठीदेखील 100 शेतकऱ्यांना एक किलोप्रमाणे फुलेनाचणी हे संशोधित वाण वितरीत करण्यात आले. त्यातून 200 ते 500 क्विंटल बियाणे पुढीलवर्षी  मिळणार आहे. हे बियाणेदेखील प्रमाणित करून विक्रीसाठी उपलब्ध होईल.
कांदा बियाणाचे उत्पादनदेखील रब्बीसाठी करण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने पुढील हंगामापासून पश्चिम घाट पट्टयातही कांद्याचे उत्पादन होऊ शकणार आहे. चार गटातील 40 शेतकऱ्यांना ॲग्रीफाऊंड डार्क रेड जातीचे बियाणे देण्यात आले होते. या भागात मोहाच्या फुलांचा उन्हाळ्यात बहार असल्याने  आणि करवंदे, गिरीपुष्पालाही बहार असल्याने  मधमाशांच्या माध्यमातून क्रॉस पॉलिनेशन चांगल्या पद्धतीने होते. एकरी सव्वा ते दीड लाख उत्पादन त्यामुळे मिळते.


पुढच्या टप्प्यात प्रमाणित बियाणांचे प्रमाण वाढविण्याबरोबर त्याला बाजार मिळवून देण्याचा कृषि विभागाचे प्रयत्न असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. मधमाशा पालनासाठी एनएचआरडीएफच्या माध्यमातून पेट्या मिळविण्याचे कृषि विभागचे प्रयत्न आहेत. आदिवासी भाग आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी हे प्रयत्न महत्वाचे ठरणार आहेत.
*******

Tuesday 26 July 2016


यशासाठी शंभर टक्के योगदान देणार
                          - कविता राऊत

जागतिक क्रीडास्पर्धांचा महासंग्राम अर्थात ऑलिम्पीक स्पर्धा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होत आहे. ब्राझील मधील रिओ शहरात होणाऱ्या या स्पर्धांमध्ये नाशिकची ‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धावपटू कविता राऊत-तुंगार मॅरेथॉन स्पर्धेत 14 ऑगस्ट रोजी सहभाग घेणार आहेत. त्यांच्या तयारीविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत-
प्रश्न :- रिओ 2016मध्ये देशाचे स्वाभाविकच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहात, मनात काय भावना आहेत?
उत्तर:- खूप छान वाटतंय. तिरंगा ध्वजाकडे बघितल्यावर अभिमानाने ऊर भरून येतो. ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते; तो क्षण आता खूप जवळ येत चाललायं. मी उलटमोजणी देखील सुरु केली आहे.
प्रश्न:- या प्रवासामध्ये नाशिकचा स्थान काय?
उत्तर:- नाशिकच्या मातीसोबत एक घट्ट नाळ जुळली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक कठीण काळ असतो आणि याच काळात नाशिकने मला आधार दिला, नवा उत्साह दिला. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी मला मदत केली आणि या सर्व सकारात्मक पाठींब्यामुळेच मला कठीण काळातून उभारी घेण्याची प्रेरणा मिळाली.
प्रश्न:- गेल्या वर्षभरात या स्पर्धेसाठी केलेल्या तयारीचे नियोजन कसे होते?
उत्तर:- आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात कठीण परिश्रम मी घेत आहे. रस्त्यावर धावण्याचा  सराव केला. पहाटे तीन  वाजता उठून गोदावरीच्या किनाऱ्यालगत बापू पूल परिसरात धावण्याचा सराव आणि बाकी शारीरिक व्यायाम करायचे. मनःशांती साठी रोज थोडा वेळ ध्यान करायचे. सायंकाळी भोसला सैनिकी शाळेच्या मैदानावर सराव करीत असायचे,ऑलिम्पिकसाठी निवड झाल्यानंतर बंगरूळला सराव सुरू आहे.
प्रश्न:- अशा मोठ्या स्पर्धांसाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची असते. त्यासाठी काही विशेष खबरदारी…..
उत्तर:- जास्तीत जास्त मी फळे आणि फळांचा रस, पालेभाज्यांचे सूप यावर भर दिलेला आहे. दुपारी जेवण आणि नंतर सलाड एवढाच मोजकाच पण गुणात्मक आहार घेत आहे. व्यायाम नेमाने सुरूच आहे.

प्रश्न:- आतापासून पुढे अंतिम सामन्याच्या वेळपर्यंत सरावाचे नियोजन कसे असणार आहे?
उत्तर:- मॅरेथॉन स्पर्धे मध्ये 42 किमी अंतर पूर्ण धावायचे असते. यासाठी शारीरिक तंदरुस्ती आणि शारीरिक क्षमता चांगली असणे गरजेचे आहे. 32 किमी ते 42 किमी या अतिमहत्वाच्या टप्प्यासाठी वेगळी धोरणे आखावी लागतात. सध्या या धोरणांचाच विचार करत आहे. 30 किंवा 31 तारखेपर्यंत हार्ड सराव असणार आहे आणि नंतर प्रमाण कमी करून फक्त नियमित सरावावर भर देता येईल.  सर्व तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. एखाद्या परीक्षेपूर्वी आपण उजळणीला महत्व देतो त्याप्रमाणे सध्या बारीकसारीक गोष्टींबाबत उजळणी करत आहे, तसेच शरीर तंदुरुस्त रहावं यासाठी काळजी घेत आहे.
प्रश्न:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या; कसा होता अनुभव?
उत्तर:- अविस्मरणीय क्षण होता. मनावरच दडपण पूर्णपणे दूर झाल्यासारखं वाटलं. पंतप्रधान महोदयांच्या भाषणामुळे अजून चांगले याश मिळविण्यासाठी प्रेरणा मिळाली.

प्रश्न:- सावरपाडा ते रिओ काय सांगाल या प्रवासाबद्दल...?
उत्तर:- खर सांगायचं तर सुरुवात एकदमच खडतर होती; पण चालायचं ठरवलेलं होतं. मार्ग खडतर की सरळ याची कधीच पर्वा केली नाही फक्त चालतंच राहिले. आता सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद सोबत घेऊन एका महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. एकूणच या प्रवासात आई वडील गुरु आणि पती यांनी वेळोवेळी आधार दिला.
प्रश्न:-  पतीचा उल्लेख केलात, जोडीदाराच्या योगदानाबद्दल काय सांगाल..
उत्तर :- ते कठिण काळातील प्रमुख आधार आहे. जेव्हा लग्न ठरले तेव्हा यांनीच मला पुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यामुळे माझा खेळ पूर्ववत झाला किंबहुना विकसित झाला.
प्रश्न:- आपले मार्गदर्शक विजेंदर सिंग यांच्या बोलण्यातून आपल्याविषयी कौतुकाची भावना नेहमी प्रकट होते. तुम्ही आपल्या ‘कोच’बद्दल काय सांगाल?
उत्तर:- मी आज जे काही आहे ते फक्त त्यांच्यामुळेच आहे.  त्यांच्यामुळे नाशिकमध्ये निवासाची सोय झाली. माझी  सगळी  व्यवस्था त्यांनीच केली. माझ्यातील गुण हेरून माझ्या क्षमतांना आणि प्रयत्नांना योग्य दिशा दिली. त्यांनी जे सांगितले ते कृतीत आणण्याचा प्रयत्न मी केला, कदाचित त्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे.
प्रश्न:- ‘रिओ’मधल्या ‘त्या’अंतिम क्षणाबद्दल मनात काय कल्पना आहे?
उत्तर:- त्या स्वप्नपुर्तीच्या क्षणांची वाट पाहते आहे, त्यासाठीचएवढा सराव चाललाय. त्या दिवशी मी माझे 100 टक्के योगदान देणार आहे. संपूर्ण शर्यत पूर्ण करून पदक मिळविण्याचा माझा प्रयत्न असेल. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्यासोबत आहेतच...
प्रश्न:- उदयोन्मुख खेळाडूंना काय संदेश द्याल?
उत्तर:- शरीर तंदरुस्त राहण्यासाठी खेळत राहणे आवश्यक आहे. खूप कष्ट करा कधी न कधी यश मिळतेच मिळते. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयशाने खचून जाऊ नका आणि यश मिळाल्याने हुरळून जाऊ नका.
प्रश्न:-जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने स्पर्धेसाठी शुभेच्छा!
उत्तर:- धन्यवाद.

कोच विजेंदर सिंग(SAI)- असा शिष्य प्रत्येक गुरूला मिळो. कविताने अतिशय कठीण प्रसंगातून मार्ग काढत ऑलिम्पिकपर्यंत धाव घेतली आहे. जेव्हा सगळ्या बाजूने टीकांचा वर्षाव होत होता तेव्हा न डगमगता तिने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरून मिळवून टीकाकारांना उत्तर दिले. कविताने ऑलिम्पिकचे दरवाजे ठोठावले आहेत. नव्या खेळाडुंना ही गोष्ट फारच प्रेरणादायी आहे. ती चांगली कामगिरी करेल असा विश्वास आहे.
धन्यवाद...!!!





आईसाठी मेडल आणायचे आहे-दत्तू भोकनळ
ब्राझीलमधील  रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही गावातील  दत्तू भोकनळ हे नौकानयन मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 6 ऑगस्ट रोजी  या स्पर्धेत सहभागी होऊन नौकानयन स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे ते पहिले महाराष्ट्रीयन ठरतील.  नुकतेच त्यांनी अमेरिकेमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. ऑलिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासोबत केलेली ही बातचीत...
प्रश्न :- देशाचे स्वाभाविकच महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता आहात; काय वाटते आहे?
उत्तर :- खूप छान वाटतंय. हा खेळ शारीरिक दृष्ट्या फार अवघड आहे तरी देखील सर्व कसोट्या पार करत इथपर्यंत पोहचलो आहे. आता अंतिम लक्ष्य गाठायचंच आहे.
प्रश्न :- आपल्या मायभूमीबद्दल काय भावना आहेत?
उत्तर :- नाशिक मधील खेडेगावात जन्म झाला. संघर्ष काय असतो आणि खडतर परिस्थितीत आपल्या ध्येयावर लक्ष कसे केंद्रित ठेवायचे हे नाशिकने शिकवले. पुढे पुण्यामध्ये नाशिक फाटा परिसरात सराव करत असल्याने पुण्याचेही बरेच योगदान आहे. राज्य सरकारनेदेखील अर्थसहाय्य केले.


प्रश्न :- पारंपरिक खेळाकडे वळण्याऐवजी या खर्चीक क्रीडाप्रकाराकडे कसे वळलात ?
उत्तर :- सन 2012 मध्ये सैन्यदलात वाहनचालक म्हणून रुजू झालो. तोपर्यंत या खेळाबद्दल काहीच माहिती नव्हते. सुभेदार कुदरत यांनी माझी शरीरयष्टी बघून या खेळाची गोडी लावली आणि  मार्गदर्शन केले. नौकायननमध्ये आवड निर्माण झाली; स्पर्धा जिंकू लागलो. हे सर्व कसे आणि किती वेगाने घडले ते मलादेखील कळले नाही.
प्रश्न :- चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही ते रिओ... काय सांगाल या प्रवासाबद्दल...
उत्तर :- संघर्षमय प्रवास...घरी परिस्थिती हालाखीचीच होती. इयत्ता पहिली ते नववी चे शिक्षण कष्टाचे झाले. वडील विहिरीचे काम करायचे. इयत्ता नववीला असताना वडील आजारी पडले. त्यांच्या औषधोपचारासाठी विहिरीचे सर्व साहित्य विकले. मजुरी करुन घर चालवले. अशातच 2011 मध्ये वडील वारले. घराचा प्रमुख आधार हरपल्यानंतर गावातील मंडळींकडूनही फारसे सहकार्य मिळायचे नाही.  फार वाईट वाटायचे. या काळात काका आणि मामा यांनी मला आधार दिला. प्रतिकुलताच आपल्याला घडविते. त्याचवेळी ठरवलं ग्रामस्थांचा आपल्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलेल अशी मोठी कामगिरी करायची.
सैन्यदलात आल्यानंतर सारच बदलत गेल. सुभेदार कुदरत अली यांनी खूप मार्गदर्शन केल. 2014 साली पुण्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक मिळविले.पुढे पात्रता फेरीत 2 किमी अंतर 7 मिनिटे 14 सेकंदात पार करुन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो; नुकत्याच झालेल्या अमेरिका राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. 


प्रश्न :- द.कोरिया ऑलिम्पिक पात्रता फेरीत 2 किमी अंतर 7 मिनिटे 14 सेकंदात पार करण्याची छान कामगिरी केलीत. हे कसे जमले?
उत्तर :- 2015 च्या आशियन स्पर्धेत पाठीचे दुखणे असतानाही खेळलो होतो. त्याचवेळी रिओ ऑलिम्पिक मध्ये खेळायचं हे लक्ष्य ठरवलं होत आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक गोष्टींचे नियोजन केलेले होते. मेहनतही घेतली.
प्रश्न :- आताच आपण सांगितले की, सगळ नियोजनानुसार चालू आहे. गेल्या वर्षभरात कसं होत नियोजन?
उत्तर :- राष्ट्रीय पातळीवरील मार्गदर्शक इंदरपाल सिंग यांनी एक वेळ ठरवून दिली होती. त्याच वेळेसाठी झटत होतो. शरीरात फॅटस्  जीबात नाही ठेवले. जेवढी ताकद वाढवता येईल तेवढी वाढवत होतो. एवढ्या वेळेत एवढे अंतर पार करण्याच उद्दिष्ट डोळ्यासमोर होत त्यामुळे तेवढी वेळ नोंदवता आली. 


प्रश्न :- मधल्या काळात म्हणजेच पात्रता पात्रता फेरीनंतरचे नियोजन कसे होते?
उत्तर-पात्रता फेरीला निघण्यापूर्वी आईचा अपघात झाला त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली आणि कोमात गेली. पुण्याच्या आर्मी हॉस्पिटल मध्ये मित्रांच्या देखरेखीखाली तिला अॅडमिट केले आणि कोरियाला रवाना झालो. तिथे जिंकून आल्यानंतर आईची स्मरणशक्ती गेल्याचे समजले; पण ध्येयापासून मागे यायचे नव्हते. सराव चालूच ठेवला. कोच इस्माईल बेग आणि राजपाल सिंग यांनी या काळात मार्गदर्शन केले. एक महिना भारतात राहिल्यानंतर पुढील दोन महिन्यांसाठी म्हणजेच सध्या अमेरिकेत सराव करतो आहे. अजून दोन दिवस कठीण सराव असेल. पुढे ब्राझील मध्ये गुरुवारी पोहोचल्यानंतर 5 तारखेपर्यंत सराव करणार आणि स्पर्धा 6 तारखेला आहे.
प्रश्न :- मोठ्या स्पर्धांसाठी शारीरिक तंदरुस्ती सोबतच सकस आहाराची आवश्यकता असते. आपण कसा आहार ठेवला?
उत्तर :- आहाराच्या बाबतीत मी वेळापत्रकच बनविले आहे. सकाळी अर्धा लिटर पाणी, दोन ब्रेड, जाम नंतर सराव. सरावानंतर चार ब्रेड, जाम, अर्धा लिटर दूध, 2 अंडे दुपारी शांत झोप. रात्री जेवणात भात, भाजी आणि थोड्या प्रमाणात मांसाहार असा असतो. तर सरावादरम्यान एनर्जी ड्रिंक’ घेत असतो.
प्रश्न :- 2012 मध्ये ज्या खेळाबद्दल किंचितही माहिती नव्हती त्या खेळाट प्राविण्य मिळवत ऑलिम्पिक वारी निश्चित केली....काय सांगाल याबद्दल?
उत्तर :- याचे सर्व श्रेय मी माझे प्रत्येक टप्प्यावर लाभलेल्या मार्गदर्शकांनाच देईल. त्यांनी वेळोवेळी मला प्रोत्साहित करुन या खेळासाठी मला तयार केल. मी निश्चित प्रयत्न केले पण त्यासाठी व्यवस्थित दिशा त्यांनीच मला दिली.
प्रश्न :- रिओ ला जात आहात त्याबद्दल सैन्य दलातील अधिकारी आणि समाज यांच्या काय भावना आहेत?
उत्तर :- रिओ साठी निवड झाल्यापासून सगळं बदललं आहे. आधी सहसा दुर्लक्ष केल जायचं पण आता सगळे स्वत:हून लक्ष देताय. सैन्यदलातील अधिकारी वर्ग नेहमीच प्रोत्साहन देत आलेला आहे आणि आता सुद्धा माझ्याकडून सर्वांना खूप अपेक्षा आहे.
प्रश्न :- आपण ऑलिम्पिकला जाणारे पहिले महाराष्ट्रीयन नौकानयनपटू आहात ? उदयोन्मुख खेळाडूंना काय संदेश द्याल?
उत्तर :- प्रशिक्षकांना खेळाडूंकडून खूप अपेक्षा असतात. खेळाडू सर्व प्रयत्न करतात पण अंतिम क्षणाला आशा सोडून देतात आणि अपयशी होतात. खेळाडूंनी तसे न होऊ देता शेवटपर्यंत टिकून रहायला हवे. नकारात्मक विचारांना कुठेही थारा द्यायला नको. एक नकारात्मक विचार सारं काही उध्वस्त करतो.
प्रश्न :- आम्ही सारे नाशिककर कल्पना करतो आहे की आपल्या जिल्ह्यातील खेळाडू तिरंगा घेऊन सामन्याला उतरत आहे...आपण काय कल्पना करुन ठेवली आहे या क्षणाबद्दल...
उत्तर :- फार अभिमानाची वेळ असेल ती. जेव्हा पाण्यात उतरण्यासाठी बोट काढेल तेव्हा तिरंग्याकडे बघून आपोआपच आत्मविश्वास जागृत होईल..आणि तो तिरंगा तुलनेने सर्वात उंच कसा जाईल याचसाठी प्रयत्न करेल...आणि यश मिळवेल.. मला दुसरे काहीच माहिती नाही. माझ्या आईला मेडल आणून द्यायचे आहे....
प्रश्न :- आपल्याला जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शुभेच्छा...
उत्तर :- धन्यवाद.     

Monday 25 July 2016

नाशिकचे सांस्कृतिक वैभव-सार्वजनिक वाचनालय
नाशिकला असलेल्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासातील मानबिंदू म्हणून ओळख असलेले सार्वजनिक वाचनालय आपला शतकोत्तर अमृत महोत्सव साजरा करीत आहे. अनेक मान्यवरांनी गौरवलेल्या या वाचनालयाची सांस्कृतिक वाटचाल या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना प्रेरक अशीच आहे. स्थापनेपासून कार्यरत असणारे  राज्यातील हे एकमात्र जुने वाचनालय आहे.

नाशिकच्या सरकारवाड्यात 1840 मध्ये सरकारवाड्यात या वाचनालयाची सुरूवात झाली. स्थापनेपासून 1864 पर्यंत वाचनालयाचा कारभार वर्गणीदारांवर अवलंबून होता. नगरपालिकेच्या स्थापनेनंतर 100 रुपये अनुदान मिळू लागले.  वाचनालयातील सूचना पुस्तकातील संदर्भ वाचनालयाच्या प्रगतीचा रोमांचक इतिहास जीवंत करणारे आहेत.
वाचनालयाच्या नावाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी इथल्या काही जुन्य ग्रंथावर ‘नाशिक  लायब्ररी ॲण्ड रीडिंग रुम’,  ‘नाशिक सिटी लायब्ररी’, ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ अशी नावे हाताने इंग्रजीतून लिहिलेली आढळतात. जुन्या शिक्क्यांवर ‘Native Liabrary Nassick’  आणि  ‘नासिक पुस्तकालय’ हा मजकूर आहे. 1924 मध्ये वाचनालयाची घटना नव्याने तयार करण्यात आल्यावर ‘सार्वजनिक वाचनालय नाशिक’ हे नाव दिले गेले आणि तेच आजही कायम आहे.
सरकारवाड्यात जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने वाचनालय काही काळ राजेबहाद्दर  वाड्यातील दिवाणखान्यात हलविण्यात आले होते. त्यानंतर ते 1924 मध्ये पुन्हा सरकारवाड्यात आले. वाचनालयाच्या शताब्दी समारंभाला स्वातंत्र्यवीर सावरकर उपस्थित होते.वाचनालयाला महाराष्ट्र शासनाकडून हायस्कूल क्रिडांगणावरील 200 फूट  बाय 175 फूट क्षेत्रफळाची जागा  विनामुल्य मिळाली. 31 मे 1962 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.
शासनाकडून मिळालेले दोन लाख, नाशिक नगरपालिकेचे 50 हजार, केंद्र शासनाचे 30 हजार यासह काशिनाथ साईखेडकर, डॉ.रा.भा.पाटणकर, डॉ. वि.गो.पानसे, कै. एफ.एच.दस्तुर, शेंगांची गाडी चालविणारे बाळकोबा भालेकर, रोटरी क्लब, निझाम ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, मायको कंपनी, जनलक्ष्मी बँक आदी दात्यांच्या देणगीतून वाचनालयाचा सतत विस्तार झाला आहे. कर्नल देशपांडे यांनी अलिकडच्या काळात दिलेली 40 लाखाची देणगी आणि इतर दात्यांच्या सहकार्याने वाचनालय इमारत आणि परिसराचे नुतनीकरण करण्यात आले आहे.

वाचनालयाच्या वार्षिक समारंभात येणाऱ्या साहित्यिकांची यादी मोठी आहे. महामहोपाध्याय डॉ.पां.वा.काणे, दत्तो वामन पोतदार, नाट्याचार्य कृ.प्र.खाडीलकर यांचेपासून अलिकडच्या काळातील  शंकर वैद्य, डॉ.यु.म.पठाण आदींपर्यंत अनेक महान साहित्यिकांनी वाचनालयाला भेट दिली आहे. इथे भेट दिली नसलेले मराठी साहित्यातील मोठे नाव क्वचितच आढळेल.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड, गो.ह.देशपांडे, तात्यासाहेब शिरवाडकर, मु.शं.औरंगाबादकर अशा अनेकांनी वाचनालयाचा सांस्कृतिक वारसा पुढे नेताना त्याच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले.
वाचनालयाला लोकनायक जयप्रकाश नारायण, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न महर्षी धोंडेा केशव कर्वे, भारतरत्न पां.बा.काणे, राम मनोहर लोहिया, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, पी.व्ही.नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनोहर जोशी, जॉर्ज फर्नांडीस, मधुकरराव चौधरी, पुरुशोत्तम टंडन, धनंजयराव गाडगीळ, काकासाहेब गाडगीळ, बाळासाहेब खेर, ग.वा.माळवणकर, एम.वाय.नुरी, अच्युतराव पटवर्धन, के.एफ.नरीमन, श्री.अ.डांगे, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, पंजाबराव देशमुख, पां.वा.गाडगीळ, चिंतामणराव कोल्हटकर, वसंत साठे , गो.नि.दांडेकर, कुसुमाग्रज, ग.दि. माडगुळकर, शंकरराव खरात,  वि.स. खांडेकर, साने गुरुजी , बाबासाहेब पुरंदरे, अशा अनेक मान्यवर व्यक्तिंनी भेट दिली आहे. (जागेअभावी निवडक नावे दिली आहेत.)

साहित्य विषयक कार्यक्रम, इतिहास परिषद,  वार्षिक समारंभ, साने गुरूजी कथामाला, कविसंमेलन आदी विविध उपक्रमातून नाशिकच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीला पुढे नेण्याचे कार्य ‘सावाना’ने केले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यमंदिराचे नामकरण पु.ल.देशपांडे यांच्या हस्ते झाले. हेच नाट्यगृह आज नाशिकच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीसाठी महत्वाचे ठरले आहे.

वाचनालयाच्या सभागृहात भरणारे ग्रंथप्रदर्शन इथले वेगळे वैशिष्ट्य आहे. वाचनालयाच्या खालच्या मजल्यावरील हॉल केवळ अशा प्रदर्शनांसाठीच दिला जातो. मु.शं.औरंगाबादकर सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. इथल्या अभ्यासिकेचा लाभ अडीचशे विद्यार्थी नाममात्र शुल्कात घेत आहेत. कला प्रदर्शनासाठी स्वतंत्र सभागृह आहे. कलामहर्षी वा.गो.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निर्मित कलादालनात अनेक प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. वस्तु संग्रहालयात विविध प्रकारच्या  प्राचिन दुर्मिळ वस्तु पहायला मिळतात.

 वाचनालयाच्यावतीने ग्रंथलेखन, कथालेखन, कार्यक्षम आमदार पुरस्कार, शिक्षक गौरव पुरस्कार असे विविध परितोषिके दिली जातात. विशेष म्हणजे मुख्यमंत्री होण्याच्या एक वर्षाआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्षम आमदार म्हणून इथेच गौरविण्यात आले  होते.
ग्रंथालयात 1 लाख 80 हजाराहून अधिक ग्रंथसंपदा आहे. संदर्भ ग्रंथालयात 55 हजार  ग्रंथ आहेत. ग्रंथालयाला महाराष्ट्र शासन, राजाराम मोहन राय फाऊंडेशनसह विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. इथला पोथी विभाग वैशिष्ट्यपुर्ण असून त्यात 10 हजार पोथ्या आहेत. या दुर्मिळ ग्रंथांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे.

बदलत्या परिस्थितीत वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी वाचनालयातर्फे दुसऱ्या शनिवारी ‘ऐस पैस गप्पा’, प्रत्येक ‍शनिवारी ‘ पुस्तक मित्रमंडळ’, उद्यान वाचनालय, दृकश्राव्य विभाग, ग्रंथालय सप्ताह, साहित्यिक मेळावा, ज्ञानवर्धिनी, बहि:शाल व्याख्यानमाला, असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
केवळ ग्रंथालय आणि वाचन या कक्षा ओलांडून सार्वजनिक वाचनालयाने नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. अनेक महनीय व्यक्तींच्या आठवणींना जपून ठेवत प्राचीन संस्कृतीचे संचित आणि नव्या युगातील आधुनिक विचार एकाचवेळी समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या वाचनालयाने केले आहे. म्हणून वाचनालयाचा शतकोत्तर अमृत महोत्सव नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासातील एक ‘सोनेरी पान’ आहे.

----

Sunday 24 July 2016

झेप यशाकडे…
       नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनीच्या परेड मैदानावर  नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्र. 113 च्या दीक्षांत संचलन झाले. ‘‘ सदरक्षणाय् खलनिग्रहणाय्’’ हे ब्रिद स्विकारून लोकसेवेत रुजु  होणाऱ्या 749 प्रशिक्षीत पोलीस उपनिरिक्षकांपैकी 246 महिला अधिकारी होत्या. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे एक प्रकारचा आगळावेगळा विक्रम प्रस्थापित करीत प्रबोधिनीच्या इतिहासात  सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीचा ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’  सन्मान मिळविणाऱ्या मीना भिवसेन तुपे या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. मुख्यमंत्र्यांच्या  प्रदान करण्यात आलेले 10 पैकी 7 पुरस्कार महिला अधिकाऱ्यांनी पटकाविले.
          प्रबोधिनीच्या इतिहासात प्रथमच महिला प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षणातील सर्वोच्च ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ (मानाची तलवार) हा सन्मान मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी तो मिळविणाऱ्या  मीना तुपे यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. मीना तुपे यांनी  आपल्या यशाविषयी जिल्हा माहिती कार्यालयाशी चर्चा केली-

          प्रबोधिनीच्या इतिहासात  सोनेरी पान लिहिणाऱ्या मीना तुपे यांचा पुरस्कार अनेक अर्थाने महत्वाचा आहे. कोणतीही शिक्षणाची पार्श्वभूमी नसताना गरीब शेतकरी कुटुंबातील महिलेने मिळविलेले हे यश अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरले.
          बीड जिल्ह्यातील दगडी शहाजहापूर गावात पाच एकर जमिनीवर घाम गाळणाऱ्या भिवसेन तुपे यांच्यावर घरातील इतर सहा सदस्यांची जबाबदारी. अशा परिस्थितीत त्यांनी तीन मुलींचे लग्न केले. कोणीच सातवीपेक्षा जास्त शिकले नाही. मी मात्र त्याला अपवाद ठरली. गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतल्यावर मी पारगाव हायस्कुलला माध्यमिक शिक्षण पुर्ण केले.
वडिलांचे कष्ट कमी करण्यासाठी नोकरी मिळवायची या उद्देशाने मी डीएडदेखील पुर्ण केले. मात्र शिक्षकाची नोकरी मिळेपर्यंत वाट पाहण्याची तयारी नव्हती. लहान भावाची जबाबदारीदेखील होतीच. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पोलीस भरती प्रक्रीयेत सहभागी होऊन आणि यशस्वी झाले. बीड येथेच कॉन्स्टेबल म्हणून नेमणूक झाली. या यशानंतर घरच्यांचा विरोध हळूहळू कमी झाला.
पीएसआय वैशाली शिंदे यांच्याकडे पाहून एक दिवस असेच अधिकारी होण्याचा निश्चय केला आणि त्यादिशेने प्रयत्न सुरू केले. एमपीएससीची तयारी सुरू केली. ड्युटीवरून परतल्यावर, कोर्टात मोकळ्या वेळात, बसमधून जाताना वेळ मिळेल त्याठिकाणी अभ्यास सुरू होता. घरच्यांना लग्न करू नका असे बजावले होते.  हळूहळू घरच्यांच्या विरोध मावळला. ‘काय करत होती कुणास ठाऊक’ अशी तिच्या आईची प्रतिक्रीया होती. मात्र प्रकृतीला जपण्याचा सल्ला ती अधूनमधून द्यायची. तेवढाच आधार वाटायचा आणि उत्साह वाढायचा.

अखरे 2013 मध्ये माझे स्वप्न पुर्ण झाले. राज्य सेवा परिक्षेत खुल्या गटात राज्यात दुसरी आली आणि 2015 मध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. प्रशिक्षणात धावण्यासाठी खुप त्रास होत असल्याचे जाणवल्यावर परतण्याचाही निर्णय एका क्षणाला घेतला होता. मात्र दुसऱ्याच क्षणी स्वत:ला सावरत काहीतरी करूनच गावात जायचे असा चंग बांधून कष्ट सहन केले. माझ्यामते आजचे यश त्या कष्टाचेच आणि आई-वडिलांच्या आशिर्वादाचे फळ आहे.
मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सन्मान स्विकारतांनाचा क्षण जीवनातील महत्वाचा क्षण होता. तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. हे यश आईवडिल आणि सेल्स टॅक्स विभागातील सहाय्यक आयुक्त डॉ.बाळासाहेब मालेगावकर यांचे आहे. वर्ग-1 चा अधिकारी होण्याचे स्वप्न समोर आहे. कठोर परिश्रम लागतील याची मला जाणीव आहे, पण अशक्य नाही.  

माझ्यासारखे इतरही ग्रामीण युवक-युवतींनी पुढे यावे असेही वाटते. केल्याने सगळं शक्य आहे. विजपथाकडे वाटचाल करताना अशक्य काहीच नाही. अविरत प्रयत्नांची तयारी हवी पोलीस अधिकारी म्हणून महिलांवरील अत्याचाराबाबत समाजात जागरूकता आणायची आहे. महिलांना माझ्या कामामुळे न्याय मिळाला तर त्याचा आनंद या यशापेक्षा अधिक असेल. 

Friday 22 July 2016

केल्याने होत आहे...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी गावात किकवी नदीवर लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यामुळे परिसराचे चित्र पालटणार आहे.
त्र्यंबकेश्वरपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाततली नळपाणी योजना स्रोताअभावी गेल्या तीन वर्षापासून बंद पडली होती. हिवाळ्यानंतर गावातील विहिरीचे पाणी अटत असल्याने उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरविले जात असे. गुरांना पाण्यासाठी भटकावे लागे. महिलांनादेखील 2 ते 3 किलामीटरची पायपीट पाण्यासाठी करावी लागत असे. गौतमी-गोदावरी धरणाजवळ असूनही शेतकऱ्यांची भिस्त खरीपावरच होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बहिरू मुलाणे  आणि इतर ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन बंधारा बांधण्याचे निश्चित केले.

गावात बैठक घेऊन लोकसहभागाचे आवाहन करण्यात आले. सुरूवातीला काही ग्रामस्थांनी कामाच्या यशाविषयी शंका उपस्थित केली. मात्र काम सुरू झाल्यावर ग्रामस्थांचे चांगले सहकार्य  लाभले. 15 मे ते 30 जून अशा दीड महिन्याच्या कालावधीत किकवी नदीतील गाळ उपसण्याबरोबर 50 मीटर लांब आणि 4 मीटर खोल आकाराचा सिमेंट बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याच्या निर्मितीवर आलेला खर्च परिसरातील शेतकऱ्यांनीच केला. स्वत: मुलाणे यांनी जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले. 

आज या बंधाऱ्यामुळे दोन किलोमीटरपर्यंत नदीचे पात्र भरलेले आहे. गौतमी-गोदावरी धरणाच्या सांडव्यातील पाणी बंधारात येत असल्याने उन्हाळ्यातदेखील पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे 200 एकर क्षेत्र बागायतीत रुपांतरीत होईल, असा विश्वास मुलाणे व्यक्त करतात. नदीच्या दोन्ही बाजूस असलेल्या बेझे, राजावाडी आणि पिंपरी अशा तीन गावातील शेतकऱ्यांना या बंधाऱ्यामुळे फायदा होणार आहे.
बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस विहीर करून गावास पाणी पुरवठा करण्याचा ग्रामस्थांचा मनोदय आहे. या बंधाऱ्यामुळे फायदा झाल्याने असे आणखी दोन बंधारे संपुर्णपणे लोकसहभागातून बांधण्याचे नियोजनही सुरू करण्यात आले आहे.  पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यावर गावातील शौचालयाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशाही ग्रामस्थांना आहे.
दत्तू भालके, शेतकरी पिंपरी- बंधाऱ्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. गेल्यावर्षी पाणी नसल्याने गहू वाळला. आता बंधाऱ्यामुळे बारामहिने पिके घेता येतील. उन्हाळ्यात भाजीपालादेखील पिकविता येईल.
बहिरू मुलाणे-जनतेने पुढाकार घेतल्यास कोणतीच समस्या गावात रहात नाही. विशेषत: तरुण पुढे आल्यास परिवर्तन सहज शक्य होते.


Thursday 21 July 2016


समन्वयातून जलक्रांती
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातील रवळगाव येथे  जलयुक्त शिवार योजने अंतर्गत  शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने आणि एकत्रितपणे  कामे केल्याने ‘माथा ते पायथा’ जलसंधारणाची कामे होऊन पहिल्याच पावसात शिवारात सर्वत्र पाणीसाठा झाला आहे. पूर्वी झालेल्या कामांमुळे 132 टीसीएम पाणीसाठा होत असे. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या कामांमुळे 910.96 टीसीएम पाणीसाठा  नव्याने उपलब्ध होणार आहे.

 दिंडोरीपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या या संपुर्ण आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावात पिण्याच्या पाण्यासाठी फारशी समस्या येत नाही. मात्र गेल्या दोन वर्षात ग्रामस्थांना उन्हाळ्यात थोडा त्रास सहन करावा लागला. पाण्याच्या कमतरतेमुळे रब्बीचे क्षेत्रदेखील मर्यादीतच होते. ही परिस्थितीत बदलण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्रित येऊन जलयुक्त शिवार योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

उपविभागीय अधिकारी मुकेश भोगे  यांच्या मार्गदर्शनाखाली  वन विभाग, कृषि विभाग, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग, ल.पा. स्थानिक स्तर आणि भुजल विकास यंत्रणा यांनी गावातील विविध कामांचा आराखडा तयार केला. तालुका कृषी अधिकारी व्ही.एस.सोनवणे यांनी या यंत्रणांमध्ये चांगला समन्वय राहून नियोजनपूर्वक कामे होतील याकडे विशेष लक्ष दिले. मार्च 2015 पासून कामांना सुरूवात करण्यात आली.

गावातील दऱ्याचा नाल्यावर असलेल्या पाझर तलावाच्या बंधाऱ्याचे पिचिंग आणि सांडव्याचे काम केल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भुजल विकास यंत्रणेतर्फे विंधन विहिरीजवळ हायड्रो फ्रॅक्चरींग करण्यात आल्याने विंधन विहिरीला चांगले पाणी  लागले आहे. त्याचा लाभ उन्हाळ्यात होणार आहे. लघु सिंचन विभागातर्फे दोन सिमेंट बंधाऱ्याची कामे सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 2 कोटी 33 लक्ष रुपयांची कामे करण्यात आली आहेत.
पिप्परधाड नाल्यातून लोकसहभागाद्वारे 800 घनमीटर गाळ काढला. त्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी 60 हजार रुपये खर्च केला. या नाल्यावरील बंधाऱ्या लगतच्या 50 फुट खोल विहिरीचे पाणी तळाशी लागले होते. नालाखोलीकरणानंतर अवघ्या 8 ते 10 फुटावर पाणी आले आहे.

व्ही.एस.सोनवणे, तालुका कृषी अधिकारी- शासनाच्या विविध यंत्रणांनी एकत्रित येऊन समन्वयाने कामे केल्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली आहेत. केवळ गावाची पाणी टंचाई दूर करणे हा उद्देश नसून जलसमृद्धीतून कृषीसमृद्धीकडे गावाची वाटचाल व्हावी, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.
श्री.वामन लिलके, माजी सरपंच- जलयुक्त शिवार योजना गावाचे भाग्य बदलणारी ठरली आहे. सर्व ग्रामस्थांचे सहकार्य आणि शासकीय यंत्रणांचे चांगले काम यामुळे आता गावाला पाणी टंचाई भासणार नाही. शेतात विविध प्रकारची पिके घेता येतील.



गावाची लोकसंख्या 2860 असून वर्षभरात  त्यासाठी 16 टीसीएम  आणि जनावरांसाठी चार टीसीएम असे एकूण 20 टीसीएम पाणी आवश्यक असते. रब्बी पिकांचाही विचार करता पिकांसाठी 821 टीसीएम पाणी गरजेचे आहे. पूर्वी झालेल्या कामांमुळे 132 टीसीएम पाणीसाठा होत असे. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत झालेल्या कामांमुळे 910.96 टीसीएम पाणीसाठा  नव्याने उपलब्ध होणार आहे. गावाच्या गरजेपेक्षा हा पाणीसाठा जास्त असून त्यामुळे गाव खऱ्या अर्थाने ‘सुजलाम् सुफलाम्’ होणार आहे.
कामाचा प्रकार
कामे (पुर्ण + सुरू असलेली)
अडविले जाणारे पाणी (टीसीएम)
समतल सलग चर
128.9 हेक्टर
21.65
मजगी
60.27 हेक्टर
159.29
नाला खोलीकरण/सरळीकरण
7
24.5
मातीनाला बांध
4
23.52
वनतळे
36
450
गाळ गाढणे
1
5
 गावतलाव/ पाझर तलाव दुरुस्ती
4
227

*******