Saturday 9 July 2016

‘जलयुक्त शिवार’ची किमया
नाशिक जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 39 लाख 61 हजार घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आल्याने 3960 टीसीएम पाणीसाठा वाढणार आहे.
गेल्यावर्षी महाराष्ट्र दिनी या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील अधिक टंचाईग्रस्त भागातील गावांची निवड करण्यात आली. योजने अंतर्गत लोकसहभागावर अधिक भर देण्यात आला. त्यासाठी विविध बैठका, मेळावे, माध्यमे आदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. रोहयेा, कृषी विभाग, वन विभाग, ल.पा. विभाग, उपविभागीय कार्यालय, तहसीलदार, गट विकास अधिकारी आदी यंत्रणांद्वारे विविध कामे हाती घेण्यात आली. कृषि विभागाने चित्ररथाद्वारेदेखील योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली.
जलसंधारणाच्या कामांना व्यापक लोकसहभाग लाभल्याने योजनेला खऱ्या अर्थाने गती मिळाली. पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या अनेक गावातील नागरिकांनी पुढाकार घेत गाळ काढण्याच्या कामात सहकार्य केले. विविध उद्योगसंस्थांनीदेखील कामांना सहकार्य केले. विशेषत: उद्योजक, व्यावसायिक तसेच काही ठिकाणी लोकप्रतिनिधीं आणि नागरिकांनी जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर आदी उपलब्ध करून दिले. डिझेलचा खर्च शासनामार्फत करण्यात आला.

योजनेबाबत गावपातळीवर चांगली वातावरण निर्मिती झाल्याने ग्रामपंचायतींचा सक्रीय सहभाग वैशिष्ट्यपूर्ण होता. आर्ट ऑफ लिव्हींगसारख्या सामाजिक संस्थांनीदेखील ग्रामीण भागात जेसीबीची व्यवस्था करून महत्वपूर्ण योगदान दिले. नांदगावसारख्या भागात गेली काही वर्षे टंचाईचा सामना करणऱ्या गावात चांगला पाऊस झाल्यास  झालेल्या कामांमुळे उन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवणार नाही.
कामे झालेल्या ठिकाणी पहिल्याच पावसात पाणीसाठा झाला आहे. गाळ काढण्याच्या आणि नदी-नाले खोलीकरणामुळे पाणीसाठा वाढण्याबरोबर शिवारात पाणी मुरत असल्याने काही ठिकाणी विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. भविष्यातीलदेखील भूजल पातळी वाढण्याच्यादृष्टीने ही कामे उपयुक्त ठरणार आहेत.

जिल्ह्यात गतवर्षी योजने अंतर्गत 229 गावात 6 हजार 298 कामे पुर्ण करण्यात आली असून 1325 कामे सुरू आहेत. या कामांवर एकूण 130 कोटी 58 लाख खर्च करण्यात आला आहे. या कामांमुळे निर्माण होणाऱ्या पाणीसाठ्यामुळे एक पाणीपाळी दिल्यास 54 हजार 500 हेक्टर आणि दोन पाणीपाळी दिल्यास 27 हजार 250 हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकेल.

जिल्ह्यात एकूण 626 तलावातील  गाळ काढण्यात आला आहे. त्यातील अधिकाधिक टंचाईचा सामना करणाऱ्या येवला, नांदगाव, देवळा, सिन्नर आणि चांदवड तालुक्यातील आहे. गाळ काढण्यात  9 हजार 760 शेतकऱ्यांचा सहभाग होता. गाळ काढण्यासाठी सुमारे 27 कोटी 73 लाख खर्च झाला आहे.

तालुका
तलावांची संख्या
काढलेला गाळ (घ.मी.)
येवला 
170
8 लाख 94 हजार
नांदगाव
120
17 लाख 37 हजार
दिंडोरी
29
1 लाख 26 हजार
पेठ
7
2 हजार 500
चांदवड
104
4 लाख 87 हजार
देवळा
57
1 लाख 47 हजार
बागलाण
13
4 हजार 700
कळवण
13
22 हजार
सुरगाणा
6
16 हजार
त्र्यंबकेश्वर
22
21 हजार
इगतपुरी
12
18 हजार 500
निफाड
17
43 हजार 600
सिन्नर
32
3 लाख 62 हजार
मालेगाव
24
75 हजार 900
एकूण
626
3961000

 योजने अंतर्गत 2016-17 साठी 218 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावात 1145 कामे सुरू असून 219 कामे पुर्ण झाली आहेत. या कामांसाठी 12 कोटी 60 निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लोकसहभाग हा जलयुक्त शिवार योजनेचा मुळ गाभा आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आणि विविध संस्थांनी चांगला प्रतिसाद दिल्याने पहिल्या वर्षी चांगले काम झाले आहे.  पहिल्या पावसात चांगले परिणाम दिसून आले आहेत. आणखी पाऊस झाल्यास या गावांना उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागणार नाही. यावर्षी आणखी 218 गावात कामे सुरू करण्यात येत आहेत. यात अधिकाधीक लोकसहभाग वाढावा आणि ग्रामीण भाग टंचाईमुक्त व्हावा, अशी अपेक्षा आहे.- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

योजना पारदर्शक पद्धतीने राबविली जावी यासाठी 8 हजारावर छायाचित्रे काढण्यात आली आहेत. ती ऑनलाईन सिस्टीमध्ये लोड करून कामांची माहिती अपडेट केली जाते. याद्वारे पारदर्शकतेबरोबरच कामांची गुणवत्ता राखील जावी असे प्रयत्न आहेत. विविध संस्थांनी केलेले सहकार्य महत्वाचे आहे- गोरक्षनाथ गाडीलकर, उपजिल्हाधिकारी, रोहयो



No comments:

Post a Comment