Saturday 9 July 2016


गोलदरी: ‘जलयुक्त’ची किमया खरी
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गोलदरी गाव नावाप्रमाणे आहे. डोंगरावरून वळसे घेत गाडी उभी रहाते ती ग्रामपंचायतीच्या कार्यालयाजवळ. गावाला भेट दिल्यावर रस्त्याच्या पलिकडील पाण्याने भरलेले वनतळे लक्ष वेधून घेत होते. बाजूला काळी मंडळी सुंदर निसर्गाच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढण्यात दंग होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे झालेल्या परिवर्तनाचे हे बोलके उदाहरण.
गावात महसूल विभागाने घेतलेल्या  पुढाकारामुळे आणि स्थानिकांच्या सहकार्यामुळे गावातील वनतळे आणि पाझर तलावातील गाळ काढण्यात अला असून ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पाड्यातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.


नावाप्रमाणे सौंदर्य लाभलेल्या या गावच्या ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत हट्टीपाडा, डिडोणापाडा, खोरीपाडा, लोहारपाडा, काथाडेपाडा, माणीपाडा आणि गोलदरी अशी सात गावे येतात. गोलदरीत तशी पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही. मात्र इतर पाड्यांना उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागतो. खडकाळ मृदामुळे पावसाचे पाणी पटकन मुरते आणि उतारावरून खालच्या बाजूस वाहून जाते.

 पाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी तहसीलदार नरेश बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी शिवराज देसाई यांनी गावातील नागरिकांचा सहभाग मिळविला. तहसिलदारांनी सुशील कन्स्ट्रक्शनच्या सहकार्याने जेसीबीची व्यवस्था केली. सरपंच सुमनताई टोपले यांचेदेखील सहाकार्य या कामात मिळाले. जलयुक्त शिवार येाजनेच्या अंमलबजावणीसाठी बैठक घेऊन वातावरण निर्मिती करण्यात आली. मंडळ अधिकारी सुयोग वाघमारे आणि  तरुण ग्रामसेवक संदीप जाधव यांनीदेखील उत्साहाने सहभाग घेतल्याने कामाला गती मिळाली. 


सुरूवातीस या वनतळ्यामधून 200 ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. त्यासाठी तळ्यातील गाळ शेतात वाहून टाकण्यात आला.  त्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था स्थानिकांनी केली. जवळच असलेल्या पाझर तलावातील सांडवा तुटल्यामुळे त्यातील पाणीसाठ्याला मर्यादा येत होत्या. याठिकाणीदेखील अडीचशे ट्रॅक्टर गाळही काढण्यात आला. त्यामुळे दोन्ही ठिकाणी पाणीसाठा वाढला आहे.
या कामामुळे काथाडेपाडा येथील बोअरवेलला केवळ 15 फुटावर पाणी लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 5 विहिरी, 5 शेततळे आणि 29 दगडी बांधांचे कामदेखील गावात करण्यात आले आहे. गावात गतवर्षी 189 शौचालये उभारण्यात आले. उर्वरीत शौचालये यावर्षी उभारून गाव हागणदारी मुक्त करण्याचा निश्चय जाधव यांनी व्यक्त केला. जलयुक्तच्या माध्यमातून वाढलेल्या पाणीसाठ्यात मत्स्यबीज पालनासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीचे उत्पन्न त्यामुळे वाढणार आहे.
हिरव्यागार वनराजीने वेढलेल्या गोलदरीतील पाड्यांना उन्हाळ्यात पाण उपलब्ध झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्याबरोबरच तेथील एकूणच विकासालाही गती निश्चितपणे मिळेल. हीच ‘जलयुक्त’ची खरी किमया आहे.

                              

                                *******

No comments:

Post a Comment