Thursday 7 July 2016

‘जलयुक्त’ रायपाडा
मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटीपासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर असलेलल्या रायपाड्याची तरुणाई गाव ‘जलयुक्त’ करण्यासाठी सरसावली आहे. तरुण सरपंच विठ्ठल वारे यांच्या नेतृत्वाखाली गावाने जलयुक्त शिवार योजनेअंत़़र्गत चांगले काम केल्याने उन्हाळ्यातदेखील पीक घेणे शक्य होणार आहे.
आदिवासी लोकवस्ती असलेल्या या गावात दोन विहिरीतून पाणी मिळते. पिण्याच्या पाण्यासाठी विशेष अडचण येत नाही. थोड्याफार अंतरावर जावे लागते एवढेच. मात्र उन्हाळ्यात पाणी पातळी खालवल्याने जनावरांना पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. रब्बी पिकेदेखील घेता येत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी वारे यांनी गावातील युवकांना आणि ग्रामस्थांना एकत्रित करून गाळाने पुर्ण भरलेल्या गावतळ्यातील गाळ काढण्याचा संकल्प केला.

देवगावमधील गोटूराम दोंदे आणि कृषि सहायक के.डी.निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली गावतळ्यातील गाळ काढण्यास सुरूवात झाली. बॉश कंपनीने जेसी मशिन आणि गाळ वाहून नेण्यासाठी चार डंपर पुरविले. डिझेलचा एक लाख सोळा हजाराचा खर्च शासनामार्फत देण्यात आला. दीड महिन्यात काम पुर्ण करण्यात आले.

एकूण 55 फूट लांब 35 फूट रुंद आणि तीन मीटर खोल तळे तयार झाले आहे. तळे पहिल्याच पावसात भरले आहे. तळ्याद्वारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गावातील विहिरींची पाणी पातळी वाढण्यासही मदत होणार आहे.

योजनेच्या माध्यमातून गावाच्या एकूणच विकासाला चालना देण्यासाठी कृषि विभागानेदेखील पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना भाताचे बियाणे मोफत वितरीत करण्यात आले आहे. बॉश कंपनीतर्फे  खते मोफत पुरविण्यात येणार आहेत. ‘जलयुक्त’च्या माध्यमातून गावाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे ग्रामस्थांना एकत्रित येऊन काम करण्याची मिळालेली प्रेरणा आणि पाणी अडविण्याचे कळलेले महत्व योजनेचे फलित म्हणावे लागेल
दिलीप वारे, शेतकरी – आम्हा युवकांची कोणतेही काम करण्याची तयारी आहे. बॉश कंपनीचे सहकार्य आहेच. पुढच्यावर्षी तळ्याला दगडाचे पिचिंग करून बाजूला झाडे लावायची आहेत. पाण्यामुळे आता गहू-बाजरीदेखील निघू शकेल याचे समाधान आहे.



No comments:

Post a Comment