Monday 25 July 2016

नाशिकचे सांस्कृतिक वैभव-सार्वजनिक वाचनालय
नाशिकला असलेल्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासातील मानबिंदू म्हणून ओळख असलेले सार्वजनिक वाचनालय आपला शतकोत्तर अमृत महोत्सव साजरा करीत आहे. अनेक मान्यवरांनी गौरवलेल्या या वाचनालयाची सांस्कृतिक वाटचाल या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना प्रेरक अशीच आहे. स्थापनेपासून कार्यरत असणारे  राज्यातील हे एकमात्र जुने वाचनालय आहे.

नाशिकच्या सरकारवाड्यात 1840 मध्ये सरकारवाड्यात या वाचनालयाची सुरूवात झाली. स्थापनेपासून 1864 पर्यंत वाचनालयाचा कारभार वर्गणीदारांवर अवलंबून होता. नगरपालिकेच्या स्थापनेनंतर 100 रुपये अनुदान मिळू लागले.  वाचनालयातील सूचना पुस्तकातील संदर्भ वाचनालयाच्या प्रगतीचा रोमांचक इतिहास जीवंत करणारे आहेत.
वाचनालयाच्या नावाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी इथल्या काही जुन्य ग्रंथावर ‘नाशिक  लायब्ररी ॲण्ड रीडिंग रुम’,  ‘नाशिक सिटी लायब्ररी’, ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ अशी नावे हाताने इंग्रजीतून लिहिलेली आढळतात. जुन्या शिक्क्यांवर ‘Native Liabrary Nassick’  आणि  ‘नासिक पुस्तकालय’ हा मजकूर आहे. 1924 मध्ये वाचनालयाची घटना नव्याने तयार करण्यात आल्यावर ‘सार्वजनिक वाचनालय नाशिक’ हे नाव दिले गेले आणि तेच आजही कायम आहे.
सरकारवाड्यात जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने वाचनालय काही काळ राजेबहाद्दर  वाड्यातील दिवाणखान्यात हलविण्यात आले होते. त्यानंतर ते 1924 मध्ये पुन्हा सरकारवाड्यात आले. वाचनालयाच्या शताब्दी समारंभाला स्वातंत्र्यवीर सावरकर उपस्थित होते.वाचनालयाला महाराष्ट्र शासनाकडून हायस्कूल क्रिडांगणावरील 200 फूट  बाय 175 फूट क्षेत्रफळाची जागा  विनामुल्य मिळाली. 31 मे 1962 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.
शासनाकडून मिळालेले दोन लाख, नाशिक नगरपालिकेचे 50 हजार, केंद्र शासनाचे 30 हजार यासह काशिनाथ साईखेडकर, डॉ.रा.भा.पाटणकर, डॉ. वि.गो.पानसे, कै. एफ.एच.दस्तुर, शेंगांची गाडी चालविणारे बाळकोबा भालेकर, रोटरी क्लब, निझाम ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, मायको कंपनी, जनलक्ष्मी बँक आदी दात्यांच्या देणगीतून वाचनालयाचा सतत विस्तार झाला आहे. कर्नल देशपांडे यांनी अलिकडच्या काळात दिलेली 40 लाखाची देणगी आणि इतर दात्यांच्या सहकार्याने वाचनालय इमारत आणि परिसराचे नुतनीकरण करण्यात आले आहे.

वाचनालयाच्या वार्षिक समारंभात येणाऱ्या साहित्यिकांची यादी मोठी आहे. महामहोपाध्याय डॉ.पां.वा.काणे, दत्तो वामन पोतदार, नाट्याचार्य कृ.प्र.खाडीलकर यांचेपासून अलिकडच्या काळातील  शंकर वैद्य, डॉ.यु.म.पठाण आदींपर्यंत अनेक महान साहित्यिकांनी वाचनालयाला भेट दिली आहे. इथे भेट दिली नसलेले मराठी साहित्यातील मोठे नाव क्वचितच आढळेल.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड, गो.ह.देशपांडे, तात्यासाहेब शिरवाडकर, मु.शं.औरंगाबादकर अशा अनेकांनी वाचनालयाचा सांस्कृतिक वारसा पुढे नेताना त्याच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले.
वाचनालयाला लोकनायक जयप्रकाश नारायण, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न महर्षी धोंडेा केशव कर्वे, भारतरत्न पां.बा.काणे, राम मनोहर लोहिया, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, पी.व्ही.नरसिंहराव, अटल बिहारी वाजपेयी, मनोहर जोशी, जॉर्ज फर्नांडीस, मधुकरराव चौधरी, पुरुशोत्तम टंडन, धनंजयराव गाडगीळ, काकासाहेब गाडगीळ, बाळासाहेब खेर, ग.वा.माळवणकर, एम.वाय.नुरी, अच्युतराव पटवर्धन, के.एफ.नरीमन, श्री.अ.डांगे, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, पंजाबराव देशमुख, पां.वा.गाडगीळ, चिंतामणराव कोल्हटकर, वसंत साठे , गो.नि.दांडेकर, कुसुमाग्रज, ग.दि. माडगुळकर, शंकरराव खरात,  वि.स. खांडेकर, साने गुरुजी , बाबासाहेब पुरंदरे, अशा अनेक मान्यवर व्यक्तिंनी भेट दिली आहे. (जागेअभावी निवडक नावे दिली आहेत.)

साहित्य विषयक कार्यक्रम, इतिहास परिषद,  वार्षिक समारंभ, साने गुरूजी कथामाला, कविसंमेलन आदी विविध उपक्रमातून नाशिकच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीला पुढे नेण्याचे कार्य ‘सावाना’ने केले आहे. परशुराम साईखेडकर नाट्यमंदिराचे नामकरण पु.ल.देशपांडे यांच्या हस्ते झाले. हेच नाट्यगृह आज नाशिकच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीसाठी महत्वाचे ठरले आहे.

वाचनालयाच्या सभागृहात भरणारे ग्रंथप्रदर्शन इथले वेगळे वैशिष्ट्य आहे. वाचनालयाच्या खालच्या मजल्यावरील हॉल केवळ अशा प्रदर्शनांसाठीच दिला जातो. मु.शं.औरंगाबादकर सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. इथल्या अभ्यासिकेचा लाभ अडीचशे विद्यार्थी नाममात्र शुल्कात घेत आहेत. कला प्रदर्शनासाठी स्वतंत्र सभागृह आहे. कलामहर्षी वा.गो.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निर्मित कलादालनात अनेक प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. वस्तु संग्रहालयात विविध प्रकारच्या  प्राचिन दुर्मिळ वस्तु पहायला मिळतात.

 वाचनालयाच्यावतीने ग्रंथलेखन, कथालेखन, कार्यक्षम आमदार पुरस्कार, शिक्षक गौरव पुरस्कार असे विविध परितोषिके दिली जातात. विशेष म्हणजे मुख्यमंत्री होण्याच्या एक वर्षाआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्षम आमदार म्हणून इथेच गौरविण्यात आले  होते.
ग्रंथालयात 1 लाख 80 हजाराहून अधिक ग्रंथसंपदा आहे. संदर्भ ग्रंथालयात 55 हजार  ग्रंथ आहेत. ग्रंथालयाला महाराष्ट्र शासन, राजाराम मोहन राय फाऊंडेशनसह विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. इथला पोथी विभाग वैशिष्ट्यपुर्ण असून त्यात 10 हजार पोथ्या आहेत. या दुर्मिळ ग्रंथांचे स्कॅनिंग करण्याचे काम सुरू आहे.

बदलत्या परिस्थितीत वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी वाचनालयातर्फे दुसऱ्या शनिवारी ‘ऐस पैस गप्पा’, प्रत्येक ‍शनिवारी ‘ पुस्तक मित्रमंडळ’, उद्यान वाचनालय, दृकश्राव्य विभाग, ग्रंथालय सप्ताह, साहित्यिक मेळावा, ज्ञानवर्धिनी, बहि:शाल व्याख्यानमाला, असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
केवळ ग्रंथालय आणि वाचन या कक्षा ओलांडून सार्वजनिक वाचनालयाने नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे महत्वाचे कार्य केले आहे. अनेक महनीय व्यक्तींच्या आठवणींना जपून ठेवत प्राचीन संस्कृतीचे संचित आणि नव्या युगातील आधुनिक विचार एकाचवेळी समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य या वाचनालयाने केले आहे. म्हणून वाचनालयाचा शतकोत्तर अमृत महोत्सव नाशिकच्या सांस्कृतिक इतिहासातील एक ‘सोनेरी पान’ आहे.

----

No comments:

Post a Comment