Friday 29 September 2017

‘जलयुक्त’मुळे टंचाई दूर

हनुमाननगरची पाणीटंचाई जलयुक्तमुळे झाली दूर


          नाशिक दि.29- निफाड तालुक्यतील हनुमाननगर गावात जलयुक्त शिवार अभियान राबविल्यामुळे गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. ग्रामस्थांच्या एकजूटीने झालेल्या या कामांमुळे शेतीसाठी विशेष लाभ होणार आहे.
          हनुमाननगर गावातून जाणाऱ्या रस्त्यामुळे गावाचे दोन भागात विभाजन होते. एका भागाला पालखेड कालव्याच्या पाण्याचा लाभ होत असे. मात्र उर्वरीत गावाला उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागे. गावातील गाडवे नाल्यावरील बंधाऱ्यातून गळती होत असल्याने पावसाळ्यानंतर शेततळी भरण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. विहिरींची पाणी पातळी उन्हाळ्यात खालावल्यामुळे शेततळे भरण्यासही अडचणी निर्माण होत असत. अशा परिस्थितीत गतवर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 15 कामे करण्यात आली.

          गावनाल्यावरील पाच सिमेंट बंधाऱ्यांची लघु पाटबंधारे विभागामार्फत दुरुस्ती करण्यात आली. या कामावर 22 लाख रुपये खर्च करण्यात आला. अत्यंत कमी खर्चात ही कामे झाली आणि 200 टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. शाखा अभियंता अर्जुन गोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कामांसाठी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्याने पावसाळ्यापूर्वी काम पुर्ण करणे शक्य झाले.
          गावात दहा शेतकऱ्यांच्या विहिरींचे पुर्नभरण करण्यात आल्याने उन्हाळ्यात याचा फायदा होणार आहे. या कामासाठी साधारण दीड लाख खर्च करण्यात आला. पुर्नभरणामुळे विहिरींची पाणीपातळी बऱ्याच ठिकाणी काही फुटांवर आली आहे. पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण झाल्याने भाजीपाला उत्पादनासाठी या चा उपयोग होणार आहे.

          झालेल्या पाणीसाठ्यातून शेतकऱ्यांनी शेततळी भरून घेतली असून पावसाळ्यानंतरही आणखी एकदा त्यात पाणी भरणे शक्य होणार आहे. उन्हाळी पिकांसाठी त्याचा विशेष उपयोग होणार आहे. जलयुक्तच्या या यशामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ग्रामस्थांचा उत्साहदेखील वाढला असून  या कामांची देखभालीची जबाबदारीदेखील त्यांनी स्विकारली आहे.

गोपीनाथ ढुबे, शेतकरी-कालवा असूनही पूर्वी अर्ध्या गावाला टंचाईचा सामना करावा लागे. ग्रामस्थांच्या एकजूटीमुळे आणि अधिकाऱ्यांनी परिश्रम घेतल्याने जलयुक्तची कामे पुर्ण झाली. शंभराच्यावर विहिरींची पाणीपातळी वाढली असल्याने उन्हाळ्यात टंचाई भासणार नाही आणि त्यातून शेत बहरेल असा विश्वास आहे.


---

Thursday 28 September 2017

मुलीच्या जन्माचे स्वागत

जिल्हा रुग्णालयात मुलीच्या जन्माचे स्वागत

नाशिक दि.28- जिल्हा शासकीय रुग्णालयात रात्री 12 वाजेनंतर जन्माला आलेल्या मुलीच्या मातेचा सनईच्या मंगल स्वरांनी साडी,ओटी, कपडे आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करीत मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात आले. यावेळी कक्ष रांगोळी आणि फुलांनी सजविण्यात आला होता.
ॲड.सुवर्णा शेपाळ यांच्या कल्पनेतून आयोजित या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे, डॉ.जी.एम.होले, मानिनी देशमुख, डॉ.अनंत पवार, आदी उपस्थित होते.
मुलींचे कमी होणारे प्रमाण चिंताजनक बाब असून नागरिकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनबेटी बचाओ, बेअी पढाओचा संदेशही देण्यात आला.

----

स्वच्छ भारत आढावा बैठक

स्वच्छता अभियानात महाराष्ट्राची कामगिरी देशात सर्वोत्तम
                                                                   -बबनराव लोणीकर

          नाशिक दि.28- देशभरात राबवण्यिात येणाऱ्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत महाराष्ट्राची कामगिरी देशात चांगली असून राज्याला 2018 पर्यंत हगणदारी मुक्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावागावात स्वच्छतेचा संदेश पोहोचवावा , असे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  बबनराव लोणीकर यांनी केले.

 विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित स्वच्छता अभियानाच्या नाशिक विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उज्वला पाटील, आमदार डॉ.राहुल अहिरे, दिपीका चव्हाण, सुरेश भोळे, विभागीय आयुक्त महेश झगडे, उपसचिव रुपेश जयवंशी, विभागातील जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

          श्री.लोणीकर म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत राज्याने शौचालय बांधकामात चांगली कामगिरी केली. राज्यातील 15 जिल्हे , 163 तालुके, 18 हजार ग्रामपंचायती आणि 26 हजार गांवे हगणदारी मुक्त झाली आहे. स्वच्छता अभियासाठी विभागाला 194 कोटीचा निधी देण्यात आला असून मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने गरज भासल्यास सीएसआर निधीतून सहकार्य करण्यात येईल. निधीच्या उपलब्धतेबरोबर लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणणेही गरजेचे असून त्यासाठी लोकजागृती आणि प्रबोधनावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

          ते म्हणाले, देशाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. महात्मा गांधी, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनी आपल्या संदेश आणि कृतीतून स्वच्छतेचा आदर्श प्रस्तुत केला आहे.  अस्वच्छतेमुळे नदीपात्रात दुषीत पाणी जाऊन त्याचा आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होतो. म्हणूनच शासनाने स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे.

          शौचालय बांधण्यासाठी अनुदान म्हणून दिल्या जाणाऱ्या 4 हजाराच्या रकमेत 12 हजारापर्यंत वाढ करण्यात आली आहे. हा राष्ट्रीय कार्यक्रम असल्याचे त्यात सहभाग घेण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. 2018 पर्यंत जिल्हा हगणदारी मुक्त न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

          श्री. लोणीकर यांनी विभागात राबविल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री पेयजल योजनेसाठी 360 कोटी, जलस्वराज्य टप्पा- 2 साठी 94 कोटी राष्ट्रीय पेयजलसाठी 58 कोटी अशी एकुण 512 कोटीचा निधी विभागासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
          जुन्या योजना अपूर्ण असतांना केंद्राचा निधी  मिळत नसल्याने पाणी पुरवठ्यासाठी शासनाने मुख्यमंत्री पेयजल योजना सुरु केली आहे. या योजनेची कामे त्वरीत सुरु करण्यात यावी. प्रस्तावात त्रुटी असल्यास त्या कार्यकारी अभियंत्यांनी त्वरीत दुर करुन घ्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.

          श्री. झगडे म्हणाले, जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष प्रयत्न करावेत. उद्दिष्टपूर्तता कमी असलेल्या कामांबाबत बैठक घेण्यात यावी. विभागाची सरासरी राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक होईल या दिशेने प्रयत्न करावे. मुख्यमंत्री पेयजल योजनेची कामे  एक ते दीड महिन्यात सुरु होतील याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. नागरिकरण आणि पाणीपुरवठा या संदर्भात भविष्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

उपसचिव जयवंशी यांनी स्वच्छता अभियान आणि पाणीपुरवठा योजनांची जिल्हानिहाय माहिती सादर केली. बेसलाईन सर्व्हेक्षणानुसार नंदुरबार जिल्ह्यात 61 टक्के, धुळे 69 टक्के, नाशिक 78 टक्के, जळगाव 63 टक्के तर  अहमदनगर जिल्ह्यात 82 टक्के शौचालये बांधण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी अनेाखी कल्पना राबवित विशेष प्रयत्न करणाऱ्या ग्रामसेवक किशोर विभुते, सुनिल तुपे, संदीप जाधव यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


शासकीय कार्यालयांना भेट
       बैठकीनंतर श्री.लोणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. जनतेपर्यंत स्वच्छतेचा संदेश अधिक प्रभावीपणे जाण्यासाठी कार्यालय स्वच्छ ठेवण्यात यावे आणि कार्यालयातील कागदपत्रांचे स्कॅनिंग करुन कागदपत्रांच्या डिजीटल प्रती जतन करण्यात याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. आरोग्याच्यादृष्टीने पाणी महत्वाचा घटक असल्याने राज्यात सहा ठिकाणी पाण्याचे नमुने  तपासण्यासाठी कार्यशाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. अत्यंत काळजीपूर्वक आणि सेवाभावनेने आपले काम करा, असा संदेश श्री.लोणीकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिला.
         

-----

Wednesday 27 September 2017

जागर स्वच्छतेचा

मोहाडी येथे स्वच्छतेसाठी स्त्रीशक्तीचा जागर


नाशिक, दि. 27 : ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छतेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ग्रामीण भागात ‘जागर नारी शक्तीचा, संकल्प स्वच्छतेचा’  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मोहाडी येथे झालेल्या कार्यक्रमात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर, आरोग्य सभापती यतीन पगार, दिंडोरी पं.स. उपसभापती वसंतराव थेटे, प्रविण जाधव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात स्वच्छता रॅलीने झाली. कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात प्रत्येक घराभोवती स्वच्छता करून  रांगोळ्या काढल्याने गावात ‘स्वच्छता उत्सवा’चे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीत गोंधळी पथकाने स्वच्छतेचा जागर केला. मान्यवरांनी गावात सुरू असलेल्या शौचालय बांधकामची पाहणीदेखील केली.
रॅलीनंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मीना यांनी श्रमदानात सहभाग घेतला. या प्रसंगी शालेय विद्यार्थींनींनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला. उपक्रमानिमित्त  घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध आणि रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एलईडी व्हॅन’च उद्घाटन श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. शौचालय बांधकामात चांगली कामगिरी करणाऱ्या वणी  आणि चौसाळे ग्रामपंचायतीचा यावेळी सन्मान  करण्यात आला. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात शौचालय अनुदानाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.  

यावेळी बोलतान श्री.राधाकृष्णन म्हणाले, स्वच्छता कार्यात नागरिकांना स्वत:चा उपक्रम म्हणून सहभागी व्हावे. वर्षभर अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्याबरोबरच प्लास्टिकचा वापर गावात होणार नाही याची दक्षता घ्यावी. मोठ्या ग्रामपंचायतींनी कचरा विलगीकरण आणि प्रक्रीयेवर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती सांगळे यांनी आरोग्यासाठी परिसर स्वच्छता महत्वाची असल्याचे  सांगून केवळ उद्दीष्ट म्हणून न पाहता स्वच्छतेला दैनंदीन सवयीचा भाग करावा, असे आवाहन केले.
15 सप्टेंबरपासून ‘जागर नारी शक्तीचा, संकल्प स्वच्छतेचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतरर्गत महिलांचे आरोग्य आणि स्वच्छतेविषयी व्याख्यान आयोजित करण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मसन्मान जागविण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्यातर्फे 2 ऑक्टोबरपर्यंत ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमदेखील राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी उदय किसवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजेंद्र पाटील, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, गटविकास अधिकारी भुपेंद्र बोरसे, सरपंच सुरेश गावीत आदी उपस्थित होते.

----

Sunday 24 September 2017

पालखेड जलयुक्त

काजळी झाली गाळमुक्त आणि पालखेड-शिरवाडे वणी परिसर जलयुक्त

          नाशिक दि.25- निफाड तालुक्यतील पालखेडआणि शिरवाडे वणी गावाच्या सीमेवरील काजळी नदीच्या पात्रातील गाळ काढल्याने नदीपात्रातील पाणीसाठा वाढून परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळीदेखील वाढली आहे. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा पालखेडसह शिरवाडे गावातील शेतकऱ्यांनाही फायदा झाला आहे.
          पालखेड गावातून पालखेड डावा कालवा तर शिरवाडे वणीमधून ओझरखेड कालवा जातो. मात्र कालव्यातून शेतीसाठी मिळणारे पाणी पुरेसे होत नाही. शेतीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी बरेच कष्टक करावे लागतात आणि त्यासाठी अनेकदा वादही होतात. हे टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना राबविण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र केले. उपविभागीय अधिकारी महेश पाटील आणि कार्यकारी अभियंता बापूसाहेब देसले यांनीदेखील वेळोवेळी मार्गदर्शन केले.

          काजळी नदीचे पात्र संपुर्ण गाळाने भरलेले असल्याने तिच्यावर बांधलेल्या बंधाऱ्यात पाणीसाठा होत नसे. शिवाय पावसाळ्यात शेजारच्या शेतातही पाणी  गेल्याने नुकसान होई. अनेकदा बंधाऱ्याची उंची कमी करण्याबाबतही विचार करण्यात आला. पाणीसाठा वाढविण्यासाठी  नदीतील गाळ काढणे आवश्यक होते. शाखा अभियंता अर्जुन गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 मे रोजी या कामाला सुरूवात करण्यात आली. ग्रामस्थांच्या सहभागामुळे साधारण एक महिन्यात काम पुर्ण करण्यात आले.
          गाळ काढण्यासाठी एक पोकलँड, एक जेसीबी, 30 ट्रॅक्टर  आणि चार डंपरचा उपयोग करण्यात आला. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने यंत्रसामुग्रीसाठी डिझेल उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांनी स्वत: ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ शेतात वाहून नेला. एकूण 15 शेतकऱ्यांच्या शेताला त्यामुळे फायदा झाला असून या भागात मका, टोमॅटो, कोबी, मिरची आदींची लागवड करण्यात आली आहे.

गावात तीन बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आला आहे. एका ठिकाणी 600 मीटर नदीपात्रात 15 फूट खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीसाठ्याची 72 टीसीएमने क्षमता वाढली आहे.  तर इतर दोन ठिकाणी  180 मीटर आणि 250 मीटर खोलीकरण करण्यात आल्याने  105 टीसीएम क्षमता वाढली आहे.

एकूण 170 डंपर आणि 400 ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला. शिवाय बंधाऱ्याची गळती बंद करण्यासाठी पाच मीटर मातीचा थर बंधाऱ्याच्या आतल्या बाजूस देण्यात आला आहे. शेतीसाठी अनुपयुक्त गाळ नदीच्या बाजूस टाकल्याने शेताकडे जाण्यासाठी चांगला रस्तादेखील तयार झाला आहे.

 नदीच्या किनाराला दोन्ही गावातील किमान शंभर विहिरीला लाभ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वर्षाअखेर कोरडे पडणाऱ्या नदीपात्रात यावर्षी उन्हाळी पिकासाठीदेखील पाणी राहिल आणि पाणी जिरल्याने विहिरींद्वारेदेखील सिंचन करता येईल, असा ग्रामस्थांना विश्वास आहे.
पंडीत आहेर, पं.स.सभापती-योजना राबविताना होणाऱ्या लाभाबाबात शंका होती. मात्र आता वाढलेला पाणीसाठा पाहून विश्वास वाढला आहे. पुढील वर्षी आणखी काही ठिकाणी ही योजना राबविण्याचा विचार आहे. शिवार जलयुक्त होण्यासाठी ही योजना खरोखर उपयुक्त आहे.


Friday 22 September 2017

भक्त निवास उद्घाटन

पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते भक्त निवासाचे उद्घाटन

          नाशिक दि.22-महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास योजनेंतर्गत श्री कालिका माता मंदीर परिसरात उभारण्यात आलेल्या भक्त निवासाचे लोकार्पण राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
          कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे,महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते,  श्रीकालिका देवी मंदीर संस्थानचे केशवराव पाटील, प्रतापराव कोठावळे, सुभाष तळाजिया, आबासाहेब पवार आदी उपस्थित होते.

          संस्थानच्या सामाजिक कार्याबद्दल समाधान व्यक्त करून श्री.महाजन म्हणाले, समाजातिल उपेक्षितांना सहकार्य करण्यासाठी धार्मिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. श्री कालिकामाता संस्थानने विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आहे. भक्त निवासाच्या माध्यमातून परिसरातील रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुविधा होणार असल्याने भक्तनिवासाचा विस्तार करण्यासाठी संस्थांनला शासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली.
प्रास्ताविकात श्री.पाटील यांनी भक्त निवासाच्या उभारणीसाठी पर्यटन विभागामार्फत एक कोटी 14 लाखाचा निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. संस्थानतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

----

‘स्वच्छता हीच सेवा’

आजारापासून मुक्ततेसाठी स्वच्छता राखा- गिरी महाजन

          नाशिक दि.22- स्वाईन फ्ल्यू, डेंग्‌यु, मलेरिया या प्रकारच्या आजारापासून शहर मुक्त करण्यासाठी नागरिकांनी परिसराची स्वच्छता राखावी आणि वर्षभर कर्तव्यभावनेने स्वच्छता उपक्रम राबवावेत, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
          ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शहर स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त महेश झगडे, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, उपमहापौर प्रथमेश गिते आदी उपस्थित होते.

          श्री.महाजन म्हणाले, रोजच्या आचरणात स्वच्छतेची सवय असणे गरजेचे आहे. स्वच्छतेमुळे रोगराईवर नियंत्रण आणता येते. तसेच शहराच्या सौंदर्यातही भर पडते. नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगल्यास सार्वजनिक ठिकाणी कचरा होणार नाही, असे त्यांनी सांगितले. प्रधानंमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार 2 ऑक्टोबरपर्यंत परिसर स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवावेत. सार्वजनिक ठिकाणी प्लास्टीकचा कचरा टाकू नये आणि थुंकू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
          पालकमंत्र्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. त्यांच्या हस्ते शहर स्वच्छतादूत असलेल्या कविता राऊत, चित्रकार सावंत बंधु, प्रसाद पवार आणि अशोक दुधारे यांचा सत्कार करण्यात आला.

स्वच्छता मोहिमेत  352 टन टन कचरा संकलीत

       शालीमार चौकापासून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. सर्व मान्यवरांनी संत गाडगे महाराज पुतळ्यापर्यंत परिसर स्वच्छतेत सहभाग घेतला. संत गाडगे महाराज पुतळ्याला पालकमंत्री महाजन यांनी अभिवादन केले.  शहरातील विविध 449 ठिकाणी स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. कचरा संकलनासाठी 30 ट्रॅक्‌टर, 41 डंपर, 117 घंटागाड्या, 33 जेसीबी आदिंची  व्यवस्था करण्यात आली  होती. एकूण 28 हजार 819 अधिकारी, कर्मचारी, नागरिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. विविध ठिकाणाहून एकूण 352 टन कचरा संकलीत करण्यात आला.

 पालकमंत्र्यांनी स्वत: केले श्रमदान
          पालकमंत्री महाजन यांनी मोहिमेच्या शुभारंभापासून सकाळी 11 वाजेपर्यंत विविध ठिकाणी स्वच्छतेसाठी श्रमदान केले. संत गाडगेमहाराज पुतळ्यापासून परतत असतांना श्री.महाजन यांना दुभाजकाच्या मध्यावर कचरा आढळल्यावर त्यांनी वाहनांचा ताफा त्याच ठिकाणी थांबवून एक तास इतर स्वयंसेवकांसह श्रमदान केले. त्याच चौकात असणाऱ्या जुन्या कारंजाच्या टँकमध्ये  उतरुन त्यांनी स्वयंसेवकांच्या सहकार्याने तेथील कचरा काढला. या परिसरातून एक घंटागाडी भरून कचरा काढण्यात आला.

 त्यानंतर पालकमंत्र्यांनी संदर्भ रुग्णालय परिसरात जाऊन त्यांनी श्रमदान केले. रस्त्यात कचरा दिसेल त्या ठिकाणी  थांबून मंत्री महोदयांनी त्या परिसराची स्वच्छता केली आणि नागरिकांचे प्रबोधनही केले. त्यानंतर सिडको परिसरात जाऊन त्यांनी स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला.
 श्री.महाजन यांनी पेलीकन पार्क येथे भेट देऊन स्वच्छता कामांची पाहणी केली. परिसराची पूर्ण स्वच्छता करण्यात येऊन पार्कचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा  आणि यापुढे त्याठिकाणी कचरा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.


जिल्हाधिकाऱ्यांचा स्वच्छता मोहिमेत सहभाग
         जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या  परिसरात मनपा कर्मचाऱ्यांसह श्रमदान केले. या ठिकाणाहून 3 टन कचरा संकलीत करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना नाल्यात कचरा न टाकण्याबाबत आवाहन केले.

----

Monday 18 September 2017

मोफत लसीकरण शुभारंभ

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाईन फ्लू मोफत लसीकरणाचा शुभारंभ

नाशिक, दि. 18 :- पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील गरोदर मातांना मोफत स्वाईन फ्लू लसीकरण करण्याचा शुभारंभ करण्यात आला.
          यावेळी  जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, नगराध्यक्षा तृप्ती धारणे, जिल्हा शल्य् चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.

          यावेळी बोलताना श्री.महाजन म्हणाले, गरोदर मातांना स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मातांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी गरोदर मातांना सीएसआर आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला असून त्यासाठी सामाजिक संस्था आणि उद्योजकांचे सहकार्य मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  आवश्यक काळजी घ्यावी आणि लक्षणे आढळून येताच जवळच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे  आवाहन त्यांनी केले.
          स्वाईन फ्लूवर वेळेवर उपचार न झाल्यास हा आजार धोकादायक ठरू शकत असल्याने नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे डॉ.जगदाळे यांनी सांगितले.

श्री.महाजन यांची जिल्हा रुग्णालयाला भेट

पालकमंत्री श्री.महाजन यांनी जिल्हा रुग्णलयातील नवजात बालक अतिदक्षता केंद्राला भेट देऊन बालमृत्युबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त डॉ.अभिषक कृष्णा, जिल्हा शल्य् चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.
श्री.महाजन यांनी दूरध्वनीवरून मुकुल माधव ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या ट्रस्टच्या माध्यमातून लवकरच 16 बेबी वॉर्मर, 10 फोटोथेरेपी, 15 पल्सऑक्सीमीटर, 20 सिरींज पंप, एक बिलीरुबीनो मीटर आणि एक मोबाईल एक्सरे युनिट सप्टेंबर अखरेपर्यंत रुग्णालयाला मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
          स्वाईन फ्लू उपचारांसाठी आवश्यक 5 व्हेंटीलेटर लवकरच सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. गरोदर मातांचे वजन कमी असल्यास नवजात बालकांचेदेखील वजन कमी असते. त्यामुळे मातांना पोषण आहार योग्यरितीने मिळेल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
नाशिक येथे वैद्यकीय शिक्षणाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. संदर्भ रुग्णालयातील जागेबाबतही आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही ते म्हणाले. पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाल्यास 90 तज्ज्ञ डॉक्टर्स उपचारासाठी उपलब्ध होतील,अशी माहिती त्यांनी दिली.

----