Friday 8 September 2017

‘जलयुक्त’ पथदर्शी उपक्रम

गांगोडबारीचाजलयुक्तपथदर्शी उपक्रम यशस्वी

नाशिक, दि. 9 : पेठ तालुक्यातील गांगोडबारी येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावतलावाची गळती रोखण्यासाठी मृद व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला पथदर्शी उपक्रम यशस्वी झाल्याने तलाव पाण्याने भरला आहे. प्रक्रीयेत किरकोळ दुरूस्ती करून हा उपक्रम राज्यभरात राबविण्यात येणार आहे.
गांगोडबारी गावातील गावतलावातून पाण्याची गळती होत असल्याने पावसाळ्यानंतर तलावातील पाणीसाठा संपुष्टात येत असे. तलावाच्या खालील बाजूस असलेली नळ पाणी पुरवठा योजनेची उद्भव विहिर एप्रिलमध्ये कोरडी पडत असल्याने गेल्या काही वर्षापासून गावाला टँकरवर अवलंबून रहावे  लागे. गतवर्षी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाने शिंदे गावातील खासगी विहिरीपासून पेसा अंतर्गत पाईपलाईनची व्यवस्था करून तात्पुरत्या स्वरुपात पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केली.
मे महिन्यात श्री.डवले यांनी गावाला भेट दिल्यानंतर पथदर्शी उपक्रमाचे नियोजन करण्यास सुरूवात झाली. गळती रोखण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावाच्या वरच्या बाजूची झुडुपे स्वच्छ करणे, सीओटी व तलावाच्या वरच्या बाजूस काळ्या मातीच्या थराऐवजी 500 मायक्रॉनचा पॉलीथीन पेपर टाकणे, मुरुमाचा थर देणे, सांडवा दुरुस्ती आदी कामे घेण्यात आली.

कामाची सुरुवात 31 मे रोजी करण्यात आली. पाऊस सुरू होण्यापूर्वी कामे पुर्ण करावयाची असल्याने अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसह रात्रंदिवस काम करून केवळ 15 दिवसात काम पुर्ण केले. मग्रारोहयो अंतर्गत ग्रामस्थांच्या सहकार्याने तलावातील गाळदेखील काढण्यात आला. उपअभियंता व्ही.एस.गवळी, शाखा अभियंता जे.टी.पाटील, बी.एस.ढंगारे आणि त्यांच्या सहकार्यांनी कामासाठी विशेष परिश्रम घेतले.
जे.टी.पाटील, शाखा अभियंता- दुरुस्तीचे काम शासन परिपत्रकानुसार केले असता 29 लाखापर्यंत खर्च अपेक्षित होता. मात्र भरावाच्या वरच्या बाजूने  बॅल्केटींगसाठी आणि  जलावरोधक खंदकात 500 मायक्रॉनचा प्लास्टिक पेपर वापरल्याने केवळ 10 लाख 50 हजारात हे काम  पुर्ण झाले. ग्रामस्थांचे चांगले सहकार्य लाभल्याने पावसाळ्यापुर्वी हे काम पुर्ण करू शकलो.


जलरोधक खंदकात प्लास्टिक पेपर टाकल्याने पाण्याची गळती बंद झाली आहे. उद्भव विहिरीस यामुळे वर्षभर पाणी उपलब्ध होणार आहे. गावातील विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली असून तलावाखालील 50 ते 60 हेक्टर क्षेत्र अप्रत्यक्ष सिंचनाखाली येणार आहे. तलावात 141 टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होणार असून त्यातून गाव टंचाईमुक्त होण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्याने राज्यातील इतरही तलावांची दुरुस्ती कमी खर्चात करणे शक्य होणार आहे.
हिरामण गवळे, ग्रामस्थ- पूर्वी पाऊस थांबल्यावर दररोज एक हात पाणी कमी होत असे. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर पाण्याची गळती पुर्णत: थांबली आहे. या कामासाठी अधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे परिश्रम घेतले. पिण्याच्या पाण्याबरोबर गुरांनाही पाणी उपलब्ध होईल याचा आनंद आहे.


----

No comments:

Post a Comment