Monday 18 September 2017

‘स्वच्छता हीच सेवा’

    पालकमंत्र्याच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरला स्वच्छता मोहिमेचे आयोजन

नाशिक, दि. 18 :- स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वर येथे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. श्री. महाजन यांनी स्वत: श्रमदान करुन मोहिमेत सहभाग घेतला .

मोहिमेचा शुभारंभ स्वच्छतेची शपथ घेऊन करण्यात आला. शहरातील सात प्रमुख भागात विविध पथकामार्फत स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक पथकांसाठी  स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली होती. कचरा संकलनासाठी प्रत्येक भागात स्वतंत्र ट्रक्टरची व्यवस्था करण्यात आली होती.

जुने बसस्थानक येथे तीन  टन, नवे बसस्थानक एक टन, गोदावरी नदी 4 टन, कृष्णा हॉटेलची मागची बाजू एक टन, वाहनतळ दीड टन, श्रीचंद्र घाट आणि रिंगरोड प्रत्येकी दीड टन असे एकूण 13.5 टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. नदीपात्रातील कचरा काढण्यासाठी जेसीबीचा देखील उपयोग करण्यात आला. अनेक स्वयंसेवकांसह विविध संस्थांनी श्रमदानात सहभाग घेतला.

यावेळी बोलतांना श्री.महाजन म्हणाले, स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी  आहे. देशाला स्वच्छ आणि रोगराई मुक्त करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी आपला परिसर, शहर, जिल्हा, स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने देशभरातील भाविक येथे येतात. त्यामुळे शहरात स्वच्छतेसाठी सामुहिक प्रयत्न गरजेचे आहे. या तीर्थक्षेत्राला देशातील स्वच्छ शहर करण्यासाठी नागरिकांनी आठवड्यातील दोन तास स्वच्छतेसाठी द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा हागणदारी मुक्त करण्यासाठी व्यापक मोहिम सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

          जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, नगराध्यक्षा तृप्ती धारणे, मुख्याधिकारी चेतना केरुरे, सोमेश्वरानंद महाराज, बिंदू महाराज, तहसिलदार महेंद्र पवार  आदीसह  विविध स्वयंसेवी आणि शैक्षणिक संस्थांनी देखील स्वच्छता उपक्रमांत सहभाग घेतला.

----

No comments:

Post a Comment