Wednesday 27 September 2017

जागर स्वच्छतेचा

मोहाडी येथे स्वच्छतेसाठी स्त्रीशक्तीचा जागर


नाशिक, दि. 27 : ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेतर्फे स्वच्छतेत महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी ग्रामीण भागात ‘जागर नारी शक्तीचा, संकल्प स्वच्छतेचा’  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मोहाडी येथे झालेल्या कार्यक्रमात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, बांधकाम सभापती मनीषा पवार, समाजकल्याण सभापती सुनिता चारोस्कर, आरोग्य सभापती यतीन पगार, दिंडोरी पं.स. उपसभापती वसंतराव थेटे, प्रविण जाधव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात स्वच्छता रॅलीने झाली. कार्यक्रमाच्या निमित्ताने गावात प्रत्येक घराभोवती स्वच्छता करून  रांगोळ्या काढल्याने गावात ‘स्वच्छता उत्सवा’चे वातावरण निर्माण झाले होते. रॅलीत गोंधळी पथकाने स्वच्छतेचा जागर केला. मान्यवरांनी गावात सुरू असलेल्या शौचालय बांधकामची पाहणीदेखील केली.
रॅलीनंतर जिल्हाधिकारी राधाकृष्णन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मीना यांनी श्रमदानात सहभाग घेतला. या प्रसंगी शालेय विद्यार्थींनींनी पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला. उपक्रमानिमित्त  घेण्यात आलेल्या वक्तृत्व, निबंध आणि रांगोळी स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एलईडी व्हॅन’च उद्घाटन श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. शौचालय बांधकामात चांगली कामगिरी करणाऱ्या वणी  आणि चौसाळे ग्रामपंचायतीचा यावेळी सन्मान  करण्यात आला. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात शौचालय अनुदानाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.  

यावेळी बोलतान श्री.राधाकृष्णन म्हणाले, स्वच्छता कार्यात नागरिकांना स्वत:चा उपक्रम म्हणून सहभागी व्हावे. वर्षभर अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्याबरोबरच प्लास्टिकचा वापर गावात होणार नाही याची दक्षता घ्यावी. मोठ्या ग्रामपंचायतींनी कचरा विलगीकरण आणि प्रक्रीयेवर विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती सांगळे यांनी आरोग्यासाठी परिसर स्वच्छता महत्वाची असल्याचे  सांगून केवळ उद्दीष्ट म्हणून न पाहता स्वच्छतेला दैनंदीन सवयीचा भाग करावा, असे आवाहन केले.
15 सप्टेंबरपासून ‘जागर नारी शक्तीचा, संकल्प स्वच्छतेचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतरर्गत महिलांचे आरोग्य आणि स्वच्छतेविषयी व्याख्यान आयोजित करण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मसन्मान जागविण्यासाठी प्रबोधन करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्यातर्फे 2 ऑक्टोबरपर्यंत ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमदेखील राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी उदय किसवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजेंद्र पाटील, तहसीलदार बाबासाहेब गाढवे, गटविकास अधिकारी भुपेंद्र बोरसे, सरपंच सुरेश गावीत आदी उपस्थित होते.

----

No comments:

Post a Comment