Wednesday 30 August 2017

क्षेत्रीय अधिकारी प्रशिक्षण

‘जलयुक्त’ कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्यावे-एकनाथ डवले   
    

नाशिक, दि. 30 :- जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत होणारी कामे गुणवत्तापूर्ण करण्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्यासाठी कामांचे जीओ टॅगींग करण्यात यावे. तसेच कोणत्याही परिस्थितीत 15 नोव्हेंबरपर्यंत कामे सुरू करण्यात यावीत, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले.
मृद व जलसंधारण विभाग  आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आयोजित विभागीय क्षेत्रीय अधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कार्यक्रमाचे संचालक डॉ. कैलास मोते, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, जलसंधारण विभागाचे अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, आयआयटीचे तज्ज्ञ हेमंत बेलसरे, आयडब्ल्युएमपीचे डॉ. प्रीतम वंजारी, उपायुक्त बाळासाहेब जेजूरकर आदी उपस्थित होते.

श्री.डवले म्हणाले, जलयुक्त अभियानांतर्गत कामे हाती घेताना अंदाजपत्रकाचा अभ्यास करूनच मान्यता देण्यात यावी. भूगर्भशास्त्राचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करून तांत्रिक बाबींकडे विशेष लक्ष देण्यात यावे. अभियानातील लोकसहभाग वाढविण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. क्षेत्र उपचाराची कामे पुर्ण करण्यात आली असल्यास इतर कामांना सुरवात करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्याचे प्रयत्न करण्याबरोबरच त्या पाण्याचे योग्य पद्धतीने वितरण आवश्यक आहे. नियोजन करतना तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्याने अभियान अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य आहे. अभियानाशी निगडीत विविध पैलूंची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अंतर्गत पाच सदस्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली. श्री.डवले यांनी अधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसन करून अभियानाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
‘जलयुक्त शिवार’ प्रत्येक ग्रामस्थाचे अभियान व्हावे - महेश झगडे

जलयुक्त शिवार अभियान हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हे अभियान केवळ शासनाचे म्हणून न राबविता प्रत्येक ग्रामस्थाचे अभियान व्हावे यादृष्टीने लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त झगडे यांनी केले.
ते म्हणाले, गेल्या दोन वर्षात अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. अभियानाबाबत विविध शासन निर्णयात सुस्पष्टता असल्याने आणि निधीची उपलब्धता झाल्याने अभियानाला चांगले यश मिळते आहे. मात्र प्रयत्नात त्रुटी राहिल्याने काहीवेळा अभियानाला अपेक्षित यश मिळत नाही. अशा त्रुटी टाळण्यासाठी वस्तुनिष्ठ कृती आराखडा तयार करण्यात यावा. पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याच्यादृष्टीने उपाय शोधून त्यांचा समावेश आराखड्यात करावा आणि त्या आराखड्याची पुर्णत: अंमलबजावणी करावी.
 जलयुक्तचा आराखडा गावपातळीवरच ग्रामसभेच्या मान्यतेने अंतिम होत असल्याने योजनेमध्ये प्रत्येक ग्रामस्थाचा सहभाग होण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. पाणी साठविण्याबरोबरच ठिबक सिंचन, तुषार सिंचनसारख्या पद्धतीच्या उपयोगाद्वारे पाण्याची बचत केल्यास पुढच्या पिढीसाठी जलसाठा उपलब्ध राहील. अभियानातील तक्रारींचे निवारण तात्काळ केल्यास विश्वासार्हता वाढेल. रोजगार हमी योजना आणि जलयुक्त अभियानाची एकमेकाशी सांगड घालून निधीचा योग्य उपयोग करता येणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी अभियानातील लोकसहभाग वाढविण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे डॉ. वंजारी म्हणाले, जलसंधारण व जलनियोजनातील शास्त्रीय माहितीच्या उपलब्धतेचा वापर गावपातळीवर करता यावा, यासाठी गावनिहाय कार्यान्वयन आराखडा तयार करण्यात आला आहे. क्षमता उपचार नकाशा वापरुन गावातील कोणत्या ठिकाणी जलसंधारणाची कामे घ्यावी हे निश्चित करणे सोपे जाईल. हे नकाशे तयार करण्यासाठी भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्त्रो), एमआरसॅक, जीएसडीए, कृषी, जलसंपदा, वने, महसूल आदी विभागांच्या माहितीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. नकाशात दर्शविलेल्या जागांचा उंच-सखलपणा, जमिनीचा पोत, मातीचा प्रकार यांची शास्त्रीय माहिती गावपातळीवरील नियोजनामध्ये महत्वपूर्ण ठरेल.

श्री. बेलसरे यांनी गावपातळीवर पाण्याचा ताळेबंद तयार करण्याविषयी माहिती दिले. ते म्हणाले, गावात पाण्याचा कार्यक्षमतेने उपयोग करण्यासाठी आणि पाण्याविषयीच्या गरजा पुर्ण करण्यासाठी गावातील पाण्याचा ताळेबंद तयार करणे गरजेचे आहे. ताळेबंदामुळे पाण्याची उपलब्धता व मागणी कळून योग्य वितरण करण्यासाठी वापर करता येईल. ताळेबंदात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पीक नियोजनानुसार गरज, पाण्याचे बाष्पीभवन, अपधाव आणि उपलब्ध पाणीसाठा याचा विचार करण्यात यावा. पाणी विषयक जागरूकता वाढली तर चांगल्याप्रकारे नियोजन करता येईल, असे त्यांनी सांगितले. पाण्याचा ताळेबंद तयार करताना महिला, भूमीहीन आणि अल्पभूधारक शेतकरी यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने तयार केलेल्या ‘भूजलाची गाथा’ या लघुपटाद्वारे भूजलाविषयी माहिती देण्यात आली. श्री. गायकवाड यांनी या लघुपटाच्या माध्यमातून पाण्याबाबत महत्वाचा संदेश गावपातळीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले. 82 टक्के शेती भूगर्भाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने भूजलाचा नियोजनपूर्वक वापर आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. मोते यांनी मृदु व जलसंधारण  कामांच्या नियोजन, आराखडे व  पद्धतींमधील तांत्रिक बाबींचे माहितीपूर्ण  सादरीकरण केले. त्यांनी विविध प्रकारच्या जमीनींमध्ये जलसंधारण कामांसाठी बांध बंधिस्ती, चर, माती उपचार, शेततळे, विहीर पुनर्भरण, पीक पद्धतीने पाणी वापरातील परिणामकारकता, शेतकऱ्यांसाठी विविध योजनातून असलेली कामे आदींची माहिती दिली. मूलस्थानी मृद व जलसंधारण अधिक महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. शेततळ्यासाठी निधीची उपलब्धता असून ऑफलाईन पद्धतीनेदेखील नोंदणी शक्य आहे, मात्र आवश्यक टप्पे पुर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात जलसंधारण उपचार दुरुस्ती, तांत्रिक आणि अर्थिक मापदंड या विषयावर कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. वाल्मीचे संचालक ह.का.गोसावी यांनी अप्रत्यक्ष सिंचनात पाणी वाटप व्यवस्थेविषयी माहिती दिली. डॉ.संजय कोलते यांनी मनरेगा आणि जलयुक्त शिवार अभियान अभिसरणाविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपायुक्त श्री. जेजूरकर यांनी जलयुक्त शिवार योजनेबाबात सादरीकरण केले. कार्यशाळेस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., किशोरराजे निंबाळकर, मल्लिनाथ कलशेट्टी, दिलीप पांढरपट्टे तसेच विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी तसेच कृषी, जलसंधारण, जलसंपदा, वने, महसूल व ग्रामविकास विभागाचे  अधिकारी उपस्थित होते.
                                                       00000

Monday 28 August 2017

महा अवयवदान

महाअवयवदान महोत्सवानिमित्त ग्रामीण भागात जनजागृती
          नाशिक दि.28- राज्यात 29 आणि 30 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणाऱ्या  महाअवयवदान महोत्सव 2017 संदर्भात  मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना यांनी  ग्रामपंचायत  आणि आरोग्य विभागाची बैठक घेऊन ग्रामीण भागात जनजागृती अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.
          अवयवदानाबाबत माहिती देण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्यावतीने 29 ऑगस्ट 2017 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक-सेविका, आशा यांचेमार्फत ग्रामसभेत नागरिकांना अवयवदाना विषयी माहिती देण्यात येणार आहे. गाव पातळीवर समाजामध्ये जागरुकता निर्माण करणे अवयवदाना विषयी समाजातील गैरसमज दुरु करुन ब्रेन डेड व्यक्तीबाबत जवळचे नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतांना कशाप्रकारे निर्णय घ्यावा, तसेच ब्रेन डेड व्यक्ती म्हणजे काय, याबाबत या ग्रामसभेत माहिती देण्यात येणार आहे.
 तसेच 30 ऑगस्ट रोजी गावातील प्रत्येक घरासमोर अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी रांगोळी काढण्यात येणार असून रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहे.  प्रत्येक गावातुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या रांगोळीस पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात गणेशमंडळामार्फत दाखविण्यात येणाऱ्या देखाव्यामध्ये अवयवदानाविषयीचे देखावे व माहिती जास्तीत जास्त मंडळांनी दाखवावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शहरामध्ये अवयवदानाविषयी मागीलवर्षी चांगल्याप्रकारे प्रसार आणि प्रचार करण्यात आला होता. त्याप्रमाणे यावर्षी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेमध्ये अवयवदानाविषयी जनजागृती चांगल्याप्रकारे व्हावी व अवयवदानाचे प्रमाण समाजामध्ये वाढावे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशिल वाकचौरे यांनी केले आहे.                  
                                                         ---

Friday 25 August 2017

‘पुन्हा घरी’

‘पुन्हा घरी’ : सुसंवाद सहजीवनाचा !

       अलिकडच्या काळात माणसाने विविध क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती साधली आहे. भौतिक आणि आर्थिक मानकांच्या आधारे माणसाच्या विकासाचे मुल्यमापन होत असताना सामाजिक आणि भावनीक पातळीवर मात्र त्याच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिलेल्या दिसतात. माणसाचे परस्परांशी असलेले नाते-सबंध, त्यामधील ताण, समस्या या विषयांवर मुक्त चर्चा होताना फारसे दिसत नाही. त्यामुळेच की काय, समस्येमध्ये आणखीनच भर पडते आहे.
          प्रत्येक नात्याला अनेक पदर असतात. नाती आली की त्याच व्यवहारही ओघाने आलाच, हा व्यवहार विश्वासाचा, भावनेचा, विचारांचा, सहकार्याचा, समजून घेण्याचा, समजून सांगण्याचा असतो. चांगल्या-वाईट माणसांना ओळखणे, ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारणे, आपल्या आयुष्यात त्यांना स्थान देणे आपल्याकडून घडते का? याचे उत्तर नकारार्थी आहे.
           ‘पतीपत्नी’ या नात्यामध्ये एकूणच सर्व मानवी नात्यांचा सार आढळतो. त्यानूसार समज, गैरसमज, राग, लोभ, बरोबरी, तुलना, असूया, हेवेदावे अशी मानवी नात्यातील समस्त प्रकारांची सरमिसळ होऊन पर्यायाने होणारी गुंतागुंत अटळ असते. या नात्याचा पाया ‘विश्वास, पारदर्शकता, प्रेम व वचनबद्धता’ या मूळ चार स्तंभांवर आधारित असतो. त्यामुळे यातील एकजरी स्तंभ डगमला तर संसाराचा डोलारा कोसळायला सुरुवात होते. पतीपत्नीच्या पवित्र नात्यामध्ये नितळ पारदर्शकता अपेक्षेपेक्षा गृहीतच जास्त धरलेली असते. वैवाहिक जीवनात सगळंच काही आलबेल असेलच असे नाही. हे जाणून वर्तनातील आणि स्वभावातील लवचिकता महत्वाची असते.
          प्रत्येकाच्या संसारिक जीवनात चांगले वाईट प्रसंग येतच असतात आणि बऱ्याच प्रसंगी आपल्या मानसिक, आर्थिक व सामाजिक क्षमतांची कसोटी लागते. आपण अशा अनेक प्रसंगातून सहजगत्या सहीसलामत बाहेर येऊ शकतो कारण आपल्या पाठीमागे आपले कुटूंब सर्वशक्तीनिशी भरभक्कमपणे उभे असते. याची जाण बऱ्याचदा आपल्याकडून ठेवली जात नाही.  त्यामुळेच कौटुंबिक कलहाच्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकाच आपल्याला दिसतात.  कदाचित म्हणूनच ‘पतीपत्नी’ या पवित्र नात्याला प्रसंगी ‘कोर्टाची पायरी’ नशीब होते, जे अत्यंत अनाकलनीय व अयोग्य आणि तेवढेच दु:खदायक आहे.
          आपल्या कुटुंबातील संवाद अशा अनेक प्रसंगांवर रामबाण उपाय आहे. सुखवस्तु कुटुंबात संवादाअभावी लहानसहान बाबींवरून वाद होतात आणि पर्यायाने ‘पोलीस ठाणे व न्यायालय’ यांच्या दारापर्यंत आपणच आपल्या कुटुंबाला फरफटत नेतो. याचा विपरीत परिणाम पुढील पिढीच्या एकूणच विकासावर हातो. शिवाय कुटुंबाची वाताहत, ससेहोलपट व उध्वस्तता याशिवाय आपल्याला काहीही साध्य होत नाही.           परमेश्वराने निर्मिलेल्या समस्त प्राण्यांमध्ये संवेदना आणि संवाद हे माणसाचे वेगळेपण आहे. कोणऱ्याही समस्येतून मार्ग काढणे याआधारे सहज शक्य आहे. ऐकून घेण्याची, समजून घेण्याची व समजावून सांगण्याची इच्छाशक्ती नात्याला बळकटी देणारी असते. मानसोपचार तज्ज्ञांनी अत्यंत स्पष्टपणे, रोखठोक पद्धतीने तरी परंतु अतिशय तरलतेने माणसाच्या आयुष्यातील प्रेम, आपुलकी, विश्वास, निखळ पारदर्शकता, संसारिक व सामाजिक जबाबदाऱ्या व एकुणात बेफिकीरी अशा सर्वांगाने एकूण एक कंगोरे उलगडत या विषयाची हाताळणी यशस्वीपणे केल्याची उदाहरणे अनेक आहेत.
          या विषयाचे गांभिर्य  लक्षात घेऊन मी नाशिक शहर पोलीस आयुक्त या नात्याने ‘कम्युनिटी पोलीसींग’ वा ‘समाज-पोलीस’ या अभियानांतर्गत समाजामधील नियमितपणे घडणाऱ्या पतीपत्नीमधील किरकोळ भांडणाचा विपर्यास होऊन निर्माण होणारे कौटुंबिक कलह कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  
नाशिक शहरातील पतीपत्नी मधील भांडणामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीचा अभ्यास करता कोठेतरी पोलीस ठाणे स्तरावर प्रथम तक्रार करणाऱ्या पती किंवा पत्नी यांच्या तक्रारीवर सरळपणे गुन्हा दाखल होऊ न देता प्रथमत: त्यांच्याशी समुपदेशन  आहे असे लक्षात येते. या प्रक्रियेतून संवाद व त्यानंतर सुसंवादाद्वारे त्यांच्यामधील प्रथम अवस्थेतील असलेले गैरसमज व वाद/कलह सुरुवातीलाच सौम्य करण्याच्या दृष्टीने साधारणत: फेब्रुवारी 2017 पासून ‘पुन्हा घरी’ ही संकल्पना तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
नाशिक शहरातील या विषयातील तज्ज्ञांची मदत घेऊन त्यांनी केलेल्या उपयुक्त समुपदेशनांमुळे आम्ही आतापर्यंत 89 जोडप्यांना एकत्र आणले असून सदर जोडपी आपआपल्या घरी परतली आहे. या उपक्रमाकडे अधिक गांभिर्याने लक्ष देऊन तो  राज्यस्तरावर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. याकरिता पोलीस अधिकारी नंदवाळकर, श्रीराम पवार यांच्यासह महिला सुरक्षा शाखेतील महिला पोलीस अधिकारी  आणि कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. सोबतच  दिपाली मानकर, आरती अहिरे, अनिता पगार,  वैशाली बालाजीवाले, मनिषा आहेर, ॲड. शिरीष पाटील इतकेच नव्हे तर मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या एमएसडब्ल्यु कॉलेजचे प्राचार्य श्री.देशमुख, प्रा.वैशाली जगताप, गिता जोशी इत्यादींचा समुपदेशकात समावेश आहे. त्याचबरोबर मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर, समाजसेवक, विधीतज्ज्ञ यांचेदेखील चांगले सहकार्य मिळत  आहे. आमचे महिला अधिकारी, कर्मचारी व समुपदेशक सदस्यांच्या मार्फत नांदावयास परतलेल्या जोडप्यांना भेटी देऊन विचारपूसदेखील करण्यात येते.
          आमच्या या उपक्रमात आमही फक्त प्रयत्नशील माध्यम म्हणुन काम करीत आहोत. यामध्ये आम्ही निस्वार्थी, नि:पक्ष व कोणताही स्वनिर्णय न लादता पारदर्शक पद्धतीने समुपदेशन प्रक्रिया पार पाडीत आहोत. आतापर्यंत केलेल्या समुपदेशनात जरी काही जोडपी एकत्र आली नसली तरी त्यांच्यातील वाद, गैरसमज कमी होऊन ते एकविचाराने गोड पद्धतीने  विभक्त झाले आहेत. यावरुन ‘पुन्हा घरी’ या योजनेचे यश दिसून यशस्वीता दिसून येते. इतकेच नव्हे तर एकत्र नांदावयास गेलेल्या कुटूंबांचा पाठपुरावा करता ते खुशाल असल्याचेच कळवितात  आणि यातच मला समाज स्वास्थ्यासाठी काहीतरी केल्याचे एक आंतरिक समाधान मिळते, एवढेच...
  -डॉ. रवींद्रकुमार सिंगल

   पोलीस आयुक्त, नाशिक

Thursday 24 August 2017

अन्न व औषध प्रशासनातर्फे आवाहन 2

मिठाई खरेदी-विक्री करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

नाशिक, दि. 25 : मिठाई तयार करताना अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि नियमानुसार सर्व तरतूदींचे पालन व्हावे यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत असून तरतूदींचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामारे जावे लागेल, असे अन्न व  औषध प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खवा, मिठाई, मावा उत्पादकांची सखोल तपासणी करण्याची मोहिम राबविण्यात येत  असून संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणाकरिता घेण्यात येत आहेत.
सणाच्या काळात ग्राहकांडुन मोठ्या प्रमाणात मिठाईचे सेवन करण्यात येते. ग्राहकांनी नोंदणीधारक विक्रेत्याकडूनच मिठाई खरेदी करावी. खरेदी करताना बिलाशिवाय आणि उघड्यावरील मिठाई खरेदी करू नये. शक्यतो भडक खाद्यरंग असलेली मिठाई खरेदी करू नये. त्यात प्रमाणापेक्षा जास्त खाद्यरंग असण्याची शक्यता असते.
खवा माव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन 24 तासाच्या आत करावे. बंगाली मिठाईचे सेवन आठ तासाच्या आत करावे. शिल्लक राहिलेली मिठाई फ्रिजमध्ये ठेवावी.  मिठाईवर बुरशी आढळून आल्यास किंवा चवीत फरक जाणवल्यास ती सेवन न करता नष्ट करावी.
मिठाई खरेदी करतान शंका आल्यास सहआयुक्त अन्न व औषध प्रशासन नाशिक विभाग उद्योग भवन पाचवा मजला कक्ष क्र. 21 व 23 आयटीआय सिग्नलजवळ सातपूर रोड नाशिक (दूरध्वनी क्र. 0253-2351204/2351200) येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहआयुक्त उ.श.वंजारी यांनी केले आहे.

----

अन्न व औषध प्रशासनातर्फे आवाहन 1

सार्वजनिक मंडळानी प्रसाद तयार करताना खबरदारी घेण्याचे आवाहन

नाशिक, दि. 25 : सणासुदीच्या काळात सार्वजनिक मंडळांनी प्रसाद बनविताना आणि वाटप करताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व  औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
उत्सवाच्या काळात वाटला जाणारा महाप्रसाद अन्न  पदार्थ असल्याने तो सुरक्षित असणे  आणि त्यापासून भाविकांच्या आरोग्यावर कुठलाही दुष्परीणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत मार्गदर्शन सुचना तयार करण्यात आल्या असून सार्वजनिक मंडळांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सर्व सार्वजनिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी तसेच प्रसाद उत्पादन व वितरण करणाऱ्या  व्यावसायिकांनी  अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 नियमावलीमधील तरतूदींचे पालन करणे आवश्यक आहे.
प्रसाद तयार करताना जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा कच्चा माल किंवा अन्न पदार्थ नोंदणीकृत व्यावसायिकांकडूनच खरेदी करावा. प्रसादासाठी लागणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी आणि झाकण असलेली असावी. फळांचा वापर करताना त्यांची खरेदी ओळखीलच्या नोंदणीकृत परवानाधारकाकडूनच करावी. कच्चे, सडलेल्या फळांचा उपयोग करू नये.
प्रसादाचे उत्पादन करताना मानवी सेवनास सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. आवश्यक तेवढ्याच प्रसादाची निर्मिती करावी. प्रसाद तयार करण्यासाठी लागणारे पाणी पिण्यायोग्य असावे. प्रसाद तयार करणाऱ्या स्वयंसेवकास ग्लोव्हज, टोपी देण्यात यावे आणि त्याचे हात स्वच्छ असावे. स्वयंसेवक कोणत्याही त्वचा अथवा संसर्गजन्य रोगापासून मुक्त असावा.
दुध आणि दुग्धजन्य पदार्थ कमी तापमानावरच साठवणूकीस ठेवावे. खव्याची वाहतूक रेफ्रीजरेटेड वाहनातूनच करावी. जुना, शिळा, अनेक दिवस कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलेला खवा किंवा मावा प्रसादासाठी वापरू नये. अन्न पदार्थाबाबत शंका असल्यास आपल्या क्षेत्राच्या अन्न सुरक्षा अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त (अनन्‍ ) यांचेशी संपर्क साधावा. एफडीए हेल्पलाईन क्र.1800222365 या क्रमांकावर संपर्क साधावा,  असे आवाहन नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) उ.श. वंजारी यांनी केले आहे.

-----

‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंध

‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंध
       स्वाईन फ्लू हा हवेमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. मेक्सिको देशात या आजाराची प्रथम बाधा झाली. स्वाईन फ्लू इन्फ्ल्यूएन्झा- ए  एच 1 एन 1 या विषाणुमुळे होतो. सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी आणि क्वचित प्रसंगी उलट्या व जुलाब ही स्वाईन फ्लूची सर्वसाधारण लक्षणे आहेत.
          या आजाराचा प्रसार हवेतून होतो. स्वाईन फ्लू बाधित रुग्णांच्या शिंकण्यातून आणि खोकल्यातून हे विषाणू हवेद्वारा दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. आपल्याकडे आढळणारा नेहमीचा फ्लू आणि स्वाईन फ्लू यांची लक्षणे सर्वसाधारणपणे सारखीच आहेत. तसेच सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आजार अंगावर काढू नये. उपचारास विलंब करु नये.
          स्वाईन फ्लूकडे दुर्लक्ष केल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. या आजारासाठी शासनाच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयात औषधे उपलब्ध आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
Ø सर्दी, खोकला असलेल्या व्यक्तीने लक्षणे नाहीशी होईपर्यंत घरीच थांबावे. जनसंपर्क टाळावा.
Ø शिंकताना किंवा खोकताना नाकातोंडावर रुमाल धरावा.
Ø डॉक्टरांनी दिलेल्या औषधाशिवाय गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे, असे घरगुती उपायही करावेत.
Ø घरातील टेबल, टीपॉय, संगणकाचा की बोर्ड यासारखे पृष्ठभाग वारंवार स्वच्छ करावेत.
Ø वारंवार हात , साध्या साबणाने व स्वच्छ पाण्याने धुवावेत.
Ø आपली रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी शारिरीक , मानसकि ताण टाळावा, पुरेशी विश्रांती घ्यावी. आरोग्यदायी आहार घ्यावा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी व ई व्हिटॅमिन असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
Ø लक्षणे दिसताच 36 तासांचे आत उपचार सुरु करावा.
Ø बरे वाटले तरी टॅमी फ्ल्यूचा पाच दिवसांचा पूर्ण डोस घ्यावा.
Ø धुम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, खोकला, गर्दी असलेल्या ठिकाणी जाणे उदा. सिनेमागृह, बाजार, एस.टी. स्टॅण्ड इ. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे  हे टाळावे.
स्वाईन फ्लूच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. वेळीच औषधोपचार केल्यास या आजारापासून पुर्णपणे संरक्षण करता येते. वेळीच प्रतिबंध करणे हेच स्वाईन फ्लूपासून खरे संरक्षण आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा महानगरपालिकेच्या   आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
----

कांदा लिलाव शुभारंभ

लासलगाव येथे कांदा हब उभारणार -सदाभाऊ खोत


नाशिक, दि.24 : देशाला कांदा पुरविण्याचे काम नाशिक जिल्हा करत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीसाठी  लासलगाव येथे कांदा हब उभारण्यात येईल, असे प्रतिपादन कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री  राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
निफाड तालुक्यातील विंचूर येथील कृषी उत्पन्न  उपबाजार समिती येथे कांदा  लिलावाच्या  शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष  पाशा पटेल, आमदार  अनिल कदम, लासलगाव कृषी उत्पन्न  समितीचे सभापती जयदत्त होळकर, उप सभापती सुरेश कराड जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, विंचूरच्या सरपंच ताराबाई क्षिरसागर  आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री खोत म्हणाले, राज्य शासन लासलगाव येथे कांदा हब होण्यासाठी केंद्राच्या कृषी मंत्रालय व रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करत आहे. या हबचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल. कांद्याचे भाव कमी-अधिक होत असल्याने शेतकऱ्याला चांगला भाव मिळण्यासाठी कांदा साठवणुकीची योग्य  व्यवस्था होण्यासाठी शासन उपाययोजना करीत आहेत. यासाठी जास्तीत जास्त वेअर हाऊस निर्माण केले जातील. सध्या कांद्याला चांगला भाव असून तो तसाच मिळावा यासाठी  केंद्र सरकारने आत्ताचे आयात-निर्यात धोरण बदलू नये व कांदा साठवणूकीवर बंदी आणू नये याबाबत विनंती करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगीतले.

ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताला समोर ठेवून प्रत्येक निर्णय घेतला जात असून सोयाबीनवर आयात कर वाढवण्यात आला. तूर खरेदी शासन हमी भावाने करतांना  75 लाख टन खरेदी करण्यात आली आहे. यासाठी म्हणून बाहेरुन आयात होणाऱ्या उडीद वरील आयात कमाल मर्यादा 3 लाख टनावर आणण्यात आली. तर तूर डाळीवर 2 लाख टन आयातीचे बंधन घातले गेले. यामुळे सोयाबीनचा भाव 6 हजार रु. प्रति. किंटल, उडीद 6400 प्रति क्विंटल झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

श्री. खोत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचे धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी  चालू वर्षी नाशिक जिल्ह्यात 15 कोटी 28 लाख अनुदान व मागील प्रलंबित अनुदान देण्यासाठी 32 कोटी रुपये जिल्ह्याला देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
श्री. पटेल म्हणाले, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर देण्यासाठी राज्याने कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली असून 1 जुलैपासून आयोगाने काम सुरु केले आहे.  नाशवंत मालाला हमी भाव देण्यासाठी पणन विभागाच्या अंतर्गत समिती स्थापन करण्यात येत आहे. कांद्यालादेखील हमीभाव  देण्याबाबतचा निर्णय 6 महिन्यात घेतला जाईल. आवश्यकता भासल्यास यासाठी विशेष शिष्टमंडळ स्थापन करुन प्रयत्न केले जातील. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे, असे श्री. पटेल म्हणाले .

यापूर्वी कृषी राज्यमंत्री चितेगाव येथील राष्ट्रीय फलोत्पादन  व संशोधन संस्थेस भेट दिली. त्यांनी कांदा व लसून याबाबत करण्यात येत असलेल्या संशोधनाची माहिती घेतली. येथील प्रयोगशाळा, ऑरगॅनिक सॅम्पल चाचणी केंद्र  यांची त्यांनी पाहणी केली. यावेळी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार अनिल कदम व संस्थेचे उपसंचालक हरी प्रकाश शर्मा उपस्थित होते.

                                    *********

Wednesday 23 August 2017

अवयवदान मोहिम


अवयवदान मोहिमेविषयी गाव पातळीवर जागृती करणार-गिरीष महाजन

          मुंबईदि.23-  देशभरात अवयवदानाच्या चळवळीला गती मिळत आहे. शहरांसोबतच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यासाठी आता 29व 30 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय महाअवयवदान अभियान हाती  घेण्यात आले आहे.29 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन गावात करण्यातयेणार आहे. याद्वारे गावागावात अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीआज दिली.
            अवयवदानात गेल्यावर्षी भारतातून महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते. यावर्षी राज्यात या विषयी जाणीव जागृती केल्यामुळे अवयवदात्यांची संख्या 41 वरुन 131 पर्यंत गेली आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगदान अभियानास महोत्सव स्वरुपात साजरे करण्याचे मन की बात याकार्यक्रमात सूचित केले आहे. त्यानुसार 30 ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील प्रत्येक घरांसमोर स्वच्छता करुन अवयवदानाबाबतची रांगोळीकाढण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.
            अवयवदानासाठी जिल्हा तथा तालुकास्तरावर मानवी साखळ्यांद्वारे अवयवदानाविषयी जागृती करण्यात येणार असून या अवयवदान चळवळीत लोकांनी सहभाग घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.
महा अवयवदान मोहीम
·        सध्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाआधारे मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत.
·        जनतेतून अवयव दानाला चालना मिळावी याकरिता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी महा अवयवदान अभियान सन 2016 मध्ये दि. 30.8.2016 ते 01.09.2016 दरम्यान राबविण्यात आले होते.
·        यावर्षी महा अवयवदान महोत्सव-2017 दि. 29.8.2017 ते 30.8.17 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
·        महाअवयवदान महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दि. 29.8.2017 रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे.अवयवदान प्रचाराचा ठराव व अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.
·        अवयवदान जागृती महोत्सवाकरिता दिनांक 30.8.2017 रोजी सकाळी प्रत्येक घरासमोर अवयवदान जागृतीसंबंधी रांगोळी काढणेबाबत ग्रामसभेत आवाहन करण्यात येणार आहे.
·        दिनांक 18.8.2017 ते 28.8.2017 दरम्यान शालेय व उच्च माध्यमिक विद्यालय यामध्ये अवयवदानासंदर्भात रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, चर्चासत्र व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
·         गणेश उत्सव कार्यक्रमांमध्ये अवयवदान देखावा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
·        अवयवदान जागृती विषयाचे पोस्टर, प्रचार व प्रसारासाठी स्पर्धा आयोजित करुन त्यापैकी पाच उत्कृष्ट पोस्टर्सची  निवड करून. या पाच उत्कृष्ट पोस्टरचा वापर अवयवदान जागृतीसाठी राज्यातील प्रत्येक रुग्णालय, शासकीय कार्यालय, महाविद्यालय येथे करण्यात येणार आहे.
·        अवयवदान जनजागृतीविषयी प्रसार व प्रचार व्हावा याकरिता सर्व धर्माचे धर्मगुरु, समाजसेवक, अवयवदाता कुटुंबीय व मान्यवरांच्या उपस्थितीत महा अवयवदान महोत्सवानिमित्त निमित्त विशेष कार्यक्रमाचे मुंबई येथे आयोजन करण्यात येणार आहे.
००००          

Thursday 17 August 2017

ट्रामा केअर सेंटर उद्घाटन

 आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमधील सर्व पदे भरणार- डॉ. दिपक सावंत

नाशिक, दि.17:- राज्याची सार्वजनिक आरोग्य विभागातील सात हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया करण्यात येत असून असून 22 ऑगस्टनंतर या पदावरील शंभर टक्के नियुक्त्यांमुळे आरोग्य विभागाला नवसंजिवनी मिळेल, असे  प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी केले.

सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयातील आधुनिक ट्रामा केअर सेंटरचे उद्घाटन डॉ.सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार दिपीका चव्हाण, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती यतिंन्द्र पाटील, नगराध्यक्ष सनिल मोरे, आरोग्य उपसंचालक लोचना घोडके, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.
            डॉ. सावंत म्हणाले, चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून या विभागातील वर्ग 3 4 शंभर टक्के पदे भरण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. वैद्यकिय अधिकाऱ्यांची पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आले आहेत. याचबरोबर 781 बीएएमएस वैद्यकिय अधिकाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

          ते म्हणाले, आरोग्य सेवेचे काम आशावर्कर, एमपीडब्लू, एएनएम नर्सेस रात्रंदिवस करत असतात. वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांना चांगली सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न करतात. यामुळेच मागच्या कालावधीत राज्यभरात शासकीय रुग्णालयातून 15 हजार नेत्ररुग्णांवर  यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी देखील शासकिय रुग्णालये आपली आहेत असे मानून ही स्वच्छ व सुंदर राखावी. अशा सामाजिक योगदानामुळे रुग्णांचे आरोग्य चांगले होण्यास मदत मिळेल, असे डॉ.सावंत म्हणाले.
          आरोग्य सेवेमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस व कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी उत्तम सुसंवाद राखून जिव्हाळ्याची वागणून द्यावी. यासाठी येणारा रुग्ण हा आपला कुटुंबिय आहे असे समजून उपचार करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
           सटाणा येथील ट्रामा सेंटर साठी डिजीटल व पोर्टेबल एक्स रे मशीन, रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यास मान्यता देतानाच अपघातातील रुग्णांवर विशेष उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्ती करण्यासाठी तरतूद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
          यावेळी आमदार श्रीमती चव्हाण, आरोग्य सभापती श्री. पाटील, नगराध्यक्ष श्री.मोरे यासह विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी आरोग्य सेवेमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्यांचा सत्कार आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. जगदाळे यांनी आभार मानले.

00000000

पाणी मागणी अर्ज

       लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणी मागणी अर्ज

       नाशिक, दि. 16 : पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पातील सिंचनाकरीता पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून खरीप हंगामातील उभ्या पिकांसाठी संबंधित लाभधारक शेतकऱ्यांनी आणि सहकारी पाणी वापर संस्थांनी नमुना नंबर 7 चे पाणी मागणी  अर्ज संबंधित शाखा कार्यालयात दिनांक 18 ऑगस्ट 2017 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत दाखल करावेत, असे आवाहन कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.
          पाटबंधारे विभागाच्या लघु तलाव प्रकल्पातील 33 टक्के पाणी पिकांना संरक्षित सिंचनासाठी उलब्ध झाले आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, चांदवड व सिन्नर तालुक्यातील लघु तलावातील पाणी उपलब्ध आहे. त्या नमूद तलाव लाभक्षेत्रातील शेतकरी बागायतदार यांनी आपल्या  हद्दीच्या नजीकच्या शाखा कार्यालयात मुदतीत अर्ज दाखल करावेत. मुदतीनंतर आलेल्या पाणी  मागणी अर्जाचा विचार केला जाणार नाही.
          पाणी  अर्ज दाखल करतांना संबंधितांनी  त्यांचे नांवे असलेली सर्व थकबाकी  भरणे आवश्यक आहे. पाणी अर्ज दाखल करतांना चालू वर्षाचे सातबाराचे  उतारे जोडणे आवश्यक आहे. मागणी न करताच त्याचे क्षेत्रातील पिकास पाणी घेतल्याचे आढळून आल्यास तो पाणी वापर अनाधिकृत समजून त्यावर उभ्यापिकाचे क्षेत्राचा अनाधिकृत पाणी वापरांचा पंचनामा करण्यांत येणार आहे. लघु पाटबंधारे तलावाचे काठावर मंजूरी धारका व्यतिरिक्त कोणीही इलेक्ट्रीक  मोटारी  अथवा ऑईल इंजिन ठेवून वा पाईप अर्थात डोंगळे टाकून पाणी घेण्याचा प्रयत्न केल्याचे स्थानिक कालवा अधिकाऱ्यांचे निदर्शनास आल्यास महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 च्या कलम 92 अन्वये त्यांचे इलेक्ट्रीक मोटार, ऑईल इंजिन व तत्संबंधीचे साहित्य जप्त करुन नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित पाटबंधारे शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.
000000

नवीन महसुली सझा

नवीन महसुली सझांच्या प्रारुपावरील हरकती नोंदवण्याचे आवाहन

नाशिक दि.16:- जिल्ह्यात क्षेत्रीयस्तरावर महसूली सझांची पुनर्रचना व नवीन सझांची निर्मिती बाबत प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून यावरील कोणत्याही प्रकारच्या हरकती, सुचना असल्यास 31 ऑगस्ट 2017 पर्यंत लेखी स्वरूपात संबंधीत उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात दाखल कराव्यात. सदर अधिसूचना नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेत तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदार कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून 31 ऑगस्ट 2017 पर्यंत शासकीय वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.  अधिसूचनेबाबत मुदतीनंतर  प्राप्त झालेल्या हरकती व सुचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कळविले आहे.
                                                                   ----

आढावा बैठक

 गावांना भेटी देऊन नियोजन करा-दादाजी भुसे 
 

                                                

          नाशिक, दि.16- मालेगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने टंचाईला सामोरे जाणाऱ्या गावात अधिकाऱ्यांनी भेटी देऊन कामांचे नियोजन करावे, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
            मालेगाव येथे आयेाजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त संगिता धायगुडे, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, अप्पर पोलीस अधिक्षक हर्ष पोतदार, तहसिलदार डॉ. सुरेश कोळी, गट विकास अधिकारी अनंत पिंगळे, कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, आदी  उपस्थित होते.
             आठवड्यातून दोन दिवस गाव पातळीवर भेट देऊन विविध विभागांतर्गत कामांची नोंद घ्यावी. संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकाऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना श्री.भुसे यांनी दिल्या.        
            बैठकीमध्ये तालुक्यातील पिकस्थिती, पावसाअभावी नापेर क्षेत्र, पीक नुकसान, पुर्नपेरणी क्षेत्र व बियाणे मागणी बाबत कृषी विभागाने माहिती सादर केली. महसूल विभागाने पावसाचे प्रमाण, रोहयो, चारा टंचाईवरील उपाययोजना, अन्न सुरक्षा पत्रिका, अंत्योदय योजना, धान्य वाटप, संजय गांधी योजनांची माहिती दिली.  कर्ज माफी, पीक कर्ज वाटप, विविध गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा तसेच अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
             मालेगाव शहर हागणदारीमुक्त होण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशाबद्दल मनपा आयुक्त संगिता धायगुडे यांचे श्री.भुसे यांनी अभिनंदन केले.   
                                                                   00000