Friday 25 August 2017

‘पुन्हा घरी’

‘पुन्हा घरी’ : सुसंवाद सहजीवनाचा !

       अलिकडच्या काळात माणसाने विविध क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती साधली आहे. भौतिक आणि आर्थिक मानकांच्या आधारे माणसाच्या विकासाचे मुल्यमापन होत असताना सामाजिक आणि भावनीक पातळीवर मात्र त्याच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिलेल्या दिसतात. माणसाचे परस्परांशी असलेले नाते-सबंध, त्यामधील ताण, समस्या या विषयांवर मुक्त चर्चा होताना फारसे दिसत नाही. त्यामुळेच की काय, समस्येमध्ये आणखीनच भर पडते आहे.
          प्रत्येक नात्याला अनेक पदर असतात. नाती आली की त्याच व्यवहारही ओघाने आलाच, हा व्यवहार विश्वासाचा, भावनेचा, विचारांचा, सहकार्याचा, समजून घेण्याचा, समजून सांगण्याचा असतो. चांगल्या-वाईट माणसांना ओळखणे, ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारणे, आपल्या आयुष्यात त्यांना स्थान देणे आपल्याकडून घडते का? याचे उत्तर नकारार्थी आहे.
           ‘पतीपत्नी’ या नात्यामध्ये एकूणच सर्व मानवी नात्यांचा सार आढळतो. त्यानूसार समज, गैरसमज, राग, लोभ, बरोबरी, तुलना, असूया, हेवेदावे अशी मानवी नात्यातील समस्त प्रकारांची सरमिसळ होऊन पर्यायाने होणारी गुंतागुंत अटळ असते. या नात्याचा पाया ‘विश्वास, पारदर्शकता, प्रेम व वचनबद्धता’ या मूळ चार स्तंभांवर आधारित असतो. त्यामुळे यातील एकजरी स्तंभ डगमला तर संसाराचा डोलारा कोसळायला सुरुवात होते. पतीपत्नीच्या पवित्र नात्यामध्ये नितळ पारदर्शकता अपेक्षेपेक्षा गृहीतच जास्त धरलेली असते. वैवाहिक जीवनात सगळंच काही आलबेल असेलच असे नाही. हे जाणून वर्तनातील आणि स्वभावातील लवचिकता महत्वाची असते.
          प्रत्येकाच्या संसारिक जीवनात चांगले वाईट प्रसंग येतच असतात आणि बऱ्याच प्रसंगी आपल्या मानसिक, आर्थिक व सामाजिक क्षमतांची कसोटी लागते. आपण अशा अनेक प्रसंगातून सहजगत्या सहीसलामत बाहेर येऊ शकतो कारण आपल्या पाठीमागे आपले कुटूंब सर्वशक्तीनिशी भरभक्कमपणे उभे असते. याची जाण बऱ्याचदा आपल्याकडून ठेवली जात नाही.  त्यामुळेच कौटुंबिक कलहाच्यावेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकाच आपल्याला दिसतात.  कदाचित म्हणूनच ‘पतीपत्नी’ या पवित्र नात्याला प्रसंगी ‘कोर्टाची पायरी’ नशीब होते, जे अत्यंत अनाकलनीय व अयोग्य आणि तेवढेच दु:खदायक आहे.
          आपल्या कुटुंबातील संवाद अशा अनेक प्रसंगांवर रामबाण उपाय आहे. सुखवस्तु कुटुंबात संवादाअभावी लहानसहान बाबींवरून वाद होतात आणि पर्यायाने ‘पोलीस ठाणे व न्यायालय’ यांच्या दारापर्यंत आपणच आपल्या कुटुंबाला फरफटत नेतो. याचा विपरीत परिणाम पुढील पिढीच्या एकूणच विकासावर हातो. शिवाय कुटुंबाची वाताहत, ससेहोलपट व उध्वस्तता याशिवाय आपल्याला काहीही साध्य होत नाही.           परमेश्वराने निर्मिलेल्या समस्त प्राण्यांमध्ये संवेदना आणि संवाद हे माणसाचे वेगळेपण आहे. कोणऱ्याही समस्येतून मार्ग काढणे याआधारे सहज शक्य आहे. ऐकून घेण्याची, समजून घेण्याची व समजावून सांगण्याची इच्छाशक्ती नात्याला बळकटी देणारी असते. मानसोपचार तज्ज्ञांनी अत्यंत स्पष्टपणे, रोखठोक पद्धतीने तरी परंतु अतिशय तरलतेने माणसाच्या आयुष्यातील प्रेम, आपुलकी, विश्वास, निखळ पारदर्शकता, संसारिक व सामाजिक जबाबदाऱ्या व एकुणात बेफिकीरी अशा सर्वांगाने एकूण एक कंगोरे उलगडत या विषयाची हाताळणी यशस्वीपणे केल्याची उदाहरणे अनेक आहेत.
          या विषयाचे गांभिर्य  लक्षात घेऊन मी नाशिक शहर पोलीस आयुक्त या नात्याने ‘कम्युनिटी पोलीसींग’ वा ‘समाज-पोलीस’ या अभियानांतर्गत समाजामधील नियमितपणे घडणाऱ्या पतीपत्नीमधील किरकोळ भांडणाचा विपर्यास होऊन निर्माण होणारे कौटुंबिक कलह कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  
नाशिक शहरातील पतीपत्नी मधील भांडणामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीचा अभ्यास करता कोठेतरी पोलीस ठाणे स्तरावर प्रथम तक्रार करणाऱ्या पती किंवा पत्नी यांच्या तक्रारीवर सरळपणे गुन्हा दाखल होऊ न देता प्रथमत: त्यांच्याशी समुपदेशन  आहे असे लक्षात येते. या प्रक्रियेतून संवाद व त्यानंतर सुसंवादाद्वारे त्यांच्यामधील प्रथम अवस्थेतील असलेले गैरसमज व वाद/कलह सुरुवातीलाच सौम्य करण्याच्या दृष्टीने साधारणत: फेब्रुवारी 2017 पासून ‘पुन्हा घरी’ ही संकल्पना तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
नाशिक शहरातील या विषयातील तज्ज्ञांची मदत घेऊन त्यांनी केलेल्या उपयुक्त समुपदेशनांमुळे आम्ही आतापर्यंत 89 जोडप्यांना एकत्र आणले असून सदर जोडपी आपआपल्या घरी परतली आहे. या उपक्रमाकडे अधिक गांभिर्याने लक्ष देऊन तो  राज्यस्तरावर घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे. याकरिता पोलीस अधिकारी नंदवाळकर, श्रीराम पवार यांच्यासह महिला सुरक्षा शाखेतील महिला पोलीस अधिकारी  आणि कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. सोबतच  दिपाली मानकर, आरती अहिरे, अनिता पगार,  वैशाली बालाजीवाले, मनिषा आहेर, ॲड. शिरीष पाटील इतकेच नव्हे तर मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या एमएसडब्ल्यु कॉलेजचे प्राचार्य श्री.देशमुख, प्रा.वैशाली जगताप, गिता जोशी इत्यादींचा समुपदेशकात समावेश आहे. त्याचबरोबर मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर, समाजसेवक, विधीतज्ज्ञ यांचेदेखील चांगले सहकार्य मिळत  आहे. आमचे महिला अधिकारी, कर्मचारी व समुपदेशक सदस्यांच्या मार्फत नांदावयास परतलेल्या जोडप्यांना भेटी देऊन विचारपूसदेखील करण्यात येते.
          आमच्या या उपक्रमात आमही फक्त प्रयत्नशील माध्यम म्हणुन काम करीत आहोत. यामध्ये आम्ही निस्वार्थी, नि:पक्ष व कोणताही स्वनिर्णय न लादता पारदर्शक पद्धतीने समुपदेशन प्रक्रिया पार पाडीत आहोत. आतापर्यंत केलेल्या समुपदेशनात जरी काही जोडपी एकत्र आली नसली तरी त्यांच्यातील वाद, गैरसमज कमी होऊन ते एकविचाराने गोड पद्धतीने  विभक्त झाले आहेत. यावरुन ‘पुन्हा घरी’ या योजनेचे यश दिसून यशस्वीता दिसून येते. इतकेच नव्हे तर एकत्र नांदावयास गेलेल्या कुटूंबांचा पाठपुरावा करता ते खुशाल असल्याचेच कळवितात  आणि यातच मला समाज स्वास्थ्यासाठी काहीतरी केल्याचे एक आंतरिक समाधान मिळते, एवढेच...
  -डॉ. रवींद्रकुमार सिंगल

   पोलीस आयुक्त, नाशिक

No comments:

Post a Comment