Wednesday 23 August 2017

अवयवदान मोहिम


अवयवदान मोहिमेविषयी गाव पातळीवर जागृती करणार-गिरीष महाजन

          मुंबईदि.23-  देशभरात अवयवदानाच्या चळवळीला गती मिळत आहे. शहरांसोबतच गाव पातळीवर ही मोहीम राबविण्यासाठी आता 29व 30 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय महाअवयवदान अभियान हाती  घेण्यात आले आहे.29 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन गावात करण्यातयेणार आहे. याद्वारे गावागावात अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनीआज दिली.
            अवयवदानात गेल्यावर्षी भारतातून महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते. यावर्षी राज्यात या विषयी जाणीव जागृती केल्यामुळे अवयवदात्यांची संख्या 41 वरुन 131 पर्यंत गेली आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंगदान अभियानास महोत्सव स्वरुपात साजरे करण्याचे मन की बात याकार्यक्रमात सूचित केले आहे. त्यानुसार 30 ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील प्रत्येक घरांसमोर स्वच्छता करुन अवयवदानाबाबतची रांगोळीकाढण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे.
            अवयवदानासाठी जिल्हा तथा तालुकास्तरावर मानवी साखळ्यांद्वारे अवयवदानाविषयी जागृती करण्यात येणार असून या अवयवदान चळवळीत लोकांनी सहभाग घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.
महा अवयवदान मोहीम
·        सध्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाआधारे मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत.
·        जनतेतून अवयव दानाला चालना मिळावी याकरिता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी महा अवयवदान अभियान सन 2016 मध्ये दि. 30.8.2016 ते 01.09.2016 दरम्यान राबविण्यात आले होते.
·        यावर्षी महा अवयवदान महोत्सव-2017 दि. 29.8.2017 ते 30.8.17 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
·        महाअवयवदान महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये दि. 29.8.2017 रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहे.अवयवदान प्रचाराचा ठराव व अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.
·        अवयवदान जागृती महोत्सवाकरिता दिनांक 30.8.2017 रोजी सकाळी प्रत्येक घरासमोर अवयवदान जागृतीसंबंधी रांगोळी काढणेबाबत ग्रामसभेत आवाहन करण्यात येणार आहे.
·        दिनांक 18.8.2017 ते 28.8.2017 दरम्यान शालेय व उच्च माध्यमिक विद्यालय यामध्ये अवयवदानासंदर्भात रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यान, चर्चासत्र व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
·         गणेश उत्सव कार्यक्रमांमध्ये अवयवदान देखावा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
·        अवयवदान जागृती विषयाचे पोस्टर, प्रचार व प्रसारासाठी स्पर्धा आयोजित करुन त्यापैकी पाच उत्कृष्ट पोस्टर्सची  निवड करून. या पाच उत्कृष्ट पोस्टरचा वापर अवयवदान जागृतीसाठी राज्यातील प्रत्येक रुग्णालय, शासकीय कार्यालय, महाविद्यालय येथे करण्यात येणार आहे.
·        अवयवदान जनजागृतीविषयी प्रसार व प्रचार व्हावा याकरिता सर्व धर्माचे धर्मगुरु, समाजसेवक, अवयवदाता कुटुंबीय व मान्यवरांच्या उपस्थितीत महा अवयवदान महोत्सवानिमित्त निमित्त विशेष कार्यक्रमाचे मुंबई येथे आयोजन करण्यात येणार आहे.
००००          

No comments:

Post a Comment