Monday 26 March 2018

दीक्षांत समारंभ


शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करावा-  डॉ.एम.जी.चांदेकर

नाशिक, 26 : दूरशिक्षणाच्या माध्यमातून प्राप्त केलेल्या ज्ञान व कौशल्याचा उपयोग व्यावसायिक प्रगतीबरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी करावा आणि अध्ययनशील समाजनिर्मितीत आपले योगदान द्यावे,  असे आवाहन संत गाडगे महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. चांदेकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 24 व्या दीक्षांत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायूनंदन, विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू राम ताकवले, कुलसचिव दिनेश बोंडे, परीक्षा नियंत्रक अर्जुन घाटुंळे तसेच विद्यापीठाचे व्यवस्थापक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

श्री.चांदेकर म्हणाले, देशात संगणक तंत्रज्ञानासह ग्रामीण भागातदेखील  संगणक,  स्मार्टफोन आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.  तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी आवश्यक मनोवृत्ती तयार करण्यात विद्यापीठांची  भूमीका महत्वाची आहे. विद्यापीठांनी आपल्या अभ्यासक्रमात नव्या तंत्रज्ञानाचा वापर, विकास आणि त्याचे फायदे यांना स्थान देणे आणि विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रवृत्त करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी दूरशिक्षण पद्धतीने पुढे येणे आवश्यक आहे. उच्च शिक्षणात प्रवेश घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढविण्याचीदेखील गरज आहे. दूरशिक्षण पद्धतीने समाजातील अशा गरजांची नोंद घ्यावी आणि त्या गरजा पूर्ण करणारे शिक्षणक्रम तयार करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, मुक्त शिक्षण पद्धती समाजाभिमुख असावी. पारंपरिक नियमांनी या शिक्षणपद्धतीला जखडल्यास या पद्धतीचा लाभ सामान्य जनतेला होणार नाही. दूरशिक्षण पद्धतीकडे एक पर्याय म्हणून नव्हे तर समाजाच्या आर्थिक रचनेत, सामाजिक रचनेत योगदान कायम ठेवून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारी व्यवस्था म्हणून पाहणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. ताकवले म्हणाले, विज्ञानयुगाने डिजीटल  युगाच्या निर्मितीचा मार्ग शोधण्याबरोबर मार्ग संश्लेषण पद्धतीवर आधारीत एकत्रित आणि एकात्मिक विचार संस्था व समाज यांचा पूर्णत्वाचा विचार करण्याचा विवेकही दिला आहे. म्हणूनच 21 वे शतक सर्वसामान्य लोकांचे आहे. नव्या युगाचे पुनर्गठन तंत्रज्ञान व मानवी गरजा यावर आधारीत राहणार आहे. अशावेळी मुक्त विद्यापीठाने आपले उद्दीष्ट ‘लोकविद्यापीठ’ स्थापण्याचे ठेवून प्रासंगिक शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले.
 मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात स्वाध्याय, सहाध्याय आणि ‍निर्मितीवर भर असून शिक्षण आणि सामाज विकास यांच्यात एकात्मिक संबंध जोडला आहे. त्यातील विकासाचा मार्ग शिक्षणास दाखवावा लागणार असल्याचे ते म्हणाले. सामान्यातील असामान्यत्वाला वाव देणारे शिक्षण असावे, असेही डॉ.ताकवले म्हणाले.

कुलगुरु डॉ.वायुनंदन यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर केला. विद्यापीठाने ई-गव्हर्नन्सवर भर दिला असल्याचे नमूद करून पदवी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याची सुविधा चालू वर्षापासून उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

समारंभात एक लाख 54 हजार 440 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. डॉ.ताकवले यांना डी.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. यशस्वी स्नातकांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक व पदवी प्रदान करण्यात आली. 31 अभ्यासकांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली, तर 43 स्नातकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
----


Thursday 22 March 2018

जलजागृती सप्ताह समारोप

 पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जलजागृती आवश्यक-के.भा. कुलकर्णी

नाशिक, दि.22- शहरी व ग्रामीण भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जलजागृती चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता के.भा. कुलकर्णी यांनी केले.
परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे आयोजित जलजागृती सप्ताह समारोप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलतज्ज्ञ सुनील कुटे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, महानगरपालिकेचे शहर अभियंता ए.व्ही.धनाईत, कार्यकारी अभियंता प्रविण गायकवाड, दिलीप मुसळे, राजेश शिंदे, गिरीष सैंदाणी आदी उपस्थित होते.

श्री.कुलकर्णी म्हणाले, पाण्याचे महत्व जाणूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे पाण्याचा अतिरिक्त वापर टाळणे गरजेचे आहे.  पाण्याची नासाडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनेवर भर दिला गेला पाहिजे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत हे उद्दीष्ट समोर ठेऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. कुटे यांनी पाणी  हा जीवनशैलीचा भाग असल्याने जलजागृती केवळ सप्ताहापुरती मर्यादीत न राहता याविषयी निरंतर प्रबोधन करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
अधिक्षक अभियंता श्री. मोरे यांनी प्रास्तविकात जलजागृती सप्ताहानिमित्त आयोजित उपक्रमांची माहिती दिली. जलदिनानिमित्त रांगोळी, चित्रकला, आदी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

तत्पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विक्रम गायकवाड यांनी सहकाऱ्यांसह व्यथाया एकांकिकेचा प्रयोग सादर केला. त्यातून शिक्षण, पाणी ,आरोग्य, जलसंवर्धनाचे महत्व मांडण्यात आले.  तृप्ती बोरस्ते हिने पाणी प्रश्न आणि मी याविषयावर व्याख्यान केले. गिरणा नदी खोरे प्रकल्प यांनी पाण्याला लागली तहानहे लघुनाट्य, तर नाना साळवे यांनी वामनदादा कर्डक यांची पाणी वाढ गं मायही कविता सादर केली.
00000

Tuesday 20 March 2018

विभागीय क्रीडा संकुल


सामान्य खेळाडुंना क्रीडा सुविधांचा लाभ द्या-राजाराम माने

नाशिक, 20 : विभागीय क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधांचा लाभ सामान्य खेळाडुंना अत्यंत कमी शुल्कात मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित  विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, प्र. क्रीडा उपसंचालक रविंद्र नाईक आदी उपस्थित होते.


श्री.माने म्हणाले, सामान्य कुटुंबातील खेळाडुच्या क्रीडा गुणांना क्रीडा संकुलाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळायला हवे. त्यासाठी आवश्यक सुविधा संकुलात निर्माण करण्यात याव्यात व अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यात यावे. संकुलाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अधिक सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात यावी आणि सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. युथ होस्टेलच्या उभारणीच्या कामाला गती द्यावी आणि दिलेल्या खर्चाच्या मर्यादेत सुधारीत आराखडा सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
          बैठकीत युथ होस्टेलची उभारणी, सिंथेटीक ट्रॅक आणि टेनिस कोर्टची सुरक्षा, सुरक्षा भिंतीची उंची वाढविणे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते.
-----
           

Saturday 10 March 2018

मालेगाव आढावा बैठक


‘जलयुक्त’च्या कामांचा दर्जा चांगला ठेवा- दादाजी भुसे


मालेगाव, दि. 10:- ‘जलयुक्त’ शिवार अभियान आणि   ‘ गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’  या दोन्ही योजनांची कामे उत्तम दर्जाची करावीत  आणि गाव टंचाईमुक्त होईल यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
शासकीय विश्रमागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसिलदार ज्योती देवरे, गट विकास अधिकारी आनंद पिंगळे, वन विभागाचे श्री.कांबळे, तालुका कृषी अधिकारी गोकुळ अहिरे आदी उपस्थित होते.
श्री. भुसे म्हणाले, सन 2016-2017 मधील कामे अपूर्ण असल्यास मार्च 2018 अखेर ती पूर्ण करावीत. तसेच 2017-18 चे कामाचे योग्य नियोजन करुन ती कामे तातडीने सुरु करण्यात यावीत. जलयुक्तच्या कामासाठी प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च होईल आणि कामांचा दर्जाही चांगला राहील याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. टंचाईग्रस्त गावात सीएसआर अंर्तगत जलयुक्तची कामे घेण्यात यावीत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी वन विभागाला सीसीटी आणि वनतळ्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
                                                        ---


बालमहोत्सव 2017-18


विभागीय स्तर चाचा नेहरु बालमहोत्सवाचे विंचुर गवळी येथे उद्घाटन

नाशिक, दि 10 :- महिला व बालविकास विभाग अंतर्गत नाशिक विभागीय उपआयुक्त कार्यालयातर्फे विंचूर गवळी येथील नवजीवन पब्लिक स्कुल येथे आयोजित विभागीय स्तर चाचा नेहरु बालमहोत्सव 2017-18 चे उद्घाटन महिला व बालविकास आयुक्त लहूराज माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
          कार्यक्रमाला बाल हक्क आयोगाचे सदस्य संतोष शिंदे, आरोग्य उपसंचालक डॉ.लोचना घोडके, माहिती उपसंचालक डॉ.किरण  मोघे, नवजीवन फाऊंडेशनचे विश्वस्त सुभाष देशमुख, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त बी.टी.पोखरकर, चंदुलाल शहा, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुरेखा पाटील आदी उपस्थित होते.

          यावेळी बोलताना श्री.माळी म्हणाले, अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी. प्रतिकूल विचार बाजूला सारून कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यश निश्चितपणे मिळेल. मनात जिद्द असल्यास सामान्य परिस्थितीतून मार्ग काढता येतो. जिद्दीने पुढे जाताना एकमेकांचे नातलग बनून प्रेम द्यावे, शासन पालकत्वाची जबाबदारी पुर्ण करीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देईल, असे त्यांनी सांगितले.
          डॉ.घोडके यांनी अनाथालयातून बाहेर पडलेल्या यशस्वी युवकांचा आदर्श समोर ठेवत विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन करावे, असे सांगितले.

          यावेळी श्री.देशमुख आणि श्री.शिंदे यांनीदेखील विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात श्री.पोखरकर यांनी  बालमहोत्सवात नाशिक विभागातील 350 विद्यार्थी 14 क्रीडाप्रकारात सहभागी होतील अशी माहिती दिली. अनाथालयात राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या कला आणि क्रीडागुणांना वाव देण्यासाठी 2012 पासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 अनाथालयातून बाहेर पडून विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या संदीप भालेराव, मनोज पवार, उन्नती बर्वे, माया व्यवहारे, कविता साळुंके यांनीदेखील आपले अनुभव मनोगतातून मांडले. त्यांचा श्री.माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच  ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेबाबत जनजागृती करण्यासाठी  विभागीय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

विजेत्यांची नावे- वक्तृत्व स्पर्धा- रुपाली गिरवले अहमदनगर (प्रथम), वैशाली साठे नाशिक (द्वितीय), निबंध लेखन- धनश्री गायके निफाड (प्रथम), मयुरी पंडीत नाशिक (द्वितीय), घोषवाक्य स्पर्धा-सविता बागूल मालेगाव (विभागस्तर प्रथम व राज्यस्तर द्वितीय), पथनाट्य स्पर्धा विभागून- वनिता शिंदे आणि ग्रुप नाशिक व शरयु ठाणगे व ग्रुप अहमदनगर
----

रुग्णवाहिका लोकार्पण


सामाजिक उत्तरदायित्व निधीतून लोककल्याणाचे केलेले काम महत्वपूर्ण
-         राधाकृष्णन बी.  ख्Pz

नाशिक, दि 10 :- पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडीयाने देशासाठी समर्पित भावनेने वीज प्रकल्प पूर्ण करताना सामाजिक उत्तरदायित्व निधीतून लोककल्याणाच्या कामांसाठी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात  आयोजित जिल्हा शासकीय रुग्णालयासाठी रुग्णवाहिका आणि  दिंडोरी तालुक्यातील अवनखेड ग्रामपंचायतीला स्कूल बसच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार हरिश्चंद्र चव्हाण, पॉवर ग्रिड कार्पोरेशनचे महाप्रबंधक राजेशकुमार, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे, अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधवआदी उपस्थित होते.

          श्री.राधाकृष्णन म्हणाले, रुग्णवाहिका आणि स्कूल बसच्या माध्यमातून पॉवर ग्रिड कार्पोरेशनने लोकसेवेच्या कामांची सुरूवात केली आहे. आदवासी क्षेत्रातील कुपोषण मुक्ती कार्यक्रम आणि जलयुक्त ग्राम योजनेसाठी करण्यात येत असलेल्या कामांमध्येदेखील त्यांचा सहभाग आहे. लवकरच प्रत्येक तालुक्यामध्ये कार्पोरेशनच्या सहकार्याने ‘इन्फॉर्मेशन किऑस्क’ उभारण्यात येणार आहेत. जनतेला माहिती घेणे, सातबारा सह विविध दाखले मिळवणे, रेल्वे आरक्षणसाठी आदीसाठी  जनतेला त्याचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

अवनखेडचा समावेश देशातील अग्रेसर गावात होण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कोणताही प्रकल्प पुर्ण करताना शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी खा.चव्हाण म्हणाले.
श्री. राजेशकुमार यांनीदेखील यावेळी  विचार व्यक्त केले.
0000

Friday 9 March 2018

सोशल मिडिया महामित्र


समाज माध्यमांद्वारे विकास संदेशाचे आदानप्रदान व्हावे-रविंद्र सिंगल

नाशिक, दि. 9 :- समाज माध्यमे लोकशिक्षणासाठी महत्वाचे आणि तेवढेच प्रभावी साधन असून त्यांचा उपयोग विकास संदेशांचे आदानप्रदान करण्यासाठी करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी केले.
व्ही.एन.नाईक महाविद्यालयातसोशल मिडिया महामित्रउपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय संवादसत्रात सहभागी स्पर्धकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

श्री.सिंगल म्हणाले, शासनाच्या विविध योजना, चांगले सामाजिक उपक्रम, शेतकऱ्यांसाठी आवश्यक माहिती आणि चांगल्या विचारांचे आदानप्रदान या माध्यमातून घडल्यास त्याचा लाभ नागरिकांना होईल, तसेच समाज माध्यमांचा दुरुपयोग कमी होण्यास मदत होईल. या माध्यमाचा चुकीचा उपयोग करून त्याद्वारे नागरिकांची फसवणूक होत असल्याने समाजमाध्यमे वापरताना दक्षता बाळगावी. जबादार नेटीझन म्हणून आपली भूमीका अदा करावी, असे त्यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाने सोशल मीडियाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी चांगला उपक्रम आयोजित केल्याचे ते म्हणाले.

संवाद सत्रात जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, स्वप्नील तोरणे,  संतोष साबळे, सुरेश पाटील, विजयसिंह दुधभाते, चंदुलाल शहा,  किरण लोखंडे, मिलिंद सजगुरे, महेंद्र महाजन, अनिकेत साठे, भावेश ब्राह्मणकर, वैशाली बालाजीवाले, योगेश खरे, नानासाहेब पाटील,  श्रीकांत सोनवणे, वृंदा भार्गवे, प्राची पिसोळकर, दत्ता पाटील, सचिन शिंदे, विवेक ठाकूरआदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी प्राचार्य शांताराम बडगुजर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय संवाद सत्रातून जिल्ह्याच्या एकूण 15 क्षेत्रातील प्रत्येकी एक प्रतिनिधीची निवड होणार आहे. सोशल मिडियाचा जबाबदारीपूर्वक वापर व्हावा आणि त्यातून विवेकी समाज घडावा या उद्देशाने प्रथमच अशा उपक्रमाचे आयोजन राज्यभरात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात येत आहे.
------    ----

Tuesday 6 March 2018

पोलिओ लसीकरण


पोलिओ लसीकरण मोहिम 11 मार्च रोजी

नाशिक, 6 : जिल्ह्यात 11 मार्च रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून लसीकरणापासून कोणतेही बालक वंचित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी  राधाकृष्णन बी. यांनी दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात मोहिमेच्या नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  (महिला व बालविकास)डी.बी.मुंडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.
श्री.राधाकृष्णन म्हणाले, महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात शंभर टक्के लसीरणासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. स्थलांतरीत वस्तीतील प्रत्येक मुलाचे लसीकरण होण्यासाठी मोहिमेच्या संपुर्ण कालावधीत स्थळभेटी द्याव्यात. लसीकरण केंद्रावर उपस्थित न राहणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार कमलाकर लष्करे यांनी सादरीकरणाद्वारे मोहिमेची माहिती दिली. 2018 मध्ये पाकीस्तानमध्ये 11 आणि अफगाणिस्तानमध्ये 4 ठिकाणी पोलिओचे जंतू आढळले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भारतात शेवटचा पोलिओचा जंतू  जानेवारी 2011 मध्ये हावडा येथे आढळला होता. देशातून पोलिओ  कायमस्वरुपी घालविण्यासाठी लसीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
000000
           


सामाजिक न्याय कार्यशाळा


विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून कायद्यांचे ज्ञान दिले जावे
                                   -न्यायमुर्ती सी. एल. थूल

         
नाशिक, दि.6:- समाजातील भेदाभेद मिटवण्यासाठी निर्माण झालेल्या कायद्यांचा वापर प्रभाविपणे होण्यासाठी आणि  समाजातील वातावरण चांगले राहण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात या विषयांचे ज्ञान दिले जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल यांनी व्यक्त केले.
          राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आयोजित ‘नागरी संरक्षण कायदा, अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम’ या विषयावरील विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त आर.आर. माने, बार्टीचे प्रकल्प संचालक लक्ष्मीकांत देशमुख, समाजकल्याण उपायुक्त (पुणे) सदानंद पाटील, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देशमुख, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल आदी उपस्थित होते.

          न्या. थुल म्हणाले, समाजातील मागास, दुर्बल घटकापर्यंत कायद्यांची माहिती पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातील प्रश्न सोडवून जीवन सुसह्य व्हायला हवे. त्यासाठी काम करणाऱ्या विभागांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
          याप्रसंगी नागरी संरक्षण कायदा, अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम यांची निर्मितीमागची पार्श्वभूमी, त्यांतील सुधारणा यांचा घटनाक्रम, हिंदु कोड बीलाचे महत्व व त्या-त्या वेळची सामाजिक परिस्थिती आदींची माहिती न्या. थूल यांनी विविध न्यायालयीन खटल्यांच्या संदर्भासह दिली.

          विभागीय आयुक्त श्री.माने म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या कामाचे व्यापक स्वरुप आहे. विभागामार्फत वृद्धांसाठी विविध योजना, त्यांचेसाठी वृद्धाश्रम, निर्वाहभत्ता आदीं सारखे महत्वाचे विषय हाताळले जातात. याच बरोबर शेतकऱ्यांसाठी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण आदी समाजाशी निगडीत महत्वपूर्ण कामे केली जातात. समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी या विभागाचे काम महत्वाचे आहे, असे श्री. माने म्हणाले.

            कार्यशाळेत ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी ‘सामाजिक कायदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका’ या विषयावर बोलताना सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली. ते म्हणाले,  न्याय आणि सामाजिक न्याय हे वेगवेगळे आहेत. कायद्यांच्या माध्यमातून न्याय दिला जातो पण अत्याचाराच्या घटनेनंतर देखील एखाद्या स्त्रीला समाजात वावरताना तिची प्रतिष्ठा राखता आली तर तो सामाजिक न्याय ठरेल.
           बाबासाहेबांनी निर्माण केलेले कायदे हे जीवनाचे सर्व अंग भेदणारे होते. मुलींना शिकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो.  स्त्रीला शिक्षणासाठी आवश्यक ती संधी, साधने आदी सर्व उपलब्ध करुन देण्याबरोबरच तिच्या मताप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र मिळत असेल तर  सामाजिक न्याय झाला असे म्हणता येईल.

          श्री.कांबळे म्हणाले, बाबासाहेबांच्या काळाराम मंदीर प्रवेश सत्याग्रह, महाडचा सत्याग्रह अशा सामाजिक क्रांती नंतरच्या काळात कामगार, महिला या पिडीत, गुलामीतील जीवन जगणाऱ्या मोठ्या वर्गासाठी कायदेमंत्री म्हणून केलेले कायदे त्या काळात प्रथम भारतातच तयार झाले. कामाचे तास निश्चित करणारा प्रथमच झालेला कायदा जागतिक पातळीवर महत्वाचा असल्याचे ते म्हणाले. ते म्हण्‍ळीवील्‍ कायदा उल्लेख्‍ यावेळी त्यांनी सक्तीचे शिक्षण, अस्पृश्यता निवारण बाबत डॉ.आंबेडकरांनी केलेल्या कार्याची माहिती देत राज्यघटनेच्या रुपाने बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानाचा  उल्लेख केला.
          श्री . कलाल म्हणाले, कल्याणकारी राज्य ही संकल्पना आपण स्विकारली आहे, यामुळे सामाजिक सेवा देण्याची जबाबदारी संविधानाने आपल्यावर सोपवली आहे. सामाजिक  भावनेतून काम करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत केलेल्या तरतूदी महत्वपूर्ण ठरत आहेत.
           यावेळी श्री. महाजन, श्री. पाटील, प्रा. देशमुख आदींनी विचार व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते सामाजिक न्या विभागाच्यावतीने तयार केलेल्या नागरी संरक्षण कायदा 1955, अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम 1989 वरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
                                                          0000000

Friday 2 March 2018

‘श्रीमंत भूषण’ पुरस्कार


राज्याच्या उन्नतीसाठी सहकारक्षेत्र समृद्ध होणे गरजेचे- सुभाष देशमुख ख्Pz
      

नाशिक,दि.2 :- राज्याच्या उन्नतीसाठी सहकारक्षेत्र समृद्ध होणे गरजचे असून समाजाची गरज लक्षात घेऊन सहकाराचे जाळे विस्तारीत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
सिन्नर येथे श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य माहेत्सवी वर्ष सांगता समारंभ आणि श्रीमंत भूषण पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार राजाभाऊ वाजे, देवयानी फरांदे,  जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, माणिकराव कोकाटे, सिन्नरचे नगराध्यक्ष करण ढगळे, सुरेश पाटील, पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे, रयत शिक्षण संस्थेचे भगीरथ शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, बंद पडलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि बचतगटांना अनुदान नव्हे तर योगदानातून सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी प्रोत्साहन आणि दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात कुठल्याही प्रकारचे शासकीय अनुदान न घेता 850 संस्था सक्षम होत आहेत. निफाड आणि नाशिक येथील बंद असलेले सहकारी कारखाने आगामी काळात सुरू करण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू  असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. चांगल्या पतसंस्था उभ्या करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. पतसंस्थांनी 20 टक्के लाभ गावाच्या उन्नतीसाठी वापरावा. त्यामुळे सामान्य माणसाला त्याचा लाभ होईल. तरुणांना उद्योजक बनविण्यासाठी त्यांना पतसंस्थांनी आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.भुसे म्हणाले, सहकार क्षेत्रात महाराष्ट्राने देशाला मार्गदर्शन केले आणि या क्षेत्रात राज्याचे योगदानही मोठे आहे. प्रत्येकाच्या सहभागातून विकासप्रक्रीया गतिमान होत असल्याने प्रत्येकाला आपले चांगले योगदान या क्षेत्रात देता येते. ग्रामीण विकासात पतसंस्थांनीदेखील चांगले योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राजकारण व समाजकारण क्षेत्रासाठी तुकाराम दिघोळे, शैक्षणिक कार्यासाठी नीलीमाताई पवार आणि संत साहित्य अभ्यासासाठी ह.भ.प.महामंडलेश्वर डॉ.रामकृष्णदास  लहवितकर यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पतसंस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी आमदार वाजे यांच्यासह पुरस्कारार्थींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000