Friday 9 March 2018

सोशल मिडिया महामित्र


समाज माध्यमांद्वारे विकास संदेशाचे आदानप्रदान व्हावे-रविंद्र सिंगल

नाशिक, दि. 9 :- समाज माध्यमे लोकशिक्षणासाठी महत्वाचे आणि तेवढेच प्रभावी साधन असून त्यांचा उपयोग विकास संदेशांचे आदानप्रदान करण्यासाठी करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी केले.
व्ही.एन.नाईक महाविद्यालयातसोशल मिडिया महामित्रउपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय संवादसत्रात सहभागी स्पर्धकांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

श्री.सिंगल म्हणाले, शासनाच्या विविध योजना, चांगले सामाजिक उपक्रम, शेतकऱ्यांसाठी आवश्यक माहिती आणि चांगल्या विचारांचे आदानप्रदान या माध्यमातून घडल्यास त्याचा लाभ नागरिकांना होईल, तसेच समाज माध्यमांचा दुरुपयोग कमी होण्यास मदत होईल. या माध्यमाचा चुकीचा उपयोग करून त्याद्वारे नागरिकांची फसवणूक होत असल्याने समाजमाध्यमे वापरताना दक्षता बाळगावी. जबादार नेटीझन म्हणून आपली भूमीका अदा करावी, असे त्यांनी सांगितले. माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाने सोशल मीडियाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी चांगला उपक्रम आयोजित केल्याचे ते म्हणाले.

संवाद सत्रात जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, स्वप्नील तोरणे,  संतोष साबळे, सुरेश पाटील, विजयसिंह दुधभाते, चंदुलाल शहा,  किरण लोखंडे, मिलिंद सजगुरे, महेंद्र महाजन, अनिकेत साठे, भावेश ब्राह्मणकर, वैशाली बालाजीवाले, योगेश खरे, नानासाहेब पाटील,  श्रीकांत सोनवणे, वृंदा भार्गवे, प्राची पिसोळकर, दत्ता पाटील, सचिन शिंदे, विवेक ठाकूरआदींनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी प्राचार्य शांताराम बडगुजर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय संवाद सत्रातून जिल्ह्याच्या एकूण 15 क्षेत्रातील प्रत्येकी एक प्रतिनिधीची निवड होणार आहे. सोशल मिडियाचा जबाबदारीपूर्वक वापर व्हावा आणि त्यातून विवेकी समाज घडावा या उद्देशाने प्रथमच अशा उपक्रमाचे आयोजन राज्यभरात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात येत आहे.
------    ----

1 comment: