Saturday 31 December 2016

महाआरोग्य शिबीर

                                    महाआरोग्य शिबीर समन्वयाने यशस्वी करावे -गिरीष महाजन


                 नाशिक दि.31 :- महाआरोग्य शिबिरासाठी जिल्ह्याभरातून येणाऱ्या रुग्णांना  आरोग्याची उत्तम सेवा देण्यासाठी प्रत्येकाने समन्वय ठेवून शिबीर यशस्वी करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

गोल्फ क्लब मैदान येथे 1 जानेवारी रोजी आयोजित महाआरोग्य शिबिराच्या पुर्व नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे आदी उपस्थित होते.

शिबिरात रुग्णांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होवू नये याची दक्षता सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी घ्यावी, अशी सूचना श्री.महाजन यांनी यावेळी केली.
महाआरोग्य शिबिरात प्रत्येकाने सामाजिक जाणिवेतून सहभाग घ्यावा आणि सेवाभावनेने आपली जबाबदारी पार पाडावीअसे श्री.राधाकृष्णन यांनी आवाहन केले.

श्री. शंभरकर यांनी प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी, तालुका शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, आशा सेविका यांनी समन्वय ठेवून प्रत्येक गावातून किती रुग्ण येणार आहेत याची माहिती सोबत ठेवावी, असे सांगितले. ज्या रुग्णांची प्राथमिक तपासणी झाली नाही अशा रुग्णांची महाशिबिरात प्राथमिक तपासणी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री महाजन यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून नियोजनाबाबत सुचना दिल्या.

                                             ************

महाआरोग्य शिबिरासाठी रुग्णांची नोंदणी

महाआरोग्य शिबिरासाठी 75 हजारावर रुग्णांची नोंदणी
       नाशिक दि.31 :- गोल्फ क्लब मैदान येथे 1 जानेवारी रोजी आयोजित महाआरोग्य शिबिरासाठी  जिल्ह्यातील विविध केंद्रात रुग्णांची तपासणी करण्यात आली असून दुपारपर्यंत पर्यंत विविध रोगांच्या एकूण 75  हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.
          जिल्ह्यातून नेत्ररोगाचे 8277 , हृदयरोग 2429 , अस्थि व्यंगोपचार 5515   , जनरल सर्जरी 3146, मेंदूरोग 1623  , बालरोग 2089, मुत्ररोग 1249 , प्लास्टिक सर्जरी 363 , कान-नाक-घसा 4310 , स्त्रीरोग 2311 , जनरल मेडिसीन 5167 , श्वसन विकार 1170 , कर्करोग 250 , ग्रंथीचे विकार 454 , रेडिओलॉजी 353  , दंतरोग 2154 , लठ्ठपणा 281 , आयुष व इतर पारंपरिक उपचारपद्धती 499 , त्वचारोग 2284  आणि मानसिक आरोग्यासंबंधी 908   रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे.
          याव्यतिरिक्त नाशिक महापालिका क्षेत्रातून नेत्ररोगाचे 3635, हृदयरोग881, अस्थि व्यंगोपचार 3126, जनरल सर्जरी 897 , मेंदूरोग 792 , मुत्ररोग 233, कान-नाक-घसा 1465, स्त्रीरोग 817  , जनरल मेडिसीन 2149 यासह प्लास्टिक सर्जरी, बालरोग,  श्वसन विकार , कर्करोग , ग्रंथीचे विकार, रेडिओलॉजी, दंतरोग, लठ्ठपणा, आयुष व इतर पारंपरिक उपचारपद्धती, त्वचारोग  आणि मानसिक आरोग्यासंबंधी   रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.
 राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णालयांमार्फत झालेल्या तपासणीत 6 हजार 557 रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे. विविध खाजगी शिबिराच्या माध्यमातूनदेखील रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.
                                          00000

Friday 30 December 2016

वनराई बहरली

सामुहिक प्रयत्नातून वनराई बहरली

          कळवण तालुक्यातील इन्सी गावाच्या ग्रामस्थांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन संरक्षणाचे अनेक उपाय केल्याने परिसरातील 400 हेक्टर क्षेत्रात दाट वनराई बहरली आहे. वनस्पतींच्या शंभरपेक्षा अधिक प्रजाती इथे असून गावाला या वनाचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे. गावाने संत तुकाराम वनग्राम योजने अंतर्गत जिल्हा स्तरावरील प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.

          इन्सीच्या दाट जंगलात सुर्यकिरणांनादेखील प्रवेश कठीण असतो. विशेष म्हणजे जंगलात फिरताना एकही झाड तोडलेले दिसत नाही.  ग्रामस्थांच्या गेल्या 17 वर्षाच्या प्रयत्नांचे हे फलित आहे. ग्रामस्थांनी स्वत:हून अवैध चराईस आणि वृक्षतोडीस प्रतिबंध केला आहे. समितीचे सदस्य दोन-तीन व्यक्तींच्या गटात गस्त घालून जंगलाचे रक्षण करतात. ग्रामपंचायतीने दोन रखवालदारांची नेमणूक केली असून त्यांच्या मानधनासाठी प्रत्येक कुटुंबाकडून ठरल्याप्रमाणे निधी गोळा केला जातो.

          वणवा लागू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येते. जंगलात आगपेटी घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे. वनक्षेत्रात अतिक्रमण करण्यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. तसे आढळल्यास समितीचे सदस्य वनविभागाला तात्काळ माहिती देतात. अवैध चराईस पुर्णत: प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे गवत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. हे गवत कापून आणण्यास ग्रामस्थांना परवानगी असल्याने चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे.

          जंगलात वन्यजिवांच्या शिकारीसदेखील बंदी करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. त्यामुळे इथे मोर, ससे, घोरपड, कोल्हे, लांडगे, बिबट आदी प्राणी-पक्षी आढळतात. जंगलात नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. त्याखेरीज विविध ठिकाणी चार वनतळे घेण्यात आली आहे. पावसाळ्यात बंधारे बांधून पाणी अडविले जाते. वृक्षांचा पालापाचोळा जंगलातच राहत असल्याने बाष्पीभवन कमी होण्याबरोबर जमिनीचा पोतही चांगला राहण्यास मदत होत आहे. वनराईमुळे जमिनीची धूप थांबून शेतातील मृदेचे रक्षण होण्यास मदत झाली आहे.

          वन परिक्षेत्र अधिकारी बी.आरा.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने ग्रामस्थांशी चांगला समन्वय राखला असून गावात 32 कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. इतरही कुटुंबांना गॅस शेगडी वाटप करण्यात येणार आहे. गावात सभामंडप बांधून देण्यात आला आहे. गावातील धार्मिक कामांसाठी हा मंडप भाड्याने दिला जातो. त्यातून मिळणारा निधी समितीच्या खाजगी खात्यात जमा केला जातो. शेतकऱ्यांना दहा आंब्याची आणि एक लिंबाचे कलम शेतात लावण्यासाठी वाटप करण्यात आले आहे.

गावातील महिलांचे वन संरक्षणासाठी सहकार्य घेण्यात वन विभगाला यश आले आहे. महिलांना वन व्यवस्थापन समितीच्या कार्यकारी मंडळात 50 टक्के सहभाग देण्यात आला आहे. महिलावर्ग जागरूक असल्याने इंधनाची गरज भागविण्यासाठी धसकट, मक्याचे वाया जाणारे लेंडरे, शेणाच्या गवऱ्या आदीचा वापर करण्यात येतो.

इन्सी गावाला प्रवेश करण्यापूर्वी दिसणारे डोंगर आणि गावातील डोंगराचा भाग पाहिल्यावर ग्रामस्थांनी केलेले भरीव कार्य चटकन जाणवते. शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाला साजेशे आणि त्यासाठी इतरांना प्रेरणा देणारे कार्य या गावाने करून दाखविले आहे. विशेष म्हणजे त्यातील सातत्य तेवढेच कौतुकास्पद आहे.
रमेश  पवार-  वीस वर्षापूर्वी गावाभोवती उजाड माळरान होते. आज 106 प्रकराच्या वनस्पतींच्या प्रजातींनी वन नटलेले वन आमच्या गावात असल्याचा अभिमान प्रत्येक ग्रामस्थाला आहे. त्यामुळे वनराई जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्व ग्रामस्थ करतात.

शशीकांत वाघ, वन परिमंडळ अधिकारी- लोकामध्ये जंगलाबद्दल चांगली भावना रुजावी आणि जंगलापासून होणारे फायदे त्यांच्या पर्यंत पोहोचावे यासाठी वनविभागातर्फे विविध योजनांचा लाभ गावाला देण्यात आला आहे. वन संरक्षणाच्या कामात ग्रामस्थांचादेखील चांगला प्रतिसाद असतो.


Thursday 29 December 2016

महाराजस्व अभियान

महाराजस्व अभियानातील काम महत्वपूर्ण
-         राधाकृष्णन बी.


नाशिक, दि.29 :- नाशिक तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण तसेच शहरी भागाची मोठी लोकसंख्या लक्षात घेता त्यांना विविध प्रकारचे दाखले देण्यासह आधार कार्ड नोंदणीसाठी आयोजित महाराजस्व अभियानाचे काम जनतेच्यादृष्टीने महत्वपूर्ण आणि प्रशासनाची विश्वासार्हता वाढविणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.      
      नाशिक तहसिल कार्यालयातर्फे आयोजित महाराजस्व अभियान अंतर्गत भव्य शिबीराच्या व विस्तारित समाधान योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपविभागीय अधिकारी राहूल पाटील, उपविभागीय कृषि अधिकारी गोकूळ वाघ, तहसिलदार राजश्री अहिरराव हे उपस्थित होते.

महाराजस्व अभियानाची 3 वर्षांपासून अंमलबजावणी होत असल्याचे सांगून श्री.राधाकृष्णन म्हणाले, नागरीकांची विविध दाखल्यांची मागणी मोठ्या संख्येने आहे. मंडळस्तरावर यापूर्वी झालेल्या शिबीरांमध्ये देखील विविध योजनांची माहिती देणे, विविध योजना, शिधापत्रिका दाखल्यांसाठी अर्ज स्विकारणे, लाभार्थ्यांना मंजूर लाभ दाखले देण्याचे काम झाले आहे. महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांसाठीचे विविध दाखले देण्यात आल्यास त्यांची शालेय  प्रवेशाच्या वेळी दाखल्यांसाठी होणारी गर्दी टाळता येऊ शकेल, असे ते म्हणाले.
नाशिक तहसिलने महाराजस्व अभियानाद्वारे डिजीटल पद्धतीने दाखले देण्यासाठी केलेल्या सुविधेमुळे वेळेची बचत होऊन मोठ्या लोकसंख्येला सेवा देणे शक्य झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कॅशलेस सेवांसाठी सर्वांनी सहभाग देण्याचे आणि 1 जानेवारी रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबीराचा लाभ गरजूंना होण्यासाठी त्याची माहिती जनतेपर्यंत  पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

श्री. शंभरकर म्हणाले, शासनाच्या योजना जनतेसाठी पोहोचवण्यासाठी  महाराजस्व अभियान चांगला उपक्रम आहे. ग्रामिण भागामध्ये अजूनही लोकांमध्ये चांगल्या आरोग्यासाठी हागणदारी मुक्त गाव (ओडीएफ) व्हावे यासाठी जागरुकता होण्याची गरज आहे. शौचालय बांधण्यासाठी शासन मदत करत असूनही काही ठिकाणी प्रथम शौचालयाचे अनुदान मागण्यात येते. त्यामुळे त्यांचे आरोग्य आर्थिक नुकसान होते आहे.  त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करण्याची आणि जिल्हा पूर्णपणे हागणदारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
तहसिलदार अहिरराव यांनी नाशिक तहसिल कार्यालयाने डिजीआयझेशनसाठी जवळपास 12 लाख 70 हजार कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण केले असून  आधारकार्डचे देण्याचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती दिली. आधार कार्डाचे बँक खात्याबरोबर सींडींग करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, दाखले शिधापत्रिका वाटप करण्यात आले. महाराजस्व अभियान, डिजीटायझेशन प्रक्रिया विविध योजनांच्या अंमलबजावणी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रशस्तिपत्रे देऊन गौरव करण्यात आला.
आमदार प्रा.देवयानी फरांदे सीमा हिरे यांची महाराजस्व अभियानाला भेट

आमदार प्रा.देवयानी फरांदे सीमा हिरे यांनी आज महाराजस्व अभियानाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी विविध शासकिय विभागांच्या स्टॉल्सची पाहणी केली. अभियानासाठी महसूल, आरोग्य, कौल्य विकास, रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन, कृषि, भारत पेट्रोलियम, महावितरण आदी विभागांनी स्टॉल्स उभारले होते.
तसेच उत्कृष्ठ कार्याबद्दल मंडल अधिकारी एम.एस. शेख, नायब तहसिलदार सुदेश कांबळे, तलाठी अनिल रोकडे, आर.एम.परबते, आनंद नगरे, भगवान साबळे यांना प्रशस्तिपत्रे देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांच्या हस्ते विमल अहिरे भारती वर्मा यांना राष्ट्रीय कुटुंब लाभार्थी प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच 19 पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका, उत्पन्न, जात, वय, अधिवास आदी प्रमाणपत्रे देण्यात आली.
महाराजस्व अभियानात विविध 2532 दाखले, प्रमाणपत्रे व मंजूरीपत्रांचे वाटप

अभियानात आज दिवसभरात महसूल विभागाच्या वतीने शालेय उपयोगाचे विविध 1800 प्रकारचे दाखले, 28 सामाजिक आर्थिक लाभाच्या योजनांची मुजूरी पत्रे देण्यात आली. तसेच 374 नवीन व दुबार शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले. तसेच 142 शिधापत्रिकेतील नावे कमी करण्याचे दाखले देण्यात आले. कृषि विभागाच्या वतीने 128 द्राक्ष निर्यात नोंदणी प्रमाणपत्रे, 65 कृषि मृदु आरोग्यपत्रिका वाटप करण्यात आले. तसेच 320 विविध कृषि योजनांसाठी अर्ज स्विकारण्यात आले. याचबरोबर विविध विभागांनी शासकिय योजनांची परिपत्रके, माहिती पत्रे अभियानास भेट देणाऱ्या नागरीकांना वाटप केली.

0000000