Tuesday 27 December 2016

महाआरोग्य शिबिर

महाआरोग्य शिबिरासाठी 6 हजार 560 रुग्णांची नोंदणी
       नाशिक दि.27 :- गोल्फ क्लब मैदान येथे 1 जानेवारी रोजी आयोजित महाआरोग्य शिबिरासाठी  जिल्ह्यातील विविध केंद्रात रुग्णांची तपासणी करण्यात आली असून विविध रोगांच्या एकूण 6 हजार 560 रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणीसाठी  संदर्भित करण्यात आले आहे.
          जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, उपकेंद्र,  जिल्हा रुग्णाल, ग्रामीण रुग्णालय, महापालिका रुग्णालय, विविध खाजगी रुग्णालयात गरजूंची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येत असून त्याद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातून नेत्ररोगाचे 835, हृदयरोग 326, अस्थि व्यंगोपचार 407 , जनरल सर्जरी 431, मेंदूरोग 159, बालरोग 99, मुत्ररोग 138 , प्लास्टिक सर्जरी 46, कान-नाक-घसा 370, स्त्रीरोग 294 , जनरल मेडिसीन 453, श्वसन विकार 130, कर्करोग 28, ग्रंथीचे विकार 53, रेडिओलॉजी 30 , दंतरोग 168, लठ्ठपणा 26, आयुष व इतर पारंपरिक उपचारपद्धती 46, त्वचारोग 216 आणि मानसिक आरोग्यासंबंधी 66 रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे.
          याव्यतिरिक्त नाशिक महापालिका क्षेत्रातून नेत्ररोगाचे 244, हृदयरोग 108, अस्थि व्यंगोपचार 205, जनरल सर्जरी 50, मेंदूरोग 61, बालरोग 17 , मुत्ररोग 37, प्लास्टिक सर्जरी 4, कान-नाक-घसा 106, स्त्रीरोग 50, जनरल मेडिसीन 115, श्वसन विकार 41, कर्करोग 11, ग्रंथीचे विकार 12, रेडिओलॉजी 6, दंतरोग 52, लठ्ठपणा 13, आयुष व इतर पारंपरिक उपचारपद्धती 1, त्वचारोग 54 आणि मानसिक आरोग्यासंबंधी 3 रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे. राजीव गांधी आरोग्यदायी योजनेतील रुग्णालयांमार्फत झालेल्या तपासणीत 750 रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे.
          प्राथमिक तपासणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची पर्यवेक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक शहरातील आयुष रुग्णालय, सुयोग रुग्णालय, सिनर्जी रुग्णालय, संतकृपा रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय नागजी चौक, शताब्दी रुग्णालय, क्युरी मानवता मुंबई नाका, श्री गुरुजी रुगणालय, विजन रुग्णालय, चोपडा रुग्णालय, लाइफ केअर रुग्णालय, सायखेडकर रुग्णालय, वक्रतुंड रुग्णालय, सिक्स सिग्मा  या रुग्णालयातदेखील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
          ग्रामीण तसेच शहरी भागात आरोग्य तपासणीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, आरोग्य अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समन्वयासाठी जिल्हास्तरावर पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
          गरीब आणि गरजू रुग्णांवर आरोग्य शिबिरात मोफत उपचार व शस्त्रक्रीया करण्यात येणार असून त्यासाठी पद्मश्री डॉ.अमित मायदेव, पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, पद्मश्री डॉ.रतन देशपांडे, पद्मविभूषण डॉ.कांतीलाल संचेती, डॉ.सुलतान प्रधान, प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ.रमाकांत पांडा, डॉ.रणजीत जगताप, प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.देवपुजारी, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज, डॉ. शरद हर्डीकर, डॉ.अजय चंदनवाले, डॉ.शैलेश पुणतांबेकर, डॉ.कैलास शर्मा, डॉ.जयश्री तोडकर यांच्यासह नामांकीत डॉक्टर उपस्थित राहणार आहेत.
          पालकमंत्री महाजन यांनी स्वत: विविध उद्योग संघटना, वैद्यकीय क्षेत्रातील संघटना, स्वयंसेवी संस्था आदींना पत्राद्वारे  या जनसेवेच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा शिबीर यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करीत आहे. महाआरोग्य शिबिराची माहिती देण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. सदर ॲपद्वारे शिबीरासाठी नोंदणी करता येणार असून शिबिराबाबतची विस्तृत माहिती उपलब्ध होणार आहे. गुगल प्लेस्टोअरमध्ये नाशिक आरोग्य शिबीर टाईप करून हे ॲप डाऊनलोड करता येईल.
-----


          

No comments:

Post a Comment