Tuesday 20 December 2016

‘मेक इन नाशिक’

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईत नाशिकचे ब्रँडींग आवश्यक
                                                      -पालकमंत्री गिरीष महाजन

          नाशिक दि.20 :-जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्यादृष्टीने ‘मेक इन नाशिक’सारख्या संकल्पनेच्या माध्यमातून मुंबईत नाशिकचे ब्रँडींग होणे आवश्यक आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशविदेशातून चांगली गुंतवणूक येण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

निमा हाऊस येथे आयोजित ‘मेक इन नाशिक’ प्रदर्शनासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार बाळासाहेब सानप, डॉ.राहुल आहेर, एमआयडीसीच्या प्रादेशिक व्यवस्थापक हेमांगी पाटील, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सरचिटणीस उदय खरोटे, मधुकर ब्राह्मणकर, मंगेश पाटणकर, ज्ञानेश्वर गोपाळे आदी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले, नाशिकमध्ये उद्योगासाठी लागणाऱ्या घटकांच्या अनुकूलतेमुळे औद्योगिक विकासाला मोठा वाव आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने जिल्ह्यात यावे यासाठी पालकमंत्री या नात्याने आपण प्रयत्न करीत आहोत. लवकरच त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
जिल्ह्यात कृषिआधारीत उद्योगांनादेखील मोठा वाव आहे. जिल्ह्यात पिकणाऱ्या फळांवर प्रक्रीया करणारे उद्योग उभे राहणे गरजेचे आहे. त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. निमाने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री.महाजन यांनी केले. कोणताही उद्योग अथवा त्याचे युनिट बंद पडल्यास अनेक रोजगाराच्या संधी कमी होतात. त्यामुळे उद्योग बंद पडू नये असेच शासनाचे धोरण आहे. त्यादृष्टीने ‘मेक इन नाशिक’ प्रदर्शनासाठी आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल आणि मुख्यमंत्री महोदय देखील या प्रदर्शनाला उपस्थित राहतील यासाठी व्यक्तिश: प्रयत्न करणार असल्याचे श्री.महाजन म्हणाले.


*******

No comments:

Post a Comment