Sunday 30 July 2017

वातानुकूलित बसपोर्ट भूमीपूजन

नाशिकच्या धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात एकात्मिक बसपोर्ट
                                                              -देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. 30 :-  राज्यातील प्रत्येक तालुक्यात नाशिक येथील मेळा बसस्थानकाच्या धर्तीवर अत्याधुनिक तसेच एकात्मिक बसपोर्ट तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  स्मार्टसिटीचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नाशिक शहरात एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात फायबर ऑप्टीकचे जाळे टाकण्यात येणार असून संपूर्ण शहर वायफाय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मेळा बसस्थानकाच्या ठिकाणी विमानतळाच्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्रातील वातानुकूलित बसपोर्ट उभारले जाणार असून या कामाचा भूमीपूजन कार्यक्रम मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री  गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे,  खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजनी भानसी, एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एस.टी. महामंडळाचे कार्यकारी अभियंता अ.वा. भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी यामिनी जोशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले , एसटीने सामान्य, गरीब, मध्यमवर्गीय माणसांची मोठी सेवा केली आहे. मात्र, त्याच्या गुणवत्तापूर्ण विकासाकडे लक्ष दिले गेले नाही.  प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी शासनाने एसटीमध्ये मोठे फेरबदल झाले. परिवहनमंत्रीच महामंडळाचे अध्यक्ष असतील असा निर्णय झाला. त्यामुळे निर्णय वेगाने होऊ लागले.  नाशिक येथे अत्याधुनिक वातानुकूलित बसपोर्ट उभारणीचा भूमीपूजन समारंभ झाला. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात सर्वसुविधायुक्त एकात्मिक बसपोर्ट सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

सगळ्या बसपोर्टना अत्याधुनिक करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने काम करण्याचा विचार सुरु असल्याचे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, यापुढील काळात राज्यातील सर्वसामान्यांनाही तितक्याच दर्जेदार सेवा कमी किंमतीत या माध्यमातून देता येतील.
मुंबईतील उपनगरी रेल्वे स्टेशन परिसरात शेतकऱ्यांचा भाजीपाला विकण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयामुळे राज्यातील आणि विशेषत: नाशिकमधील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.

नाशिक शहराच्या विकासाचा उल्लेख करुन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हे शहर मी दत्तक घेतले आहे.  नाशिक शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाधारित व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.  फायबर ऑप्टीकच्या जाळ्याच्या माध्यमातून आणि एकात्मिक सीसीटीवी प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचे वाहतूक व्यवस्थापन तसेच सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेणे सोपे होणार आहे, असे त्यांनी सांगितल

नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या पूररेषेचा प्रश्न निकाली काढण्याचं काम लवकरच केले जाईल, असे श्री. फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.  नाशिक जिल्ह्यातून जात असलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग  नाशिकसाठी फायद्याचा असल्याचे ते म्हणाले.  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिकला ड्रायपोर्ट उभारणी करण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे येथील शेतमालाचे कंटेनर मुंबईला जलदगतीने जाऊ शकतील. त्याशिवाय मुंबई- नाशिक हा प्रवासही कमी कालावधीत शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.

रेल्वेमंत्री प्रभु म्हणाले, नाशिक मधील विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने रेल्वेशी संबंधित प्रकल्पांना मंजूरी देऊन ते तातडीने पूर्ण केले जातील. यामुळे विविध मार्गाने कोट्यावधींचे चलन येथे येईल. पुणे-नाशिक रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण केला जाईल. नाशिक मध्ये रेल्वेच्या उत्पादनांसाठी कारखाना उभारण्यात येईल, ज्यामुळे इथल्या पूरक उद्योगाला देखील फायदा मिळेल व रोजगार निर्मिती होईल. केंद्र सरकार मुंबईमधील 36 उपनगरी स्थानके आधुनिक पध्दतीने विकसीत करण्यात असून तेथे प्रवाश्यांच्या उपयोगी अनेक सुविधा दिल्या जातील. यामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला थेट विक्रीची सुविधा करण्यात येणार आहे. मुंबईमध्ये येथून सर्वात जास्त भाजीपाला जात असल्याने जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यामुळे संधी निर्माण होऊन मोठे उत्पन्न मिळेल, असे श्री प्रभु म्हणाले.
ते म्हणाले, रेल्वेच्या विकासात साडे आठ लाख कोटीं रुपयांपेक्षा मोठी गुंतवणूक करण्यात येत असून देशभरातील 100 रेल्वेस्थानकांना अत्याधुनिक स्वरुप दिले जाणार आहे. अनेक प्रकल्पांना अंतिम स्वरुप दिले असून यामुळे नाशिक येथील रेल्वे वाहतूक वाढून त्याचा फायदा मिळेल. या पार्श्वभूमीवर येथे होणारे नवीन बसपोर्ट हे शहरासाठी महत्वाचे ठरेल, असे रेल्वेमंत्री म्हणाले.
परिवहनमंत्री श्री. रावते यांनी राज्यात अशा प्रकारचे  15 ठिकाणी वातानुकूलित बसपोर्ट तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येक ठिकाणची बसस्थानके ही आधुनिक पद्धतीची असावीत, यासाठी महामंडळाने स्वता 60 आर्किटेक्टची नियुक्ती केली. बीओटी तत्वाद्वारे बसस्थानके उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने रद्द केला असून यापुढील काळात अत्याधुनिक बसस्थानके उभारण्याची राज्य शासनाने क्षमता निर्माण केल्याचे ते म्हणाले. खासगी वाहतूकदारांच्या स्पर्धेत आता एसटी महामंडळही उतरले असून कमी किंमतील अधिक चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न असून येत्या 3 महिन्यात दीड हजार लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस सुरु होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या बसस्थानकासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि परिवहनमंत्री रावते यांनी केलेल्या सहकार्याचा आवर्जून उल्लेख केला. खासदार गोडसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमावेळी नाशिक होमगार्डच्यावतीने शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत एक दिवसाच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
शहरातील सर्वाधीक गर्दीच्या ठिकाणी असणाऱ्या या मेळा बसस्थानकाचा विमानतळाच्या धर्तीवर वातानुकूलित आणि सर्वसुविधायुक्त बसस्थानक उभारण्यासाठी 14 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.  याठिकाणी 55 हजार स्क्वेअर फुटाचे  20 बसेसचे प्लॅटफॉर्म  असलेला सर्वांत मोठा बस थांबा याठिकाणी उभारण्यात येणार आहे. यामध्ये नऊ हजार फुटांचे बेसमेंट पार्किंग, प्रवाशांसाठी बाहेर पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, बसस्थानकातील पहिल्या मजल्यावर मिनी थिएटर, 20 गाळे आदी सुविधा असणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी शॉपिंगची व्यवस्था, वाहक आणि चालकांसाठी निवारा कक्ष, अद्यावत सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही आदी सोईसुविधा असणार आहेत.

                                                  ****

बहुउद्देशीय शितगृह भूमिपूजन

वीज, पाणी आणि बाजारपेठ या त्रिसूत्रीद्वारे शेतकऱ्यांना सक्षम करणार
                                                -देवेंद्र फडणवीस


नाशिक, दि.30 : शेतकऱ्याला वीज, पाणी आणि बाजारपेठ मिळावी या त्रिसूत्रीच्या आधारे शासन काम करीत असून त्याद्वारे शेतकऱ्याला सक्षम करीत त्याच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यात येईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
  लासगाव येथे भारतीय रेल्वे व लासलगांव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय शितगृहाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला रेल्वेमंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सिमा हिरे, स्नेहलता कोल्हे, लासलगाव खरेदी विक्री संघाचे चेअरमन नानासाहेब पाटील, कॉनकारचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक व्ही.कल्याण रामा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आर.के. यादव, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,  सुरेश बाबा पाटील आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, कांद्याची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात असण्यासाठी शेतमालाची साठवणूक करणे आणि योग्य दर मिळाल्यावर विकता येईल यासाठी आवश्यक व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने रेल्वेच्या सहकार्याने शितगृहाची  साखळी निर्माण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. देशात उभारण्यात येणाऱ्या 227 पेकी 52 शितगृह महाराष्ट्रात उभारले जात आहे. त्यात्यापैकी 25 आता पूर्ण होतील आणि उर्वरीतही मंजूर करून घेण्यात आले असून तेदेखील लवकरच पुर्ण करण्यात येतील. कोल्ड स्टोरेजसाठी वीज दर कमी करण्याचादेखील शासनाचा विचार आहे.  

शासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे आणि शेतकऱ्यांच्या कष्टामुळे गेल्या दोन वर्षात शेतमालाच्या निर्यातीत वाढ झाली आहे. ग्रेप नेटच्या माध्यमातून 30 हजार द्राक्षबागांची नोंदणी झाली असून द्राक्ष निर्यात गेल्यावर्षी दुप्पट झाली आहे. अनार नेट आणि मँगो नेटच्या माध्यमातून डाळींब आणि आंब्याच्या निर्यातीतही वाढ झाली आहे. टोमॅटो केचअप प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी जपानी कंपनीसोबत करार करण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनाला हमी भाव मिळून दराच्या चढउतारीचा त्याच्यावर परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

 मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्याला अबाधीत वीज पुरवठा करण्यासाठी शासनाने सोलरपंप देण्याची योजना सुरू केली आहे. मात्र त्याच्या मोठ्या संख्येने वितरणावर असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता शासनाने सोलर फिडर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याची सुरुवात राळेगणसिद्धी येथून करण्यात येईल. सोलर फिडरमुळे शेतकऱ्याला अविरत वीज पुरवठा होऊन उत्पादन वाढण्यासाठी मदत होणार आहे.
नाशिकसह मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटविण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोलाची कामगिरी केली असल्याचे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, नार-तापी-नर्मदा आणि दमणगंगा-पिंजार योजनेबाबत ऐतिहासिक करार करण्यात आला आहे. नार-पार खोऱ्यातून गिरणा खोऱ्यात 10 टीएमसी पेक्षा जास्त पाणी आणण्यात येणार असून या कामासाठी साडेचार हजार कोटी खर्च होणार आहे. दुष्काळी तालुक्यांसाठी पाण्याचे नियोजन करणे त्यामुळे सोईचे होईल.

पार खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात पाणी आणले जाईल आणि त्यापैकी 3 टीएमसी पाणी पालखेड समुहात येणार आहे. परसवाडी पोहोच कालव्यासाठी त्यामुळे अधिक पाणी उपलब्ध होईल. दमणगंगा खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात 25 ते 30 टीएमसी पाणी येणार असल्याने पाण्याची तुट संपुष्टात येईल. नाशिक मधील चांदवड, येवला आणि सिन्नर सारख्या नेहमी टंचाईला सामोरे जाणाऱ्या भागासोबतच मराठवाड्यालादेखील याचा लाभ होईल.
 दमणगंगा-एकदरे-गंगापुर योजनेतून 5 टीएमसी पाणी आणि वैतरणा- दमणगंगा- कडवा योजनेतून 7.3 टीएमसी पाणी मिळणार आहे. खानदेश आणि मराठवाडा ‘सुजलाम सुफलाम’ होण्यासाठी या योजना उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रेल्वेच्या माध्यमातून विदर्भासाठी 21 हजार कोटींचे, मराठवाड्यासाठी 19 हजार कोटींचे आणि उत्तर महाराष्ट्रात 22 हजार कोटींचे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. राज्यातील एकूण एक लाख कोटींचे प्रकल्प रेल्वेच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 रेल्वेमंत्री श्री.प्रभु म्हणाले, राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध असून त्यादृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हिताचे अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून या प्रयत्नांना चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून शितगृहांची उभारणी करण्यात येत आहे. ही सुरुवात असून जगातले सर्वोत्तम तंत्रज्ञान उपयोगात आणीत शेतकऱ्यांचा माल प्रक्रिया करुन बाजारात नेण्याच्या दृष्टीने कन्टेनर कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राज्याला सर्व सहकार्य करण्यात येईल.
राज्य शासनासोबत रेल्वेने अनेक प्रकल्प राबविले आहेत. फळ प्रक्रिया मंत्रालयाशी चर्चा करण्यात आली असून त्यासाठी आवश्यकतेनुसार शितगृहाची साखळी निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कामायनी एक्सप्रेसला लासलगांव येथे जाताना- येताना थांबा देण्याची घोषणाही त्यांनी केली.
प्रास्ताविकात नानासाहेब पाटील आणि व्ही कल्याण रामा यांनी शीतगृह प्रकल्पाविषयी माहिती दिली.

----

Saturday 29 July 2017

‘समृद्धी’ साठी जमिन खरेदी

इगतपुरी येथेसमृद्धीसाठी जमिन खरेदीस प्रारंभ


नाशिक दि.29- इगतपुरी येथे समृद्धी महामार्गासाठी जमिन खरेदी करण्याच्या प्रक्रीयेचा शुभारंभ विभागीय आयुक्त महेश झगडे आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत झालादुय्यम निबंधक कार्यालयात धामणगाव ता. इगतपुरी येथील तीन शेतकऱ्यांची मिळून गट नं.242 ची  एकूण 2.0991 हे.आर जमिन खरेदी करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहकार्यकारी संचालक किरण कुरुंदकर, उपजिल्हाधिकारी तथा प्रशासक (नवनगरे) विठ्ठल सोनवणे, उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, तहसीलदार अनिल पुरे, दुय्यम निबंधक झोपे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे तहसीलदार मिनाक्षी राठोड यांनी खरेदी केली. जमिन खरेदीनंतर एका तासात संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात  एकूण 4 कोटी 31 लाख पंधरा हजार पाचशे एकोणसत्तर एवढी रक्कम जमा करण्यात आली. बँकेत रक्कम त्वरीत जमा झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून या रकमेचा उपयोग नवी जमिन खरेदी करून चांगली शेती करण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरीत रक्कम बँकेत ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितलेथेट खरेदीमुळे पंचवीस टक्के रक्कम अधिक मिळाल्याने त्यांनी शासनाला धन्यवाद दिले.

---

Wednesday 19 July 2017

जिल्हा नियोजन समिती बैठक

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकास योजनांचा आढावा
 जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्याचे चित्र बदलले  -गिरीष महाजन


नाशिक, दि. 19 : पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 2016-17 मध्ये विविध योजनांअंतर्गत झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेचा लाभ अधिकाधीक शेतकऱ्यांना देण्याचा शासनाचा प्रयत्न असून या योजनेमुळे राज्याचे चित्र बदलले आहे, असे प्रतिपादन श्री.महाजन यांनी यावेळी केले.
बैठकीस ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, उर्वरीत महाराष्ट्र विकास महामंडळाच्या सदस्या सुधा कोठारी, जिल्ह्याचे पालक सचिव सीताराम कुंटे, विभागीय आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त डॉ.अभिषेक कृष्णा, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मीना, पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.
श्री.महाजन म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने भौगोलिक परिस्थिती पाहून जलयुक्त शिवार योजनेच्या निकषात बदल करण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. या योजनेमुळे टँकर्सची संख्या कमी झाली असून येत्या दोन वर्षात सर्व तालुके टँकरमुक्त होतील. जिल्ह्याने नाले खोलीकरण, धरणातील गाळ काढणे, बंधारे बांधणे आदीच्या माध्यमातून  योजनेच्या अंमलबजावणीत चांगली कामगिरी केली आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकरी कष्टाळू असून माती देखील सुपीक आहे. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याने नदीजोड योजनेच्या माध्यमातून राज्याला अधिकाधीक पाणी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारकडून यासाठी निधी उपलब्ध होऊ शकेल. लवकरच यासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. नदीजोड प्रकल्पामुळे मालेगाव आणि मराठवाड्यालाही फायदा होईल, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेच्या माध्यमातून 9  लाख क्युबीक मीटर गाळ काढण्यात आला आहे. राज्यातील प्रमुख पाच धरणातून प्रायोगिक तत्वावर यंत्राच्या सहाय्याने गाळ काढण्याचा तसेच त्यातील गाळ आणि वाळू वेगळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या उत्पन्नात भर पडण्याबरोबर शेतकऱ्यांनादेखील लाभ होईल, अशी माहिती श्री.महाजन यांनी दिली.
पुरामुळे क्षतीग्रस्त झालेल्या स्मशानभूमी व त्याकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी निधी देण्यास प्राथमिकता देण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
श्री.भुसे म्हणाले, जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी निधी देणे आवश्यक आहे. या शाळांना नाविन्यपूर्ण योजनेतून क्रीडासाहित्य उपलब्ध करून द्यावे. तसेच डिजीटल शाळा आणि ई-लर्निंगच्या सुविधा विकसीत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात यावा.
बैठकीत आमदार जयंवत जाधव, अपूर्व हिरे, बाळासाहेब सानप, जे.पी.गावीत, नरहरी झिरवाळ, निर्मला गावीत, राजाभाऊ वाजे, अनिल कदम, शेख असीफ शेख रशीद, दिपीका चव्हाण, पंकज भुजबळ, देवयानी फरांदे, सीमा हिरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालूवर्षी नऊशे कोटींची तरतूद
जिल्हा वार्षिक योजानेअंतर्गत 2017-18 या वर्षासाठी एकूण 900 कोटी 52 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या पैकी सर्वसाधारण योजनेसाठी 321 कोटी 38 लक्ष, आदिवासी उपयोजनेसाठी 481 कोटी 59 लक्ष आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 97 कोटी 55 लक्ष रुपयांचा समावेश आहे. पालकमंत्री महाजन यांच्या प्रयत्नांमुळे सर्वसाधारण योजनेसाठी 27 कोटी 25 लक्ष रुपयांचा वाढीत नियतव्यय मंजूर झाल्याचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी सांगितले.

----

पोलिस ठाणे नुतन इमारत उद्घाटन

                           आडगाव पोलिस ठाण्याची नवीन इमारत राज्यासाठी पथदर्शी
                                                             -         पालकमंत्री गिरीश महाजन


नाशिक, दि. 19:-  आडगाव पोलिस ठाण्याची नवीन इमारत अद्ययावत  आणि सुसज्ज असून  राज्यातील इतर पोलिस ठाण्यांसाठी ती पथदर्शी इमारत ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत आडगाव पोलिस ठाण्याच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, प्रा.देवयानी फरांदे, सीमा हिरे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या काळात अशा अद्ययावत पोलिस ठाण्यांची गरज आहे.  इमारतीची रचना आणि तिच्यातील दर्जेदार सुविधांमुळे  पोलिस दलाचे मनोबल वाढेल. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांना सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पोलिसांचे प्रश्न सोडविण्याकडेदेखील लक्ष देण्यात येत आहे.  जिल्ह्यातही  पोलिसांसाठी 2200 घरे निर्माण करण्यात येत आहे,  असे ते म्हणाले.
शहराची सुरक्षा वाढवण्यासाठी नाशिक शहरासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, त्याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

पोलिस आयुक्त सिंघल म्हणाले, शहरातील मुंबई नाका व म्हसरुळ पोलिस ठाण्यांसाठी नवीन जागा मिळवून चांगल्या सुसज्ज इमारती देण्याचा प्रयत्न आहे. शहर पोलिस मुख्यालयासाठी देखील 22 मजली इमारत, सुसज्ज फायरींग रेंज आदी देण्याचे प्रस्तावित आहे, असे ते म्हणाले.

याप्रसंगी आमदार सानप, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदींनी विचार व्यक्त केले.
यावेळी इमारतीच्या निर्मितीमध्ये योगदान दिलेल्या पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या अधिक्षक अभियंता वृंदा गिरासे, कार्यकारी अभियंता अरुण नागपुरे,आर्किटेक्ट प्रविण पगार व ठेकेदार शैलेश चापसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आडगाव पोलिस ठाण्यात 8 अधिकाऱ्यांसह 91 पोलिस कर्मचारी नागरीकांसाठी कार्यरत असतील. नवीन इमारतीचे क्षेत्रफळ 2190 स्क्वेअर मीटर असून फर्निचर, बिनतारी यंत्रणा, तपासी अंमलदार, पोलिस अधिकाऱ्यांचे सुसज्ज कक्ष, महिला व पुरुष पोलिसांसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष, कोठडी, नागरीकांसाठी स्वागत कक्ष असणारी ही अद्ययावत इमारत आहे.

000000

Friday 14 July 2017

सतर्कतेच्या सुचना

  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  विभागातर्फे नागरिकांना सतर्कतेच्या सुचना

नाशिक, दि. 14:- हवामान खात्याने  मध्य  महाराष्ट्रात येत्या 24 तासात जोरदार  पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला असल्याने  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्फे नागरीकांना सतर्क रहण्याच्या सूचना देण्यात आल्या  आहेत.
धरण परीसरात पडणारा  पाऊस व धरणाच्या  खालच्या बाजूस पडणाऱ्या पावसामुळे नाले, ओढे, ओहोळ, छोटी-मोठी गटारे, नदीपात्र यामध्ये पुराचे  पाणी  येण्याची  दाट शक्यता आहे. त्यामुळे पावसाचेवेळी नागरिकांनी सतर्क रहावे. लहान मुले, विद्यार्थी, नागरिक यांनी पुराचे पाणी  पाहण्यासाठी जाऊ नये. तसेच नदी काठावर तसेच पुलांवर गर्दी करु नये.
पुराच्या पाण्यातून वाहने चालवू नयेत. वाहने, जनावरे यांना पुराचे पाण्यापासून दुर ठेवावे. पुराच्या पाण्याचे संपर्कात  आलेले व उघड्यावरील अन्नपदार्थ खऊ नये. सर्व प्रकारच्या विद्युत तारा व विद्युत  खांबापासून दूर रहावे. पाण्यातील विद्युत खांब, तारा व विद्युत उपकरणांना  हात लावू नये.
पुराची ठिकाणे, पुलांवर, नदी, ओढे, नाले, धरणे, धबधबे इ. कोणत्याही  धोकेदायक ठिकाणी  सेल्फी  काढण्यास जावू नये. धार्मिक यात्रा व पर्यटनासाठी  जाणाऱ्या प्रत्येक भाविक आणि पर्यटकाने आपत्ती  व्यवस्थापन  नियंत्रण कक्षात पर्यटनाची माहिती द्यावी म्हणजे त्यांचे  अडचणीच्या वेळी  मदत करणे जिल्हा प्रशासनास शक्य होईल.

 नागरिकांनी अधिक माहितीसाठी  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्ष (टोल फ्री-1077, दुरध्वनी -2315080/2317151), नाशिक शहर पोलीस नियंत्रण कक्ष-(टोल फ्री क्र.-100, दुरध्वनी-0253-2305233/2305201/2305200), पोलीस नाशिक ग्रामीण नियंत्रण कक्ष (दुरध्वनी : 0253-2309715/2309718/2309700/2303088) नाशिक शहरातील पाणी  साचणे ,तुबंणे,वृक्ष किंवा इमारत  कोसळणे, सर्व प्रकारची शोध व बचावासाठी  नाशिक महानगर पालिका नाशिक नियंत्रण कक्ष (दुरध्वनी क्र. 2222413/2571872) अग्निशमन  विभाग (दुरध्वनी क्र. 0253-2590871/2592101/2592102) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  विभागातर्फे करण्यात आले आहे.                                                   

Thursday 13 July 2017

‍जिल्हा परिषद आढावा बैठक

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात चांगले काम- दादाजी भुसे


नाशिक, दि. 13:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात चांगले काम होत असून जिल्ह्यातील कळवण, देवळा व नाशिक हे तीन तालुके संपूर्ण हागणदारीमुक्त झाले आहेत, असे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
‍जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि.प. अध्यक्षा शितल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, आमदार राजाभाऊ वाजे, नरहरी झिरवाळ, योगेश घोलप, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, उपायुक्त सुखदेव बनकर,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले असून त्यानुसार जिल्ह्यातील उर्वरीत 560 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट मार्च 2018 अखेर पूर्ण करावयाचे आहे, असे श्री.भुसे यांनी सांगितले.

 ते म्हणाले, गरीब बेघर कुटुंबाना आवास योजनांमधून घरकुल उपलब्ध व्हावेत यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जमीन घेण्यासाठी निधी देण्याची तरतूद असून त्याचा लाभ गरजू लाभार्थ्यांना करुन द्यावा. घरकुलांसाठी 783 लाभार्थ्यांना शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणे गरजेचे आहे असे सांगून श्री.भुसे म्हणाले, शाळाची दुरुस्ती, रंगरंगोटी, कुंपण याबरोबरच ई-लर्निंग  सुविधा असणाऱ्या डिजीटल शाळा करण्यात याव्यात. शिक्षण विभागाने मालेगाव तालुक्यातील शिक्षकांच्या सहाय्यानेपेपरलेस मुख्याध्यापकही संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी तयार केलेले संकेतस्थळ हा अभिनव प्रयोग राज्यातील इतर शाळातदेखील लागू करण्यात येईल. शाळा डिजीटल होण्यासाठी सीएसआर निधी, शासकीय अनुदान व खाजगी दानशूर व्यक्तींचे सहकार्य घेतले जावे, असे ते म्हणाले.

यावेळी ग्रामीण रस्ते विकास, पशुसंवर्धन, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषी, फलोत्पादन, रोहयो, लघु पाटबंधारे, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, अपारंपरिक उर्जा आदी विभागांच्या विविध योजनांची माहिती सादर करण्यात आली. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रउपक्रमांतर्गत मालेगाव तालुक्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांनी तयार केलेल्या संकेतस्थळाचे मंत्री महोदयांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी स्वच्छ भारत अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, गटविकास अधिकारी पी.टी. सोनवणे, महेश पाटील, पुरुष नसबंदीचे  उद्दीष्ट गाठण्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरावर गौरव झाल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदींचा श्री. भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.                                                         

                                              0000000

एनएमआरडीए कार्यालय उद्घाटन

नाशिक महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन


नाशिक, दि. 13 : विभागीय आयुक्त कार्यालय इमारतीत सुरू करण्यात आलेल्या महानगर आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक महानगर विकास प्राधिकरण कार्यालयाचे उद्घाटन नगररचना विभागाच्या सहसंचालक प्रतिभा भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यालयाचे कामकाज आजपासूनच सुरू करण्यात आले आहे.
यावेळी उपआयुक्त प्रकाश वाघमोडे, सहआयुक्त उन्मेश महाजन नगररचना विभागाच्या सहायक संचालक जयश्री सुर्वे तसेच क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.
विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधीची उपलब्धता, पायाभूत सुविधांचा विकास, विकासाचे योग्य नियोजन आणि गुंतवणूक आकर्षित करण्यावर भर देण्यात येईल, असे विभागीय आयुक्त तसेच प्राधिकरणाचे महानगर आयुक्त महेश झगडे यांनी कार्यक्रमानंतर अधिकारी आणि क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले.
महानगर प्रदेश क्षेत्रातील कोणत्याही भागाचा योग्य, शिस्तबद्ध आणि जलद विकास करण्याच्या अनुषंगाने प्राधिकरणाची स्थापना 1 मार्च 2017 रोजी करण्यात आली आहे. नाशिक प्रदेश विकास प्राधिकरणाचे क्षेत्र नाशिक महानगरपालिका क्षेत्र वगळून नाशिक तालुक्यातील ग्रामीण भाग, दिंडोरी , निफाड, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही ग्रामीण भाग मिळून तयार झालेले आहे.

----