Saturday 29 September 2018

शेतकरी संवाद


कृषी उत्पादक कंपन्याबाबत शेतकरी हिताचे धोरण लवकरच-मुख्यमंत्री


नाशिक, दि.29 : कृषी उत्पादक कंपन्याबाबत सर्वसामावेशक व व्यापक शेतकरी हिताचे धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सह्याद्री फार्मस कंपनी येथे आयोजित कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अनेक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधीनी चर्चेत सहभाग घेतला.

 कृषी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून राज्यभरात अतिशय चांगले काम सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, सह्याद्री फार्मर्स कंपनीसारख्या शेतकऱ्यांना एकत्रित करून काम करणाऱ्या कंपन्यांना बळ देण्यासोबतच या कंपन्यांच्या सहकार्याने सर्वसामावेशक शेतकरी हिताचे धोरण राज्य शासन लवकरच तयार करणार आहे.  शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठेचा दर्जा देण्याबाबत  विचार करता येईल, असे त्यांनी सांगितले.

 ते म्हणाले, द्राक्ष निर्यातदाराकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची होणारी फसवणूक  टाळण्यासाठी शेतकऱ्यात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. देशात वाणांच्या नवीन प्रजाती आल्या तर बाजारपेठ मिळणे सुलभ होणार आहे, त्यादृष्टीने शासन आणि शेतकरी यांना एकत्रित काम करावे लागणार  आहे. सौर उर्जेचा वापर वाढविण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगून राळेगणसिद्धी येथे सौरऊर्जेवरील पहिला पथदर्शी प्रकल्प उभा केला आहे, राज्यात याच धर्तीवर सौरप्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-----

सह्याद्री फार्मर्स भेट


कौशल्य विकासाद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण-देवेंद्र फडणवीस

नाशिक,29 : शेती क्षेत्रात कौशल्य विकासाची आवश्यकता असून कौशल्य विकासाद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात येईल आणि त्यासाठी कृषी उत्पादक कंपन्यांची मदत घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दिंडोरी तालुक्यात मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीष महाजन, सकाळ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ.राहुल आहेर, बाळासाहेब सानप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे,  महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, पोलीस अधिक्षक संजय दराडे, सह्याद्रीचे विलास शिंदे आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी  योजनेद्वारे तीन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कृषी उत्पादक कंपनीमुळे एकत्रितपणे मोठ्या बाजारपेठेत जाता येते आणि चांगली गुंतवणूकदेखील करता येते. मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादक कंपन्या उभ्या केल्या आणि त्यांची क्षमता वाढविली तर अनुकूल परिवर्तन होईल, तसेच आंतरराष्ट्रीय बाजाराला आवश्यक उत्पादन घेता येईल.
शेतीची केवळ उत्पादकता वाढविली आणि  विपणनावर लक्ष दिले नाही तर  परिस्थिती बदलता येणार नाही. पूर्वजनांनी निसर्गचक्र जाणून आणि मातीशी नाते जोडून वैज्ञानिक दृष्टीकोनातून शेती केली. कालांतराने शेती पद्धतीत नाविन्य न आणल्याने अनेक वाण लुप्त झाले. निसर्गचक्र बदलल्यावर शेती संकटात जाऊ लागली. ही परिस्थितीत बदलण्यासाठी शासन आणि शेतकरी एकत्रित येण्याची गरज आहे.

  सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याची संघटीत शक्ती कशी काम करते याचा प्रत्यय आला आहे. शेतकरी एकत्रित येऊन जगाची बाजारपेठ काबीज करू शकतो हे दाखवून दिले आहे. सह्याद्रीप्रमाणे राज्याच्या इतरही भागात असे प्रयोग करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.



मुख्यमंत्री म्हणाले, शासनाने हमी भावाद्वारे गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात शेतमालाची खरेदी केली आहे. मात्र केवळ यामुळे समृद्धी येणार नसून शेतकऱ्याला बाजाराशी जोडण्याची गरज आहे. प्रक्रीया उद्योगांना प्रोत्साहन देऊन  शेतमालाला बाजार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.पवार यांनी  शासनाने कौशल्य विकासाची महत्वाकांक्षी योजना राबविल्याचे सांगितले. गटशेतीला प्रोत्साहन देतानाच शेतमालाचे ब्रँडीग आणि मार्केटींग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवारमुळे शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले.

  यावेळी श्री.शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे सह्याद्री फार्मर्स कंपनीविषयी माहिती दिली. तर अमोल बिरारी यांनी ‘भविष्यातील महाराष्ट्र’ या विषयावर सादरीकरण केले. यावेळी  महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी मुख्यमंत्री निधीसाठी यावेळी 21 हजार  रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री फार्मर्स कंपनीला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
----

रोजगार मेळावा


मेक इन महाराष्ट्र’द्वारे रोजगार निर्मितीला चालना-देवेंद्र फडणवीस

नाशिक,29 : ‘मेक इन महाराष्ट्र’ च्या माध्यमातून राज्यात गेल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीला आकर्षित करण्यात आले असून त्याद्वारे रोजगार निर्मितीलादेखील  चालना देण्यात येत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ओझर टाऊनशिप परिसरातील कम्युनिटी हॉल येथे उद्योग विभागतर्फे आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, देवयानी फरांदे, डॉ.राहुल आहेर, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, उप महापौर प्रथमेश गिते, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, पोलीस अधिक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते.

श्री.फडणवीस म्हणाले, उद्योग क्षेत्राला मनुष्यबळ देण्यासाठी तसेच कुशल युवकांना मनुष्यबळाला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योग मेळावा सेतूचे काम करतो. त्यामुळे राज्यात उद्योग विभागातर्फे रोजगार मेळाव्याचा चांगला उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
बदलत्या काळात कौशल्य विकासाला महत्व प्राप्त झाले आहे. रोजगारासाठी शिक्षणाबरोबर कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. कौशल्य विकासासाठी शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहे. राज्याची औद्योगिक प्रगती होत असतना रोजगाराच्या संधीतही वाढ होत आहे.ईपीएफआयच्या सर्वेक्षणानुसार राज्यात गतवर्षी 8  लाख नवे रोजगार निर्माण  झाले. शासन युवकांना संधी उपलब्ध करून देत आहे. त्या संधीच्या लाभ घेत अनुभवाच्या बळावर युवकांनी प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

नाशिक जिल्ह्याला उद्योग क्षेत्रात प्रगतीची संधी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, नाशिक हा औद्योगिक त्रिकोणातील महत्वाचा जिल्हा आहे. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई आणि नाशिक जवळ येऊन पुण्याप्रमाणे नाशिकचा औद्योगिक विकास शक्य आहे. हायस्पीड कनेक्टिव्हीटीमुळे नाशिकच्या कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला लाभ होणार आहे. कृषी क्षेत्रातील गुंतवणूक वाढत असून ड्रायपोर्टमुळे जिल्हा मुंबईशी जोडला जाऊन कृषी विकासाला आणखी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी तरुणाला रोजगार देण्यासाठी संघर्ष केला. रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शासनाचे असेच प्रयत्न असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले.
आमदार कदम म्हणाले, राज्यात रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. राज्य शासनातर्फे त्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नाशिकमध्ये रोजगार मेळाव्यासाठी 12 हजार तरुणांनी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त कांबळे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्राच्या औद्योगिक धोरणाविषयी माहिती दिली. ते म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून राज्यात 12 लाख कोटींची गुंतवणूक केली. उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी अनुकूल धोरण राज्यात राबविण्यात येत असून उद्योग क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत.
00000

Monday 24 September 2018

संत रविदास भवन


 प्रत्येक विभागात संत रविदास भवन उभारण्यात येणार-राजकुमार बडोले

नाशिक दि.24- प्रत्येक विभागात संत रविदास भवन उभारण्यात येईल आणि संत रविदास सन्मान पुरस्काराच्या संख्येत वाढ करण्यात येईल,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप, आमदार सीमा हिरे, योगेश घोलप, भाऊसाहेब कांबळे, रामचंद्र अवसारे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विजय करंजकर आदी उपस्थित होते.
श्री.बडोले म्हणाले, चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील असून चर्मकार आयोगासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. समाजात समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव जोपासला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
-----

मतदार नोंदणी



मतदार नोंदणी करण्याचे आवाहन

नाशिक दि. 24 :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू असून 31 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्षे पुर्ण करणाऱ्या नवमतदारांची नोंदणी करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने 124 नाशिक (मध्य) विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी रविवार 30 सप्टेंबर 2018 रोजी मतदान केंद्रात सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत उपस्थित राहतील. युवकांनी  मतदार नोंदणीसाठी मतदान केंद्रावर फॉर्म क्र. 6 भरून  आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे.
अर्जासोबत दोन पासपोर्ट आकाराची छायचित्रे, रहिवास पुरावा, वयाचा पुरावा, आवश्यक असल्यास जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र सोबत जोडावे. मतदार यादीतील तपशील आणि मतदान केंद्रासंबंधी माहिती ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पहाता येईल, असे सहा. मतदार नोंदणी अधिकारी नाशिक (मध्य) विधानसभा मतदार संघ यांनी कळविले आहे.
-----

कृषी यांत्रिकीकरण


कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन

       नाशिक दि.24- राज्य शासनाच्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण तसेच महिला शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
          यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर व ट्रॅक्टर चलीत औजारांसाठी अनुदान देण्यात येते. इच्छुक शेतकऱ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी त्र्यंबकेश्वर येथे 5 ऑक्टोबर 2018 पर्यंत सादर करावे, असे  आवाहन तालुका कृषी अधिकारी अजय सुर्यवंशी यांनी केले आहे.
----

Sunday 23 September 2018

आयुष्मान भारत


प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ
आदिवासी भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा द्या-गिरीष महाजन


       नाशिक दि.23- केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ आदिवासी भागातील जनतेला मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जि.प.अध्यक्षा शितल सांगळे, महापौर रंजना भानसी, आमदार नरेंद्र दराडे, नरहरी झिरवाळ, डॉ.राहुल आहेर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, दिपीका चव्हाण, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, आरोग्य उपसंचालक रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, डॉ.जयराम कोठारी आदी उपस्थित होते.

श्री.महाजन म्हणाले, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना खऱ्या अर्थाने देशाच्या सशक्तीकरणाची योजना आहे. ही आतापर्यंतची जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून विम्याची रक्कम केंद्र व राज्य शासन भरणार आहे.  जिल्ह्यातील  4 लाख 88 हजार 9 लाभार्थी कुटुंबांना योजनेचा लाभ होणार आहे.

राज्य शासन सामान्य जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे. आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून गरजूंना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरीब व्यक्तिंना उपचारासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील 50 कोटी जनतेला 5 लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करणे शक्य होणार आहे. योजनेचा लाभ अधिकाधीक नागरिकांना देण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.महाजन यांच्या हस्ते रविंद्र बर्वे, दिनेश अहिरे, कादीर शेख, सोमनाथ ताठे, रंजना अहिरे, बाबू बच्छाव, विलास काकुळते आणि योगेश तेलंग यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले.
सन 2011 च्या जनगणनेनुसार  ग्रामीण भागातील भौगोलिक स्थिती, कुटुंबातील कमवती व्यक्ति, अनुसूचित जाती व जमाती, भूमिहीन शेतकरी, आदी 7 वर्गातील कुटुंबाचा तसेच शहरातील कचरावेचक, भिकारी, घरकाम करणारे, फेरीवाले, बांधकाम मजूर, कारागीर आदी 11 वर्गातील कुटुंबांचा योजनेत समावेश आहे.

राज्यातील 83.72 लक्ष कुटुंबांना सध्याच्या विमा कंपनीमार्फत रुपये दीड लाखापर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्यावरील 5 लाखापर्यंतचे विमा संरक्षण राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत अॅश्युरन्स तत्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच अंगीकृत रुग्णालयांचे रुपये दीड लाखवरीत ते 5 लक्ष मर्यादेपर्यंतचे दावे राज्य आरोग्य हमी सोसायटी अदा करील. राज्यातील एकूण 80 शासकीय रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू करण्यात येत असून त्यानंतर खाजगी रुग्णालयांना योजनेत समाविष्ट करून घेण्यात येईल.
केंद्र शासनाने योजनेअंतर्गत 1122 उपचार निश्चित केले आहेत. तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत 971 उपचार समाविष्ट आहेत. दोन्ही योजनांमधील उपचारांचा आढावा घेऊन एकत्रित यादी तयार करण्यात आली आहे. त्यातील उपचारांचा लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.
-----

Friday 21 September 2018

लोकराज्य वाचक मेळावा


जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक-डॉ.बी.जे.भंडारे


नाशिक दि.21- जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन, कौशल्य आणि स्वावलंबन आवश्यक आहे, असे प्रतिपादन केटीएचएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.बी.जे.भंडारे यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालय,नाशिक व के.टी.एच.एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकराज्य वाचक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे,  प्रा.डॉ. दिलीप पवार, प्रा. बाबुराव बोनाटे, प्रा. मोहन पवार, प्रा. रामनाथ रावळ, प्रा.उत्तम जाधव उपस्थित होते.

श्री.भंडारे म्हणाले,स्पर्धेच्या जगात वावरत असतांना अधिक ज्ञान प्राप्तीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन केले पाहिजे. ज्ञानाधारीत समाजात वावरताना प्रगती साधण्यासाठी वाचन हा उत्तम पर्याय आहे.  लोकराज्य मासिक संदर्भासाठी उपयुक्त असून त्यातील यशकथा प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी ज्ञानग्रहण करताना विविध कौशल्यदेखील आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ.पवार यांनी प्रास्ताविकात लोकराज्यचे विशेषांक वाचनीय असल्याचे सांगितले. डॉ.मोघे यांनी राज्य शासनाच्या माहितीदूत उपक्रमाची माहिती दिली.
**********

Thursday 20 September 2018

इमारत भूमिपुजन


                      ग्रामीण भागाच्या विकासात सहकारी पतसंस्थांची भूमीका महत्वाची
                                                                                                 -गुलाबराव पाटील


नाशिक दि.20  - जिल्ह्याने सहकार क्षेत्रात चांगली कामगिरी केली असून ग्रामीण भागाच्या विकासात सहकारी बँका व पतसंस्थांची मोलाची भूमीका आहे, असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
चांदवड येथील दि.चांदवड मर्चंन्टस को-ऑप.बँकेच्या नियोजित प्रशासकीय इमारतीच्या भूमिपुजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा रेखाताई गवळी, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, तहसिलदार शरद मंडलिक, स्वामी जयदेवपुरीजी महाराज, मर्चंन्ट बँकेचे, चेअरमन जगन्नाथ राऊत आदी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, सहकारी क्षेत्र अनेक बदल स्वीकारत असून येत्या काळातदेखील जिल्ह्याच्या विकासात सहकारी बँकांचे योगदान महत्वाचे राहील.  शेतकऱ्यांची काळजी घेणार बँक म्हणून मर्चंन्ट बँकांकडे पाहिले जात असल्याने चांदवड मर्चंट को-ऑप.बँकेने शेतकरी व व्यापारी वर्गाला सहकार्य करावे. बँकेने आपल्या ठेवी  100 कोटी ठेवींच्या घरात पोहचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बँकींग क्षेत्रात मिळविलेल्या पुरस्काराबद्दल त्यांनी बँकेच्या सर्व सदस्यांचे अभिनदंन केले.
यावेळी चांदवड तालुक्यातील पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
**********

लोकराज्य वाचक मेळावा


मोबाईल वापरताना दक्षता घ्या-तन्मय दिक्षीत

नाशिक, 20 : मोबाईल अथवा समाजमाध्यमांचा उपयोग करताना आपली वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तिकडे जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञ तन्मय दिक्षीत यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे क्रांतिवीर वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित लोकराज्य वाचक मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक संपत चाटे, प्राचार्य शांताराम बडगुजर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे आणि प्रा.शरद काकड उपस्थित होते.

श्री.दिक्षीत यांनी मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास घ्यावयाची खबरदारी, इंटरनेट सुरक्षा, वैयक्तिक माहितीची सुरक्षा आदींविषयी माहिती दिली. समाजमाध्यमांचा सकारात्मक कामासाठी उपयोग करा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.चाटे यांनी शासनाच्या कौशल्य विकास योजनांची माहिती दिली. येणाऱ्या काळात बहुविध कौशल्य असलेल्या युवकांना रोजगाराची अधिक संधी असणार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्राचार्य बडगुजर म्हणाले, विद्यार्थी जीवनापासून नाविन्याचा शोध घेतल्यास व्यक्तिमतत्व विकसीत करता येते. वाचन व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहे. राज्य शासनाच्या योजनांची  माहिती मिळविण्यासाठी लोकराज्य मासिक उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.मोघे यांनी विद्यार्थांना माहितीदूत उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
-----