Saturday 1 September 2018

लोकराज्य वाचक अभियान


स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी लोकराज्य उपयुक्त- महेश पाटील

          नाशिक, 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या लोकराज्य मासिकात शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमाची सविस्तर माहिती प्रकाशित होत असल्याने स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी 'लोकराज्य'चे वाचन अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी महेश पाटील यांनी केले.
          लासलगाव कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आयोजित लोकराज्य वाचक अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, उपप्राचार्य डॉ.आर.बी.पाटील, प्रा.किशोर अंकुलेकर, सोमनाथ अरोटे, डॉ.नारायण जाधव, मारुती कंधारे, संजय निकम, जेष्ठ पत्रकार हारुन शेख आदी उपस्थित होते.

          श्री. पाटील म्हणाले, राज्य शासनाचे लोकराज्य आणि केंद्र शासनाचे योजना हे मासिक स्पर्धा परिक्षेची पूर्वतयारी करतांना संदर्भासाठी महत्वाचे आहे. लोकराज्याचे विविध विशेषांक माहितीपूर्ण आणि संग्राह्य असतात. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून  लोकराज्य ग्रामीण भागात घरोघरी गेल्यास शासनाच्या योजनांची माहिती जनसामान्यांना होऊ शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी  'लोकराज्य' वाचनाची सवय ठेवावी , असे आवाहन त्यांनी केले.

          स्पर्धा परिक्षेची तयारी विषयी बोलतांना ते म्हणाले, स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी न्यूनगंड बाजूला सारावा, स्वत:मधील कमकुवत बाबींसंदर्भात आत्मपरिक्षण करुन त्यावर मात करण्याचा प्रयत्न करावा.  स्पर्धा परिक्षेचे स्वरुप समजावून घेत त्याच्या प्रत्येक पैलूंचा विचार करुन अभ्यासाचे नियोजन करावे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमात असलेले विषय चांगल्या प्रकारे आत्मसात केल्यास त्याचा स्पर्धा परिक्षेसाठी चांगला उपयोग होतो. भाषेचा योग्य प्रकारे उपयोग करण्याची कला आत्मसात केल्यास मुलाखतीच्या वेळी आणि लेखनातदेखील चांगला फायदा होतो.
          माहिती विभागाच्या 'महितीदूत' उपक्रमात विद्यार्थी सहभागी झाल्यास त्यांना शासनाच्या योजनांची माहिती मिळेल आणि ती इतरांना देता येईल, असे त्यांनी सांगितले.

          उपप्राचार्य पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी पूर्ण क्षमतेने करावी असे सांगितले. ते म्हणाले, स्पर्धा परिक्षेत यश मिळवयाचे असेल तर वाचनसंस्कृती विद्यार्थ्यांनी अंगिकारली पाहिजे. तसेच आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर स्वत:ला सिद्ध करणे गरजेचे आहे.
          डॉ.मोघे यांनी लोकराज्य वाचन अभियान आणि 'माहितीदूत' उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.   
00000

No comments:

Post a Comment