Thursday 6 September 2018

ढेकू ‘जलयुक्त’


ढेकू परिसरात जलयुक्तमुळे पाणीसाठ्यात वाढ

       नाशिक दि.6-नांदगाव तालुक्यातील ढेकू गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या क्षेत्र उपचार आणि बंधाऱ्याच्या कामामुळे कमी खर्चात अधिक पाणीसाठा निर्माण झाला आहे. गाव जलपरिपुर्ण झाले असून पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांना जलसंधारणाचे महत्व पटले आहे.
ढेकू बु. आणि ढेकू खु. अशा दोन्ही गावात पाणीटंचाई असल्याने उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागे. विहिरीची पाणीपातळी जानेवारीनंतर खालवत असल्याने शेतासाठीदेखील त्यानंतर पिके घेणे कठीण होत असे. जलयुक्तमध्ये गावाची निवड झाल्यानंतर दोन्ही गावात विविध यंत्रणांमार्फत 28 कामे पुर्ण करण्यात आली. या कामांवर 19 लाख रुपये खर्च करण्यात आला. गाळ काढण्याच्या कामात लोकसहभागही चांगला मिळाला.

एकूण 200 हेक्टर क्षेत्रावर कामे घेण्यात आली. ढेकू बु. गावाची पाण्याची एकूण गरज 333 टीसीएम असताना पाणीसाठा 224 टीसीएम होता. नव्या कामांमुळे 205 टीसीएम अतिरिक्त पाणीक्षमता निर्माण झाल्याने पाऊस चांगला आल्यास रब्बीच्या पिकांसाठीदेखील पाणी उपलब्ध होणार आहे.
ढेकू खु. गावात पाण्याची गरज 420 टीसीएम असताना जलयुक्तच्या कामांमुळे एकूण 428 टीसीएम पाणीक्षमता निर्माण झाली आहे. दोन्ही गावात ऑगस्ट महिन्यातील पहिल्याच चांगल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. तयार करण्यात आलेल्या मातीनाला बांध व गॅबिअन बंधाऱ्यामुळे पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर क्षेत्र उपचारामुळे भूजल पातळीतही वाढ झाल्याने विहिरींच्या पाणी पातळीतही फरक झाला आहे.

जलयुक्त शिवार अभियानामुळे कमी पावसाच्या या भागात शेतीच्या माध्यमातून संपन्नता आणण्याचे स्वप्न शेतकरी पाहू लागला आहे.  ग्रामस्थांमध्ये अधिक पाणी अडविण्याची चर्चा सुरु होणे हे जलयुक्त शिवार अभियानाचे यश आहे.
विजय पवार, तालुका कृषी अधिकारी-नांदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत  माथा ते पायथा कामे झाल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊन खरीपानंतर शेतकऱ्यांना दुसरे पीकही घेणे शक्य आहे.

प्रदीप सुर्यवंशी, नागरीक-कंपार्टमेंट बंडींगच्या कामांमुळे शिवारात चांगले पाणी जिरले आहे. त्यामुळे विहीरीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पिकांना आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

-----

No comments:

Post a Comment