Saturday 8 September 2018

साक्षरता दिवस


आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस

       जागतिक स्तरावर 8 सप्टेंबर हा दिवससाक्षरता दिवसम्हणून साजरा करण्यात येतो. युनेस्कोच्या 26 ऑक्टोबर 1966 रोजी झालेल्या सभेत हा दिवस 1967 पासून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. साक्षर आणि विकसीत समाजनिर्मितीच्यादृष्टीने साक्षरतेचे आणि मानव अधिकाराचे मूल्य समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी गेल्या 50 वर्षापासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील हे प्रयत्न सुरू आहेत.
शिक्षणामुळे मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणता येतात.  तसे बदल घडून यावेत यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी शिक्षणाशी संबंधित विविध पैलूंची निवड त्यावर्षासाठीची संकल्पना म्हणून करण्यात येते आणि जागतिक स्तरावर त्यादृष्टीने विविध आयोजन होत असतात.
  यापूर्वी डिजीटल युगातील साक्षरता,  साक्षरतेसाठी जागतिक स्तरावरील समन्वीत प्रयत्न, साक्षरता आणि शाश्वत विकास, साक्षरता आणि सबलीकरण असे विविध विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चिले गेले आहेत. विकासाच्यादृष्टीने शिक्षणाचे असलेले महत्व या सर्वांच्या केंद्रस्थानी होते.
यावर्षीसाक्षरता आणि कौशल्य विकास  ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या विषयाचा विचार 1950 पासून करण्यात येत आहे. कृषी, आरोग्य आणि कामगार क्षेत्रात व्यक्तिच्या कौशल्याला चालना देणारे विविध उपक्रम हाती घेण्यात आले. या उपक्रमांची साक्षरता, तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास आदी क्षेत्रांचा समन्वय साधण्यात चांगली भूमी आहे.
युवकांमधील कौशल्य विकास हा जागतिक स्तरावर दुर्लक्षिला गेलेला विषय आहे. आजही जगातील 102 दशलक्ष युवक शिक्षणाच्या कौशल्यापासून वंचित आहेत. भविष्यातील निरक्षर लोकसंख्या कमी करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील 2030 चे शाश्वत विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी या लोकसंख्येला पुरेसे कौशल्य प्रदान करणे गरजेचे आहे.
       जागतिकीकरणाच्या युगात, डिजीटल तंत्रज्ञान वेगाने जीवनाच्या सर्वच क्षेत्रात बदल घडवून आणत असताना शिक्षणाशी निगडीत नव्या कौशल्याची आवश्यकता भासू लागली आहे. ही नवी कौशल्ये विकसीत करण्याचा विचार शिक्षण क्षेत्राशी निगडीत सर्व घटकांनी करावा हा या दिवस साजरा करण्यामागचा विचार आहे.
       भारतात आणि महाराष्ट्रातही कौशल्य विकासाची संकल्पना शासनस्तरावर वेगाने पुढे नेण्यात येत आहे. राज्याने प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियान हाती घेऊन 2022 पर्यंत 4.5 कोटी मनुष्यबळाचे कौशल्य विकसीत करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवेल आहे. राष्ट्रीय पातळीवरदेखील उद्येागाची गरज आणि युवकांमधील कौशल्य यांची सांगड घालीत रोजगाराची संधी वाढविण्याचे प्रयत्न विविध योजनांच्या माध्यमातून होत आहे.
       साक्षरता आणि कौशल्य विकासाशी निगडीत विविध पैलूंवर शिक्षण क्षेत्राशी निगडीत विविध संस्था आणि सामाजिक संस्थांमध्ये चर्चा घडून येणे अपेक्षित आहे. शिक्षण प्रवाहात व्यक्तिला सक्षम करणारे आणि विशेषत: रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे कौशल्य समाविष्ट करणे आणि युवकांना त्याकडे आकर्षित करणे ही काळाची गरज आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचा हाच संदेश असावा.
                                           ----

No comments:

Post a Comment