Tuesday 31 October 2017

एकता दौड

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकता दौडचे आयोजन


नाशिक, दि.31 :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवूनएकता दौडचा शुभारंभ झाला. याप्रसंगी मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपायुक्त रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.  

राष्ट्राच्या एकतेसाठी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची महत्वाची भूमिका होती. स्वतंत्र भारताला एक अखंड राष्ट्राचे रुप देण्यात त्यांचे महत्वाचे योगदान होते. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा घ्यावी, असा संदेश आज विभागीय आयुक्त झगडे यांनी रॅलीच्या समारोप प्रसंगी दिला.

 दौडचा शुभारंभ शिवाजी स्टेडीअम येथून करण्यात आल. सीबीएस, जुना आग्रा रोड, त्र्यंबक नाका, सिव्हील हॉस्पीटल मार्गे गोल्फ क्लब मैदानावर रॅलीचा समारोप झालारॅलीत शासकीय अधिकारी-कर्मचारी, एनसीसी, होमगार्ड, पोलिस दल, स्पोर्टस क्लब- विविध संस्थाचे सदस्य व नागरीकांनी सहभाग घेतला.

                                                0000

Monday 30 October 2017

जनता दरबार

नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवा
जनता दरबारात पालकमंत्री गिरीष महाजन यांचे निर्देश

नाशिक, दि.30 :- शासकीय विभागांनी आणि संबंधीत यंत्रणांनी नागरिकांच्या समस्या तत्परेने सोडवाव्यात आणि कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी सौजन्याने संवाद साधावा, असे निर्देश पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले. यावेळी एकूण 295 अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.
पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जि.प.अध्यक्षा मनिषा सांगळे, महापौर रंजनाताई भानसी,  आमदार अनिल कदम, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, नरहरी झिरवाळ, डॉ.राहुल आहेर, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त डॉ.अभिषेक कृष्णा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपायुक्त दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर आदी उपस्थित होते.

सकाळी अकरा वाजता जनता दरबारला सुरूवात झाल्यानंतर प्रथम नाशिक तालुक्यातील नागरिकांच्या समस्यांवर सुनावणी झाली. त्यानंतर जिल्ह्यातील इतर  तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी झाली.  नाशिक 33, दिंडोरी 22, निफाड 65, पेठ 5, सिन्नर 73, त्र्यंबकेश्वर 12, सुरगाणा 7, इगतपुरी 25, देवळा 21, चांदवड 22 आणि कळवण तालुक्यातील 8 नागरिकांच्या समस्यांबाबत सुनावणी झाली. मालेगाव, बागलाण, येवला आणि नांदगाव तालुक्यासाठी 6 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता मालेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील मालू कॉम्प्लेक्स कॉलेज ग्राऊंड येथे ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिक मनपा क्षेत्रातील एक स्वातंत्र्य सैनिकाची समस्या आणि दुसरी अंध-अपंगांना विविध योजनांचा लाभ देण्याबाबतच्या दोन समस्यांवर सुनावणी झाली. इतर अर्जांवर 16 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 2 वाजता राजीव गांधी भवन येथे सुनावणी घेण्यात येणार आहे.

   प्रत्येक नागरिकाची आणि अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेत श्री.महाजन यांनी नागरिकांच्या अर्जावर निर्णय दिले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कार्यवाही करून संबंधितास त्याबाबत कळविण्यात यावे तसेच तक्रारींबाबत सकारात्मक दखल घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
वृद्ध कलावंतांना मानधन देण्याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  त्वरीत समिती स्थापन करावी आणि निर्णयप्रक्रीया पुर्ण करावी, पेसा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा परिषदेने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, निफाड तालुक्यातील शिवरस्त्याबाबत मोजणी करून अतिक्रमणधारकांकडून वसूली करावी, निफाड तालुक्यातील गोरठाण येथील डीपी तातडीने बसवावी, प्रत्येक गावात स्माशनशेड होईल यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, नाशिक-दिंडोरी आणि नाशिक-येवला रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावी, ओझरखेड गावातील पर्यटन विकासाबाबत कामे करताना गावातील सुविधांबाबत सुधारीत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री.महाजन यांनी विविध समस्यांबाबत सुनावणी करताना दिले.

ते म्हणाले, गोदावरी नदीत सांडपाणी सोडण्याचा प्रकार गंभीर आहे. नद्यांचे पाणी प्रदुषीत झाल्याने धरणांचे पाणीदेखील प्रदुषीत होत असल्याने शासनस्तरावर ही समस्या दूर करण्यासाठी गांभिर्याने विचार सुरू आहे. केंद्र सरकारनेदेखील यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. नगरपालिकांना याबाबत सुचना देण्यात आल्या असून एसटीपी प्लँटसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

सुरगाणा येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचा प्रश्न तातडीने निकालात काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या वसतीगृहासाठी शासनाने आतापर्यंत अडीच कोटी रुपये खर्च केला आहे. त्र्यंबकेश्वर येथील इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांची तिसऱ्या हप्त्याची रक्कम आठ दिवसात जमा करावी, असेही त्यांनी सांगितले. चणकापूर धरणातून म्हसाड पाणी योजनेच्या माध्यमातून गिरनारे आणि इतर गावांना पाणी पोहोचविण्यासाठी 98 कोटीच्या योजनेस मान्यता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिली.
जनता दरबारात पालकमंत्र्यांनी महसूल, पोलीस, महावितरण, परिवहन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आदी विविध विभागांबाबतच्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि समस्या दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
         


क्षणचित्रे-
*सकाळी 9 वाजेपासून नागरिकांनी गर्दी करण्यास सुरूवात केली.
*सकाळी ग्रामीण भागातील आणि दुपारून शहरी भागातील नागरिकांची नोंदणी करण्यात आली.
*नोंदणीसाठी प्रशासनातर्फे चोख व्यवस्था
*टोकन क्रमांकानुसार क्रमाने समस्येची सुनावणी
*तालुक्याच्या क्रमांकानुसार नागरिकांना ध्वनीक्षेपकावरून सुचना देण्याची व्यवस्था
*उपक्रमाबाबत नागरिकांकडून पालकमंत्र्यांना धन्यवाद.
*नागरिकांना बसण्यासाठी स्वतंत्र प्रतिक्षा कक्ष
*रात्री नऊ वाजेपर्यंत पालकमंत्री महोदयांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत सुनावणी घेतली.




निमा कार्यक्रम

विकासासाठी लहान उद्योगही महत्वाचे-अनंत गिते

नाशिक, दि.30 :  कृषी आणि उद्योग क्षेत्रांचे देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान असून  देशाच्या विकासासाठी मोठ्या उद्योगाएवढेच लहान उद्योगही महत्वाचे आहेत,  असे प्रतिपादन केंद्रीय अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्री अनंत गिते यांनी केले.
नाशिक इंडस्ट्रीअल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) च्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर, सार्वजनिक उद्योगांचे प्रतिनिधी, उद्योग, व्यवसाय आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. गिते म्हणाले, केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना स्वायतत्ता दिली आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्या तीन वर्षापूर्वी 14 हजार कोटी रुपये तोट्यात होत्या. त्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आज नफ्यात आल्या आहेत. निमाच्या प्रयत्नामुळे सार्वजनिक उद्योग व खाजगी उद्योग जवळ येण्यास सुरुवात झाली असून हे संबंध जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला पूरक ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले,  एक नवीन उद्योग उभारला गेल्यास त्यामुळे शेकडो- हजारो जणांना रोजगार उपलब्ध होतो. उद्योगांसाठी अधिकाधिक व्हेंडर नोंदणी होणे चांगले असून त्यामुळे स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन त्याचा परिणाम गुणात्मक वाढ होण्यावर होईल. यासाठी नवीन उद्योजकांना प्रोत्साहन दिले जावे, अशी अपेक्षा श्री.गिते यांनी व्यक्त केली.

‘मेक इन नाशिक’ उपक्रमामुळे नाशिक येथील औद्योगिक गुंतवणूकीसाठी उपयोगी वातावरण तयार होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नाशिक येथील रस्ते, रेल्वे व विमान मार्गांची कनेक्टिव्हिटी उद्योगांना पोषक असून लवकरच येथून विमानसेवा सुरु होईल असे ते म्हणाले.
याप्रसंगी खा.गोडसे, निमाचे अध्यक्ष श्री. पाटणकर आदींनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि., भारत इलेक्ट्रिकल लि., गोवा शिपयार्ड लि., मिश्र धातू लि. , माझगाव डॉकयार्ड लि. आदी सार्वजनिक उद्योगांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मंत्री महोदयाच्या हस्ते सन्मान करण्यात आला.                                    
                                                        *******


Sunday 29 October 2017

‘जनता दरबार’

सोमवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जनता दरबार

नाशिक, दि.29 :  पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियेाजन सभागृह येथे सोमवार 30 ऑक्टोबर 2017 ‘जनता दरबार’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे पालकमंत्री नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करतील.
          ग्रामीण भागातील नागरिकांची नोंदणी सकाळी 9 ते 10.30 या वेळेत तर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्यांची नोंदणी  दुपारी 1.00 ते 2.00 दरम्यान करण्यात येईल. सकाळी 11 वाजता ग्रामीण भागाच्या व दुपारी 2.30 वाजता शहरी भागातील तक्रारींची सुनावणी करण्यात येईल.
 नोंदणीसाठी पाच टेबल ठेवण्यात येणार असून प्रत्येकी तीन  तालुक्यांसाठी एक टेबल असणार आहे. नोंदणी करताना  नागरिकांना टोकन क्रमांक देण्यात येणार आहे. आपल्या क्रमाची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी ध्वनीक्षेपकावरून टोकन क्रमांकाची घोषणा करण्यात येणार असून त्या क्रमाने नागरिकांना तालुकानिहाय सभागृहात प्रवेश देण्यात येणार आहे. उर्वरीत नागरिकांना बसण्यासाठी स्वतंत्र प्रतिक्षा कक्ष उभारण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी स्वतंत्र नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
 निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव आणि तहसीलदार एस.एस.देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज पूर्वतयारीची पाहणी केली. जनता दरबारसाठी येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या वाहनासाठी छत्रपती शिवाजी स्टेडिअम, गोल्फ क्लब आणि डोंगरे वसतीगृह मैदान येथे पार्कींगची सुविधा करण्यात येणार आहे. बैठकीसाठी सर्व शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
----

          

Friday 27 October 2017

राष्ट्रीय एकता दौड

राष्ट्रीय एकता दौडमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे-महेश झगडे

      नाशिक, दि. 27 :-  'राष्ट्रीय एकता दिवस' व 'राष्ट्रीय संकल्प दिवस' उत्साहाने साजरा  करण्यासाठी  31 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकता दौडमध्ये शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्था आदी सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी आज केले.
          नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात   सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने  'राष्ट्रीय एकता दिवस' तसेच     स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी  निमित्त 'राष्ट्रीय संकल्प दिवस' कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आयोजित  बैठकीत ते बोलत होते.  यावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे, उपायुक्त  रघुनाथ गावडे, उपायुक्त प्रकाश वाघमोडे, उपायुक्त प्रवीण  पुरी, नाशिक शहर मुख्यालय पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे,  निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव,   जिल्हा क्रीडा अधिकारी  रविंद्र नाईक आदी  उपस्थित होते. 

        श्री. झगडे म्हणाले, विभागातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी व महत्वाच्या शहरांमध्ये राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ, राष्ट्रीय एकता दौड व सायंकाळी संचलन, मानवंदना आदींचे नियोजन करण्यात यावे.   राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सर्व शासकीय कार्यालयात  मंगळवार 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11-00 वाजता अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  'राष्ट्रीय एकता दिवसा'ची शपथ घ्यावी.
           राष्ट्रीय एकोपा वाढीस लागावी या उद्देशाने राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन, देशभक्तीपर गाणी व नामवंत वक्त्यांची व्याख्याने आदी  आयोजित करण्यात यावीत.   जिल्ह्यातील तळागाळातील जनतेपर्यंत राष्ट्रीय एकता दिवस व राष्ट्रीय संकल्प दिवसाची माहिती  पोहचविण्यासाठी विभाग प्रमुखांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. 
          यावेळी विभाग प्रमुखांनी  'राष्ट्रीय एकता दिवस' व 'राष्ट्रीय संकल्प दिवसा'निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. 

नाशिक शहरात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन
          मंगळवार 31 ऑक्टोबर, 2017 रोजी सकाळी 7-00 वाजता श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून  राष्ट्रीय एकता दौडचा शुभारंभ होणार आहे.  श्री छत्रपती शिवाजी  स्टेडियम   त्र्यंबक नाका मार्गे, गोल्फ क्लब मैदान येथे दौडचा समारोप होईल, अशी माहिती श्री. रविंद्र नाईक यांनी  दिली. 
राष्ट्रीय एकता दौड मध्ये सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षणाधिकारी उच्च माध्यमिक यांचे अधिनस्त असलेले विद्यार्थी,  राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व इतर खेळाडू तसेच सेवाभावी संस्था,  700 स्काऊट, गाईडचे विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होणार  आहेत.   सायंकाळी  पोलीसांचे संचलन आयोजन  करण्यात येणार  आहे. 
-0000000

Wednesday 25 October 2017

मालेगाव दुर्घटना

वडेल येथील मृतांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत-गिरीष महाजन


          मालेगाव, दि. 25 - अजंग व दाभाडी रस्त्याजवळील तलावात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून दुर्घटनेत मृत पावलेल्या मालेगाव तालुक्यात वडेल येथील मृत शेतमजुर महिलांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधुन खास बाब म्हणुन प्रत्येकी रुपये 1 लाखाची मदत करण्यात येईल, तसेच जखमींना खाजगी रुग्णालयात  उपचारांसाठी लागणारा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिली. 

पालकमंत्री महाजन आणि राज्यमंत्री यांचेकडून मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींची विचारपूस, उपचाराचा खर्च शासन करणार व सटाणानाका रोड येथील सुविधा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करुन जखमींना औषधोपचार करण्याच्या सुचना केल्या. त्यानी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांचे सात्वंन केले. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त महेश झगडे, प्र. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस प्रमुख संजय दराडे, उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसिदार अवळकंठे, पोलीस उप अधिक्षक अजित हगवणे, गजानन राजमाने आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, टॅक्टर चालकाच्या चुकीमुळे सदर घटना घडली असून चालकावर कायदेशीर कारवाई होईल. घटनेच्या वेळी काही महिलांचे प्राण वाचविणाऱ्या  मुलींच्या धाडसाचे त्यांनी  कौतुक केले.
**********




Monday 23 October 2017

फवारणी करतांना खबरदारी

 पिकांवर किटकनाशकांची फवारणी करतांना घ्यावयाची खबरदारी

       यवतमाळ जिल्ह्यात कापूस व सोयाबीन पिकावर किटकनाशकांची फवारणी करतांना शेतकरी व शेतमजूरांना विषबाधा होण्याच्या घटना 6 जुलैपासून सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकरी व शेतमजूर यांनी किटकनाशकांची फवारणी करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
 *किटकनाशकांची फवारणी करताना सर्व शेतकरी व शेतमजूर यांनी प्रतिबंधात्मक किटचा म्हणजेच हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, ॲप्रॉन, बुट इत्यादीचा वापर कटाक्षाने करावा.
* किटकनाशकांची फवारणी शेतमजूरामार्फत केली जात असतांना शेतमजूरांना संरक्षक किट पुरवून, त्यांना आवश्यक त्या सूचना देण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी शेतमालकाची आहे. त्यानुसार शेतमालकाने नैतिक व कायदेशीर जबाबदारी पूर्ण पाडावी, जेणेकरुन, संभाव्य शारिरीक व जिवित हानी टाळता येईल.
* शेतमालकाने किटकनाशकांची फवारणी करतांना स्वत:ला, घरातील कुटुंबियांना अथवा शेतमजूरांना विषबाधा झाल्यास प्रथमोपचार करण्याच्या दृष्टीकोनातून प्रथमोपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध करुन ठेवावे.
* पिकावर किटकनाशकांची फवारणी करताना शक्यतो सकाळच्या सत्रात वारे नसताना करावी. कारण उष्ण, दमट व प्रखर उन्हामध्ये किटकनाशकाशी संपर्क आल्यास शरीरात विष भिनण्याची प्रक्रिया वेगाने होते.
* पिकावार किटकनाशकांची फवारणी करताना फवारणी करणाऱ्या व्यक्तीने वारे वाहणाऱ्या दिशेला तोंड करुन किटकनाशकांची फवारणी केल्यास किटकनाशकाचा फवारा मोठ्या प्रमाणात शरीरावर पडून शरीरात विष भिनण्याची शक्यता असते.
* पिकावार किटकनाशकांची फवारणी करताना जवळपास अन्य व्यक्ती अथवा जनावरे यांची उपस्थिती असणार नाही याबाबत आवश्यक ती काळजी घ्यावी.
* किटकनाशकांपैकी ऑर्गेनोफॉस्फरस अथवा कार्बामेट अथवा क्लोरीन गटातील किटकनाशके (उदा. प्रोफॅनोफॉस, प्रोफॅनोफॉस+ सायपरमेथ्रीन यांचे मिश्रण, मोनोक्रोटोफॉस, डायफेन्युरॉन, इत्यादी ) ही जहाल असल्याने त्यांच्या फवारणीवेळी आवश्यक ती खबरदारी न चुकता घेण्यात यावी.
* किटकनाशकांची फवारणी करताना त्यासोबत कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहिती पत्रकातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, तसेच किटकनाशकांचे पाण्यामध्ये मिश्रण तयार करताना कंपनीने घालून दिलेल्या प्रमाणानुसारच मिश्रण तयार करावे. विहीत प्रमाणापेक्षा पाण्यामध्ये किटकनाशकांची जास्त  मात्रा झाल्यास, पिकांना,तसेच, जिवितास धोका वाढतो,ही बाब विचारात घ्यावी.
* किटकनाशकांची फवारणी करताना शेतमालकाला स्वत:ला विषबाधा झाल्यास त्याने तात्काळ प्रथमोपचार घ्यावेत. तसेच, शेतमजूर अथवा अन्य व्यक्तीस विषबाधा झाल्यास त्याच्यावर तात्काळ प्रथमोपचार करावेत. प्रथमोपचारानंतर स्वत: अथवा संबंधित शेतमजूराला तात्काळ जवळच्या शासकीय अथवा खाजगी रुग्णालयात दाखल करुन उपचार घ्यावेत.
* शेतमालकाने , माणसूकी व सामाजिक कर्तव्याचे भान ठेवून विषबाधेच्या घटनेची माहिती, कृषी सहाय्यक, पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्याला, तहसिलदार, पोलीस ठाणे अंमलदार, आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक अथवा जिल्हाधिकारी यांना तात्काळ कळवावी. बाधित व्यक्तीच्या कुटुंबियांनासुद्धा शेतमालकाने अवगत करावे.
* शेतमालकाने अथवा शेतमजूरांनी विषारी किटकनाशके लहान मुले अथवा जनावरे यांच्यापासून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. तसेच किटकनाशकांची फवारणी केल्यानंतर, शिल्लक राहिलेले किटकनाशक, किटकनाशाचे डबे, पॅकिंग, बॉक्स, इत्यादी मटेरिअल काळजीपर्वूक नष्ट करावे अथवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
* किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमालकाने अथवा शेतमजूरांनी फवारणी दरम्यान अथवा फवारणी पूर्ण झाल्यानंतर साबणाने स्वच्छ हात व तोंड धुतल्याशिवाय काहीही खाऊ अथवा पिऊ नये. फवारणीनंतर साबणाने स्वच्छ आंघोळ करावी. शेतमजूराला संरक्षक किट व साबण पुरविण्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी शेतमालकाची आहे.
* शेतमालकाने किटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजूराची सरकारी दवाखान्यामार्फत वर्षातून किमान एकदा शारिरीक तपासणी करुन घ्यावी.
           अधिक माहितीसाठी नजिकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी  संपर्क साधावा.

 ---

Wednesday 18 October 2017

दिवाळी अंक प्रकाशन

जिल्ह्यात पर्यटन विकासाला चांगली संधी - डॉ.सुभाष भामरे


       नाशिक, दि.18 :  जिल्ह्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व लक्षात घेता पर्यटन विकासाला चांगली संधी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.
          दै.सकाळच्या पर्यटन विषयावर आधारीत दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ.भामरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सकाळचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, लक्ष्मण सावजी, दादाजी जाधव, दत्ता भालेराव तसेच पर्यटन क्षेत्राशी संबंधीत मान्यवर उपस्थित होते.
डॉ.भामरे म्हणाले, नाशिक वेगाने विस्तारणारे शहर आहे. येथे  धार्मिक आणि वैद्यकीय पर्यटन विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. पर्यटनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे रोजगार निर्माण होऊन अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते. यादृष्टीने पर्यटनाकडे पाहण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. दिवाळी अंकाच्या माध्यमातून  पर्यटनाबाबत माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा दै.सकाळचा प्रयत्न स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन क्षेत्राशी संबंधीत संस्थांनी बाहेरील पर्यटक जिल्ह्यात येतील यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
  

---

कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रम

कर्जमुक्तीचा प्रारंभ शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी - डॉ.सुभाष भामरे
 
       नाशिक, दि.18 :  राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टीने सक्षम करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन प्रयत्नशील असून कर्जमुक्तीचा प्रारंभ शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रजंनाताई भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, डॉ.राहुल आहेर, अनिल कदम, प्रभारी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, सहकार सहनिबंधक मिलिंद भालेराव  आदी उपस्थित होते.

       डॉ.भामरे म्हणाले,  गारपीट, दुष्काळ आणि अवेळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला होता. त्याला सक्षम करणे महत्वाचे होते. कर्जाच्या दुष्टचक्रातून बळीराजाची सुटका करण्यासाठी शासनाने कर्जामाफी जाहीर केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवा विश्वास निर्माण होऊन ते नव्या उमेदीने शेती करतील आणि कृषीक्षेत्राच्या विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 ते म्हणाले, राज्य शासनाने शाश्वत शेतीसाठी जलयुक्त शिवार अभियान सुरु केले. या अभियानाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाल्याने त्याचे लोकचळवळीत रुपांतर झाले आहे. या अभियानामुळे 20 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. 15 हजार गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे सुटला असून पुढील दोन वर्षात 10 हजार गावे टंचाईमुक्त होतील.
          केंद्र शासनाने देखील प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून राज्यातील 26 प्रकल्पांना प्राधान्याने आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे. त्यामुळे अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

          श्री. गावडे म्हणाले, जिल्ह्यातून एक लाख 74 हजार 525 शेतकरी कुटुंबाचे अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले आहेत आणि गावनिहाय यादी देखील उपलब्ध झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 1040 केंद्र कार्यरत होते.   योजनेतील पात्र शेतकऱ्यांपैकी प्रातिनिधीक स्वरुपात प्रत्येक तालुक्यातील दोन शेतकरी कुटुंबांना संपूर्ण कर्जमाफी झाल्याबाबतचे बेबाक प्रमाणपत्रे वितरण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही असे प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
          मान्यवरांचे हस्ते 30 शेतकरी कुटुंबांचा साडी-चोळी, शाल देऊन सत्कार करण्यात आला आणि संपूर्ण कर्जमाफी बेबाक प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले . यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्यस्तरीय कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले.

---

Thursday 12 October 2017

कृषी आढावा बैठक

कृषी ग्रामसभेचा ‘नाशिक पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवणार-सदाभाऊ खोत

          नाशिक दि. 12-  कृषी विभागामार्फत ग्रामीण भागात कृषी ग्राम सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्य व उपयुक्त असून कृषी ग्रामसभेचा ‘नाशिक पॅटर्न’ संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
          कृषी प्रशिक्षण केंद्रात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एन.जगताप , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.

          श्री. खोत म्हणाले, सर्व कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष गावात भेटी देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्यावर उपाययोजना सुचविण्यात याव्यात. शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
          कृषी निविष्ठा केंद्रात शासनाने प्रमाणित केलेल्या औषधांची यादीप्रमाणे विक्री होत असल्याबाबत कृषी निरीक्षकांनी दुकानांची तपासणी करावी. तसेच या संदर्भात मार्गदर्शनासाठी मेळावे, बैठकांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही यावेळी श्री. खोत यांनी दिले.

पाणी पुरवठा योजनांचा आढावा
          महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेबाबत राज्यमंत्री श्री.खोत यांनी जिल्हानिहाय आढावा घेतला. तसेच नोव्हेंबर 2017 पासून जिल्हास्तरीय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात यावे आणि कामांना गती द्यावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

---