Friday 6 October 2017

‘आरसेटी’मुळे मार्गदर्शन

‘आरसेटी’मुळे  बेरोजगारांना व्यवसायाचे मार्गदर्शन
                                 

नाशिक दि.6- ग्रामीण भागातील युवकांना व्यवसायासाठीचे कौशल्य देण्यासाठी महाबँक ग्रामीण रोजगार प्रशिक्षण केंद्रामार्फत 136 विविध प्रकारच्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमातून 3 हजार 380 बेरोजगारांना प्रशिक्षीत करण्याचे काम करण्यात आले आहे. या पैकी 2 हजार 494 प्रशिक्षणार्थींनी स्वत:चे व्यवसाय सुरु केले आहे.

जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकिय समितीच्या सल्याने ‘आरसेटी’ प्रशिक्षण केंद्राचे कामकाज सुरु आहे. समितीत जिल्हा रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र, मुक्त विद्यापीठाचे कार्यक्रम समन्वयक आदी तज्ज्ञांचा समावेश आहे. केंद्रासाठी लिड बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक अशोक चव्हाण, केंद्राचे संचालक सदाशिव पाटील यांचे मार्गदर्शन व योगदान महत्वपूर्ण ठरले आहे.

प्रशिक्षणासाठी वयोमर्यादा 20 ते 35 वर्षे असून दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती, मनरेगाचे लाभार्थी यांना प्राधान्य देताना वयाची मर्यादा  45 वर्षे आहे. प्रशिक्षण सत्रांची माहिती जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, सर्व शासकिय बँक शाखांमध्ये दिली जाते. मोफत प्रशिक्षण, व्यवसायासाठी विविध योजनांमधून कर्ज, प्रशिक्षण काळात मोफत निवास भोजनाची व्यवस्था केली जाते.  

ग्रामीण स्वयंरोजगारासाठी काम करण्याच्या भुमिकेतून यावर्षी साधारण 28 प्रकारच्या विविध व्यवसायांचे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पॉलिहाऊस शेती, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया, ड्रेस डिझायनिंग, ब्युटीपार्लर, शिलाई, दुकान व्यवस्थापन, लेदर शिलाई मशीन आदींचा यात समावेश आहे. प्रशिक्षणार्थीं युवक, महिला आणि मुली यांना निवासी पध्दतीने प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आहे. यासोबतच नाविन्यपूर्ण इतरही व्यवसायांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी नोंदणी करुन व्यवस्था केली जाते.

राष्ट्रीय स्तरावर गौरव
भारत सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाने महाबँक ग्रामीण रोजगार संस्थेच्या नाशिक येथील ‘आरसेटी’ प्रशिक्षण केंद्राच्या कार्याची दखल घेऊन 7 जून 2017 रोजी देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. नवी दिल्ली येथे कार्यक्रमात नाशिक केंद्राचे संचालक सदाशिव पाटील यांनी हा पुरस्कार केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री व वित्त राज्यमंत्री यांच्या हस्ते स्विकारला आहे. युवकांना व्यवसायाचे कौशल्य देण्याबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची कामगिरी महत्वाची ठरली आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यातही केंद्राची भूमीका महत्वाचीच म्हणावी लागेल.

रविंद्र पवार, प्रशिक्षक समन्वयक- ग्रामीण भागातील युवकांना अनेक प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यावर व ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती, सेवा कौशल्य  देण्यावर प्रशिक्षणात भर देण्यात येतो.  गावपातळीपर्यंत पोहोचून गरजूंना शोधून यासाठी मुलाखतीद्वारे प्रशिक्षणासाठी निवड केली जाते


आरसेटी केंद्राच्यावतीने गावोगावी उद्योजकता मेळावे घेऊन पंचायत समिती, ग्रामपंचायत व अग्रणी, राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधून या प्रशिक्षणाबाबत माहिती देण्यात येत असून प्रशिक्षणाबाबत अधिक माहितीसाठी संस्थेच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र इमारत, 3 रा मजला, सार्वजनिक वाचनालयासमोर, नेहरु गार्डनजवळ,  टिळक पथ, नाशिक येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत भेट द्यावी.

शांताराम शेवाळे, बेकरी व्यावसायिक- मी दीड वर्षापूर्वी ‘आरसेटी’ मधून उद्योजकता विकास प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर फक्त  बेकरी उत्पादनांची विक्री न करता स्वत: उत्पादन सुरु करण्यासाठी मी भाड्याने जागा घेऊन उत्पादन सुरु केले. आता सध्या महिन्याकाठी  60 ते 65 हजार रुपये यामधून उलाढाल होत आहे. यासाठी केक, पेढा, बर्फी आदी पदार्थ बनवित असल्याने नफ्यात वाढ झाली आहे.

     00000

No comments:

Post a Comment